सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला

श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम: ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा । ऊँ नमो सर्व सिध्दाय स्वाहा ।
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम्‍ ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम्‍ । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम्‍ ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम्‍ । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती । अनेक पाहा लीला करिती । गाणगापुरी राहती । भक्तोध्दारा कारणे ॥१॥
अवतार कार्य पूर्ण होत । गाणगापुराहुनी निघत । श्रीशैल पर्वती येत । महास्वामी अवधारा ॥२॥
स्वामी गुहेत वसलेले आहेत व दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्याच्या समोर काही भक्त बसले आहेत.
मल्लिकार्जुनाते पाहोनी । स्वामी जाती कर्दळीवनी । तीनशे वर्षे तप करोनी । पुन्हा उठती अवधारा ॥३॥
अरण्यात एक ग्रामस्थ । होता वृक्षाची फांदी तोडत । कुर्‍हाड हातातून सुटत । पडे एका वारुळावरी ॥४॥
वारुळात श्री गुरुनाथ । होते पाहा समाधिस्थ । कुर्‍हाड मांडीवरी पडत । जागृत ऐसे होती ते ॥५॥
भिल्लासी देवोनी आशीर्वचन करिती तेथोनी प्रयाण । हिमालयात जावोन । काही काळ राहती ॥६॥
हिमालयात स्वामी समर्थ । योग्यांसी दर्शन देत । राहती एका गुहेत । नवल तेथे वर्तले ॥७॥
योग्यांसवे चर्चा करीत । बैसले होते स्वामी समर्थ । दोन वाघ येवोनी तेथ । श्रवणालागी बैसले ॥८॥
समर्थ म्हणती वाघांप्रत । काहो प्रकांड पंडित । गजावरी बैसोनी फिरत । जयपत्रे घेत होता ना ॥९॥
श्रोते व्हावे सावधान । आठवावे गुरुचरित्र आख्यान । दोन ब्राह्मण येवोन । चर्चा केली गुरुसवे ॥१०॥
ते ब्राह्मण पुढील जन्मात । वाघरुपे जन्म घॆत । तेची पुन्हा समर्थांप्रत । येवोनी गुहेत मिळती ते ॥११॥
वाघांसी पूर्वजन्म आठवत । मनुष्यवाणी बोलू लागत । म्हणती त्रिविक्रम यतीप्रत । छळले होते आम्ही हो ॥१२॥
आम्ही बैसलो पालखीत । त्रिविक्रम यतीसी चालवीत । नेले गाणगापुरात । वाद करण्या लागोनी ॥१३॥
नृसिंह सरस्वती समर्थ । पुरती आमुची जिरवीत । तो जन्म आमुचा जव संपत । ब्रह्मसमंध जाहलो ॥१४॥
अनेक शतके यातना भोगीत। होतो आम्ही त्या योनीत । वाघ जन्म पुढे मिळत । हिमालया माझारी ॥१५॥
आम्हा घडले दर्शन । क्षमा करा आम्हा लागोन । तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ।  ओळखिले आम्ही तुम्हासी ॥१६॥
ऐसे म्हणोनी वाघ । समर्थ चरणावरी लोळत । सद्‍गती त्या देत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥१७॥
म्हणती पुढील जन्मात । पंडित व्हाल काशीत ।तेथे दर्शन मिळत । ऐसे सांगती तयांना ॥१८॥
हिमालय पर्वतात । एक योगी तप करीत। दत्त दर्शन व्हावे म्हणत । उग्र तपस्या करीतसे ॥१९॥
