बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २ रा

अध्याय दुसरा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ जैसे मानससरोवरवेष्टित ॥ मराळ दिसती शोभिवंत ॥ तैसे श्रवणासी बैसले संत ॥ लोचन अनंत जयांसी ॥१॥
श्रवणीं ऐकतां संतसज्जन ॥ वाचेसी पारणें होय पूर्ण ॥ जैसा राकाइंदु विलोकून ॥ सरितानाथ उचंबळे ॥२॥
कीं वर्षाकाळीं गंगसी पूर ॥ कीं घन गर्जतां नाचती मयूर ॥ कीं वसत देखोनि सुंदर ॥ कोकिळा गर्जे आनंदें ॥३॥
कीं रवि देखतां कमळें विकासती ॥ कीं दाता देखोनि याचक हर्षती ॥ तैशा देखोनि संतमूर्ती ॥ वाग्देवीस आनंद ॥४॥
जैसी इंद्रापुढें रंभा ॥ दावी नृत्यकौतुकशोभा ॥ तैसी देखतां संतसभा वाग्वल्ली आनंदे ॥५॥
कैसे द्यावे दृष्टांत ॥ हें मी नेणें निश्र्चित ॥ परी माझे अन्याय समस्त ॥ संतीं पोटांत घालावे ॥६॥
शिवकंठी हाळाहळ ॥ कीं सागरापोटीं वडवानळ ॥ कीं सृष्टीचा भार सकळ ॥ पाताळीं कूमें धरियेला ॥७॥
सकळां प्रकाशक जैसा शशी परी द्वितीयेसी लोक वाहती दशी ॥ कीं हिमनगजामातासी ॥ धत्तूरपुष्पें समर्पिती ॥८॥
तैसेचि हे शब्द निश्र्चित ॥ सज्जनीं हृदयीं धरिले सत्य ॥ असो प्रथमाध्यायीं गतकथार्थ ॥ उद्धरिला वाल्मीक नारदें ॥९॥
रामकथेचा आरंभ येथूनी ॥ जेवीं मूळसंकीर्ण कृष्णावेणी ॥ परी पुढें विशाळ समुद्रगामिनी ॥ जाणिजे सज्जनीं कथा तैसी ॥१०॥
कमलोद्भवापासून निश्र्चितीं ॥ पुत्र जाहला त्या नाम पुलस्ती ॥ महातपस्वी जैसा गभस्ती ॥ चारी वेद ज्यासी मुखाद्रत ॥११॥
तृणबिंदुकन्या देववर्णीं ॥ ते पुलस्तीची जाण गृहिणी ॥ विश्रवा नामें तिजपासोनि ॥ पुत्र जाहला विख्यात ॥१२॥
भारद्वाजकन्या महासती ॥ ती दिधली विश्रव्याप्रति ॥ त्यांचे पोटीं निश्र्चिती ॥ कुबेर पुत्र जन्मला ॥१३॥
विश्रव्यापासोनि जन्म पूर्ण ॥ म्हणोनि नाम वैश्रवण ॥ तेणें तप करोनि दारुण ॥ चतुरानन वश केला ॥१४॥
कमळासन संतुष्टोन ॥ पौत्रपुत्र म्हणोन ॥ लंका पुष्पक देऊन ॥ सागरोदरीं स्थापिला ॥१५॥
पूर्वीं विधीनें लंका निर्मिली ॥ ती दानवीं बळेंचि घेतली ॥ मागुती निर्जरीं सोडविली ॥ मग दिधली कुबेरातें ॥१६॥
तो पाताळींचा दैत्य सुमाळी ॥ विप्रवेषें आला भूमंडळीं ॥ लंका देखोन तये वेळीं ॥ मनामाजी आवेशाला ॥१७॥
म्हणे हे लंका आमुची निश्र्चित ॥ हा कोण येथें राज्य करित ॥ समाचार घेतां जाहलें श्रुत ॥ सर्व वृत्त तयाचें ॥१८॥
कुबेर देखोनि सुंदर ॥ दैत्य करी मग विचार ॥ याचे पित्यासी साचार ॥ कन्या देऊं आपुली ॥१९॥
तिजपासोन जे होती सुत ॥ तयां साह्य होऊं सर्व दैत्य ॥ हें लंकाराज्य समस्त ॥ हिरोन घेऊं क्षणार्धें ॥२०॥
ऐसा सुमाळी दैत्य दुर्जन ॥ विप्रवेष अवलंबून ॥ आला लटिकीच शांति धरून ॥ कपटी पूर्ण दुरात्मा ॥२१॥
जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतळपण ॥ कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥२२॥
कीं गोरियाचें गायन ॥ कीं दांभिकाचें वरिवरी भजन ॥ धनलुब्धाचें तत्त्वज्ञान ॥ परधनहरणार्थ ॥२३॥
वरिवरी सुंदर इंद्रावण ॥ किंवा बकाची शांति पूर्ण ॥ कीं वेश्येचें मुखमंडण ॥ कामिकमनहरणार्थ ॥२४॥
कीं साधुवेष धरोनि शुद्ध ॥ यात्रेसी फिरती जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे निरंजनीं शुद्ध ॥ सिद्ध होऊन बैसले ॥२५॥
असो ऐसा सुमाळी पापराशी ॥ तेणें आपुली कन्या कैकसी ॥ घेऊन आला विश्रव्यापाशीं ॥ प्रार्थोनि त्यासी दिधली ॥२६॥
म्हणे मी अकिंचन ब्राह्मण ॥ एवढें घ्या जी कन्यारत्न ॥ ऋृषीनें कापट्य नेणोन ॥ लाविलें लग्न तियेसीं ॥२७॥
