बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २० वा

अध्याय वीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥

जैसे दुर्बळाचिया गृहाप्रति ॥ समर्थ सोयरे येती ॥ त्यांसी पाहुणेर करावया निश्र्चिती ॥ नाहीं शक्ति तयातें ॥१॥
मग तो कंदमूळें आणून ॥ पुढें ठेवी प्रीतीकरून ॥ तैसे हे प्राकृत बोल पूर्ण ॥ संतांपुढें समर्पिले ॥२॥
पयोब्धीपुढें ठेविलें तक्र ॥ कीं सुरभीपुढें अजाक्षीर ॥ अमृतापुढें साखर ॥ नेऊनियां समर्पिली ॥३॥
कुबेरापुढें कवडी जाण ॥ रंकें ठेविली नेऊन ॥ शीतळ व्हावया रोहिणीरमण ॥ नवनीत पुढें ठेविलें ॥४॥
कल्पद्रुमापुढें बदरीफळ ॥ वैरागराचे कंठीं स्फटिकमाळ ॥ मलयगिरीसी गंध शीतळ ॥ निंबकाष्ठाचें चर्चिलें ॥५॥
जो ब्रह्मांडप्रकाशक गभस्ति ॥ त्यासी ओंवाळिजे एकारती ॥ परी तो घेत देखोन भक्ति ॥ ऐसेंचि येथें संतीं केलें ॥६॥
तैसे बोल हे हीन जाण ॥ परी संतांसी आवडी पूर्ण ॥ एकुणिसावे अध्यायीं कथन ॥ काय जाहलें तें परिसा हो ॥७॥
असुरांतें देखोनि हनुमंत ॥ सभा नागवूनि समस्त ॥ पुरुषार्थ करोनि अद्भुत ॥ गेला गुप्तरूपेंचि ॥८॥
लंकेचीं मंदिरें समस्त सीतेलागीं शोधी हनुमंत ॥ जैसा रत्नपरीक्षक निरीक्षित ॥ रत्न आपुलें हारपलें ॥९॥
धांडोळिली लंका नगरी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ जेथें होतीं रावण-मंदोदरी ॥ तेथें हनुमंत पातला ॥१०॥
तंव तो शक्रारिजनक ॥ हवन करी विघ्नाशक ॥ शेजेवरी निजली निःशंक ॥ पट्टराणी मंदोदरी ॥११॥
उपरमाडिया गोपुरें ॥ राणिवसाचीं दामोदरें ॥ ऐशीं सहस्र अंतःपुरें ॥ सीतेलागीं शोधिलीं ॥१२॥
सकळ स्त्रियांचे मंदिरांत ॥ रिघोन पाहे हनुमंत ॥ जो महाराज इंद्रियजित ॥ काम रुळत तोडरी ॥१३॥
रावणें आणिल्या नारी ॥ नागिणी पद्मिणी किन्नरी ॥ ज्यांचिया पदनखांवरी ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१४॥
ऐशा सुंदरी देखत ॥ परी काममोहित नव्हे हनुमंत तो राघवप्रिय अतिविरक्त ॥ ऊर्ध्वरेता वज्रदेही ॥१५॥
घटमठांमाजी व्यापून ॥ वेगळें असे जैसें गगन ॥ तैसाचि अंजनीनंदन ॥ लोकांत वर्तूनि वेगळा ॥१६॥
स्त्रिया शोधिल्या समस्त ॥ तव मंदोदरी जेथें निद्रिस्थ ॥ तेथें येऊन हनुमंत ॥ उभा राहिला क्षणभरी ॥१७॥
सुरूप देखोनि मंदोदरी ॥ म्हणे हेचि होय विदेहकुमरी ॥ निजेली पवित्रपणें शेजेवरी ॥ पतिव्रता म्हणोनियां ॥१८॥
सतियां शिरोरत्न सीता सती ॥ परमपुरुषाची चिच्छक्ति ॥ मज आजि भेटली निश्र्चितीं ॥ म्हणोन मारुती नाचत ॥१९॥
तों होमविधि संपादून ॥ तेथें आला द्विपंचवदन ॥ तों मंदोदरी उठोन ॥ पाय धूत पतीचे ॥२०॥
ऐसें देखोन हनुमंत ॥ क्षोभला जैसा प्रळयकृतांत ॥ म्हणे जानकी होय यथार्थ ॥ वश्य जाहली रावणातें ॥२१॥
रामवचन आठवी मारुति ॥ सीतेचे वदनीं कर्पूरदीप्ति ॥ मग मुखाजवळी त्वरितगति ॥ मंदोदरीच्या पातला ॥२२॥
मुख तिचे अवघ्राणिलें ॥ तों दुर्गंधीनें मन विटलें ॥ म्हणे मद्यपान आहे केलें ॥ उभयवर्गीं मिळोनियां ॥२३॥
भिंतीस लावतां कान ॥ होत नाहीं रामस्मरण ॥ हे रावणासी मानली पूर्ण ॥ तेथें स्मरण कायसें ॥२४॥
तों रावण आणि मंदोदरी ॥ दोघें निजलीं शेजेवरी ॥ सुषुप्तिअवस्थेमाझारी ॥ निमग्न जाहलीं ते वेळे ॥२५॥
मनी विचारी हनुमंत ॥ या दोघांसी उचलोनि त्वरित ॥ किष्किंधेसी न्यावीं यथार्थ ॥ पाहील रघुनाथ दोघांतें ॥२६॥