परी न होई दर्शन । उबगे तो जिवा लागोन । गंगेत करण्या आत्मार्पण । सिध्द पाहा तो जाहला ॥२०॥
तव आकाशवाणी होत । दत्त म्हणे मी समिपत । आहे एका गुहेत । जेथे येवोनी भेटावे ॥२१॥
ऐकोनी आकाशवाणी । योगी तृप्त झाला मनी । अरण्यात जावोनी । गुहा पाहा तो शोधीतसे ॥२२॥
तव एका गुहेत । बैसले दिसती स्वामी समर्थ । योगी साष्टांग दंडवत । करोनी नमन करीतसे ॥२३॥
तीन शिरे सहा हात । आकाशवर्ण रुप दिसत । समाधी योग्यासी लागत । तृप्त पाहा तो होत असे ॥२४॥
काही काळ हिमालयात । जड मूढ जीवा उध्दरीत । कधी प्रकट कधी गुप्त ।स्वामी समर्थ अवधारा ॥२५॥
छेलाखेडा ग्रामात । दिव्य ज्योत प्रकटत । श्री स्वामी समर्थ । प्रकट होती तेथवरी ॥२६॥
आठ वर्षांचे रुपात । स्वामी तेथे प्रकट होत । अनेक लीला दावीत । भक्तोध्दारा कारणे ॥२७॥
श्री स्वामी समर्थ । हिमालयी जव संचार करीत । चंचलभारती म्हणत । लोक तेव्हा स्वामींना ॥२८॥
हरिव्दारात एक ब्राह्मण । पुरे स्वामींसी आपण कोण । अति गर्वे करोन । पुसो लगे स्वामींना ॥२९॥
स्वामी म्हणती तयासी । सांगतो तुझ्या वृत्तांतासी । तू व्याध होतासी । मारिले अनेक जीवांना ॥३०॥
दरोडे घातले अनेक । पापे केली अनेक ।तुझी पाप वृत्ती न जात । मारिले गाईसी काल तू ॥३१॥
ऐसे ऐकोनी वचन । थरथरा कापे ब्राह्मण । होई पश्चात्ताप पूर्ण । त्या ब्राह्मणा त्या वेळी ॥३२॥
स्वामी तीर्थ देती । गाय जिवंत करिती । व्दिजा सन्मार्गा लाविती । ऐसा दयाळ श्रीगुरु ॥३३॥
एके दिनी एक भक्त । स्वामींसी आपुले घरी नेत । स्वामी तयाते दाखवीत ।  एक सर्प गृहामाजी ॥३४॥
पाहोनी सर्प तेथवरी । मारावयासी धावती सारी । स्वामी म्हणती सत्वरी । मारु नका म्हणोनिया ॥३५॥
सर्पासी त्या उचलीत । आणि भक्ताते सांगत । हा तुझा बाप असत । सर्प योनी माझारी ॥३६॥
तुझे संरक्षण करीत । आहे हा येथप्रत । ऐसे भक्ता सांगत  । समर्थ स्वामी तेथवरी ॥३७॥
सर्प पायी लागत । मुक्ती द्या म्हणूनी प्रार्थित । तव त्यासही मुक्त । केला पाहा स्वामींनी ॥३८॥
असता स्वामी हिमालयात । नवल असे वर्तत । पारधी गोळ्या झाडत । पाहूनी कळप हरिणांचा ॥३९॥
परी गोळ्या न लागत । सर्व हरिणे बागडत । येती चरत चरत । स्वामी जवळी तेधवा ॥४०॥
हरिणांचे कळपात । बैसले दिसती स्वामी समर्था । पाहोनी शिकारी चिडत । गोळ्या झाडू लागले ॥४१॥
परी समर्थ हसत । हरिणेही तेथे खेळत । सर्व गोळ्या व्यर्थ । होऊनी जाती तेथवरी ॥४२॥
जो समर्थांचा अंकित । मृत्यू त्यासी काय करीत । दोन खडे समर्थ फेकीत । लक्षोनिया पारध्यांना ॥४३॥
तव ते होती स्तंभित । भूमीसी चिकटोनी जात । मग स्वामीसी शरण येत । दया करा म्हणोनिया ॥४४॥
स्वामी म्हणती तयांसी । आचरा अहिंसा व्रतासी । तेणे सद्‍गती तुम्हांसी । प्राप्त होईल निश्चये ॥४५॥