दैत्य गेला स्वस्थानासी ॥ एके दिवशीं ते कैकसी ॥ सूर्य जातां अस्ताचळासी ॥ भोग पतीसी मागत ॥२८॥
जे संध्याकाळीं होय गर्भिणी ॥ तरी महातामसी जन्मे प्राणी ॥ तो होमकाळ साधोनी ॥ कैकसी मागे भोगातें ॥२९॥
स्वस्त्रीस भोग न दे जरी ॥ तरी बाळहत्त्या पडे त्याचे शिरीं ॥ होम द्यावया दुराचारी ॥ जाऊं नेदी ऋृषीतें ॥३०॥
परम क्षोभोनियां ऋषी ॥ अंगसंग केला तियेसी ॥ म्हणे तूं विप्रकन्या नव्हेसी ॥ महातामसी पापरूपे ॥३१॥
ब्रह्मराक्षस तुझें उदरीं ॥ पुत्र होतील दुराचारी । येरी पतीचे चरण धरी ॥ एक तरी सुपुत्र देइंजे ॥३२॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ तिसरा भक्तराज बिभीषण ॥ तो पितृवरदानेंकरून ॥ साधु पूर्ण जन्मला ॥३३॥
कुंभकर्ण जेव्हां जन्मला ॥ मुख पसरोन टाहो फोडिला ॥ तेणें भूगोळ थरारिला ॥ प्रळय गमला जीवांसी ॥३४॥
ताटिका शूर्पणखा भगिनी जाण ॥ तरी त्यांत रत्न बिभीषण ॥ जैसा कागाविष्ठेंत अश्र्वत्थ पावन ॥ केवळ स्थान विष्णूचें ॥३५॥
कीं वासयांत कोकिळा श्रेष्ठ केवळ ॥ कीं शिंपीमाजीं मुक्ताफळ ॥ कीं दैत्यकुळीं भजनशीळ ॥ प्रल्हाद पूर्वीं जन्मला ॥३६॥
यावरी गोकर्णतीर्थीं जाऊन ॥ तिघे करिती अनुष्ठान ॥ रावणें आराधिला अपर्णारमण ॥ कुंभकर्णें कमलोद्भव ॥३७॥
श्रीविष्णूचें आराधन ॥ करिता जाहला बिभीषण ॥ ब्रह्मा येऊनि वरदान ॥ देता जाहला तिघांतें ॥३८॥
रावण मागे वरदान ॥ इंद्रादिदेव काद्रवेयगण ॥ यांसी बंदिशाळे रक्षीन ॥ सर्वांसी मान्य आज्ञा माझी ॥३९॥
संपत्ति संतति विद्याधन ॥ व्हावे सकळकळाप्रवीण ॥ याउपरि कुंभकर्ण ॥ वर मागे अपेक्षित ॥४०॥
तों देव जाहले उद्विग्न ॥ काय मागेल कुंभकर्ण ॥ कीं हें चराचर भक्षीन ॥ ऐसें वरदान मागेल काय ॥४१॥
कीं गिळीन म्हणे भूगोळ ॥ कीं दाढे घालीन ऋृषिमंडळ ॥ मग सरस्वतीतें देव सकळ ॥ प्रार्थिते जाहले तेधवां ॥४२॥
तूं जिह्णाग्रीं वससी देवी ॥ तरी त्या दुष्टासी भ्रांति घालावी ॥ लोकीं सुखी राहिजे सर्वीं ॥ ऐसें वदवीं सरस्वती ॥४३॥
कुंभकर्ण आधींच राक्षस ॥ सरस्वती भ्रांति घाली विशेष ॥ तों विधि म्हणे घटश्रोत्रास ॥ अपेक्षित माग कांहीं ॥४४॥
मग बोले कुंभकर्ण मज निद्रा दे कां संपूर्ण ॥ अखंड करीन मी शयन ॥ चतुरानन अवश्य म्हणे ॥४५॥
तत्काळ निद्रा येऊन ॥ पडिला जैसा प्राणहीन ॥ सुषुप्तीमाजी सर्वज्ञान ॥ बुडोन गेलें तयाचें ॥४६॥
मंदराचळ आडवा पडला ॥ कीं महावृक्ष उन्मळला ॥ निद्राभरें घोरूं लागला ॥ तेणें दश दिशा घुमघुमती ॥४७॥
म्हैसे हस्ती श्र्वापदें काननीं ॥ श्र्वासासरसीं प्रवेशती घ्राणीं ॥ उच्छास टाकितां धरणीं ॥ बाहेर पडती आरडत ॥४८॥
निद्रा देहाची समाधी जाण ॥ निद्रा जीवात्म्याचें आवरण ॥ कीं भ्रांतीचें विश्रांतिस्थान ॥ कीं अज्ञान मूर्तिमंत ॥४९॥
निद्रा तस्काराची सहकारी ॥ ध्याना अनुष्ठाना विघ्न करी ॥ चातुर्य विद्या कळाकुसरी ॥ निद्रेमाजी बुडती पैं ॥५०॥
 
अध्याय दुसरा - श्लोक ५१ से १००
निद्रा मरणाची सांगातिणी ॥ निद्रा रात्रीची ज्येष्ठ भगिनी ॥ निद्रा जीवाची विश्रांतिकारिणी ॥ आयुष्य हरोनी नेतसे ॥५१॥
स्थूळ सूक्ष्म कारणें पाहीं ॥ बुडोन जाती सुषुप्तीडोहीं ॥ असो कुंभकर्णास शुद्धि नाहीं ॥ जागा कदा नोहेचि ॥५२॥
कुंभरकर्ण निद्रासागरीं ॥ बुडोन गेला अहोरात्रीं ॥ पिता देखोन चिंता करी ॥ म्हणे व्यर्थ जन्म याचा ॥५३॥
मग तेणें प्रार्थिला कमळासन ॥ मागतसे हें वरदान ॥ षण्मास जाहलिया एक दिन ॥ सर्व सुखभोग यातें असो ॥५४॥
मग बिभीषणासी चतुर्वक्र ॥ म्हणे माग इच्छित वर ॥ तंव तो सत्त्वशीळ पवित्र ॥ काय बोलतां जाहला ॥५५॥