किंवा घालून चंड पाषाण ॥ दोघांचे येथेंच घेऊं प्राण ॥ ऐसें विचारी वायुनंदन ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥२७॥
अकस्मात गजबजोनी ॥ मंदोदरी बैसली उठोनी ॥ आक्रोशें हांक फोडोनी ॥ वक्षःस्थळ बडवित ॥२८॥
सवेंचि महाशंख करित ॥ दशकंठ धरी तिचे हात ॥ मयजा म्हणे अतित्वरित ॥ सीता द्या हो रामाची ॥२९॥
आजि विलोकिलें दुष्ट स्वप्न ॥ माझी गळसरी गेली जळोन ॥ एक बळिया वानर येऊन अशोकवन विध्वंसिलें ॥३०॥
तेणें वधिला अखया सुत ॥ समरीं गांजिला इंद्रजित ॥ घेऊन आला जनकजामात ॥ हरिदळ अद्भुत न वर्णवे ॥३१॥
शिळीं बुजोनियां सरितानाथ ॥ सुवेळेसी आला अवनिजाकांत ॥ रावण कुंभकर्ण शक्रजित ॥ वधोनि विजयी जाहला असे ॥३२॥
स्वप्न नव्हे हें ब्रह्मवचन ॥ तरी मंगळभगिनी द्या नेऊन ॥ मंगळदायक रघुनंदन ॥ त्यासी शरण जावें जी ॥३३॥
करितां परदाराभिलाष ॥ कोण पावला मागें यश ॥ मानव नव्हे राघवेश ॥ पुराणपुरुष अवतरला ॥३४॥
उदरीं बांधोनि दृढ पाषाण ॥ केवीं तरेल अगाध जीवन ॥ बळेंचि केलें विषप्राशन ॥ त्यासी कल्याण मग कैचें ॥३५॥
खदिरांगाराचे शेजेवरी ॥ कैसा प्राणी निद्रा करी ॥ महासर्पाचे मुखाभीतरीं ॥ हस्त घालितां उरे कैसा ॥३६॥
शार्दूळ करूं गेला पलाटण ॥ त्याचे जाळीमाजी जाऊन ॥ नांदेन म्हणे क्षेम कल्याण ॥ तो प्राणी कैसा वांचेल ॥३७॥
तुम्ही जरी सर्वांसी जिंकिलें ॥ परी राघवेंद्रा तैसें न चले ॥ पूर्णब्रह्म अवतरलें ॥ भक्तजन रक्षावया ॥३८॥
यालागीं द्विपंचवदना ॥ मी शरण जात्यें रघुनंदना ॥ देवोनि तयाची अंगना ॥ चुडेदान मागेन ॥३९॥
मनीं विचारी लंकापति ॥ इचें वचन सर्व मानिती ॥ नेऊन देईल सीता अवचितीं ॥ भलत्यासी आज्ञा करूनियां ॥४०॥
रावण म्हणे मंदोदरी ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ उदयीक नेऊन जनककुमारी ॥ जनकजामाता देईन ॥४१॥
पांचकोटी राक्षसगण ॥ अशोकवनाभोंवतें रक्षण ॥ तयांसी सांगोन पाठवी रावण ॥ रात्रंदिवस सावध असावें ॥४२॥
बिभीषण कुंभकर्ण इंद्रजित ॥ हे मयजेसी मानिती बहुत ॥ यांचा विश्र्वास न धरावा यथार्थ ॥ नेऊन देतील जानकीतें ॥४३॥
ऐसें समस्त वर्तमान ॥ वायुसुतें केलें श्रवण ॥ म्हणे मंदोदरी सती धन्य ॥ इच्या स्मरणें दोष नुरे ॥४४॥
तो दूतीस म्हणे दशकंधर ॥ अशोकवना जाऊनि सत्वर ॥ जनकात्मजेचा समाचार ॥ घेऊन येईं त्वरेनें ॥४५॥
तात्काळ चालिली दूती ॥ तयेमागें जाय मारुति ॥ आला अशोकवनाप्रति ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४६॥
तों अशोकवृक्षाचे तळीं ॥ ध्यानस्थ बैसली मैथिली ॥ दूती परतली तात्काळीं ॥ हनुमंत तेथे राहिला ॥४७॥
जय जय रघुवीर रघुवीर अयोध्यानाथ ॥ म्हणोनि नाचों लागला हनुमंत ॥ म्हणे धन्य मी आजि येथ ॥ जगन्माता देखिली ॥४८॥
पुच्छा नाचवी कडोविकडी ॥ तों विटावी डोळे मोडी ॥ चक्राकार मारी उडी ॥ रामनाम गर्जोनियां ॥४९॥
चहूंकडे पाहे मारुति ॥ तों रामनामें वृक्ष गर्जती ॥ पंचभूतें पक्षी घुमती ॥ रामस्मरणें करूनियां ॥५०॥

अध्याय वीसावा - श्लोक ५१ ते १००
म्हणे हे होय सीता सती ॥ पुराणपुरुषाची चिच्छक्ति ॥ सुटली कर्पूराची दीप्ती ॥ पाषाण स्मरती रामनाम ॥५१॥
मृगमदाहूनि विशेष ॥ सीतेच्या अंगींचा सुवास ॥ अशोकवन आसपास ॥ दुमदुमिलें तेणेंचि ॥५२॥
तेथें रक्षण असे त्रिजटा ॥ तिनें राघवी धरिली निष्ठा ॥ सत्संगाचा महिमा मोठा ॥ दुष्ट पापिष्ठा सद्भाव उपजे ॥५३॥
यावरी अंजनीहृदयरत्न ॥ गुप्तरूपें जवळ येऊन ॥ जानकीचे वंदोनि चरण ॥ मुद्रिका पुढें ठेविली ॥५४॥
