बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय १ ला

अध्याय पहिला - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ ॐ नमोजी पुराणपुरुषा ॥
श्रीमद्भीमातटविलासा ॥ दिगंबरा अविनाशा ॥ ब्रह्मानंदा जगद्रुरो ॥१॥
जय जय जदद्वंद्या पूर्णब्रह्मा ॥ अजअजित आत्मयारामा ॥ नीलग्रीवहृदयविश्रामा ॥ पूर्णनंदा परात्परा ॥२॥
जयजय मायाचक्रचालका ॥ मायातीता विरिंचिजनका ॥ सकळचित्तरीक्षका ॥ निजजनरक्षका करुणाब्धे ॥३॥
कमलोद्भव वैकुंठ कर्पूरगौर ॥ अंबिका गजवदन दिनकर ॥ हीं स्वरूपें तुझी साचार ॥ तूं निर्विकार सर्वदा ४॥
मंगळकारक तूं गजवदन ॥ मंगळारंभीं तुझेंचि नमन ॥ मंगळजननीवरी करितां लेखन ॥ तुझे गुण न सरत ॥५॥
रातोत्पलें सकुमार बहुत ॥ तैसे चरतळवे आरक्त ॥ प्रपद गौर नेपुरांसहित ॥ ध्याती भक्त हृदयांतरीं ॥६
क्षीरावर्णवश्र्वेतांबर ॥ कीं कांसेसी लागला क्षीरसागर ॥ कीं निर्दोष यश पवित्र ॥ वसनरूपें आकारलें ॥७
अरुणसंध्यारागामिश्रित ॥ तैसी उटी दिसे आरक्त ॥ कीं मंदराचळ सिंदूर चर्चित ॥ चारी हस्त विराती ॥८॥
भक्तांचा मनोवारण अनिवार ॥ नावरेचि कदा साचार ॥ तो आकर्षावया निर्धार ॥ विवेकांकुश धरियेला ॥९॥
भावें जे शरण येती अज्ञानजन ॥ त्यांचें छेदावया अविद्याविपिन ॥ यालागीं ऊर्ध्व फरश धरून ॥ सिद्ध गजानन सर्वदा ॥१०॥
हातीं झळके लीलाकमळ ॥ जें अम्लान न विटे सर्वकाळ ॥ तेणें पुजूं इच्छी भक्त प्रेमळ ॥ जे कां निर्मळ अंतर्बाह्य ॥११
जैसे कल्पांतविजूचे उमाळे ॥ तैसे अलंकार अंगीं मिरवले ॥ नक्षत्रपुंज गुणीं ओंविले ॥ तेवीं मुक्ताहार डोलती ॥१२
हृदयकाशीं सुरेख ॥ पदक झाला तो मृगांक ॥ क्षयरहित निष्कलंक ॥ निजसुखें सुरवाडला ॥१३
भक्तांसी विघ्ने येती प्रचंडें ॥ तीं जो आकळी शुंडादंडें ॥ कल्पांत विजूचेनि पाडें ॥ एकदंत झकतसे ॥१४॥
दिगंतचक्रीं तेज न समाय ॥ तैसीं कुंडलें झळकती मणिमय ॥ किंवा चंद्र आणि सूर्य ॥ कुंडलरूपें तळपत ॥१५॥
मुगुटीं झळकती रत्नकळा ॥ तेणें नभमंडप उजळला ॥ आदिपुरुष हा साकारलां ॥ वरदान द्यावया कवीतें ॥१६
ऐसा महाराज गजवदन ॥ वरदहस्तें दावी चिन्ह ॥ करी रामकथाबीजारोपण ॥ त्यासी जीवन घालीन मी ॥१७
ऐसा उगवतां वरदचंद्र ॥ तेणें उल्हासे कविहृदयसमुद्र ॥ साहित्यभरतें अपार ॥ असंभाव्य दाटलें ॥१८
जयजय गजवदना निरुपमा ॥ अगाध न वर्णवे तव महिमा ॥ तुझिया गुणांची पाववया सीमा ॥ कैसा सरता होईन मी ॥१९॥
काखेंसी मेरू घेऊनि देखा ॥ कैसी नृत्य करील पिपीलिका ॥ कैसे ब्रह्मांड उचलेल मशका ॥ भृगोळ मक्षिका केविं हलवी ॥२०॥
चंद्रासी कर्पूराचें उटणें ॥ वासरमणीस दर्पण दावणें ॥ हिमनगासी वारा घालणें ॥ मेघासी अर्पणें उदकांजुळी ॥२१॥
सुरतरूपुढें ठेविजे बदरीफळ ॥ मलयाचळासी धूपपरिमळ ॥ कामधेनूसी शुष्कतृणकवळ ॥ आणोनियां समर्पिलें ॥२२॥
क्षीरसिंधूसी समर्पिजे अजाक्षीर ॥ कनकाद्रीपुढें ठेविजे गार ॥ तैसें प्राकृतबोलें अपार ॥ तुझें महत्त्व केविं वर्णंू ॥२३॥
परी जो जो छंद घेत बाळक ॥ तो स्नेहेंकरोनी पुरवी जनक ॥ तरी हा रामविजय सुरेख ॥ सिद्धि पावो तव कृपें ॥२॥
आतां नमूं सरसिजोद्भवकुमारी ॥ जे विलसे सदा कविजिह्णाग्रीं ॥ जिच्या प्रसादें मुकाही करी ॥ वाचस्पतीसीं संवाद २५॥
जे आनंदसरोवरमराळिका ॥ जे चातुर्यचंपककळिका ॥ जे निजकृपेची करूनि नौका ॥ कविबाळका परतीरा नेत ॥२६