म्हणे सत्समागम सच्छास्त्रश्रवण ॥ दया क्षमा उपरति भजन ॥ निंदा वाद द्वेष गाळून ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५६॥
आशा तृष्णा मनसा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ ममता अअविद्या सांडूनि जाणा ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५७॥
काम क्रोध मद मत्सर ॥ मोह लोभ अहंकार ॥ हे दूर करोनि साचार ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५८॥
धन्य बिभीषणाची स्थिती ॥ केवळ ओतिली सुखाची मूर्ती ॥ कीं भक्तिरूप श्रीरामकीर्ती ॥ विस्तारिली आधीं पुढें ॥५९॥
सूर्याआधीं उगवे अरुण ॥ कीं ज्ञानाअगोदर भजन ॥ कीं भजनाआधीं वैराग्य पूर्ण ॥ तैसा बिभीषण जन्मला ॥६०॥
तपाअगोदर शुचित्व पूर्ण ॥ कीं बोधाआधीं सत्त्वगुण ॥ कीं सत्त्वाआधीं अद्भुत पूर्ण ॥ पुण्य जैसें प्रगटतें ॥६१॥
कीं साक्षात्काराआधीं निजध्यास ॥ मननाआधीं श्रवण विशेष ॥ कीं श्रवणाआधीं सुरस ॥ आवडी पुढें ठसावे ॥६२॥
कीं शमदमाआधीं विरक्ती ॥ कीं आनंदाआधीं उपरती ॥ कीं आत्मसुखाआधीं शांती ॥ पुढें येऊन ठसावे ॥६३॥
तैसा आधीं जन्मला बिभीषण ॥ जैसें फळा अगोदर सुमन ॥ विधी संतोषला ऐकोन ॥ म्हणे वंश धन्य याचेनि ॥६४॥
रामउपासक जे संत ॥ तयांचीं लक्षणें हींच निश्र्चित ॥ अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसादि सर्व गुण जेथें ॥६५॥
अंतरीं निग्रह करून ॥ शांतिरसें भरले पूर्ण ॥ आत्मस्तुति मनांतून ॥ स्वप्नीं जयांसी नावडे ॥६६॥
दुज याचे दोषगुणरीती ॥ हें कधीं नावडे जयांचे चित्तीं ॥ पराचे उत्तम गुण वनिती ॥ न विसरती कदाही ॥६७॥
गर्व नेणती अणुमात्र ॥ कोणसी न बोलती निष्ठुर ॥ आपुली निंदा ऐकतां साचार ॥ तिरस्कार नुपजेचि ॥६८॥
जैसे मेघ क्षारजळ प्राशिती ॥ परी पृथ्वीवरी गोड वर्षती ॥ धेनु तृण भक्षोनि देती ॥ क्षीर अमृतासारिखें ॥६९॥
इक्षुदंडासी घालिती खत ॥ तरी गोड होय रसभरित ॥ गंगा पाप जाळूनि पुण्य देत ॥ तैसे संत जाणावे ॥७०॥
परिस लोहकाळिमा झांकोन ॥ तत्काळचि करी सुवर्ण ॥ तैसेचि महाराज सज्जन ॥ परदोष लपविती ॥७१॥
जैसी कुळवंत कामिनी ॥ अवयव झांकी क्षणोक्षणीं ॥ तैसें आपुलें सुकृत झांकोनी ॥ सज्जन जन ठेविती ॥७२॥
असो सर्वलक्षणयुक्त ॥ बिभीषण परम भक्त ॥ तयासी विष्णुनाभ सत्य ॥ वर देता जाहला ॥७३॥
विरिंचि म्हणे साचार ॥ तुज भेटेल श्रीरघुवीर ॥ तो चिरंजीव करील निर्धार ॥ शशी-मित्र असती जों ॥७४॥
रावण कुंभकर्ण ते वेळे ॥ मेळवूनि राक्षसदळें ॥ प्रहस्त महोदर धांविन्नले ॥ प्रधान जाहले रावणाचे ॥७५॥
विद्युज्जिव्ह जंबुमाळी ॥ वज्रदंष्ट विरूपाक्ष बळी ॥ खर दूषण त्रिशिरा सकळी ॥ विद्युन्माली माल्यवंत ॥७६॥
मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ शुक सारण दुर्धर समस्त ॥ बळ महाबळ धांवत ॥ रावणा वेष्टित सर्वही ॥७७॥
सकळ दळभार घेऊन ॥ लंकेवरी गेला रावण ॥ कदा नाटोपे वैश्रवण ॥ बहुदिन युद्ध करितां ॥७८॥
मग रावणें काय केलें ॥ पितयाचें पत्र आणिलें ॥ कुबेरासी पाठविलें ॥ येरें वंदिलें मस्तकीं ॥७९॥
उकलोनि वाची वैश्रवण ॥ आंत लिहिलें वर्तमान ॥ तुझा सापत्नबंधू रावण ॥ लंकाभुवन यास दीजे ॥८०॥
पितृआज्ञा ते वेदवचन ॥ मानोनि निघाला वैश्रवण ॥ सकळ संपत्ति पुष्पकीं घालोन ॥ विरिंचीपासीं गेला पै ॥८१॥
मग कनकाद्रीचे पाठारीं ॥ निर्मूनि अलकावती पुरी ॥ कुबेर तेथें ते अवसरीं ॥ विष्णुसुतें स्थापिला ॥८२॥
मयासुर मंदोदरी आणि शक्ती ॥ देता जाहला रावणाप्रती ॥ दीर्घज्वाळा बळीची पौत्री ॥ ते दीधली कुंभकर्णा ॥८३॥
सरमानामें गंधर्वकन्या ॥ ते दिधली बिभिषणा ॥ सकळ भूप शरण रावणा ॥ लंकेसी येती भेयेंचि ॥८४॥
