बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय १७ वा

अध्याय सतरावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥

संत आणि इतर जन ॥ दिसती समसमान ॥ परी संत आनंदघन ॥ ब्रह्मानंदें डुल्लती ॥१॥
बकासंगे असतां मंराळ ॥ दिसती सारिखे शुद्ध धवळ ॥ परी क्षीर आणि जळ ॥ करिती वेगळें हंसचि ॥२॥
वायसांत वसे कोकिळ ॥ त्यांच्या सारखी दिसे केवळ ॥ परी प्रवर्ततां वसंतकाळ ॥ पंचमस्वरें आवळी ती ॥३॥
जंबुकवनांत वाढला केसरी ॥ परी त्याची कैसी पावेल सरी ॥ क्षणमात्रें गज विदारी ॥ हांकें भरी निराळ ॥४॥
स्फटिकांत मुक्ताफळ जाण ॥ दिसे सारिखें समसमान ॥ मुक्त जोहरी काढिती निवडोन ॥ करिती जतन जीवेंसीं ॥५॥
पाषाणांत परिस असे पूर्ण ॥ दिसे तैसाचि जड कठिण ॥ परी तो करी लोहाचें सुवर्ण ॥ कृष्णवर्णा लपवोनि ॥६॥
कस्तुरी आणि मृत्तिका ॥ दिसे रंग एकसारिखा ॥ परी मृगमद सुवासें सकळिकां ॥ श्रीमंतांसी नीववी पैं ॥७॥
तक्र दुग्ध एकवर्ण ॥ परी दुग्ध गोड सकळांसी मान्य ॥ तैसीं संतांचीं रूपें जाण ॥ इतरांसमान न म्हणावीं ॥८॥
ऐसें संत आनंदघन ॥ रामविजय परम पावन ॥ करावया बैसले श्रवण ॥ अतिआदरें करोनियां ॥९॥
आतां किष्किंधाकांडकमळावरी ॥ क्रीडेल वाग्देवी भ्रमरी ॥ तरी तो सुरस अंतरीं ॥ सदा चतुरीं सांठविजे ॥१०॥
षोडशाध्यायीं कथा परिकर ॥ पंपासरोवरासी रघुवीर ॥ आला सजलजलदगात्र ॥ ध्याय त्रिनेत्र जयातें ॥११॥
तों ऋष्यमूक पर्वतावरी ॥ उभे पांच वानर ते अवसरीं ॥ किंवा ते पांच केसरी स्वलीला उभे ठाकले ॥१२॥
कीं कनकाद्रीचीं रत्नें मांडित ॥ पंचश़ृंगें विराजित ॥ कीं उगवले पंच आदित्य ॥ उदयाचळीं एकदां ॥१३॥
कीं साह्य व्हावया रघूत्तमातें ॥ अवतरलीं पंचमहाभूतें ॥ कीं तें पंचायतन शोभतें ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥१४॥
ते पंपासरोवराचे तीरीं ॥ श्रीराम स्फटिकशिळेवरी ॥ सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून पहुडला ॥१५॥
देखतां सौमित्र राघव ॥ भयभीत जाहला सुग्रीव ॥ म्हणे वालीनें हे दोघें मानव ॥ वीर येथें पाठविले ॥१६॥
माझा घात करावया ॥ शत्रूनें दिधले पाठवूनियां ॥ म्हणोनि सुग्रीव तेथोनियां ॥ जाता जाहला सत्वर ॥१७॥
चौघांस न पुसतां तेथून ॥ पळे वेगें मित्रनंदन ॥ वनोपवनें लंघोन ॥ समीरवेगें चालिला ॥१८॥
मग सवेग धांवोनि हनुमंत ॥ उभा केला सूर्यसुत ॥ म्हणे तूं कां भितोसि येथ ॥ काय विपरीत देखिलें ॥१९॥
सुग्रीव म्हणे दोघे धनुर्धर ॥ दिसती परम प्रचंड वीर ॥ त्यांसी विलोकितां भय अपार ॥ माझे हृदयीं संचरलें ॥२०॥
आजि म्यां स्वप्न दिखिलें ॥ दोघे धनुर्धर साह्य जाहले ॥ वालीस वधोनि राज्य दिधलें ॥ किष्किंधचें मजलागीं ॥२१॥
अरुणोदयीं देखिलें स्वप्न ॥ सवें पातले दोघेजण ॥ परी मज धीर न धरवे जाण ॥ भयेंकरून व्यापिलों ॥२२॥
यावरी बोले वायुनंदन ॥ आम्ही असतां चौघे प्रधान ॥ कृतांतासी शिक्षा लावून ॥ तुजला रक्षूं सर्वदा ॥२३॥
तरी हे पंपातीरी दोघेजण ॥ बैसले वीर दैदीप्यमान ॥ कीं बृहस्पति आणि सहस्रनयन ॥ तैसे दोघे दिसती ॥२४॥
कीं एक तपस्वी एक उदास ॥ एक औदार्य एक धैर्य विशेष ॥ कीं एक पुण्य एक यश ॥ तैसे दोघे दीसती ॥२५॥
कीं एक ज्ञान एक विज्ञान ॥ एक आनंद एक समाधान ॥ कीं एक सगुण एक निर्गुण ॥ दोनी स्वरूपें हरीचीं ॥२६॥