कृपें तुझ्या विरिंचिकुमारी ॥ जन्मांध होती महाजोहरी ॥ अतिमूढ तो वेदार्थ करी ॥ शक्रपदीं निर्धारीं रंक बैसे ॥२॥
अंबे तूं कविहृदयाब्जभ्रमरी ॥ कीं निजानंदसागरींची लहरी ॥ वाग्वल्ली तूं बैसोनि जिह्णाग्रीं ॥ विरूढें सफळ सर्वदा ॥२८॥
विवेकहंस शुद्ध धवळ ॥ त्यावरी तुझें आसन अचळ ॥ तप्त कांचन जैसें सुढाळ ॥ तैसें निर्मळ निजांग तुझें ॥२९
शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर ॥ दिव्य मुक्तनग अळंकार ॥ निजबोधवीणा घेऊन सुस्वर ॥ गायन करिसी स्वानंदें ॥३॥
ऐकतां शारदेचें गायन ॥ तन्मय विधि विष्णु ईशान ॥ अंबे तुझें सौंदर्य पाहोन ॥ मीनकेतन तटस्थ ॥३१
रंभा ऊर्वशी तिलोत्तमा ॥ सावित्री अपर्णा मुख्य रमा ॥ तुझ्या चातुर्यसमुद्राची सीमा ॥ त्याही कदा न पवती ॥३२॥
अंबे तुझे गुण केविं वर्णावे ॥ केविं अर्कास अर्कीसुमनें पूजावें ॥ अंबर मुष्टींत केविं सांठवे ॥ पल्लवीं बांधवे वायु कसा ॥३३॥
न करवे उर्वीचें वजन ॥ न गणवे सिंधूचें जीवन ॥ सप्तावरणें भेदोन ॥ मशक केविं जाऊं शके ॥३४॥
ऐकोनि बाळकाचीं वचनें ॥ जननी हृदयीं धरी प्रीतीनें ॥ तैसें सरस्वतीनें निजकृपेनें ॥ घातलें ठाणें जिह्णाग्रीं ॥३५॥
माझें मन मूढ चकोर ॥ कुहूमाजी इच्छी रोहिणीवर ॥ तरी सरस्वती कृपाळु थोर ॥ शुद्ध बीज प्रकटली ॥३६॥
बीजेपासून चढत्या कळा ॥ तों तों चकोरांसी अधिक सोहळा ॥ तैसी येथें रघुनाथलीळा ॥ चढेल आगळा रस पुढें ॥३७॥
ज्ञानाचे अनंत डोळे ॥ उघडिले एकेचि वेळे ॥ आतां वंदू श्रीगुरूचीं पाऊलें ॥ जयाचेनि प्रगटलें दिव्य ज्ञान ॥३८॥
जो अज्ञानतिमिरच्छेदक ॥ जो प्रकट वेदांतज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंदमहाराज देख ॥ परमाद्भुत महिमा जयाचा ॥३९॥
जो कां पांडुरंगभक्त नर विख्यात ॥ जो भक्त भीमातीरीं समाधिस्थ ॥ तो यतिराजमहिमा अद्भुत ॥ कवण वर्णूं शके पैं ॥४०॥
जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या पूर्ण ॥ या चार अवस्थांवरी ज्याचें आसन ॥ उन्मनीही निरसोन ॥ स्वसुखें पूर्ण समाधिस्थ ॥४१॥
चांदिणें कैचें नसतां मृगांक ॥ किरणें कैचीं नुगवतां अर्क ॥ जीवनावांचोनि बीजीं देख ॥ अंकुर सहसा फुटेना ॥४२॥
जरी नेत्रेंवीण जरी निवडे नवनीत ॥ तरी सद्भुरूवांचोनि परमार्थ ॥ ठायीं न पडे जीवासी ॥४३
वर नसतां व्यर्थ वऱ्हाड ॥ शिर नसतां कायसें धड ॥ तैसें गुरुकृपेंवीण कबाड ॥ तपें व्रतें सधनें ॥४४॥
अजनेंवीण न सांपडे निधान ॥ गायत्रीवीण ब्राह्मणपण ॥ सीमा कैंची ग्रामावीण ॥ तैसें गुरूवीण ज्ञा नोहे ॥४५॥
म्हणोनि तनमनधनेंसी अनन्य ॥ ब्रह्मानंदस्वामीस शरण ॥ आरंभिली श्रीरामकथा गहन ॥ ग्रंथ संपूर्ण सिद्धी पवो ॥४६॥
ऐसें ऐकतां सप्रेम बोल ॥ बोलिला श्रीगुरू दयाळ ॥ चकोराकारणें उतावेळ ॥ मृगांक जैसा उगवे पैं ॥४७
कीं चातकालागीं धांवे जलधर ॥ कीं क्षुधितापुढें क्षीरसागर ॥ कीं कल्पतरू शोधीत आला घर ॥ दरिद्रयाचें साक्षेपें ॥४८॥
तैसा श्रीगुरु दयासागर ॥ तेणें दिधला अभयवर ॥ म्हणे सिद्धि पावेल साचार ॥ रामविजय ग्रंथ हा ॥४९
आतां वंदूं संतसज्जन ॥ जे वैराग्यवनीचें पंचानन ॥ कीं ज्ञानांबरींचे चंडकिरण ॥ उदय अस्त नसे जया ॥५०॥
 
अध्याय पहिला - श्लोक ५१ से १०