रावणें सर्व देश जिंकिले ॥ गाईब्राह्मणांसी धरोनी बळें ॥ मुखीं घालोनियां सगळे ॥ दाढेखाली रगडित ॥८५॥
आकांतलें पृथ्वीचे जन ॥ कोठें लपावया नाहीं स्थान ॥ मग कुबेरें स्वर्गीहून ॥ सांगोनि पाठविलें रावणा ॥८६
कुबेरसेवक बोले वचन ॥ तुम्ही ऋषिपुत्र वेदसंपन्न ॥ टाकिली वेदांचीं खंडें करून ॥ शास्त्रज्ञान नसे तुम्हां ॥८७॥
आम्ही जाणते एक सृष्टीं ॥ ऐसा अभिमान वाहतां पोटीं ॥ गोब्राह्मण देखतां दृष्टीं ॥ मारितां कैसे अधर्मी हो ॥८८॥
समजोनियां शास्त्रार्थ ॥ मग कर्में करणें अनुचित ॥ त्यासी ऐहिक ना परमार्थ ॥ भोगील अनर्थ अनेक तो ॥८९॥
अवलक्षणी कुरूपी देख ॥ दर्पणीं न पाहे आपुलें मुख ॥ तोंवरीच अभिमान अधिक ॥ स्वस्वरूपाचा वाहतसे ॥९०॥
तैसे दोष आचरती ॥ मग धर्मशास्त्र विलोकिती ॥ परी वीट न मानिती चित्तीं ॥ नवलरीती हे वाटे ॥९१॥
ऐसें बोलतां कुबेरदूत ॥ रावण क्रोधावला अद्भुत ॥ व्याघ्रमुखीं मुष्टिघात ॥ ताडितां जेंवी खवळे पैं ॥।९२॥
पदीं ताडितां महाउरग ॥ कीं शुंडा पिळितां मातंग ॥ कीं घृतें शिंपितां सवेग ॥ पावक जैसा खवळे पैं ॥९३॥
ऐसा सक्रोध रावण ॥ सकळ दळभार सिद्ध करून ॥ रात्रीमाजी जाऊन ॥ घाला कुबेरावरी घातला ॥९४॥
संपदा आणि पुष्पक ॥ वस्तू हरिल्या सकळिक ॥ मग तो कुबेर यक्षनायक ॥ गेला शरण शक्रातें ॥९५॥
मग तो कुबेर ते वेळां ॥ शक्रें कोशगृहीं ठेविला ॥ असो रावणासी पुत्र जाहला ॥ मेघनाद प्रथमचि ॥९६॥
एक लक्ष पुत्रसंतति ॥ सवा लक्ष पौत्रोत्पति ॥ ऐशीं सहस्र युवती भोगितां रावण न धाये ॥९७॥
अठरा अक्षौहिणी वाजंत्रीं ॥ गर्जताती अहोरात्रीं ॥ पृथ्वीचे भूप महाद्वारीं ॥ कर जोडूनि उभे सदा ॥९८॥
अस्तां जातां दिनकर ॥ कर्पूरदीपिका अठरा सहस्र ॥ पाजळोनि सभेसमोर ॥ निशाचर तिष्ठती ॥९९॥
इंद्राचिया भयें पर्वत ॥ रावणासी शरण येत ॥ शक्र आमुचे पक्ष छेदित ॥ रक्षीं त्वरित आम्हांसी ॥१००॥
 
अध्याय दुसरा - श्लोक १०१ ते १५०
लंकेश तयासी अभय देत ॥ तुम्ही गज व्हा अवघे पर्वत ॥ समस्त अचळां मानली मात ॥ जाहले उन्मत्त वारण ॥१॥
रावण देवांवरी चालिला ॥ मेघनादें इंद्र ते वेळां ॥ ऐरावतीसगट पाडिला ॥ निजबळें रणांगणीं ॥२॥
ऐसा सत्रावेळां सहस्रनेत्र ॥ जिंकी मंदोदरीचा पुत्र ॥ मग इंद्रजित नाम थोर ॥ ब्रीद तेथोन ऐसें बांधिलें ॥३॥
पाश घालोनि पाकशासन ॥ इंद्रजितें आणिला बांधोन ॥ मग विरिंची आला धांवोन ॥ होय प्रसन्न शक्रजिता ॥४॥
अपेक्षित देवोनि वर ॥ सोडविला पुरंदर ॥ मग रावणें देव समग्र ॥ सेवेलागीं ठेविले ॥५॥
शक्रें आणावे नित्य हार ॥ छत्र धरी रोहिणीवर ॥ रसाधिपती निरंतर ॥ वाहे नीर धांवतचि ॥६॥
गभस्ति होय द्वारपाळ ॥ कुबेर आणि अनिळ ॥ यांही सडासंमार्जन सकळ ॥ गृहामाजी करावें ॥७॥
वस्त्रे धूत वैश्र्वानर ॥ पुरोहित जाहला विष्णुपुत्र ॥ पांडित्य करी अंगिराकुमर ॥ नारद तुंबर गाती सदा ॥८॥
दहावेळां शिव पूजिला ॥ रावण दश वक्रें पावला ॥ वीस हस्त लाधला ॥ शिवही केला वश तेणें ॥९॥
कोणे एक समयी रावण ॥ पुष्पकविमानीं बैसोन ॥ कैलासगिरी चढतां पूर्ण ॥ तों नंदी रक्षण महाद्वारीं ॥११०॥
म्हणे नको जाऊं लंकापती ॥ शिव-उमा आहेत एकांतीं ॥ ऐसें ऐकतां मयजापती ॥ परम क्षोभ पावला ॥११॥
नंदीस म्हणे ते वेळे ॥ तुज मर्कटाचेनि बोलें ॥ मी न राहें कदाकाळें ॥ जाईन बळेंकरूनियां ॥१२॥
ऐसें बोलतां दशकंधर ॥ कोपला तेव्हां नंदिकेश्र्वर ॥ शापसस्त्र अनिवार ॥ ताडिलें सत्वर तेणेंचि ॥१३॥
म्हणे उन्मत्त तूं मूढमती ॥ तुज नर वानर रणीं वधिती ॥ तुवां दशरुद्र पूजिले नीगुती ॥ अकरावा मारुती प्रगटेल ॥१४॥
तो वानररूपें अवतरोन ॥ करील तुझें गर्वमोचन ॥ ऐकतां क्रोधावला रावण ॥ म्हणे हा उपडीन कैलासगिरी ॥१५॥