ध्यानस्थ बैसली सीता सती ॥ मानसीं चिंती रघुपति ॥ पुढें उभा असे मारुति ॥ बद्धांजलि करूनियां ॥५५॥
इंदिरेपाशीं खगेंद्र ॥ कीं अपर्णेंसमीप नंदिकेश्र्वर ॥ कीं शचीपुढें जयंत पुत्र ॥ उभा ठाके प्रीतीनें ॥५६॥
असो कनकदंड पडे पृथ्वीवरी ॥ तैसा जानकीसी नमस्कारी ॥ मग अशोकवृक्षावरी ॥ राघवप्रिय ओळंघला ॥५७॥
इकडे तमालनीळ सांवळा ॥ ध्यानीं विलोकित जनकबाळा ॥ तों अवतारमुद्रिका ते वेळां ॥ सव्यकरांगुळीं दिसेना ॥५८॥
मुद्रिका न दिसे म्हणोन ॥ श्रावणारिस्नुषा उघडी नयन ॥ तों मुद्रिका पुढेंचि जाण ॥ दैदीप्यमान पडली असे ॥५९॥
मुद्रिका देखतां ते वेळीं ॥ हृदयीं आलिंगी जनकबाळी ॥ विमलांबुधारा नेत्रकमळीं ॥ जानकीच्या सूटल्या ॥६०॥
म्हणे सांडोनि रघुत्तमातें ॥ माये कैशी आलीस येथें ॥ राम आणि सौमित्रांतें ॥ त्यजोनि कोठें आलीस ॥६१॥
जगद्वंद्य तो श्रीराम ॥ जो चराचरफलांकितद्रुम ॥ त्याची वार्ता स्वस्तिक्षेम ॥ सांग मुद्रिके मजपाशीं ॥६२॥
तों त्या वनीं निशाचरी ॥ तेथें होत्या दुराचारी ॥ विक्राळरूपें ते अवसरीं ॥ सीतेजवळी धांविन्नल्या ॥६३॥
कां गे रडतीस म्हणोन ॥ पसरोनि आल्या विक्राळ वदन ॥ तुज आम्हीं भक्षूं तोडून ॥ कुटके करोन तिळप्राय ॥६४॥
कैंचा राम तमालनीळ ॥ तूं रावणासी घाली माळ ॥ राक्षसीणी करिती कोल्हाळ ॥ सीते भोंवत्या मिळोनियां ॥६५॥
बाबरझोटी भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ लंबस्तनें विशाळ उदर ॥ पर्वत माजीं सांठवती ॥६६॥
असो ऐसें देखोनि हनुमंत ॥ पुच्छ सोडी अकस्मात ॥ राक्षसिणी झोडिल्या समस्त ॥ प्राणांसी बहुत मुकल्या ॥६७॥
राक्षसिणी फिरविती डोळे ॥ पुच्छें आंवळिले दृढ गळे ॥ एक म्हणती जनकबाळे ॥ रक्षीं माते आम्हांसी ॥६८॥
निमाल्या बहु राक्षसिणी ॥ उरल्या लागती सीतेच्या चरणीं ॥ कित्येक गेल्या पळोनी ॥ दशकंठातें सांगावया ॥६९॥
हृदयीं बोध प्रगटतां जाणा ॥ भ्रांती भुली इच्छा वासना ॥ आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ पळती जैशा क्षणार्धें ॥७०॥
तैशा पळाल्या निशाचरी ॥ जानकी मुद्रिकेतें विचारी ॥ शरयूतीरविहारी ॥ कोठें सांग मुद्रिके ॥७१॥
मज आलिंगितां श्रीरामचंद्र ॥ तेव्हां कंठीं न सोसेचि हार ॥ आतां गिरि कानन समुद्र ॥ दोघांमध्यें पडियेले ॥७२॥
वाल्मिकानें भाष्य कथिलें ॥ तें काय सर्व व्यर्थ गेलें ॥ एक कपि बलिया येऊन बळें ॥ लंकानगर जाळील ॥७३॥
मज देऊनि समाधान ॥ सवेंचि आणील रघुनंदन ॥ पाषाणीं समुद्र बुजवोन ॥ दशवदनासी मारील पैं ॥७४॥
तों मुद्रिका नेदी प्रतिवचन ॥ म्हणे मज कळली खूण ॥ माझ्या विरहेंकरून ॥ देह राघवें त्यागिला ॥७५॥
कीं योगियांचें ध्यानीं गुंतला ॥ कीं भक्त धांवण्या धांवला ॥ कीं सौमित्रें माघारा नेला ॥ म्यां छळिलें म्हणोनियां ॥७६॥
कृपा न करवे मजवरी ॥ तरी येऊन माझा वध करीं ॥ मी बुडाल्यें चिंतासमुद्रीं ॥ काढी बाहेरी त्वरेनें ॥७७॥
अहा रामा राजीवनेत्रा ॥ दशकंठरिपु विषकंठमित्रा ॥ पुढें पाठविली कां हे मुद्रा ॥ कोण्या विचारेंकरूनियां ॥७८॥
मृगत्वचेची कंचुकी इच्छिली ॥ हाच अन्याय घडला मुळीं ॥ म्यां पापिणीनें ते वेळीं ॥ सौमित्र वीर छळियेला ॥७९॥
म्यां साधुछळण केलें ॥ म्हणोन राक्षसां हातीं सांपडलें ॥ मजला वियोगदुःख घडलें ॥ त्याच दोषें करूनियां ॥८०॥
जे साधुछळण करिती ॥ ते मज ऐसें दुःख पावती ॥ अंती जाती अधोगती ॥ महाअनर्थी पडती ते ॥८१॥