जे भक्तसरोवरीचें राजहंस ॥ जे कां अविद्यारण्यहुताश ॥ कीं ते पद्महस्ती विशेष ॥ भवरोगा वैद्य होती ॥५१॥
कीं जीव पावे आपले पदासी ॥ ऐसा मुहूर्त देणार ते ज्योतिषि ॥ कीं ते पंचाक्षरी स्वप्रतापेंसीं ॥ पंचभूतांसी पळविती ॥५२॥
कीं ते दैवीसंपत्तीनें भाग्यवंत ॥ मुमुक्षूंसी करिती दरिद्ररहित ॥ कीं ते दयेचीं अद्भुत ॥ गोपुरें काय उंचावलीं ॥५३
संत श्रोते चतुर पंडित ॥ माझें बोलणें आरुष अत्यंत ॥ जैसा सरस्वतीपुढें मूढ बहुत ॥ वाग्विलास दावीतसे ॥५॥
सूर्यापुढे जैसा दीप देख ॥ कीं जान्हवीस न्हाणावया थिल्लरोदक ॥ कीं कनकाद्री जो अति सुरेख ॥ त्यासी अलकार पितळेचे ॥५५॥
कामधेनूस अर्पिलें अजाक्षीर ॥ चंद्रासी शीतळ करी रंभापुत्र ॥ कल्पतरु कल्पिलें देणार ॥ त्यासी निंबोळ्या समर्पिल्या ॥५६
रत्नाकरापुढें कांच समर्पिली ॥ तैसी माझी हे आरुष बोली ॥ परी तुम्ही प्रीति बहु ठेविली ॥ प्राकृत शब्दीं नवल हें ॥५७
विष्णुसी भूषणें अपार ॥ परी तुळसीवरी आवडी थोर ॥ कीं पार्वतीपतीस बिल्वपत्र ॥ भक्तीं वाहतां आवडे ॥५८
रायें दासीस पाठीं घालितां । तिची सर्वांवरी चाले सत्ता ॥ थोड्या मोलाचे अळंकार लेतां ॥ जनसमस्तां थोरदिसे ॥५९॥
म्हणोनि तुम्ही संत प्रभु थोर ॥ तुमचा महिमा न वर्णवे अपार ॥ मोटेंत बांधवेल समीर ॥ चरणीं अंबर क्रमवेल पैं ॥०॥
गणवतील पृथ्वीचे रजःकण ॥ मोजवेल सिंधूचें जीवन ॥ कनकाद्रीचा चेंडू करून ॥ उडविजेल सर्वथा ॥६१
भोगींद्रमस्तकींचा मणी ॥ आणवेल एखादे क्षणीं ॥ सूर्य जातां धरवेल गगनीं ॥ नक्षत्रें गुणीं ओंविजेतील॥६२॥
काढवेल शशिमंडळीचें अमृत ॥ मोडवतील ऐरावतीचे दांत ॥ कीं दिग्गज आणोन समस्त ॥ एके ठायीं बांधजेतील ॥६३॥
तुरंग करूनि प्रभंजन ॥ करवेल सर्वत्र गमन ॥ परी न कळे संतांचें महिमान ॥ जे ब्रह्मानंदें पूर्ण सदा ॥६४
तों संत बोलती आनंदघन ॥ मन निवालें तव बोल ऐकून ॥ आम्ही करूं इच्छितों रामकथा श्रवण ॥ वरी दष्टांत गोड तुझे ॥६५॥
मेरू सुंदर रत्नेंकरून ॥ कीं नक्षत्रें मंडित गगन ॥ कीं वृक्ष फळीं परिपूर्ण ॥ तैसा दृष्टांतें ग्रंथ शोभे ॥६६
कीं शांति क्षमा दया विशेष ॥ तेणें मंडित सत्पुरुष ॥ कीं परिवारासहित नरेश ॥ दृष्टांत सुरस ग्रंथीं तैसे ॥६७॥
आधींच भूक लागली बहुत ॥ त्याहीवरी वाढिलें पंचामृत ॥ कीं दुर्बळासी अकस्मात ॥ कल्पतरु भेटला ॥६८॥
कन्यार्थी हिंडतां भूमंडळ ॥ त्यासी राजकन्या घाली माळ ॥ कीं रोगीयासी रसायन निर्मळ ॥ अकस्मात जोलें ॥६९॥
आतां बहु टाकोनि शब्दजाळ ॥ बोलें रामकथा रसाळ ॥ जैसी सिकता सांडोनि मराळ ॥ मुक्ताफळेंचि सेविती ॥७०
कीं कोशगृहीं प्रवेशोनी ॥ भांडारी रत्नें काढी निवडोनि ॥ कीं दोष टाकून सज्जनीं ॥ उत्तम गुण स्वीकारिजे ॥७१
ऐसे संतांचें बोल परिकर ॥ ऐकोनी ब्रह्मानंदें श्रीधर ॥ साष्टांग घालोनि नमस्कार ॥ म्हणे सादर परिसिजे ॥७२
असंभाव्य श्रीरामचरित्र ॥ शतकोटि ग्रंथ सविस्तर ॥ वाल्मीक बोलिला अपार ॥ कथासमुद्र अगम्य ॥७३
जो सत्यवतीहृदयरत्न ॥ कथी जगद्रुरु पराशरनंदन ॥ तें व्यासोक्त रामायण ॥ कोणा संपूर्ण न वर्णवे ७४॥
वसिष्ठें कथिलें निश्र्चितीं ॥ तें वासिष्ठरामायण म्हणती ॥ शुकें कथिलें नानारीतीं ॥ शुकरामायण बोलतीतया ॥७५॥
जो अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ तेणें पाहोन श्रीरामचरित्र ॥ कथिलें नाटकरामायण साचार ॥ अपार चरित्र निजमुखें ॥६॥