उचलोनियां कैलासपर्वत ॥ लंकेत नेईन क्षणांत ॥ म्हणोनि तळीं घातला हात ॥ समूळ उचलावयासी ॥१६॥
तें जाणोनि हिमनगजामात ॥ निजपदें दडपिला पर्वत ॥ सहस्र वर्षेंपर्यंत ॥ आक्रंदत रावण ॥१७॥
मग करी शिवाचे स्तवन ॥ प्रसन्न जाहला त्रिनयन ॥ दशवक्र दीधला सोडून ॥ आला परतोन लंकेसी ॥१८॥
एकदां रेवातीरीं ध्यानस्थ ॥ बैसला असतां मयजाकांत ॥ पुढें सिकतालिंग विराजित ॥ तों पाणी चढत माघारें ॥१९॥
सहस्त्रार्जुनें निजभुजेंकरून ॥ कोंडिलें नर्मदेचें जीवन ॥ ध्यान करितां रावण ॥ आकंठपर्यंत बुडाला ॥१२०॥
परम क्रोधावला दशमौळी ॥ धांवोनि आला तयाजवळी ॥ म्हणे कोण रे तूं ये स्थळीं ॥ रेवाजळ कोंडितोसी ॥२१॥
सहस्त्रार्जुनें कवळ घालून ॥ ग्रीवेसी धरिला दशवदन ॥ कीं मृगेंद्रें धरिला वारण ॥ जाहले प्राण कासाविस ॥२२॥
बहुकाळ बंदीं घातला ॥ मग पौलस्ति ऋषि धांविन्नला ॥ भिक्षा मागोनि तया वेळां ॥ सोडविला राक्षस ॥२३॥
बळीचिया नगरा देख ॥ बळेंचि आला लंकानायक ॥ जैसा व्याळाचे बिळीं मूषक ॥ चारा घेऊं प्रवेशला ॥२४॥
तों बळीचिया महाद्वारीं ॥ एक पुरुष उभा दंडधारी ॥ जयाचिया तेजामाझारी ॥ शशी-मित्र झांकोळती ॥२५॥
तो महाराज त्रिविक्रम ॥ देखोनि बळीचें निजप्रेम ॥ द्वारपाळ जाहला पुरुषोत्तम ॥ अज अजित जगद्रुरु ॥२६॥
मग तयासी म्हणे रावण ॥ बळीसी आणी बोलावून ॥ नाहीं तरी हे नगरी उचलोन ॥ पालथी घालीन सागरीं ॥२७॥
मग म्हणे वैकुंठविलासी ॥ तूं बळीचा प्रताप नेणसी ॥ आतांच येईल प्रत्ययासी ॥ जाईं वेगेंसी आंतौता ॥२८॥
मग आतां प्रवेशला त्वरित ॥ तों सभेसी बैसला विरोचनसुत ॥ तयासी म्हणे लंकानाथ ॥ करावया समर पातलों मी ॥२९॥
जैसा शुष्क तृणाचा पुतळा ॥ धरावया आला वडवानळा ॥ कीं वृषभ बळें माजला ॥ खोचूं धांवला सिंहासी ॥१३०॥
व्याघ्रासी धरीन म्हणे बस्त ॥ कीं आळीका सुपर्णावरी धांवत ॥ ऐरावतीचा मोडावया दांत ॥ शलभ जैसा सरसावला ॥३१॥
वृश्र्चिक धांवे सत्वर ॥ ताडावया खादिरांगार ॥ खद्योत म्हणे दिवाकर ॥ आंसडून पाडीन खालता ॥३२॥
तैसा बळीप्रति रावण ॥ सांगे आपुलें थोरपण ॥ कीं सरस्वतीपुढें मतिमंदें येऊन ॥ वाग्वाद आरंभिला ॥३३॥
हांसोनि बळी म्हणे ते वेळे ॥ या वैकुंठनाथे द्वारपाळें ॥ पूर्वीं नारसिंहरूप धरिलें ॥ प्रल्हाद भक्त रक्षावया ॥३४॥
नरसिंहगदाघायेंकरून ॥ हिरण्यकशिपूचें कर्णभूषण ॥ कुंडलें पडलीं उसळोन ॥ तीं उचलोन घेई तूं ॥३५॥
तीं उचलों गेला दशकंधर ॥ बळें लाविले वीसही कर ॥ जैसा मशकासी न ढळे कुंजर ॥ तैसें जाहलें रावणा पैं ॥३६॥
निस्तेज जाहला ते वेळीं ॥ तो बळीची राणी विंध्यावळी ॥ सारिपाट खेळतां प्रीतिमेळीं ॥ फांसा हातींचा उसळला ॥३७॥
तों बळी म्हणे रावणासी ॥ फांसा आणि वेगेंसीं ॥ परी तोही न उचले तयासी ॥ राक्षसासी खेद वाटे ॥३८॥
गदगदां हांसती दोघें जणें ॥ बंदीं घातले म्हणती देव याणें ॥ येथें आला युद्धाकारणें ॥ तों फासा यासी नुचलेचि ॥३९॥
जाहला परम अपमान ॥ माघार चालिला दशवदन ॥ तो मार्गी बळीचे सेवकजन ॥ त्यांणी रावण नागविला ॥१४०॥
घेतलीं वस्त्रें शस्त्रें हिरून ॥ मुखासी तेल मसी लावून ॥ वीसही हस्त बांधोन ॥ नगरामाजी हिंडविती ॥४१॥
एक अंगावावरी धुळी टाकिती ॥ एक दाढी धरोनि ओढिती ॥ एक बळेंचि बैसविती ॥ एक उठविती सवेंचि ॥४२॥
एक करिती शेणमार ॥ काकुळती येत दशकंधर ॥ पळों पाहे जंव बाहेर ॥ तंव द्वारपाळ जाऊं नेदी ॥४३॥
क्षुद्र द्वार मोरियेमधून ॥ मस्तक घाली जंव रावण ॥ तंव सर्वांठायी वामन ॥ दंडावरी मारित ॥४४॥
बळीचे अश्र्वशाळेंत रावण ॥ क्षुधाक्रांत हिंडे नग्न ॥ चणे खातसे वेंचून ॥ मागे कोरान्न घरोघरीं ॥४५॥