इत्यादि भाव तये क्षणीं ॥ दावी त्रिभुवनपतीची राणी ॥ म्हणे हा देह ठेवूनि ॥ काय कारण पैं असे ॥८२॥
सीता देखोन विव्हळ ॥ वृक्षगर्भी अंजनीबाळ ॥ गायन आरंभी रसाळ ॥ राघवलीला निर्मळ जे ॥८३॥
तो साक्षात रुद्रावतार ॥ रुद्रवीणा जैसा सुस्वर ॥ तैसा कंठ अति मधुर ॥ कंपस्वर गातसे ॥८४॥
कपीचे गायन रसाळ ॥ तटस्थ जाहलें रविमंडळ ॥ पाताळ सांडोन फणिपाळ ॥ येऊ भावी तेथें पैं ॥८५॥
तटस्थ जाहला प्रभंजन ॥ वेधला चंद्राचा हरिण ॥ अशोकवनीचे द्विजगण ॥ चारा घेऊं विसरले ॥८६॥
अयोध्यापतीची राणी ॥ तल्लीन होऊन ऐके श्रवणीं ॥ अशोकवृक्षामधोनि ॥ मंजुळ ध्वनि उमटत ॥८७॥
जो अजअजित निर्गुण ॥ कमलमित्रकुळभूषण ॥ भक्तहृदयमिलिंद पूर्ण ॥ जलदवर्ण जलजाक्ष ॥८८॥
जो मंगलधाम मंगळकारक ॥ जो मंगलभगिनीप्राणनायक ॥ मंगलजननीउद्धारक ॥ प्रतापार्क श्रीराम ॥८९॥
जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो चंडीशकोदंडप्रभंजन ॥ भवगजविदारण पंचानन ॥ नरवीरांतक जो ॥९०॥
जानकी जयाची चित्कळा ॥ रची अनंत ब्रह्मांडमाळा ॥ तो रघुवीर परब्रह्मपुतळा ॥ अतर्क्य लीला जयाची ॥९१॥
सच्चिदानंदतनु निष्कलंक ॥ पितृआज्ञाप्रतिपालक ॥ जो मायाचक्रचालक ॥ जगद्वंद्य जगद्रुरु ॥९२॥
जो पंचमहाभूतां वेगळा साचार ॥ तो पंचवटीवासी रघुवीर ॥ तेथें द्विपंचवदन सत्वर ॥ कपटमृग घेवोनि गेला ॥९३॥
तो द्विपंचवदन दुराचार ॥ पर्णकुटींत प्रवेशला तस्कर ॥ भूगर्मींचे रत्न सुंदर ॥ हरोनि नेलें क्षण न लागतां ॥९४॥
त्या तस्कराचा मार्ग काढीत ॥ किष्किंधेसी आला जनकजामात ॥ शक्रसुत वधोनि अकस्मात ॥ अर्कज राज्यीं स्थापिला ॥९५॥
त्या सीतावल्लभाचा किंकर ॥ दासानुदास एक वानर ॥ तेणें गांजोनि लंकानगर ॥ अशोकवना आला असे ॥९६॥
ऐसें ऐकतां गायन ॥ आनंदमय भूतनयेचें मन ॥ मग वृक्षाजवळीं उभी राहून ॥ करी नमन तयातें ॥९७॥
म्हणे धन्य धन्य तूं तरुवरा पूर्ण ॥ कोण करी तुजमाजी कीर्तन ॥ त्याचें पाहीन मी वदन ॥ धरीन चरण आदरें ॥९८॥
जो करितो तुजमाजी कीर्तन ॥ त्याची जननी धन्य धन्य ॥ त्यासी सदा असो कल्याण ॥ नलगे विघ्न कल्पांतीं ॥९९॥
ज्यासी रामकीर्तन आवडे ॥ त्यासी सांकडें कदा न पडे ॥ चारी मुक्ति तयापुढें ॥ दासी होऊनि राबती ॥१००॥

अध्याय वीसावा - श्लोक १०१ ते १५०
ऐसें जगन्माता बोलत ॥ तों उगाचि राहिला हनुमंत ॥ न बोले कांहीच मात ॥ पाहे तटस्थ जानकी ॥१॥
म्हणे येथें कापट्य पूर्ण ॥ कोण करितो न कळे कीर्तन ॥ बाहेर न भेटे येऊन ॥ तरी आतां प्राण सांडीन मी ॥२॥
अत्यंत कृश जाहली गोरटी ॥ मुद्रिका घातली मनगटीं ॥ म्हणे अयोध्यापति जगजेठी ॥ नव्हे भेटी तुझी आतां ॥३॥
मग जनकात्मजेनें ते वेळां ॥ वेणीदंड वेगें काढिला ॥ त्याचा गळां पाश घातला प्राणत्यागाकारणें ॥४॥
म्हणे अयोध्यापति तुजविण ॥ मी क्षण एक न ठेवीं प्राण ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ जनकात्मजा सरसावली ॥५॥
वेणीदंड काढोनि ॥ वृक्षडाहळीये बांधी तये क्षणीं ॥ राघवप्रिय तें देखोनि ॥ बहुत मनीं गजबजिला ॥६॥
जानकी त्यागील प्राणा ॥ मग काय सांगों रघुनंदना ॥ भरताग्रजा जगन्मोहना ॥ धांवें लौकरी ये वेळे ॥७॥
अंतरीं आठविले रामचरण ॥ बुद्धिप्रर्वतक म्हणोन ॥ मग तैसेंचि केलें उड्डाण ॥ गगनपंथें ते वेळां ॥८॥
अंजनी आत्मज ते वेळां ॥ गर्जोनि म्हणे पैल श्रीराम आला ॥ ऐसें बोलतां जनकबाळा ॥ ऊर्ध्वपंथें विलोकी ॥९॥