जो परम विश्र्वासें श्रीरामासी शरण ॥ शक्रारिजनकबंधु बिभीषण ॥ तेणें रामचरित्र कथिलें पूर्ण ॥ बिभीषणरामायण म्णती तया ॥७७॥
कमलोद्भव विष्णुसुत ॥ तेणें नारदासी कथिलें हें चरित्र ॥ तें ब्रह्मरामायण अद्भुत ॥ उमेसी सांगत शिव रामायण ॥७८
जो कलशोद्भव महामुनी ॥ जेणें जलधि आटिला आचमनेंकरूनी ॥ तेणें रामकथा ठेविली विस्तारोनी ॥ अगस्तिरामाण म्हणती तया ॥७९॥
भोगींद्र कथी सर्पांप्रती ॥ तें शेषरामायण बोलिजे पंडितीं ॥ अध्यात्मरामायण समस्तीं ॥ ऋषींनीं निवडून काढिलें ॥८०
एक शेषरामायण सत्य ॥ आगमरामायण एक बोलित ॥ कूर्मरामायण यथार्थ ॥ कूर्मपुराणीं बोलिलें ॥८१॥
स्कंदरामायण अपार ॥ एक पौलस्तिरामायण परिकर ॥ कालिकाखंडीं सविस्तर ॥ रामकथा कथियेली ॥८२॥
रविअरुणसंवाद ॥ ते अरुणरामायण प्रसिद्ध ॥ पद्मपुराणीं अगाध ॥ पद्मरामायण कथियेलें ॥८३
भरतरामायण चांगलें ॥ एक धर्मरामायण बोलिलें ॥ आश्र्चर्यरामायण कथिलें ॥ बकदाल्भ्यऋषीप्रती ॥८४॥
मुळापासून इतक्या कथा ॥ कैशा वर्णवतील तत्त्वतां ॥ त्यांमाजीं वाल्मीकनाटकाधारें कथा ॥ रामविजयलागीं कथूं ॥८५॥
समस्त कवींस नमस्कार ॥ जो जगद्रुरु आचार्य श्रीशंकर ॥ जेणें मतें उच्छेदोन समग्र ॥ शुद्ध मार्ग वाढविला ॥८६
पूर्वी एक सत्यवतीकुमर ॥ तैसाचि कलियुगीं श्रीशंकर ॥ जो ज्ञानाचा सागर ॥ जनदुद्धार केला जेणें ॥८७
सकळ मतें उच्छेदून ॥ सन्मार्ग वाढविला पूर्ण ॥ सकळ मतवादी जंबुक जाण ॥ शंकरसिंह गर्जतसे ॥८॥
सकळ मतवादी दरिद्री ॥ शंकर श्रीमंत पृथ्वीवरी ॥ संन्यासदीक्षा निर्धारीं ॥ स्थापिली जेणें विधियुक्त ८९॥
अवघे मतवादी रजनीचर ॥ शंकर त्यांवरी रघुवीर ॥ कीं कौरव वधावया यादवेंद्र ॥ अति उदित साक्षेपें ॥९॥
तैसा श्रीशंकराचार्य सकळ ॥ कुमतें छेदी तात्काळ ॥ त्या आचार्याचें पदकमळ ॥ श्रीधरभ्रमरें वंदिलें ॥९१
जो श्रीधराचार्य टीककारा ॥ त्यासी नमस्कारी श्रीधर ॥ मधुसूदनादिक कवींद्र ॥ ग्रंथ अपार जयांचे ॥९२
जो श्रृंगारवनींचा विहंगम जाण ॥ जो जयदेव पद्मावतीरमण ॥ त्याची काव्यकला पाहून ॥ पंडितजन तस्थ ॥९३॥
जो वेदांतक्षीरार्णवींचा मीन ॥ जेणें विवेकसिंधु रचिला पूर्ण ॥ तो मुकुंदराज गुणनिधान ॥ तयाचे चरण वंदिले ९४॥
तारावया जन समग्र ॥ पुनः अवतरला रमावर ॥ गीतार्थ केला साचार ॥ तो ज्ञानेश्र्वर जगद्गुरु ॥९५
जो भानुदासकुळभूषण ॥ प्रतिष्ठानवासी परिपूर्ण ॥ त्या एकनाथें ग्रंथसंपूर्ण ॥ बहुसाल कथियेले ॥९६॥
जे चातुर्यजानधानीचे कळस ॥ मुक्तेश्र्वर मुद्रलदास ॥ ज्यांचे ग्रंथ पाहतां सुरस ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥९७॥
जैसा चंडांशु सतेज व्योमीं ॥ तैसाचि केवळ वामनस्वामी ॥ ज्याची श्र्लोकरचना या भूमि-॥ मंडळीवरी अपर्व ॥९८॥
कृष्णदास जयराम ॥ जो शांतिदयेचें निजधाम ॥ ज्याचे ग्रंथ ज्ञानभरित परम ॥ जो निस्मीम ब्रह्मचारी ॥९९
श्रीरामउपासक निर्मळ ॥ जो भजनसरोवरींचा मराळ ॥ तो रामदासमहाराज केवळ ॥ भक्ति प्रबळ लावी जना ॥१००॥
 
अध्याय पहिला - श्लोक १०१ से १५०
ब्रह्मानंदस्वामीचा बंधु सत्य ॥ नाम तयाचें श्रीरंगनाथ ॥ ज्याची कविता ऐकतां समस्त ॥ अपार जन उद्धरले ॥१॥
आतां असोत समस्त कविवर ॥ अवघे ब्रह्मानंदरूप साचार ॥ त्यांसी अनन्य शरण श्रीधर ॥ द्यावा वर ग्रंथासी ॥२॥