पोटासाठी वाघ्या होऊन ॥ म्हणे मी मल्हारीचा श्र्वान ॥ कोठंबे चोंडकें काखे घेऊन ॥ नाचोनि धान्य मेळवी ॥४६॥
तों दासींनी धरिला कौतुकें ॥ उदक आणितां घातला काखें ॥ तयां काकुळती येत दीनमुखें ॥ मग सोडिती सत्वर ॥४७॥
मग विश्रवा धांवोन ॥ बळीस भेटला येऊन ॥ म्हणे बंदीस घातला रावण ॥ तो भिक्षेस मज देइंजे ॥४८॥
बळी बोले आण वाहोन ॥ येथें कोणास नाहीं बंधन ॥ ग्रामांत असे रावण ॥ तो शोधोनि नेईजे ॥४९॥
तो बळीचे आश्र्वशाळेत देखिला ॥ पिता देखोनि रडूं लागला ॥ मग ऋषीनें वामन स्तविला ॥ सोडवून नेला रावण ॥१५०॥
 
अध्याय दुसरा - श्लोक १५१ ते २००
परम लज्जित रावण ॥ लंकेसी आला परतोन ॥ मागुती पराक्रम धरोन ॥ म्हणे मी जिंकीन वाळीतें ॥५१॥
तों समुद्रतीरीं शक्रसुत ॥ बैसला असे ध्यानस्थ ॥ त्यासी धरावया लंकानाथ ॥ पुष्पकांतून उतरला ॥५२॥
जैसा पंचाननापुढें ॥ मार्जार दावी आपुले पवाडे ॥ कीं पंडितापुढें महामूढें ॥ वाग्वाद आरंभिला ॥५३॥
कीं रासभें ब्रीद बांधोन ॥ नारदापुढें मांडिलें गायन ॥ कीं महाव्याघ्रावरी टवकारून ॥ जंबूक जैसा पातला ॥५४॥
तैसा वाळीपुढें उभा रावण ॥ सावध होतां शक्रनंदन ॥ ग्रीवेसीं दशग्रीव धरोन ॥ कक्षेमाजी दाटिला ॥५५॥
चतुःसमुद्रीं करोनि स्नान ॥ किष्किंधेसी आला परतोन ॥ अंगदाच्या पाळण्यावरी नेऊन ॥ उफराटा रावण बांधिला ॥५६॥
क्षणाक्षणां धरोनि दाढी ॥ अंगद बाळभावे उपडी ॥ मग विश्रवा धांवोनि तांतडी ॥ भिक्षा मागे वाळीतें ॥५७॥
मग मुखासी काळें लावुनी ॥ वाळीनें दीधला भिरकावुनी ॥ लंकेंत पडिला येउनी ॥ खेद मनीं बहुत करी ॥५८॥
एकदां रावण पुसे विरंचित्तें ॥ आमुचा अंत कवणाचेनि हातें ॥ तें सत्य सांगावें आम्हांतें स्नेहचित्तेंकरूनियां ॥५९॥
विधि म्हणे अजपाळसुत ॥ त्याचें नाम विख्यात दशरथ ॥ त्यासी पुत्र होईल रघुनाथ ॥ तुझा अंत त्या हातें ॥१६०॥
रावणें केला मग पण ॥ तरी मी दशरथासी वधीन ॥ तों अजपाळपुत्राचें लग्न ॥ मांडिलें इकडे गजरेंसीं ॥६१॥
तो नारद सांगे अजपाळा ॥ जतन करी दशरथकौसल्या ॥ लग्नसोहळ्यामाजी घाला ॥ घालील अकस्मात रावण ॥६२॥
ऐसें सांगतां कमलोद्भवसुत ॥ मग जहाज घालोनि समुद्रांत ॥ लग्न आरंभिलें तेथ ॥ महागजरेंकरोनियां ॥६३॥
सागरामाजी होतें लग्न ॥ रावणें ही गोष्ट ऐकोन ॥ तंव तो अष्टवर्गाचा दिन ॥ घातला घाला रात्रींत ॥६४॥
जैसे अंतरिक्ष पक्षी येती ॥ तैसे राक्षस उड्या घेती ॥ जहाज फोडोनि चूर्ण करिती ॥ गदापर्वतघातेंचि ॥६५॥
वऱ्हाड सर्व बुडविलें ॥ रावण कौसल्येसी घेतलें ॥ जिचें स्वरूप न जाय वर्णिलें । तीस घातलें पेटींत ॥६६॥
पेटी लंकेसी नेता उचलोन ॥ राक्षसें बोलाविला एक मीन ॥ तो बाहेर आला सांगरांतून ॥ त्यासी रावण अज्ञापी ॥६७॥
ही पेटी करावी जतन ॥ कोणा न द्यावी मजवांचून ॥ लंकेत प्रवेशला रावण ॥ ती वस्तु जतन मत्स्य करी ॥६८॥
समुद्राचे गहन बेटीं ॥ जेथें न पडे कोणाची दृष्टी ॥ तेथें मत्स्यें ठेवूनि पेटी ॥ गेला आपण स्वकार्या ॥६९॥
कैंचा सोहळा कैचें लग्न ॥ लोक समग्र गेले बुडोन ॥ तरी दशरथ समुद्रांतून ॥ उफाळला अवचिता ॥१७०॥
ज्याचे पोटीं येणार श्रीराम ॥ दुर्गम तेंचि होय सुगम ॥ विष तें अमृत होय उत्तम ॥ अपाय तोचि उपाय ॥७१॥
तरी अंतरिक्ष चढे पांगुळ ॥ देव जरी होय दयाळ ॥ आंगणींच्या लता सकळ ॥ कल्पलता होती त्या ॥७२॥
दशरथ पाहे समुद्रांत ॥ तों भंगलें जहाज अकस्मात ॥ वाहात वाहात आलें तेथ ॥ त्यावरी दशरथ बैसला ॥७३॥
वायुवेगें जहाज गेलें ॥ त्याच बेटाशीं येऊनि लागलें ॥ दशरथे पेटी ते वेळे ॥ सहज लीलें उघडिली ॥७४॥