एक साधक एक सिद्ध ॥ एक वैराग्य एक बोध ॥ एक मोक्ष एक ब्रह्मानंद ॥ तैसे दोघे दीसती ॥२७॥
यांचिया आगमनें पाहीं ॥ आनंद दाटला माझे हृदयीं ॥ यांचा समाचार लवलाहीं ॥ जाऊन आतां आणितों ॥२८॥
त्यांचिया बोलावरून ॥ कळेल त्यांचें अंतःकरण ॥ स्वाद घेतां रस पूर्ण ॥ चतुर जैसा ओळखे ॥२९॥
अरुणोदयावरून ॥ रजनी सरली कळे ज्ञान ॥ कीं दाहकत्व निरसतां अग्न ॥ शांत जाहला जाणिजे ॥३०॥
कीं संकटसमयावरून ॥ जाणिजे बंधु मित्रजन ॥ कीं इंद्रियनियमनें पूर्ण ॥ योगाचरण जाणिजे ॥३१॥
कीं दयेवरून कळे शांति ॥ कीं तर्कावरून कळे धृती ॥ कीं वेदांत श्रवणें निवृत्ती ॥ दशा बाणली जाणिजे ॥३२॥
कीं प्रेमरसावरून भक्ति ॥ कीं निरपेक्षेवरून विरक्ति ॥ कीं पावला अद्वय मुक्ति ॥ इहपरत्रीं जाणिजे ॥३३॥
तैसें त्यांचें अंतर समस्त ॥ मी आणितों तूं राहें स्वस्थ ॥ जरी तेथें असेल विपरीत ॥ हस्तसंकेत दावीन तूतें ॥३४॥
ऐसें बोलोनि हनुमंत ॥ पंपातिरासी आला त्वरित ॥ वटवृक्षातळीं रघुनाथ ॥ पहुडलासे श्रमोनियां ॥३५॥
स्फटिकशिळा दैदीप्यमान ॥ जेवीं शेषतल्पक शुभ्रवर्ण ॥ त्यावरी श्रावणारिनंदन ॥ विराजमान दिसतसे ॥३६॥
तंव त्या वटावरी हनुमंत ॥ कौतुकें करोनि उड्डाण करीत ॥ लक्षोनियां रघुनाथ ॥ हर्षें दावी वांकुल्या ॥३७॥
ऐसा देखानि वानर ॥ सौमित्रासी दावी रघुवीर ॥ पैल पाहें तो कपिवर ॥ पंचशर तोडरीं असे ॥३८॥
झळकताहे हेमकौपीन ॥ वज्रबंधन च चळे मदन ॥ माझें चित्त स्नेहेंकरून यासी देखोन भरलें असे ॥३९॥
मातेचें वचन हनुमंत ॥ आठवी तेव्हां हृदयांत ॥ जो ओळखे कौपीन गुप्त ॥ तोचि स्वामी तुझा असे ॥४०॥
तो प्रत्यया आला सकळ ॥ परी माझें अद्भुत बळ ॥ हा दिसतसे कोमळ ॥ तमाळनीळ साजिरा ॥४१॥
शिष्यापरीस आगळें बळ ॥ गुरूस असावें बहुसाल ॥ मग वटशाखा मोडोनि सबळ ॥ रामावरी टाकिली ॥४२॥
तें देखतां उर्मिलाजीवन ॥ चापासी वेगें चढविला गुण ॥ मग बोले कौसल्यानंदन ॥ स्थिर राहें नावेक ॥४३॥
बाळकौतुक पाहें साचार ॥ त्यावरी काय टाकिसी शर ॥ तों उताणा पहुडला रघुवीर ॥ तंव शाखा सत्वर आली वरी ॥४४॥
कोदंडदंडे ते अवसरीं ॥ शाखा ताडिती वरच्यावरी ॥ ते उडोनि गेली अंबरीं ॥ तृणतुल्य तेधवां ॥४५॥
आणीकही वृक्ष पाषाण ॥ वरी टाकी वायुनंदन ॥ तेही कौसल्यागर्भरत्न ॥ कोदंडेंकरून उडवित ॥४६॥
मग गर्जोनियां हनुमंत ॥ सोडी तेव्हां पंच पर्वत ॥ परी न उठेचि रघुनाथ ॥ कौतुकें हांसे ते काळीं ॥४७॥
मग रघुनाथें एक बाण ॥ चापासी लाविला न लागतां क्षण ॥ पांच पर्वत पिष्ट करून ॥ बाणें गगन भेदित ॥४८॥
शरपिसारा लागला किंचित ॥ तेणें उडोनि गेला हनुमंत ॥ गगनीं गरगरां भोंवत ॥ प्राण होत कासाविस ॥४९॥
वातचक्रीं पडतां तृण ॥ तें भूमीस न पडे मागुतेन ॥ त्यापरी वायुनंदन ॥ कासाविस होतसे ॥५०॥

अध्याय सतरावा - श्लोक ५१ ते १००
जनक पवन धांवे ते समयीं ॥ आत्मज धरिला दृढ हृदयीं ॥ म्हणे बारे शरण लवलाहीं ॥ रामचंद्रासी जाईं कां ॥५१॥
हा अवतरला शेषशायी ॥ जाण क्षीराब्धीचा जांवई ॥ दृढ लागें त्याचे पायीं ॥ कायावाचामानसें ॥५२॥
मग श्रीरामासी हनुमंत ॥ येवोनी लोटांगण घालित ॥ मागुती उठोनि धरित ॥ श्रीरामचरण सप्रेमें ॥५३॥
उठोनियां रघुवीर ॥ हृदयी धरिला वायुकुमर ॥ एक जाहले हरिहर ॥ जयजयकार करिताती ॥५४॥