रविकुळीं अवतरोनि श्रीरघुवीर ॥ कैसें केलें लीलाचरित्र ॥ धन्य त्या वाल्मीकाचें वक्र ॥ कथा अपार बोलिला ॥३
हें वर्णितां श्रीरामचरित्र ॥ तरला वाल्मीक साचार ॥ पापें आचरला अपार ॥ ऐका सादर गोष्टी ते ॥४
वाल्मीक पूर्वीं द्विजसुत ॥ त्यजोनि आचार यज्ञोपवीत ॥ किरातसंगें वाट पाडित ॥ अति उन्मत्त वषयांध ॥५॥
महा दुर्धर कानन ॥ देखतां भयभीत होय मन ॥ पर्वतदरीमाजीं स्थळ करून ॥ सहपरिवारें वसे तेथें ॥६
भोंवतें द्वादश गांवेंपर्यंत ॥ पाळती राखोनि वाट पाडित ॥ केल्या ब्रह्महत्त्या असंख्यात ॥ नाहीं गणि इतर जीवां ॥७॥
मत्स्य धरावयालागीं बक ॥ बैसे होऊनियां सात्विक ॥ कीं मृषकालागीं बिडालक ॥ बैसे टपत जयापरी ॥८॥
कीं अंगसंकोचें पारधी ॥ जपोनि तत्काळ मृग साधी ॥ तैसा वाल्हा जीव वधी ॥ पापनिधि निर्दय ॥९॥
अपार जीव मारिले ॥ पापाचे पर्वत सांचले ॥ जैसे अंत्यजगृहाभोंवते पडिले ॥ ढीग बहुत अस्थींचे ॥११०॥
ऐसें करितां पापाचरण ॥ तयासी आलें वृद्धपण ॥ पुत्र झाले अति तरुण ॥ तरी अंगवण न सोडी ॥११॥
शस्त्र हातीं घेऊनि वाल्हा ॥ मार्ग रक्षीत जों बैसला ॥ तों अकस्मात नारद प्रगटला ॥ पूर्वपुण्येंकरूनिया ॥१२॥
चंद्रा वेष्टित नक्षत्रें जैसीं ॥ भोंवतीं ऋषींची मांदी तैसी ॥ तों पाळती सांगती वाल्हियासी ॥ जाती तापसी बहसाल ॥१३॥
वाटेसी धांवोन आडवा आला ॥ शस्त्र उभारोनी तें वेळां ॥ दटावोनि ऋषींचा मेळा ॥ उभा केला क्षणभर ॥१४
कीं स्वर्गपंथें जातां नेटें ॥ जैसी यमपुरी लागे वाटे ॥ कीं तपें आचरतां उद्भटें ॥ कामक्रोध अडविती ॥१५
असो वाल्हा म्हणे तयांसी ॥ मात्रा आणारे मजपासीं ॥ नाहीं तरी मुकाल प्राणासी ॥ माझिया हस्तें याकाळीं ॥१६॥
मग पुढें होऊन ब्रह्मनंदन ॥ म्हणे ऐक एक आमुचे वचन ॥ तुज आलें वृद्धपण ॥ पापें अपार घडलीं कीं ॥१७
द्रव्य जोडिलें त्वां अपार ॥ झाले दृष्कृतांचे संभार ॥ तुझे पापासी वांटेकर ॥ कोण आहेत हे विचारीं ॥१८॥
तुझें आलें जवळी मरण ॥ यम जेव्हां गांजील दारुण ॥ तेव्हां तुजला सोडवील कोण ॥ पाहें विचारून अंरीं ॥१९॥
दारा पुत्र धन यौवन ॥ बंधु सेवक आप्त स्वजन ॥ शस्त्रें अस्त्रें चतुरंग सैन्य ॥ न ये कामा ते वेळे ॥१२०
जीं जीं प्राणी कर्में करिती ॥ तितुकीं देव सर्व विलोकिती ॥ सकळ तत्त्वें व्यापून वर्तती ॥ मग साक्ष देती परत्रीं ते ॥२१॥
यमपुरीस चित्रगुप्त ॥ पत्रें काढुनि वाचित ॥ मग त्यासारिखा दंड करीत ॥ कोण तेथें सोडवील ॥२२॥
जो पुण्यपंथें न चाले नर ॥ निंदी तीर्थयात्रा समग्र ॥ त्यासी ताम्रभूमि तप्त अपार ॥ तीवरी चालवित हळूहळू ॥२३॥
जो परोपकार न करिती ॥ त्यांसी असिपत्रावरि हिंडविती ॥ इकडून तिकडे शस्त्रें टोंचती ॥ कोण सोडवील ते स्थानीं ॥२४॥
तप्त लोहाचा स्तंभ दारुण ॥ त्यासी भेटविती नेऊन ॥ देवद्विजां जो न करी नमन ॥ त्यासी जाण हीच गती ॥२५
जो संतांसी देखों न शके अपवित्र ॥ त्याचे रागें गीध फोडिती नेत्र ॥ जो कीर्तन स्मरण न करी अणुमात्र ॥ जिह्णा तोडिती सांडसें ॥२६॥
गुरु देवब्राह्मण सांडूनी ॥ जो षड्रस सेवी पापखाणी ॥ महानरकींचें दुर्गंध पाणी ॥ तयाचे वदनीं ओतिती ॥२७
जो तीर्थस्नान निंदी खळ ॥ त्यासी तप्त कढयीमाजीं जें तैल ॥ त्यांत तळिती तत्काळ ॥ कोण सोडवील तथें पैं ॥२८॥