तों आंत कौसल्यानिधान ॥ पाहतां वेधला अजनंदन ॥ तो नारद अकस्मात येऊन ॥ उभा ठाके ते वेळी ॥७५॥
ज्यासी भूत भविष्य सर्व ज्ञान ॥ तेणें मुहूर्तवेळा पाहून ॥ तात्काळ दोघांसी लाविलें लग्न ॥ विधियुक्त विधिसुतें ॥७६॥
वोहरांसी आशीर्वाद देत ॥ जो वैकुंठवासी रमाकांत ॥ तो तुमचे पोटी अवतरेल सत्य ॥ भयभीत होऊं नका ॥७७॥
दोघे पेटींत बैसवून ॥ वेगें गेला ब्रह्मनंदन ॥ तों लंकेत दशवदन ॥ कमळासनाप्रति सांगे ॥७८॥
तुवां जें भविष्य कथिलें ॥ तें अवघेंचि असत्य झालें ॥ जहाज फोडूनि लोक बुडविले ॥ हिरोनि आणिलें कौसल्येसी ॥७९॥
मग बोले चतुरानन ॥ मघांच दोघांसी लाविले लग्न ॥ कदा न टळे ब्रह्मवचन ॥ कल्पांतीही दशवक्रा ॥१८०॥
येरू म्हणजे जर जाहले लग्न ॥ तरी मी तुज इच्छित देईन ॥ मग पेटी आणविली मत्स्यापासून ॥ सभेमध्यें रावणें ॥८१॥
त्यामाजी नवरी असे तत्वतां ॥ ब्रह्मा म्हण उघडी आतां ॥ तों पेटी उघडूनि पाहतां ॥ वोहरे उभयतां देखिली ॥८२॥
परम आश्र्चर्य करी रावण ॥ म्हणे खरें जाहलें ब्रह्मवचन ॥ तरी मी या दोघांसी वधीन ॥ शस्त्र घेऊन सरसावला ॥८३॥
कौसल्या जाहली भयभीत ॥ पतीचें वदन विलोकित ॥ परी निर्भय वीर दशरथ ॥ ना भी म्हणत कौसल्येतें ॥८४॥
मी सूर्यवंशीं महावीर ॥ हे मशक काय दशकंधर ॥ याचीं दाही शिरें समग्र ॥ खंडीन आतां येथेंचि ॥८५॥
मग रावणाचा हात ॥ धरिता जाहला विष्णुसुत ॥ म्हणे मज देईं इच्छित ॥ माग म्हणत दशवदन ॥८६॥
हीं दोघें वधूवरें आतां ॥ मज देईं लंकानाथा ॥ मंदोदरी म्हणे तत्वतां ॥ वचन असत्य न करावें ॥८७॥
गेला तरी जावो प्राण ॥ परी असत्य न करावें वचन ॥ यासी वधितां येथेंचि विघ्न ॥ उठेल दारुण आतांचि ॥८८॥
बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ॥ ब्रह्मयासी म्हणे नेईं त्वरित ॥ तेणें पेटी उचलोन अकस्मात ॥ अयोध्येसी आणिली ॥८९॥
अयोध्येंत जाहला जयजयकार ॥ वेगें पातला शचीवर ॥ दशरथावरी धरी छत्र ॥ कर्तव्य विचित्र हरीचें ॥१९०॥
दशरथ राज्यीं स्थापून ॥ विधि आणि सहस्रनयन ॥ वेगें पावले स्वस्थान ॥ आनंदें मनी उचंबळले ॥९१॥
पुष्पकीं बैसोनि जातां दशकंधर ॥ एक देवस्त्री देखिली सुंदर ॥ तिचा बळेंचि धरिला कर ॥ तिसीं अविचार करि इच्छी ॥९२॥
तंव ते आक्रंदत नितंबिनी ॥ रावणें सोडिली तेचि क्षणीं ॥ ती ब्रह्मयापासी जाऊनी ॥ गाऱ्हाणे सर्व सांगत ॥९३॥
रावणासी सत्यलोकवासी ॥ परस्त्रीवर बलात्कार करिसी ॥ तरी शतखंडें निश्र्चयेंसी ॥ तुझें तनूचीं होतील ॥९४॥
जैसा सिंह आडांत पडिला ॥ कीं महाव्याघ्र सांपळ्यांत सांपडला ॥ तैसा रावण बांधला ॥ शापपाशेंकरोनियां ॥९५॥
रावण पाप करी दारुण ॥ गांजिले गाईब्राह्मण ॥ पृथ्वी आक्रंदल पूर्ण ॥ गेली शरण ब्रह्मया ॥९६॥
गाईच्या रूपं धरित्री ॥ आक्रंदे विरिंचीच्या द्वारीं ॥ प्रजा ऋषीगण ते अवसरीं ॥ शरण आले विधातया ॥९७॥
विधी बाहेर आला ते क्षणीं ॥ तो समस्त सांगती गाऱ्हाणीं ॥ रावणें यज्ञ टाकिले मोडोनी ॥ सत्कर्म अवनीं चालेना ॥९८॥
एक म्हणे माझिया मखां ॥ विघ्न करी नित्य ताटिका ॥ एक म्हणे सुबाहु मारीच देखा ॥ क्रतु माझा विध्वंसिती ॥९९॥
एक सांगती ऋषीश्र्वर ॥ आमचीं कुटुंबें समग्र ॥ कुंभकर्णें गा्रसिली थोर ॥ अनर्थ मांडिला विधातया ॥२००॥

अध्याय दुसरा - श्लोक २०१ से २३३
त्रिदश आणि पुरंदर ॥ म्हणती बंदीं पडले समग्र ॥ कोणासी नाटोपे दशकंधर ॥ काय विचार करावा ॥१॥
मग देव प्रजा ऋषिगण ॥ मुख्य परमेष्ठी विष्णुनंदन ॥ क्षीरसागरासी येऊन ॥ अपार स्तवन मांडिलें ॥२॥
शेषशयन नारायण ॥ कोटि सूर्यांची प्रभा पूर्ण ॥ साठी सहस्र योजन ॥ शेषतल्पक शुभ्र तो ॥३॥