श्रीराम म्हणे हनुमंता ॥ जोंवरी शशी आणि सविता ॥ तोंवरी अक्षयी हो तत्वतां ॥ बलार्णव अद्भुत तूं ॥५५॥
कैकयीहस्तींचा पूर्ण पिंड ॥ अंजनीहातीं पडला अखंड ॥ तो हा वीर जन्मला प्रचंड ॥ राघवाहून पूर्वीच ॥५६॥
असो जोडोनि दोनी कर ॥ हनुमंत उभा राहे समोर ॥ म्हणे हे राम करुणासमुद्र ॥ जगदुद्धार दीनबंधु ॥५७॥
हे राम भुवनसुंदरा ॥ हे राम जनकजावरा ॥ हे राम नवपंकजनेत्रा ॥ पुराणपुरुषा जगदात्मया ॥५८॥
परम भक्त जाणोन ॥ हनुमंतासी भेटला लक्ष्मण ॥ करीं धरून वायुनंदन ॥ सीतावल्लभें बैसविला ॥५९॥
रामचरण चुरी मारुति ॥ म्हणे रघुवीरा ऐक एक विनंती ॥ पैल ऋष्यमूक पर्वतीं ॥ वसे कपिपति सुग्रीव ॥६०॥
अभयवर देशील त्यातें ॥ तरी आतां भेटवीन तयातें ॥ बहुत कार्य तयाचेनि हातें ॥ पुढें साधेल श्रीरामा ॥६१॥
मग बोले रघुनंदन ॥ सुग्रीव हा कोणाचा कोण ॥ हनुमंत सांगे पूर्वकथन ॥ सावधान परिसावें ॥६२॥
कमलोद्भव करितां ध्यान ॥ प्रेमोदकबिंदु नेत्रींहून ॥ अंजुळींत पडतांचि पूर्ण ॥ ऋक्षरजा जन्मला ॥६३॥
तो ब्रह्मयाचा प्रियनंदन ॥ वानरवेष बळ गहन ॥ हिंडतां वनोपवन ॥ शिवलोकाप्रति गेला ॥६४॥
तंव देखिलें रम्य सरोवर ॥ भोंवते सदाफळ तरुवर ॥ परी तेथें शाप दुर्धर ॥ अपर्णेचा होता पूर्वीं ॥६५॥
जो नर सेवील येथींचें पाणी ॥ तो नारी होईल तत्क्षणीं ॥ हें ऋक्षराजें नेणोनी ॥ उडी जीवनीं घातली ॥६६॥
स्नान करून निघतां बाहेर ॥ जाहलें स्त्रियेचें शरीर ॥ रंभेहून परम सुंदर ॥ होय विचित्र ते काळीं ॥६७॥
तों मित्र इंद्र दोघेजण ॥ आले सुंदर स्त्री वरूं म्हणोन ॥ तंव तो ब्रह्मपुत्र लाजोन ॥ स्त्री होऊन बैसला ॥६८॥
न घडे तयेसीं सुरत ॥ मग दोघीं त्यागिलें रेत ॥ आधीं शक्रवीर्य मस्तकीं पडत ॥ वाळी तेथें जन्मला ॥६९॥
मागून सूर्यवीर्य पडलें ग्रीवेवरी ॥ तेथें सुग्रीव जन्मला ते अवसरीं ॥ विरिंचि पातला झडकरी ॥ तों पुत्र नारी जाहला असे ॥७०॥
मग तेणें प्रार्थोनि पार्वती ॥ उःशाप मागे पुत्राप्रती ॥ कामिनीभाव हरोनि मागुती ॥ पुत्र केला पूर्ववत ॥७१॥
दोघे पौत्र आणि सुत ॥ घेवोनि चालिला पद्मजात ॥ मग मृत्युलोकीं अद्भुत ॥ किष्किंधा नगर रचियेलें ॥७२॥
धाकुटा सुग्रीव वडील वाळी ॥ ऋक्षरजा घेऊनि ते काळीं ॥ किष्किंधाराज्य भूमंडळीं ॥ केलें तेणें बहुकाळ ॥७३॥
वाळी सुग्रीवासी तत्वतां ॥ ऋक्षरजा मातापिता ॥ पुढें वाळीस देऊन राज्यार्था ॥ धरिलें छत्र सुमुहूर्तें ॥७४॥
करोनियां योगसाधन ॥ ऋक्षरजा पावला ब्रह्मसदन ॥ पुढें वाळी सुग्रीव दोघेजण ॥ बंधु समान सारिखे ॥७५॥
इंद्रे वाळीस विजयमाळ ॥ दीधली म्हणोनि तो सबळ ॥ समरीं शत्रु होय निर्बळ ॥ वाळीप्रताप देखतां ॥७६॥
सूर्यें सुग्रीव करीं धरिला ॥ आणोन माझे हाती दीधला ॥ तूं सांभाळीं यासी दयाळा ॥ म्हणोनियां प्रार्थिलें ॥७७॥
सुग्रीव आणि वाळीमध्यें ॥ वैर लागलें राज्यसंबंधें ॥ पुढें वाळी सुग्रीवासि क्रोधें ॥ वधावयासी धांविन्नला ॥७८॥
सुग्रीवाची स्त्री रुमा रूपवंत ॥ वाळीनें घातली घरांत ॥ सुग्रीवें धरिला ऋष्यमूक पर्वत ॥ युद्ध होत षण्मासां ॥७९॥
माझी सूर्यें घेतली भाक ॥ तूं सुग्रीवाची पाठी राख ॥ ऐसें ऐकतां अयोध्यानायक ॥ काय बोलता जाहला ॥८०॥
हनुमंता भाक घे पूर्ण ॥ मज अत्यंत प्रिय सूर्यनंदन ॥ सत्वर आणि बोलावून ॥ भेटीस मन उताविळ ॥८१॥
तयाचा शत्रु वधोन ॥ त्यासी देईल छत्र सिंहासन ॥ याउपरी जानकी चिद्रत्र ॥ शोधूनि काढूं साक्षेपें ॥८२॥