जे साधुसंतासि पीडिती ॥ त्यांचे अंगाची सालें काढिती ॥ जे गुरु द्विज तीर्थें अव्हेरिती ॥ त्यांचे तोंडीं घालिती नरकमूत् ॥२९॥
धर्मवाट रोधून हरिती जे धन ॥ त्यांसी कुंभीपाकीं घालून ॥ खालीं चेतविती कृशान ॥ माजीं आक्रंदोनि चडफडती ॥१३०
लोहदंड करूनि तप्त ॥ कानीं खोंविती यमदूत ॥ जो नायके हरिकथामृत ॥ गति निश्र्चित त्यास ही ॥३१
ऐसें बोलतां नारदऋृषी ॥ अनुताप जाहला त्याचे मानसीं ॥ वेगें आला निजसदनासी ॥ स्त्रीसुतांदिकांसीं पसत ॥३२॥
पापें घडलीं मजलागीं ॥ कोणी होतां काय विभागी ॥ तंव ते म्हणती आमुचे अंगीं ॥ न लागती पापें सर्वथा हीं ॥३॥
आम्ही भाग्याचे वांटेकरी यथार्थ ॥ पापें तुझीं तूं भोगी समस्त ॥ वाल्हा झाला सद्रदित ॥ म्हणे कैसें आतां करावें ३४॥
हा नरदेह उत्तम पूर्ण ॥ केवळ भगवत्प्राप्तीचें कारण ॥ म्यां आत्महित न करून ॥ बुडालों कीं अंधतमीं ॥३५
पुण्यक्षेत्र सरसाविलें ॥ तेथें कनकबीज पेरिलें ॥ कनकाचें ताट घडिलें ॥ त्यांत वाढिलें तृणबीज ॥३६
सुधारसकुंभ दैवें जोडला ॥ तो नेऊन उकिरडां ओतिला ॥ चिंतामणि फोडून घातला ॥ पायरीस अभ्यग्यें ॥३७॥
सुरभी शोधीत आली घर ॥ तिसी मारूनि काष्ठप्रहार ॥ अभ्याग्यें घातली बाहेर ॥ तोच प्रकार मज जाहला ॥३८॥
बळें कल्पवृक्ष तोडून ॥ वाढविलें कंटकवन ॥ राजहंस दवडून ॥ दिवाभीत पाळिलें ॥३९
रंभा तोडूनि महामुर्खें ॥ अर्की वाढविल्या सकौतुकें ॥ वोसंडोनि सतेज मुक्तें ॥ सिकतहरळ भरियेली ॥१४०॥
असो ऐसा अनुतापें वाल्हा ॥ नारदापासीं परतोन आला ॥ सद्रद कंठ अश्रु डोळां ॥ साष्टांग घातला नमस्कर ॥४१॥
तनुमनधनेंसीं अनन्य ॥ स्वामी तुज मी आलों शरण ॥ तूं कृपेची नौका करून ॥ तारीं मज अघसाागरीं ॥४२
महाराज तूं धन्वंतरी ॥ माझा भवरोग दूर करीं ॥ जळतों या वणव्याभीतरीं ॥ मेघ झडकरी वर्षें तूं ॥४३
पडिलों मायेचे मेळीं ॥ पंचभूतें मज झोंबलीं ॥ वासनाविशवी गळां पडली ॥ कदाकाळीं सोडीना ॥४४
अहंदेहबुद्धि डांकिण ॥ ममता सटवी दारुण ॥ लोभ झोटिंग एक क्षण ॥ मज उमज घेऊं नेदी ॥४५
क्रोध महिषासुर दारुण ॥ कामवेताळें झडपिलें पूर्ण ॥ तृष्णा मायराणी अनुदिन ॥ सर्वदाही न सोड ॥४६॥
जाहलों मी अत्यंत क्षीण ॥ पंचाक्षरी तूं ब्रह्मनंदन ॥ सकळ भूतें टाकीं झाडून ॥ म्हणोनि चरण धरियेल ॥४७॥
अष्टभावें जाहला सद्रदित ॥ मग मनीं विचारी ब्रह्मसुत ॥ रोग पाहुनि वैद्य निश्र्चित ॥ दिव्य मात्रा काढी जवीं ॥४८॥
म्हणे हा अनधिकारी परम ॥ ‘मरा’ ऐसें सांगें नाम ॥ म्हणे हेंचि तूं जपें सप्रेम ॥ मुख्य वर्म जाण पां ॥४९
तें जीवन नाम जपत ॥ तेथेचि बैसला ध्यानस्थ ॥ आंगावरी वारुळ वाढत ॥ ध्वनि उमटत आंतोनी ॥१५०॥
 
अध्याय पहिला - श्लोक १५१ से २०७
टोणपियाचा वृक्ष जाहला ॥ तों नारद बहुकाळें पातला ॥ त्या तरुवरा खाली उभा राहिला ॥ श्रवणीं ऐकिला नामघोष ॥५१॥
वारुळाचे छिद्रांमधुनी ॥ रामनामाची मधुरध्वनी ॥ चातुर्यसमुद्र नारदमुनी ॥ जाणिलें मनी वृत्त सर्व ॥५२॥
मग उकरोनियां वारुळ ॥ बाहेर काढिला तो पुण्यशीळ ॥ वर्मकळा रगडून तात्काळ ॥ सावध केला तेधवां॥५३॥
जैसा भूमीवरी अर्क उतरला ॥ तैसा श्रीगुरुनारद देखिला ॥ धांवोन चरणकमळा लागला ॥ पापाचा जाहला संहार ॥५४॥
नाम जपतां श्रीरामाचें ॥ दोष गेले अनंत जन्मांचे ॥ जैसे पर्वत तृणाचे ॥ अग्निसंगें भस्म होती ॥५५
पापें जळावया समस्त ॥ नामामाजी प्रताप बहुत ॥ नामाचेनि न जळे निश्र्चित ॥ ऐसें पाप नसेचि ५६॥