मारुती खालीं उतरून ॥ करिता जाहला साष्टांग नमन ॥ जगन्माता बोले वचन ॥ हो कल्याण चंद्रार्कवरी ॥११०॥
जोडोनियां दोनी कर ॥ उभा राहिला समोर ॥ म्हणे कल्याणरूप रघुवीर ॥ किष्किंधेसी सुखी असे ॥११॥
मी श्रीरामाचा अनुचर ॥ हनुमंतनामा वायुकुमर ॥ माते तुजकारणें लंकानगर ॥ धांडोळिलें सर्वही ॥१२॥
सीतेसी आनंद जाहला थोर ॥ जैसा बहुत दिवस गेला कुमर ॥ तो भेटतां हर्ष अपार ॥ तैसी निर्भय जाहली ॥१३॥
अवृष्टीं वर्षे घन ॥ कीं मृत्युसमयीं सुधारसपान ॥ कीं दुष्काळिया दर्शन ॥ क्षीरसिंधूचें जाहलें ॥१४॥
असो पंचवटीपासोन वर्तमान ॥ रामें लीला केली जी पूर्ण ॥ ती सीतासतीस वायुनंदन ॥ कथिता जाहला ते वेळीं ॥१५॥
जटायु उद्धरोनि कबंध वधिला ॥ वाळी मारोनि सुग्रीव स्थापिला ॥ तो अपार मेळवून हरिमेळा ॥ साह्य जाहला श्रीरामा ॥१६॥
आठवोन तव गुण स्वरूप ॥ राम सर्वदा करी विलाप ॥ श्र्वापदें पाषाण पादप ॥ सीता म्हणोनि आलिंगी ॥१७॥
तुवां जे अलंकार टाकिले ॥ ते म्यां श्रीरामापुढें ठेविले ॥ रामें शोक केला ते वेळे ॥ तो मज सर्वथा न वर्णवे ॥१८॥
तुजकारणें सौमित्र ॥ दुःखभरित अहोरात्र ॥ जैशी मातेची वाट निरंतर ॥ बाळक पाहे प्रीतीनें ॥१९॥
ऐसा ऐकतां समाचार ॥ जानकीस दाटला गहिंवर ॥ म्हणे परम कृपाळू रघुवीर ॥ मजकारणें शिणतसे ॥१२०॥
अयोध्येहूनि येतां हनुमंता ॥ मी मागें राहें चालतां ॥ श्रीराम तरूखालीं तत्वतां ॥ उभे राहती मजकारणें ॥२१॥
बहु श्रमलीस म्हणोन ॥ राम कुरवाळी माझें वदन ॥ बोलतां सीतेसी आलें रुदन ॥ सद्रद होऊन स्फुदतसे ॥२२॥
जानकीस म्हणे हनुमंत ॥ आतां शोक करिसी किमर्थ ॥ सत्वर येईल रघुनाथ ॥ दखमुखासी वधावया ॥२३॥
तूं आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ प्रणवरूपिणी मूळप्रकृति ॥ तुझे आज्ञेनें वर्तती ॥ विरिंचि रुद्र इंद्रादि ॥२४॥
भक्त तारावया निर्धारीं ॥ दोघें अवतरलां पृथ्वीवरी ॥ आधीं वियोग दोघांभीतरीं ॥ जाहलाचि नाहीं तत्वतां ॥२५॥
यावरी भूमिजा बोले वचन ॥ तूं श्रीरामाचा विश्र्वासी पूर्ण ॥ तुजप्रति अंतरखूण ॥ राघवें काय सांगितली ॥२६॥
येरू म्हणे कैकयीगृहांतरीं ॥ ताटिकांतकें आपुले करीं ॥ तुज वल्कलें नेसविली निर्धारीं ॥ खूण साचार ओळखें ही ॥२७॥
ऐसें ऐकतां जनकदुहिता ॥ म्हणे सखया हनुमंता ॥ तूं श्रीरामाचा पूर्ण आवडता ॥ कोटिगुणें अससी कीं ॥२८॥
परी तूं दिससी सूक्ष्म ॥ ऐसेच असतील प्लवंगम ॥ तरी हें लंकानगर दुर्गम ॥ तुम्हां कैसें आटोपे ॥२९॥
ऐसें सीतेचें वचन ऐकिलें ॥ हनुमंतें भीमरूप प्रकट केलें ॥ मंदाराचळातुल्य देखिलें ॥ विशाळ रूप मारुतीचें ॥१३०॥
कीं महामेरुचि अद्भुत ॥ कीं राक्षस वधावया समस्त ॥ अवतरला प्रळयकृतांत ॥ वानरवेष धरोनियां ॥३१॥
ऐसा देखानि रुद्रावतार ॥ सीता म्हणे हा केवळ ईश्र्वर ॥ रामकार्यालागीं निर्धार ॥ अवतरला येणें रूपें ॥३२॥
हनुमंत म्हणे महासती ॥ हे लंका घालीन पालथी ॥ परी कोपेल त्रिभुवनपति ॥ आज्ञा दिधली नाहीं मज ॥३३॥
जगन्माते मंगळभगिनी ॥ मजहूनियां प्रतापतरणी ॥ ऐसे वानर किष्किंधाभुवनीं ॥ रामाजवळी आहेत ॥३४॥
जांबुवंत नळ नीळ रविकुमर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥ काळासी शिक्षा करणार ॥ राघवासवें असती पैं ॥३५॥
सीता म्हणे हनुमंतासी ॥ एवढा सागर कैसा तरलासी ॥ येरू म्हणे मुद्रेनें अनायासीं ॥ आणिलें मज ऐलतीरा ॥३६॥
मार्गीं जाहले श्रम बहुत ॥ तुझे दर्शन हरले समस्त ॥ परी जाहलों असें क्षुधाक्रांत ॥ फळें येथें दिसती बहु ॥३७॥