ऐसें बोलतां जनकजामात ॥ तेथून उडाला हनुमंत ॥ येऊनि सुग्रीवास सांगत ॥ भाग्य अद्भुत उदेलें ॥८३॥
सीतावियोगें दुःखी रघुराज ॥ रुमावियोगें दुःखी तूं सहज ॥ तरी एकमेकाचें पूर्ण काज ॥ करा आतां परस्परें ॥८४॥
एकोनि मारुतीचें वचन ॥ आनंदें नाचे सूर्यनंदन ॥ हनुमंतातें आलिंगून ॥ पाठी हातें थोपटी ॥८५॥
रघुनाथप्राप्तीसी तत्वतां ॥ तूं सद्रुरु होय हनुमंता ॥ उतराई काय होऊं आतां ॥ उपकार तत्वतां न विसरें ॥८६॥
दशरथामज रघुपति ॥ त्याची किर्ति पूर्वीं ऐकिली होती ॥ पंचवटीस करोनि वस्ती ॥ पिशिताशन मारिले ॥८७॥
असो घेऊन वानरांचे भार ॥ नळ नीळ जांबुवंत वीर ॥ सुग्रीव आला जेथें रघुवीर ॥ त्रिभुवनसुंदर देखिला ॥८८॥
कोट्यानुकोटी मीनकेतन ॥ ज्यावरून सांडावे ओंवाळून ॥ तमालनीळ स्वरूप सगुण ॥ सुग्रीवें नेत्रीं विलोकिला ॥८९॥
लोटांगण घाली सुग्रीव ॥ नळ नीळादि वानर सर्व ॥ ऐसें देखोनि सीताधव ॥ पुढें धांवत भेटावया ॥९०॥
धरोनियां दोनी कर ॥ उठविला स्वयें भानुकुमर ॥ हृदयीं धरितां रघुवीर ॥ सुख अपार सुग्रीवा ॥९१॥
अत्यंत जाहला क्षुधातुर ॥ तया भेटला क्षीरसागर ॥ कीं दरिद्रियासी अपार ॥ द्रव्य घरीं सांपडलें ॥९२॥
कीं आळशाचें गृह शोधित ॥ कल्पवृक्ष आला अकस्मात ॥ की चुकलें बाळक भेटत ॥ जननीयेसी प्रीतीनें ॥९३॥
कीं तृषाक्रांत पडिला वनीं ॥ त्यापुढें लोटे मंदाकिनी ॥ तैसा सुग्रीवाचे मनीं ॥ ब्रह्मानंद उचंबळला ॥९४॥
जीव शिव एक भाव ॥ तैसें भेटीचें वैभव ॥ तेव्हां विमानारूढ देव ॥ सुमनसंभार वर्षती ॥९५॥
नळ नीळ जांबुवंत ॥ आणिक वानर समस्त ॥ तयांसी रघूत्तम आलिंगित ॥ आनंद गगनीं न समाये ॥९६॥
हनुमंतें तये वेळे ॥ पसरिले वृक्षडाहाळे ॥ मध्यें अग्नीसि साक्ष ठेविलें ॥ दोहींकडे बैसविले दोघेजण ॥९७॥
सुग्रीव आणि रघुनाथ ॥ उभयतांस म्हणे हनुमंत ॥ एकमेकांचा कायार्थ ॥ साह्य होऊनि साधावा ॥९८॥
रघुवीर म्हणे राज्य आणि दारा ॥ सोडवूनि देतों रविकुमरा ॥ हा माझा निर्धार खरा ॥ उदयीकचि पहाल ॥९९॥
अर्कज म्हणे जेणें नेली सीता ॥ त्यासी संहारून तत्वतां ॥ अयोध्येसी नेईन रघुनाथा ॥ मंगळभगिनीसहित पैं ॥१००॥
 

अध्याय सतरावा - श्लोक १०१ ते १५०
ऐसें ऐकतां उत्तर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें नांदें अंबर ॥ दणाणलें ते समयीं ॥१॥
सुग्रीव म्हणे रघुनंदना ॥ कालचि एक सुंदर ललना ॥ राक्षस घेऊन गेला जाणा ॥ निराळमार्गें त्वरेनें ॥२॥
आम्ही समस्त देखिली नयनीं ॥ आक्रंदत करुणावचनीं ॥ म्हणे रामा धांव निर्वाणीं ॥ चापपाणि करुणाकरा ॥३॥
क्षणभरि म्हणे सौमित्रा ॥ धांव धांव परम पवित्रा ॥ मागुती म्हणे स्मरारिमित्रा ॥ राजीवनेत्रा धांव वेगीं ॥४॥
तिनें उत्तरीय वस्त्र फाडोनी ॥ आभरणें टाकिलीं बांधोनी ॥ आम्हीं तीं ठेविलीं जतन करूनि ॥ राम ऐकोनि विस्मित ॥५॥
म्हणे नवल सांगती वानर ॥ सत्वर आणिले अलंकार ॥ घेऊनि आला वायुकुमर ॥ देत रघुवीराकरीं तेव्हां ॥६॥
तंव लवलाहें ग्रंथि सोडित ॥ आभरणें ओळखिलीं समस्त ॥ अहा प्रिये म्हणोनि रघुनाथ ॥ टाकी शरीर धरणीवरी ॥७॥
हृदयीं धरोनि अलंकार ॥ शोकार्णवीं पडला रघुवीर ॥ सद्रद होती समस्त वानर ॥ नयनीं नीर लोटलें ॥८॥
आठवोनी सीतेचे गुण ॥ विलाप करी रघुनंदन ॥ धांवोनियां लक्ष्मण ॥ धरी चरण रघुपतीचे ॥९॥
सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ सखया ओळखें अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकजा आंगीं होते ते ॥११०॥
सौमित्रें अलंकार घेऊनि ॥ सादर होऊनि पाहे नयनीं ॥ म्हणे हीं नेपुरें सीतेचे चरणीं ॥ ओळखलीं म्यां साच पैं ॥११॥
नेपुरें ओळखिली साचार ॥ वरकड नेणें मी अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकात्मजा लेत होती ॥१२॥
सौमित्र म्हणे सीता माउली ॥ म्यां कधीं नाहीं विलोकिली ॥ त्रिकाळ नमनाचे वेळीं ॥ नेपुरें चरणीं देखिली म्यां ॥१३॥
ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ आनंदला रघुनंदन ॥ म्हणे बा रे तूं दिव्य रत्न ॥ वैराग्यवैरागरींचें ॥१४॥
तूं भक्तसरोवरींचा राजहंस ॥ कीं ज्ञानमुक्ताफळमांदुस ॥ कीं शत्रुविपिनहुताश ॥ सदा निर्दोष सूर्य जैसा ॥१५॥
सुग्रीव म्हणे रविकुळमंडणा ॥ जरी जानकी तुज भेटवींना ॥ तरी मी भोगीन यमयातना ॥ कल्पपर्यंत निर्धारें ॥१६॥
नळ नीळ जांबुवंत ॥ माझे प्रधान जगविख्यात ॥ भूगोल हा क्षण न लागत ॥ उचलोनि घालिती पालथा ॥१७॥
आतां रघुपति तुझी आण ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ शोधून ॥ जानकी आणीन हें प्रमाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१८॥
मग बोले मखपाळण ॥ तुज तारा राज्य दिधल्यावांचून ॥ सीताशुद्धि न करीं आण ॥ श्रावणारीची जाण पां ॥१९॥
तुझें कार्य न होतां आधीं ॥ कदा न करीं मी सीताशुद्धि ॥ ही माझी प्रतिज्ञा त्रिशुद्धि ॥ ती काळत्रयीं टळेना ॥१२०॥
गुरुकृपेंवीण ज्ञान ॥ कीं आवडीविण भजन ॥ कीं प्रेमाविण कीर्तन ॥ स्नानेंविण अनुष्ठान जैसें ॥२१॥
कीं अतिथीविण भोजन ॥ कीं वीरश्रीविण रण ॥ कीं विप्र जैसा विद्येविण ॥ सर्व जन निंदिती ॥२२॥
तैसें तुझें कार्य न होतां ॥ सीताशुद्धि न घें सर्वथा ॥ ऐसें बोलतां रघुनाथा ॥ वीरश्री आंगीं दाटली ॥२३॥
चढविला चापासी गुण ॥ म्हणे बोलावी शक्रनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ कर जोडोनि विनवित ॥२४॥
म्हणे वाळीचा मार अनिवार ॥ आपण युद्ध न करावें समोर ॥ अकस्मात टाकिजे शर ॥ तरी संहार होय पैं ॥२५॥
मंगळजननी जामात ॥ सुग्रीवासी पुसे वृत्तांत ॥ वाळीसी तुज वैर अद्भुत ॥ काय कारण पडावया ॥२६॥
सुग्रीव सांगे पूर्व वृत्तांत ॥ म्हैसासुर नामें दैत्य अद्भुत ॥ त्याचा दुंदुभि वीर्यजात ॥ परम बलिष्ठ जन्मला ॥२७॥
महा उन्मत्त मद्यपानी ॥ कलह माजवावया हिंडे वनीं ॥ परी त्यासी समरांगणीं ॥ युद्धा कोणी भेटेना ॥२८॥
मग दैत्य गेला यमाजवळी ॥ म्हणे मजसीं मांडी युद्धफळी ॥ येरू म्हणे किष्किंधेसीं वाळी ॥ त्याजवळी जाय वेगीं ॥२९॥
ऐकोनि आला किष्किंधेजवळी ॥ जैसा मूषक निघे व्याळबिळीं ॥ कीं व्याघ्राची पहावया जाळी ॥ जंबुक जैसा पातला ॥१३०॥
दैत्य हांक फोडी तयेवेळीं ॥ ऐकतां धांविन्नला वीर वाळी ॥ जैसा मृगेंद्र कव घाली ॥ मातंग दुरी देखतां ॥३१॥
शत योजनें शरीर विशाळ ॥ वाळीनें पदीं धरिला तात्काळ ॥ भूमीवरी आपटिला सबळ ॥ भूमंडळ दणाणिलें ॥३२॥
कायेंतून गेला प्राण ॥ मग प्रेत त्याचें परम पवित्रा ॥ भवंडोन ॥ रागें दिधलें भिरकावून ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥३३॥
शतयोजनें कलेवर ॥ ऋषीचें आश्रम मोडले समग्र ॥ तेथें मुख्य मातंग ऋषीश्र्वर ॥ तेणें शाप दीधला ॥३४॥