वाल्मीकें केली जीं पापें ॥ तीं भस्म जाहलीं नामप्रतापें ॥ नामापुढें अनेक तपें ॥ तुच्छ ऐसें जाणिजे ॥५७॥
जैसा पर्वत होतां संदीप्त ॥ मृगाद्विजगण न राहती तेथ ॥ तैसीं नामाग्नीपुढें समस्त ॥ पापारण्यें भस्म हती ॥५८॥
जैसी स्वप्नीं घडली दुष्कृतें बहुत जागृतीं अवधीं मिथ्याभूत ॥ तैसे रामनामें समस्त ॥ पापसमूह भस्म होती ॥५९॥
तोंवरी तमाची दाटणी ॥ जों नुगवे वासरमणी ॥ तोंवरीच मद कीजे वारणीं ॥ जोंवरी सिंह नाहीं देखिला ॥१६०॥
सिंधु गर्जे तोंवरीच पाहीं ॥ जो कलशोद्भव देखिला नाहीं ॥ तोंवरी भूतांची परम घाई ॥ जों मंत्रवादि न देखिला॥६१॥
तोंवरीच पापांचा संभार ॥ जों नामीं न धरी आदर ॥ नामप्रताप अद्भुत थोर ॥ तरला साचार वाल्मीक ॥६२॥
असो वाल्मीक म्हणे गुरुनाथा ॥ जरी कृपा कराल सर्वथा ॥ तरी रामचरित्रकथा ॥ सविस्तर करीन मी ॥६॥
ऐसें ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोषला अंतःकरणीं ॥ वरदहस्त ठेवोनियां मूर्ध्नीं ॥ वदला तें श्रवणीं आकर्णिजे ॥६४॥
साठी सहस्त्र वरुषांवरी ॥ विष्णु अवतरेल दशरथउदरीं ॥ तयाचें तूं भविष्य करीं ॥ शतकोटी सविस्तर ॥६५॥
जन्मकर्मलीला सर्व ॥ जे जे तूं वदसील भाव ॥ तैसाच वर्तेल राघव ॥ अवतारठेव अभिनव पैं ॥६६
शतकोटी ग्रंथ वाल्मीकें निर्मिला ॥सुरस रस दिव्य ओतिला ॥ तिहीं लोकांसी कलह लागला ॥ व्यवहार गेला शिवापाशीं ॥६७॥
परम चतुर कैलासनाथ ॥ तीं ठायीं समान वांटिला ग्रंथ ॥ शेवटीं दोन अक्षरें उरलीं यथार्थ ॥ कंठीं धरिली उमावरें ॥६८
शीतळ उपचार पूर्वीं केले ॥ परी ते नाहीं सफळ जाहले ॥ चंद्रबिंब शिरीं धरिलें ॥ जटेंत आकळिलें गंगेसी ॥६९॥
हिमनगकन्या शीतळ सुंदर ॥ अर्धां अर्धांगीं धरी कर्पूरगौर ॥ ठायीं ठायीं वेष्टिले फणिवर ॥ शीतळ थोर म्हणोनियां ॥१७०॥
गजचर्म अत्यंत शीतळ ॥ तेंही पांघरे जाश्र्वनीळ ॥ परी न राहे हळाहळ ॥ जाळी प्रबळ अधिकचि ॥७१
मग हा ग्रंथ निवडितां थोर ॥ दोन अक्षरें निवडिलीं साचार ॥ तीं कंठीं धरितांचि उमावर ॥ शीतळ शरीर जाहलें ॥७२॥
हृदयीं आठविला रघूत्तम ॥ मुखी स्मरतां रामनाम ॥ मध्यें हळाहळ परम ॥ भयभीत जाहलें ॥७३
मुखीं नाम हृदयीं राम ॥ दाहकत्व सांडूनि जाहलें शम ॥ भूषणरूप होऊनि परम ॥ शिवकंठीं मिरवलें ॥७४॥
नामें तरला वाल्मीक ॥ नामे तरले ब्रह्मादिक ॥ शीतळ जाहला कैलासनायक ॥ महिमा अद्भुत न वर्णवे ॥७५॥
किती गोड म्हणावा सुधारस ॥ किती वाड म्हणावें आकाश ॥ तेजस्वी परम चंडांश ॥ किती म्हणोनी वर्णावा॥७६॥
पृथ्वीस उपमा काय द्यावी ॥ पाताळखोली किती सांगावी ॥ कनकाद्रीची उंची किती वर्णावी ॥ तैसी नामाची पदवी अपार ॥७७॥
किती वर्णावा विष्णूचा प्रताप ॥ काय सांगावें शंकराचें तप ॥ तैसा रामनाममहिमा अमूप ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥७८
प्राकृतभाषा म्हणोनि ॥ अव्हेर न करावा पंडितजनीं ॥ जैसीं कृष्णावेणीचीं तीरें दोन्ही ॥ परी उदक एकचि जाणिजे ॥७९॥
असो वाल्मीकें रचिला ग्रंथ ॥ भारद्वाजाचे मुखें समस्त ॥ असंख्य ऋषि श्रवण करित ब्रह्मानंदें करूनियां ॥१८०॥
हेचि कथा कैलासीं ॥ शिव सांगे हैमवतीसी ॥ पाताळीं काद्रवेयकुळासी ॥ भोगींद्र सांगे हेचि कथा ॥८१
घटोद्भवाचे मुखीं दिवसरजनी ॥ ऋषी श्रवण करिती कर्दळीवनीं ॥ किंपुरुषखडीं स्वमुखेंकरूनी ॥ वानरांसी सांगे हनुमंत ॥८२॥