परहस्त ज्यास स्पर्शित ॥ तें सर्वथा नेघें मी निश्र्चित ॥ आतां आज्ञा दीजे त्वरित ॥ निजहस्तें घेईन मी ॥३८॥
उपरी बोले श्रीरामललना ॥ समीर स्पर्शो न शके या वना ॥ साठी सहस्र राक्षस रक्षणा ॥ ठेविले येथें लंकेशें ॥३९॥
हनुमंत ऐकतां ते अवसरीं ॥ गडबडां लोळे धरणीवरी ॥ फळआहाराविण बाहेरी ॥ निघों पाहती प्राण माझे ॥१४०॥
अहा मध्येंच आलें मरण ॥ अंतरले रघुपतीचे चरण ॥ आतां सीताशुद्धि सांगेल कोण ॥ कौसल्यात्मजासी जाऊनियां ॥४१॥
सफळ वृक्ष देखोन दृष्टीं ॥ माझें चित्त होतसे कष्टीं ॥ ऐसें वाटतसे पोटीं ॥ वनचि अवघें सांठवावें ॥४२॥
ऐसें बोलतां हनुमंत ॥ क्षण एक पडला निचेष्टित ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ मुख पसरी फळांलागीं ॥४३॥
ऐसें देखोनि ते वेळीं ॥ जगन्माता सद्रदित जाहली ॥ अहा म्हणोन धांविन्नली ॥ कुरवाळित कृपाकरें ॥४४॥
म्हणे कपींद्रा उठीं उठीं ॥ पडली फळें तरुतळवटीं ॥ तीं पाहोनि एक मुष्टी ॥ घेईं उदरतृप्तीपुरतींच ॥४५॥
बा रे वरी चढसी जाण ॥ तरी तुज माझी असे आण ॥ पडलीं फळें ती वेंचून ॥ उदरनिर्वाह करीं कां ॥४६॥
ऐसें सीता बोलतां वचन ॥ मारुति उठिला झडकरून ॥ चरण धरी धांवोन ॥ म्हणे प्रमाण आज्ञा तुझी ॥४७॥
मग जे वृक्ष करिती रामस्मरण ॥ सीतेवरी छाया केली सघन ॥ ते रामउपासक पूर्ण ॥ करी वंदन कपि त्यांतें ॥४८॥
जो रामउपासक निर्मळ ॥ त्यासी विघ्न करूं न शके काळ ॥ म्हणोनि अंजनीचा बाळ ॥ तरु ते सकळ रक्षीत ॥४९॥
जे तरु न करिती रामस्मरण ॥ तेच उपटिले मुळींहून ॥ भुजाबळें त्राहाटून ॥ उर्वीवरी झोडिले ॥१५०॥

अध्याय वीसावा - श्लोक १५१ ते २१९
मग पडलीं फळें एकवटोनी ॥ हस्तद्वयें टाकी वदनीं ॥ हनुवटी हाले तेक्षणीं ॥ फळे तांतडी चावितां ॥५१॥
चंचळ दृष्टी करून ॥ मागें पुढें पाहे अवलोकून ॥ तंव ते वनरक्षक संपूर्ण ॥ निद्रार्णवीं बुडाले ॥५२॥
राक्षसांनी मद्य प्राशिलें ॥ हनुमंतें वन विध्वंसिलें ॥ पुढें पुच्छें उपडोनि आणिले ॥ वृक्ष भोंवते सर्वही ॥५३॥
हनुमंत बैसे फलहारासी ॥ पुच्छ पाहुणेर करी तयासी ॥ न सोडी बैसल्या ठायासी ॥ आपोशन मोडे म्हणोनी ॥५४॥
पुच्छासी हनुमंत बोले ॥ गोड गोड आणीं कां फळें ॥ आजि त्वां तृप्त आम्हां केलें ॥ चिरंजीव राहे तूं ॥५५॥
नंदनवनाहून सुंदर ॥ अशोकवनींचे तरुवर ॥ फणस इक्षुदंड लवंग परिकर ॥ उपडी समग्र एकदांचि ॥५६॥
केळी नारळी देवदार ॥ जंबू कपित्थ अंजीर ॥ ज्याचें रस लागती मधुर ॥ हनुमंतवीर सेवितसे ॥५७॥
असो तरुवर लक्षकोडी ॥ भुजाबळें उर्वीवरी झोडी ॥ राघव स्मरणें तांतडी ॥ फळें वदनीं टाकीतसे ॥५८॥
हनुमंत करीत यजन ॥ रामनाममंत्रेंकरून ॥ वदनकुंडीं आहुती पूर्ण ॥ घालोनि जठराग्नि तृप्त करी ॥५९॥
सीतेनें घातली आपुली आण ॥ वृक्षावरी न चढावें पूर्ण ॥ यालागीं वृक्ष झोडोन । फळें पाडी धरणीये ॥१६०॥
जैसी कां चपळा कडाडी ॥ तैसें पुच्छ वृक्ष मोडी ॥ तों राक्षस उठले तांतडी ॥ भीम कोल्हाळ करितचि ॥६१॥
चक्रें डांगा भिंडिमाळा ॥ घेऊन धांवले एकवेळां ॥ सीताशोकहरण कोंडिला ॥ सकळीं मिळोन एकदांचि ॥६२॥
वृषभीं कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं बहुत विखारी खगेंद्र ॥ कीं श्रृगालीं वेढिला मृगेंद्र ॥ खद्योत दिनकरा धरूं म्हणती ॥६३॥
कीं मंथूनि सागर द्विज ॥ धरूं म्हणती प्रळयबीज ॥ कीं आर्द्रमृत्तिकेचे गज ॥ प्राशूं म्हणती जळसिंधु ॥६४॥