या पर्वता स्पर्शतां शक्रनंदन ॥ तात्काळ जाईल त्याचा प्राण ॥ दुंदुभीचें प्रेत जाण ॥ पडलें आहे अद्यापि ॥३५॥
मग मयासुर दुंदुभीचा सुत ॥ पितृसूड घ्यावया त्वरित ॥ पतंग अग्नीस मागत ॥ सूड खांडववनाचा ॥३६॥
सर्पाचा सूड समूळभं ॥ सुपर्णासी मागे अळी ॥ तैसा मयासुर ते काळीं ॥ बाहे वाळीस युद्धातें ॥३७॥
शक्रसुत धांविन्नला त्वरित ॥ जैसे पर्वतावर वज्र पडत ॥ तैसा मयासुर मुष्टिघात ॥ देतां वर्मित रक्तासी ॥३८॥
पाताळविवरद्वारें ॥ मयासुर पळाला त्वरें ॥ त्याचे पाठीमागें शक्रकुमारें ॥ धांव घेतली पाताळा ॥३९॥
विवरद्वारीं मी रक्षण ॥ राघवा बैसलों बहुत दिन ॥ तों यक्ष गंधर्व मिळून ॥ किष्किंधा घेऊं धांविन्नले ॥४०॥
रायाविण कोण राखे पुरी ॥ धाकें दुर्ग ओलांडिले वानरीं ॥ प्रधान प्रजा ते अवसरीं ॥ मज सांगती गाऱ्हाणें ॥४१॥
मग विवरमुखीं ठेविला पर्वत ॥ किष्किंधेस पातलों त्वरित ॥ शत्रु आटोनि समस्त ॥ प्रजा सुखी राखिल्या ॥४२॥
विंशति मासपर्यंत ॥ वाळी विवरीं जाहला गुप्त ॥ मग प्रधान प्रजा समस्त ॥ म्हणती शक्रसुत निमाला ॥४३॥
सकळीं आग्रह करून बळें ॥ राजछत्र मज दिधलें ॥ तों मयाचें शिर घेऊनि ते वेळे ॥ वाळी वीर पातला ॥४४॥
वीस मास तो निराहार ॥ दृष्टीं न दिसे विवरद्वार ॥ परम उतरला मुखचंद्र ॥ घाबरा वीर जाहला ॥४५॥
उगवला असतां उष्णकर ॥ किंचित् दिसों लागलें द्वार ॥ मग नखाग्रेंच नग समग्र ॥ उलथोनियां पाडिला ॥४६॥
हर्षें गर्जना केली थोर ॥ तेणें नांदावलें अंबर ॥ परी मजलागीं चिंता अपार ॥ बहु जाहली ते काळीं ॥४७॥
म्हणे बंधु दैत्यांनीं मारिला ॥ घाबरा किष्किंधेसी पातला ॥ तों मज राज्यपदीं देखिलें डोळां ॥ परम क्षोभला ते काळीं ॥४८॥
गुरु त्यजिजे ज्ञानहीन ॥ प्रीतीविणें मित्रजन ॥ ऐसें बोलोनि शक्रनंदन ॥ शस्त्र घेवोनि धांविन्नला ॥४९॥
मग हे नळ नीळ जांबुवंत ॥ प्राणसखा माझा हनुमंत ॥ मज घेऊन पळाले त्वरित ॥ ठाव निश्र्चित नेदी कोणी ॥१५०॥

अध्याय सतरावा - श्लोक १५१ ते २१५
हिरोनि घेतली बळेंचि दारा ॥ नित्य येऊनि करी मारा ॥ मग ऋष्यमूकपर्वतीं सीतावरा ॥ केला थारा आम्ही येथें ॥५१॥
वाळीस असे येथें शाप ॥ यालागीं राहों सुखरूप ॥ सामासां युद्ध अमूप ॥ दोघांसी होत रघुत्तमा ॥५२॥
आम्हां दोघां समान बळ ॥ परी त्याचे गळां विजयमाळ ॥ तेणें त्याचा प्रताप सबळ ॥ शत्रूंसी पळ सुटतसे ॥५३॥
विकट विषम ताल सात ॥ एकेच बाणें जो छेदी निमिषांत ॥ त्याचे हातें वाळीस मृत्य ॥ भविष्य पूर्वीं केलें हें ॥५४॥
ऐसें बोलतां सूर्यसुत ॥ धनुष्य योजी अवनिजाकांत ॥ अर्धचंद्र बाण त्वरित ॥ आकर्णवरी ओढिला ॥५५॥
मांडी दृढ देहुडें ठाण ॥ पाठीसी उभा लक्ष्मण ॥ त्याचा चरणांगुष्ठ रघुनंदन ॥ पायांखालीं रगडीत ॥५६॥
दडपितां शेषचरणांगुष्ठ ॥ सप्तही ताड जाहले नीट ॥ एकाचि बाणें सपाट ॥ सातही केले राघवें ॥५७॥
सात ताड शेषपृष्ठीवरी ॥ यालागीं निटावले झडकरी ॥ तों दुंदुभीचें प्रेत ते अवसरीं ॥ मित्रसुतें दाखविलें ॥५८॥
हें जो उचलील पुरुषार्थी ॥ वाळीचा मृत्य त्याचे हातीं ॥ चरणांगुष्ठें रघुपति ॥ प्रत ढकली तेधवां ॥५९॥
तेंही तृणप्राय उडोन ॥ पडिलें दिगंतरीं जाण ॥ अद्भुत प्रताप देखोन ॥ सुग्रीव चरणीं लागला ॥१६०॥