लक्षार्ध योजनें प्रमाण ॥ वरी पहुडला श्रीभगवान ॥ तो सच्चिदानंद रमारमण ॥ अलंकारें मंडित ॥४॥
जे अनंत शक्तींची स्वामिणी ॥ कमला विलसत चरणी ॥ जिच्या इच्छामात्रें करूनी ॥ ब्रह्मांड हें विस्तारलें ॥५॥
एक लक्ष योजनें दैदीप्य ॥ विराजमान मध्य मंडप ॥ तेथींचें तेज पाहतां अमूप ॥ मार्तंड शशी लोपती ॥६॥
गरुडपाचूंचें जोतें स्वयंभ ॥ वरी हिऱ्याचे विशाळ स्तंभ ॥ माणिकांची उथाळीं सुप्रभ ॥ खालीं तोळंबे हिरियांचे ॥७॥
सुवर्णाची तुळवटें प्रचंडें ॥ आरक्त रत्नांचे पसरिले दांडे ॥ वरी किलच्या झळकती निवाडें ॥ गरुडपाचूंचिया साजिऱ्या ॥८॥
असो पैलतीरीं देव सकळी ॥ उभे ठाकले बद्धांजुळीं ॥ म्हणती पूर्णब्रह्म वनमाळी । भक्तपाळका सर्वेशा ॥९॥
जयजय अनंत ब्रह्माडनायका ॥ वेदवंद्या वेदपाळका ॥ विश्र्वंभरा विश्र्वव्यापका ॥ विश्र्वरक्षका जगद्रुरो ॥२१०॥
पुराणपुरुषा परात्परा ॥ पंकजलोचना पयोब्धिविहारा ॥ परमात्मया परम उदारा ॥ भुवनसुंदरा भवहृदया ॥११॥
कर्ममोचका करुणाकरा ॥ कैवल्यदायका कमळावरा ॥ कर्मातीता कैटभसंहारा ॥ कनकवसना करुणाब्धे ॥१२॥
जय जय सकळदेवपाळका ॥ जय जय सकळचित्तचाळका ॥ निर्विकारा निरुपाधिका ॥ निर्गुणा निश्र्चळा निःसंगा ॥१३॥
केशवा हरी मुरमर्दना ॥ रमावल्लभा मधुसूदना ॥ सकळदुरितकाननदहना ॥ तमनाशना प्रतापसूर्या ॥१४॥
प्रळयसमुद्रीं तूं जनार्दना ॥ विशाळ मीनरूप धरून ॥ महादैत्य विदारून ॥ वेदोद्धार तुवां केला ॥१५॥
परम विशाळ मंदराचळ ॥ भेदित चालिला पाताळ ॥ तूं कूर्मरूप धरूनि घननीळ ॥ पृष्ठी खालती दीधली ॥१६॥
हिरण्याक्ष दैत्य सबळ ॥ कांखेसी घेऊन जातां भूमंडळ ॥ वराहवेष तूं तमाळनीळ ॥ दानव सकळ मर्दिले ॥१७॥
दानवबाळकप्रल्हाद ॥ त्यास तुझा अखंड छंद ॥ मग करूनि स्तंभभेद ॥ प्रकटलासी नरहरी ॥१८॥
इंद्राचे कैवारें बळी ॥ तो तुवां घातला पाताळीं ॥ त्याचे द्वारीं तू वनमाळी ॥ द्वारपाळ अद्यापी ॥१९॥
नसतां सेना रथ सेवक ॥ फरशधर तूं भृगुकुलतिलक ॥ तीन सप्तकें उर्वी निःशंक ॥ निक्षत्री केली हरी त्वां ॥२०॥
आतां रावण कुंभकर्ण असुर ॥ इहीं त्रिभुवन पीडिलें समग्र ॥ भक्तकैवारी तूं सर्वेश्र्वर ॥ रक्षी सत्वर दासांतें ॥२१॥
तों क्षीरसागरींहूनि अद्भुत ॥ ध्वनि उठली अकस्मात ॥ रविकुळीं राजा दशरथ ॥ अवतार तेथें घेतों मी ॥२२॥
शेष होईल लक्ष्मण ॥ भरत होईल पांचजन्य ॥ सुदर्शन तोचि शत्रुघ्न ॥ अवतार पूर्ण हे माझे ॥२३॥
जनकराजा मिथिलापुरीं ॥ कमळा जाईल त्याचे उदरीं ॥ तुम्ही देव एकसरीं ॥ वानररूपें अवतरा ॥२४॥
शिव तो होईल हनुमंत ॥ ब्रह्मा तो ऋक्ष जांबूवंत ॥ धन्वंतरी तो सुषेण सत्य ॥ अंगिरापति तो अंगद जाणिजे ॥२५॥
अदिति आणि कश्यप ॥ तेचि कौसल्या आणि दशरथ भूप ॥ तेथें अवतरेल चित्स्वरूप ॥ आत्माराम रघुवीर ॥२६॥
सुग्रीव तो जाणिजे मित्र ॥ नळ तो अनळ साचार ॥ नीळ अनिळअवतार ॥ यम तोचि ऋृषभ पैं ॥२७॥
ऐशी आज्ञा होतां समस्त ॥ देव जयजयकारें गर्जत ॥ आनंद न माय अंबरांत ॥ गेले त्वरित स्वस्थाना ॥२८॥
श्रीरामकथा अति रसाळ ॥ हेंचि मानससरोवर निर्मळ ॥ तुम्ही चतुर श्रोते मराळ ॥ बैसा सकळ एकपंक्तीं ॥२९॥
श्रीरामकथा करितां श्रवण ॥ होय पापांचें सर्व खंडण ॥ चिंतिले मनोरथ होती पूर्ण ॥ भक्तिकरून वाचितां ॥२३०॥
श्रोतयांसीं पडतां विघ्न ॥ श्रीराम निवारित स्वयें आपण ॥ सर्व काल रामचरणीं लीन ॥ असतां भवबंधन चुकेल ॥३१॥
ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ श्रीधरवरदा पूर्णब्रह्मा ॥ अक्षय अनामा अभंगा ॥३२॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥२३३॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