नारदाप्रती सरसिजोद्भव ॥ सांगे रामकथा अभिनव ॥ बदरिकाश्रमीं ऋषि सर्व ॥ व्यासमुखें ऐकती ॥८३
तेचि प्राकृत भाषेंत निवाडे ॥ श्रीधर वर्णीं संतापुढें ॥ जैसे बाळचाळे वेडेवांकुडे ॥ परी आवडी जननीसी ॥८४॥
तैसें प्राकृत आणि संस्कृत ॥ दोहींमाजी एकचि अर्थ ॥ जैसा दोही स्त्रियांचा एक नाथ ॥ दोन हस्त एकाचेचि ॥८५॥
दोन्ही दाढा एकचि स्वर ॥ पाहणार एक दोन नेत्र ॥ किंवा दोन पात्रांत पवित्र ॥ एकचि दुग्ध घातलें ॥८६
जैसें त्रिवेणीचें भरलें उदक ॥ दोन पात्रीं गोडी एक ॥ एक सुवर्णकूपिका अलोलिक ॥ एक ताम्रधातृची घडियेली ॥८७॥
दोनी कूपिका नेऊनि देख ॥ रामेश्र्वरासी केला अभिषेक ॥ दोन्ही धातु परी उदक एक ॥ देवासी समचि आवडती ॥८८॥
अबळां न कळे संस्कृत वाणी ॥ जैसें आडांतील निर्मळ पाणी ॥ परी दोरपात्रावांचोनी ॥ अशक्त जनां केवीं निघे ॥८९
तों तडागासी येतां त्वरें ॥ तत्काळचि तृषा हरे ॥ आबालजन तारावया ईश्र्वरें ॥ प्राकृत ग्रंथ निर्मिले ॥१९०॥
मुख्य संस्कृत पहावें ॥ परी तें अबळा नेणवे ॥ महागज कैसा बांधवे ॥ कमळतंतू घेऊनियां ॥९१॥
सर्वांस मान्य गीर्वाण ॥ जरी असेल पूर्वपुण्य ॥ तरीच तेथीचें होय ज्ञान ॥ आबालजन केवीं तरत ॥९२॥
उत्तम वस्त्रें लेत नृपती ॥ तीं दुर्बळांसी प्राप्त न होती ॥ मग ते घोंगडीच पांघरती ॥ शीतउष्ण निवारणा ॥९३॥
जैसें दधि मंथितां बहुत ॥ त्यांतून निघे नवनीत ॥ कीं स्वातीजळापासोन अद्भूत ॥ मुक्तफळें निपजती ॥९४॥
कीं इक्षुदंडाचे पोटीं शर्करा ॥ रसनेस गोडी तेचि विचारा ॥ कीं राजापासोन राजपुत्रा ॥ मान्यता होय बहुतचि ॥९५॥
महाराष्ट्रवचनें निश्र्चित ॥ परी अत्यंत रसभरित ॥ मधुमक्षिकांचे मुखीं स्रवत ॥ मधु सुरस जैसे कां ॥९६
गीवार्ण हें शशिमंडळ अद्भुत ॥ त्याची प्रभा ते हे प्राकृत ॥ संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित ॥ अर्थ प्राकृत करिती कीं ॥९७॥
अर्कवृक्षीं मधुघट ॥ जरी भरितील यथेष्ट ॥ तरी गिरीकंदरीं करावया कष्ट ॥ काय कारण धांवावें ॥९८॥
सिकतेमाजी दिव्य रत्न ॥ जरी सापडे न करितां प्रयत्न ॥ तरी चतुरीं करावें जनत ॥ किंवा अव्हेर करावा ॥९९॥
कष्टेंविण राज्य आलें हातां ॥ तरी काय ओसांडावें तत्त्वतां ॥ प्राकृतभाषीं ऐकोनी कथा ॥ लाभ श्रोतां घेईजे तेवी ॥२००॥
मुक्तफळांची उत्तम माळा ॥ वरी सुगंध सुटला आगळा ॥ तरी चतुरी का न घालावी गळां ॥ अति आवडी करोनीयां ॥१॥
आधींच इक्षुदंड गोड ॥ वरी आलें साखरेचें घड ॥ तैशी रघुनाथकथा सुरवाड ॥ त्यावरी साहित्य पुरविलें ॥२
आतां श्रोतीं सावधान ॥ वाल्मीकमहाराज गेले कथून ॥ तेचि रामकथा संपूर्ण ॥ मूळापासून ऐकिजे ॥३॥
दृष्टीं न पाहतां अवघा ग्रंथ ॥ उगाच दोष ठेविती अकस्मात ॥ ते शतमूर्ख जाणिजे निश्र्चित ॥ नव्हती पंडित विवेकी ॥४॥
ग्रंथा नाम रामविजय ॥ श्रवणें सदा पाविजे जय ॥ चिंतित मनोरथ सिद्ध होय ॥ एक आवर्तन करितांचि ॥५
आदिपुरुष श्रीअवधूत ॥ तोचि हा ब्रह्मानंद यथार्थ ॥ श्रीधरवरदें अद्भुत ॥ महिमा कोणा न वर्णवे ॥६॥
इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ समत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ प्रथमाध्याय गोड हा ॥२०७॥
॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