मग म्हणे चापपाणी ॥ सुग्रीवा तूं किष्किंधेसी जाऊनि ॥ वाळीतें पाचारूनि आणीं ॥ समरांगणीं युद्धातें ॥६१॥
ऐसें ऐकोनि यथार्थ ॥ सुग्रीवासी आवेश बहुत ॥ म्हणे त्यासी वधील हा निश्र्चित ॥ यदर्थीं संशय असेना ॥६२॥
कमलदलाक्ष कृपाघन ॥ वर्षे स्वानंदामृत जीवन ॥ तें कर्णद्वारें सेवून ॥ सूर्यसुत तृप्त जाहला ॥६३॥
रामचंद्रें अमृताबिंदु टाकिले ॥ तेणें सुग्रीवकर्णचकोर धाले ॥ कीं ते कर्णयाचकतृप्त जाहले ॥ श्रीरामवचननिधानें ॥६४॥
मग तो घासरमणीचा सुत ॥ दशकंठरिपूस विनवित ॥ म्हणे विषकंठवंद्या एक हेत ॥ पूर्ण माझा करीं कां ॥६५॥
तरी अकस्मात टाकोनि बाण ॥ घ्यावा जी वाळीचा प्राण ॥ अवश्य म्हणे जगन्मोहन ॥ भक्त वचनपाळक जो ॥६६॥
मग किष्किंधेसमीप सूर्यकुमर ॥ करीत थोर भुभुःकार ॥ दणाणिलें अवघे नगर ॥ इंद्रपुत्र दचकला ॥६७॥
गळां घालोनि विजयमाळ ॥ वेगीं धांविन्नला वाळी सबळ ॥ म्हणे अरीचा आजि थोर कल्लोळ ॥ कोण साह्य जाहला असे ॥६८॥
तारा म्हणे स्वामी परियेसीं ॥ अंगद गेला होता पारधीसी ॥ तेथें बोलत होते ऋषी ॥ राम सुग्रीवा साह्य जाहला ॥६९॥
तरी राजेंद्रा अवधारा ॥ आपण न जावें समरा ॥ म्हणोन चरणीं लागली तारा ॥ परी शक्रकुमर न माने तें ॥१७०॥
ऐकोनि कुंजराचें गर्जन ॥ कैसा उगा राहे पंचानन ॥ मृग बळेंचि आला चालोन ॥ मग शार्दुळ कैसा स्थिरावे ॥७१॥
शुष्क काननीं प्रळयाग्नी ॥ कैसा राहील शांति धरून ॥ असो सहस्राक्षनंदन ॥ तारेप्रति बोलिला ॥७२॥
म्हणे प्राणप्रिये परियेसीं ॥ षण्मासां येतो युद्धासी ॥ आजि आला तिसरे दिवशीं ॥ उल्हासेंसी गर्जत ॥७३॥
घायीं शरीर त्याचें जर्जर ॥ तैसें माझेंही जाहलें चूर ॥ त्यासी साह्य वायुकुमर ॥ तेणें वीर आणिला कोणी ॥७४॥
तरी तारे तूं आणि अंगद ॥ सुखें भोगा राज्यपद ॥ आजि सुग्रीवाचा करीन वध ॥ तरीच येईन माघारा ॥७५॥
नाहीं तरी भेठ हेचि ॥ बोलोन वाळी उठे तैसाचि ॥ जैसी उडी पंचाननाची ॥ मातंगासी लक्षोनियां ॥७६॥
जैसा पर्वतावरी पर्वत पडला ॥ तैसा सुग्रीवावरी आदळला ॥ आवेशें झगडती ते वेळां ॥ कांपों लागली धरित्री ॥७७॥
मल्लयुद्ध होता अनिवार ॥ गुप्त पाहे अवनिजावर ॥ तों दोघे सारिखे दिसती वीर ॥ कोणावरी शर टाकावा ॥७८॥
मारुति म्हणे अयोध्यापति ॥ हे दोघे एकसारिखे दिसती ॥ मग सुमनहार त्वरितगती ॥ समीरसुतें गुंफिला ॥७९॥
सुग्रीवाचे गळां घालीं ते क्षणीं ॥ विलोकित कैवल्यदानी ॥ दोघे हांक देत गगनीं ॥ प्रतिध्वनी उठताती ॥१८०॥
वज्राऐसे कठोर ॥ हाणिती तेव्हां मुष्टिप्रहार ॥ भूगोळ कांपत समग्र ॥ दणाणित पाताळें ॥८१॥
शत योजनें झाडें उपडोनि ॥ निजबळें घालिती उचलोनि ॥ उसळें तरू धांवती गगनीं ॥ विमानें पळविती देव पैं ॥८२॥
चक्राकार फिरविती पर्वत ॥ न कळतां टाकिती अकस्मात ॥ क्षणक्षणां भूकंप होत ॥ ग्रीवा सरसावी भोगींद्र ॥८३॥
हृदयीं समर्पित वज्रमुष्टी ॥ तेणें उडुगणांची होत वृष्टी ॥ गगनीं देवांचियां थाटी ॥ युद्ध दृष्टीं विलोकिती ॥८४॥
असो सहस्राक्षाचा सुत ॥ सुग्रीवासी हाणी मुष्टिघात ॥ कासावीस सूर्यसुत ॥ मागें पाहत रामाकडे ॥८५॥
वीर सांपडतां रणमंडळीं ॥ बंधूची वाट पाहे ते वेळीं ॥ तैसा सुग्रीव हृदयकमळीं ॥ दीनबंधूतें आठवी ॥८६॥
म्हो कां न सरे माझा भोग ॥ कृपा न करी अवनिजारंग ॥ जो विषकंठहृदयपद्मभृंग ॥ दशकंठदर्पदमन जो ॥८७॥