कर्पूरपुतळे म्हणती एकवेळां ॥ धरोनि आणूं वडवानळा ॥ मक्षिका मिळोनि सकळा ॥ भूगोल उचलूं भाविती ॥६५॥
उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ कीं वृश्र्चिक पुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे वज्रातें ॥६६॥
तैसे हनुमंतावरी वनरक्षक ॥ एकदांच धांवले सकळिक ॥ यावरी लोकप्राणेशबाळक ॥ काय करिता जाहला ॥६७॥
विशाळ वृक्ष उपडोनी ॥ सव्य करीं घेत तेच क्षणीं ॥ जैसा पावक शुष्कवनीं ॥ संहारी तैसा राक्षसां ॥६८॥
साठीं सहस्र वनपाळ ॥ पुच्छें भारे बांधिले सकळ ॥ फिरवूनियां तात्काळ ॥ भूमीवरी आपटिले ॥६९॥
जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें ॥ बळें आपटितां होतीं शकलें ॥ तैसे वनरक्षक ते वेळे ॥ चूर्ण जाहले सकळही ॥१७०॥
सवेंच समुद्रजीवनीं ॥ प्रेतें देत भिरकावूनी ॥ भुभुःकारें गर्जे तो ध्वनी ॥ गगनगर्भीं न समाये ॥७१॥
घायाळें उरलीं किंचित ॥ तीं रावणासमीप आलीं धांवत ॥ म्हणती एक वानर अद्भुत ॥ अशोकवनीं प्रगटला ॥७२॥
सकळ वन विध्वंसून ॥ वनरक्षक मारिले संपूर्ण ॥ ऐसें राक्षसेंद्रें परिसोन ॥ परम विषाद पावला ॥७३॥
तेव्हां ऐशीं सहस्र महावीर ॥ प्रेरिता झाला दशकंधर ॥ म्हणे धरोनि आणा रे वानर ॥ नानायत्नें करूनियां ॥७४॥
जरी नाटोपे तुम्हांलागून ॥ तरी मज दावूं नका वदन ॥ ऐशीं सहस्र पिशिताशन ॥ गर्जत वना पातले ॥७५॥
नानाशस्त्रें घेतलीं हातीं ॥ हांकें निराळ गाजविती ॥ ऐसें देखोन मारुति ॥ विशाळरूप जाहला ॥७६॥
जैसा मंदराचळ विशाळ ॥ तैसा दिसे अंजनीबाळ ॥ वासुकी ऐसें पुच्छा सबळ ॥ लंबायमान सोडिलें ॥७७॥
लंकेचे महाद्वारींची अर्गळा ॥ लोहबंदी वेष्टिला ते वेळां ॥ मारुति मारीत उठिला ॥ सिंहनादें गर्जत ॥७८॥
वृक्षावरी पक्षी उडोनी ॥ प्रातःकाळीं भरती गगनीं ॥ तैशीं अरिमस्तकें तुटोनि ॥ उसळोन धरणीं पडताती ॥७९॥
बांधोनी शत्रुसमुदायभार ॥ गगनीं फिरवी वायुकुमर ॥ आपटितां होती चूर ॥ करचरणादि अवयव ॥१८०॥
तों त्यांत मुख्य जंबुमाळी ॥ हांका देत पातला ते वेळीं ॥ म्हणे वानरा रणमंडळीं ॥ तुज आजि मारीन ॥८१॥
शूल घेवोनि ते वेळां ॥ बळें मारुतीवरी धांविन्नला ॥ तों हनुमंतें लत्ताप्रहार दिधला ॥ कोथळा फुटला तयाचा ॥८२॥
जैसें शस्त्र बैसतां प्रबळ ॥ चूर्ण होय फणसफळ ॥ कीं वज्रघातें महाशैल ॥ चूर्ण जैसा होय पैं ॥८३॥
ऐसा जंबुमाळी पडला ॥ चिरोन हनुमंतें भिरकाविला ॥ दशमुखास समाचार कळला ॥ अत्यंत कोपला ते काळीं ॥८४॥
मग पाठविले लक्ष वीर ॥ पांच सेनाधीश मुख्य थोर ॥ मल्ल प्रतिमल्लनामें असुर ॥ प्रचंड चंड जघन पैं ॥८५॥
रावणाची आज्ञा घेऊन ॥ वेगें पावला अशोकवना ॥ हें देखोन वायुनंदन ॥ अर्गळा हातीं तुळीतसे ॥८६॥
करोनि पुच्छाचें उखळ ॥ हातीं घेऊनि लोहमुसळ ॥ कांडीतसे लंकेशाचें दळ ॥ साळीऐसें तेधवां ॥८७॥
असुरदेह पडती अचेतन ॥ हाचि साळींचा कोंडा झाडून ॥ सूक्ष्मदेह तांदूळ पूर्ण ॥ जात उद्धरोनि कपिहस्तें ॥८८॥
करकरां कपि दाढा खात ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ शस्त्रास्त्रें अवघे वर्षत ॥ पिशिताशन ऊठती ॥८९॥
मेरूऐसा सबळ ॥ जातां अंजनीचा बाळ ॥ तो तेथें देंखिलें देऊळ ॥ सहस्रस्तंभमंडित ॥१९०॥
तेथें रावणें देवी स्थापिली ॥ ब्राह्मणाचा देत नित्य बळी ॥ वायुसुतें ते वेळीं ॥ तें विदारिलें देवालय ॥९१॥
पायासकट उपडोन ॥ आकाशपंथें देत भिरकावून ॥ दशदिशांसी गेले पाषाण ॥ पक्ष्यांऐसे उडोनियां ॥९२॥