असो इकडे कौसल्यानंदन ॥ तूणीरांतून काढी दिव्य बाण ॥ जैसी कल्पांत मेघांतून ॥ चपळा बाहेर निघे पैं ॥८८॥
धनुष्यावरी लावून बाण ॥ लक्ष साधिलें दुरोन ॥ वाळीचे हृदयीं येऊन ॥ अकस्मात खडतरला ॥८९॥
बाण लागला सतेज ॥ जैसी गिरिवरी पडे वीज ॥ कीं काद्रवेय देखतां अरुणानुज ॥ येऊन झडपी जैसा कां ॥१९०॥
कीं अभाग्यावरी धाड पडे ॥ राहुमुखीं शशी सांपडे ॥ कीं तपस्वियावरी सांकडें ॥ व्यसन नसतेंचि आदळे ॥९१॥
कीं तृतीयनेत्रींचा अग्न ॥ मन्मथावरी पडे येऊन ॥ तैसा वाळीचे हृदयीं बाण ॥ एकाएकीं संचरला ॥९२॥
महावृक्ष उन्मळिला ॥ कीं पर्वत भूमीवरी आदळला ॥ तैसा वाळीनें देह टाकिला ॥ भूमंडळीं ते काळीं ॥९३॥
वाळीचा देहांत जाणोनी ॥ जवळी आला चापपाणी ॥ इंद्रतनुज ते क्षणीं ॥ काय बोलता जाहला ॥९४॥
तूं क्षत्रिय एकपत्नीव्रती ॥ दुसरी वरिली कां अपकीर्ति ॥ अन्याय नसतां रघुपती ॥ बाण कां व्यर्थ टाकिला ॥९५॥
तूं सत्यवचनी यशवंत ॥ महाप्रतापी रणपंडित ॥ तुझी अपकीर्ति त्रिभुवनांत ॥ जाहली सत्य राघवेशा ॥९६॥
न हटकितां टाकिला शर ॥ मग बोले जानकीवर ॥ मर्कटा तूं केवळ वनचर ॥ तुज कासया हटकावें ॥९७॥
वीर असेल त्यासि हटकावें ॥ वनचरांसी गुप्तचि वधावें ॥ पारधियें मृग साधावे ॥ पाचारावें कासया ॥९८॥
तूं परम अन्यायी वानर ॥ बंधुस्त्रीअभिलाषी अनाचार ॥ म्यां दुष्ट दंडावया अवतार ॥ घेतला असे मर्कटा ॥९९॥
ऐसें ऐकतां ते काळीं ॥ हृदयीं सद्रद जाहला वाळी ॥ म्हणे मी पावन झालों ये वेळीं ॥ तुझेनि हस्तें राघवा ॥२००॥
थोर सुकृताचे पर्वत ॥ दृष्टीभरी देखिला रघुनाथ ॥ माझें सार्थक झालें यथार्थ ॥ नाहीं अंत निजभाग्या ॥१॥
येच मार्गीं जनकनंदिनी ॥ दश्ग्रीव गेला घेउनी ॥ मी त्यासी आणितों बांधोनी ॥ एक क्षण न लागतां ॥२॥
कक्षेमाजीं दाटून ॥ चतुःसमुद्रीं केलें स्नान ॥ पालखावरी आणोन ॥ अंगदाच्या बांधिला ॥३॥
मग पौलस्तीनें भिक्षा मागून ॥ नेला दशकंठ सोडवून ॥ त्या मशकाचा पाड कोण ॥ काय उशीर आणावया ॥४॥
माझें कर्म परम बळी ॥ तुझी सेवा नाहीं घडली ॥ राजीववाक्ष ते वेळीं ॥ स्नेहाळपणें बोलिला ॥५॥
तुझे हृदयींचा उपटोनि बाण ॥ आतां तुज सावध करीन ॥ मग म्हणे इंद्रनंदन ॥ ऐसें मरण पुढें नये ॥६॥
तुझेंनि हातें देहांत ॥ तूं दृष्टीपुढें रघुनाथ ॥ ऐसें बोलतां शक्रसुत ॥ सुग्रीव जवळी पातला ॥७॥
नेत्रीं स्रवती जळबिंदु ॥ उचंबळला शोकसिंधु ॥ मग वाळीनें तो कनिष्ठबंधु ॥ प्रीतीनें जवळी बैसविला ॥८॥
काढोनियां विजयमाळा ॥ घातली सुग्रीवाचे गळां ॥ म्हणे धन्य धन्य अनुजा वेल्हाळा ॥ दृष्टीं दाविला श्रीराम ॥९॥
धन्य धन्य तुझें वैर ॥ अंतीं दाविला रघुवीर ॥ वैर नव्हे हा स्नेह थोर ॥ मजलागीं तुवां केला ॥२१०॥
आतां रघुनाथसेवा प्रीतीं ॥ तुम्ही करावी अहोरातीं ॥ साह्य होऊनि सर्वाथीं ॥ सीतासती सोडविजे ॥११॥
ऐसें शक्रतनुज बोलोन ॥ विलोकिलें राघवध्यान ॥ तात्काळ देह सोडून ॥ वाळी जाहला विदेही ॥१२॥
विष्णुदूत येऊन ॥ नेला विमानीं बैसवून ॥ याउपरी तारेचें समाधान ॥ रघुनंदन करील पैं ॥१३॥
ते सुरस कथा अपार ॥ संतीं परिसावी सादर ॥ ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग चरित्र वर्णील हें ॥१४॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥
सप्तदशाध्याय गोड हा ॥२१५॥
ओंवीसंख्या ॥२१५॥
॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