असो यावरी हनुमंतें ॥ लोहार्गळा घेवोनि हातें ॥ मांडिलें वीरकंदनातें ॥ गीत रामाचें गातसे ॥९३॥
अशोकवन तेचि खळें ॥ माजी वीरधान्य रगडिलें ॥ हनुमंत तिवडा मध्यें बळें ॥ पुच्छ फिरवीतसे ॥९४॥
तया खळियाजवळी ॥ खेचरदेवी जनकबाळी ॥ महावीरांचे दिधले बळी ॥ राशी केल्या शिरांच्या ॥९५॥
रेणुकेच्या कैवारें फरशधरें ॥ सर्व क्षत्रियांची छेदिलीं शिरें ॥ तैसें सीतेकारणें राघवकिंकरें ॥ संहारिले यामिनीचर ॥९६॥
असो हनुमंत ते वेळां ॥ असुर पुच्छें करूनि गोळा ॥ आपटोनि समुद्रजळा  माजी निक्षेपी साक्षेपें ॥९७॥
लक्ष वीर संहारिले ॥ मग सात पुत्र पाठविले ॥ तेही हनुमंतें चूर्ण केले ॥ अर्गळाघातेंकरूनियां ॥९८॥
हांक गेली रावणापाशीं ॥ वानरें संहारिलें समस्तांसी ॥ मग पाठविलें अखयासी ॥ दळभारेंसी तेधवां ॥९९॥
अखया देखोनि हनुमंत ॥ लोहर्गळा घेऊन नाचत ॥ गदगदां हंसूनि बोलत ॥ लंकेशात्मजासी तेधवां ॥२००॥
अरे अखया तुझें नाम व्यर्थ ॥ जैसे अजागळींचे स्तन यथार्थ ॥ कीं मूर्खासी अलंकार घातले सत्य ॥ बधिराचे श्रोत्र जैसे कां ॥१॥
कीं गर्भांधाचे नयन ॥ व्यर्थ काय विशाळ दिसोन ॥ कीं नासिकाविण वदन ॥ नामकरण तैसें तुझें ॥२॥
रासभासी भद्रासन ॥ श्र्वानासी अग्रपूजामान ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ व्यर्थ प्रेतास करविलें ॥३॥
तैसें अखया नाम दशमुखें ॥ तुज ठेविलें व्यर्थ शतमुखें ॥ आतां अखया तुझा क्षणएकें ॥ क्षय करीन जाणपां ॥४॥
मग अखया धनुष्य घेऊन ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ क्षण एक वायुनंदन ॥ उगाच उभा राहिला ॥५॥
काडिया पाडतां बहुत ॥ बैसका न सांडी पर्वत ॥ कीं सुमनवृष्टीनें मदोन्मत्त ॥ खेद सहसा न मानी ॥६॥
तैसे अखयाचे बाण ॥ येतां न भंगे वायुनंदन ॥ मग लोहार्गळा घेऊन ॥ कृतांतवत धांविन्नला ॥७॥
बैसता लोहार्गळेचे घाय ॥ अखयाचा जाहला क्षय ॥ समीरात्मज पावला जय ॥ सुरसमुदाय आनंदला ॥८॥
ऐकोनि अखयाचा समाचार ॥ शोकार्णवीं पडला लंकेश्र्वर ॥ आसाळी राक्षस भयंकर ॥ अशोकवना धाडिली ॥९॥
दहा सहस्र गजांचें बळ ॥ उदरांत सांठवी अचळ ॥ एक योजन मुख विशाळ ॥ पसरोनियां धांविन्नली ॥२१०॥
कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ तिनें धांवोनि सत्वर ॥ वायुसुत धरियेला ॥११॥
उचलोनि घातला मुखांत ॥ दांतांसी दांत जो मेळवित ॥ तंव तों उतरला उदरांत ॥ क्षणमात्र न लागतां ॥१२॥
लंकेशासी सांगता हेर ॥ आसळीनें गिळिला वानर ॥ ऐकतां आनंदला दशशिर ॥ असुरसभेसहित पैं ॥१३॥
रावण शर्करा वांटित ॥ तों दूत आले शंख करित ॥ आसाळीचा जाहला अंत ॥ हनुमंतें पोट फोडिलें ॥१४॥
तिनं चाविला नसतां वानर ॥ सगळाचि गिळिला सत्वर ॥ यालागीं जितचि वीर ॥ उदर फोडोनि निघाला ॥१५॥
शोकाकुलित द्विपंचवदन ॥ म्हणे हें अद्भुत प्रगटलें विघ्न ॥ यावरी शक्रजित जाऊन ॥ युद्ध करील परिसा तें ॥१६॥
रामविजय ग्रंथ सुरस ॥ सुंदरकांड कौतुक विशेष ॥ श्रवण करोत सावकाश ॥ रघुवीर भक्त आदरें ॥१७॥
रविकुळमंडणा पुराणपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटनिवासा ॥ ब्रह्मानंदा अविनाशा ॥ श्रीधरवरदा जगद्रुरो ॥१८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ विंशतितमाध्याय गोड हा ॥२१९॥
॥ अध्याय ॥ ॥ २० ॥ ॥ ओंव्या ॥ ॥ २१९॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