असो शिकारी गेले । स्वामी कळपापाशी आले । सर्व हरिणा म्हणाले । उध्दार होईल तुमचा हो ॥४६॥
पुढील जन्मात मनुष्यत्व । प्राप्त होईल तुम्हाप्रत । आणि माझे दर्शनार्थ । याल तुम्ही निश्चये ॥४७॥
ऐसे म्हणोनी कळपाप्रत । आनंदाने जा म्हणत । स्वामीही आपुल्या गुहेत । ध्यानस्थ पाहा जाहले ॥४८॥
काही काळ हिमालयात । गुप्तरुपे तप करीत । तेथोनिया मग निघत । दक्षिण दिशेसी श्री स्वामी ॥४९॥
अनेक तीर्थे सिध्द करीत ।  स्वामी येती व्दारकेत । पाहूनी वेरावळ सोमनाथ । नाथव्दारा पाहिले ॥५०॥
तया नारायण सरोवरात । जलावरी स्वामी बैसत । भक्त होती विस्मित  । पाहोनी लीला स्वामींची ॥५१॥
तैसेची अबू पर्वतावर । समर्थ  स्वामी दिगंबर । काही काळ लोकोध्दार । करीत तेथे राहिले ॥५२॥
अनेक तीर्थस्थाने पाहत । मंगळवेढयासी येवोनी राहत । ग्रामासमीप अरण्यात । होते राहिले श्री स्वामी ॥५३॥
देव मामलेदार नामे भक्त । ध्यानी स्वामीसी पाहत । मानसपूजा करीत । प्रतिदिनी नित्य स्वामींची ॥५४॥
एकदा असता ध्यान करीत । शालीग्राम त्यासी देत । ठेवी पूजेत नित्य । ऐसे सांगती तयाला ॥५५॥
देव मामलेदार मनी म्हणत । कोण हे योगी समर्थ । ध्यानी मजला दिसत । पूजा माझी स्वीकारिती ॥५६॥
ऐसे मनी चिंतीत । तव स्वामी प्रकट होत । मंगळवेढयासी यावे म्हणत । शालीग्रामाते घेवोनिया ॥५७॥
मंगळवेढयासी जाई भक्त । ध्यान करी अरण्यात । शालीग्राम आणला का ध्वनी येत । नेत्र उघडोनी पाहतसे ॥५८॥
पाहता स्वामी समर्थांसी । मिठी घाली चरणांसी । म्हणे दत्तप्रभू आपण येथी । अरण्यात राहता का ॥५९॥
चला मजसवे म्हणत । दत्तप्रभू उत्तर देत । अक्कलकोटी राहीन म्हणत । काही काळानंतर मी ॥६०॥
देव मामलेदार ध्यानस्थ बसलेले आहेत. त्याच्या समोर स्वामी समर्थ प्रगट होऊन त्यांना शाळीग्राम देत आहेत.
पूर्वजन्मींचा तव योगमार्ग । तोचि दिधला तुजप्रत । तू राही आनंदात । सदैव जवळी मी तुझ्या ॥६१॥
ऐसे सांगोनी स्वामी समर्थ । तेथेची पाहा होती गुप्त । देव मामलेदार विस्मित ।होवोनी जाती तेधवा ॥६२॥
जनी नामे विठ्ठल भक्त । राही मंगळवेढयात । एकादशीस वारी करीत । पंढपुरा जातसे ॥६३॥
जनाबाई वृध्द झाली । परी वारी न सोडली । विठ्ठलरखुमाऊली । अंतरी सदा ध्यातसे ॥६४॥
एकदा आषाढ वारीसी । जनी चालली पंढपुरासी । वादळ वर्षा मार्गासी । अति पाहा होतसे ॥६५॥
जनी म्हणे  विठ्ठलासी । आवरी वादळ हृषीकेशी । कैसे यावे पंढरपुरासी । म्हणोनिया प्रार्थितसे ॥६६॥
ऐसी प्रार्थना करीत ।तव प्रकटले स्वामी समर्थ । म्हणती जने चराचरात । पाहे विठ्ठल भरलेला ॥६७॥
ऐसे म्हणोनी वरदहस्त । जनाबाईंच्या शिरी ठेवीत । तात्काळ समाधी लागत । ऐसी लीला स्वामींची ॥६८॥
श्री समर्थ सप्तशती ग्रंथ । समर्थांचे लीलामृत । श्रवण पठणे भाग्यवंत । भक्त पाहा होतसे ॥६९॥
अडली कामे पूर्ण होत । पूर्ण होती मनोरथ । कृपा करी स्वामी समर्थ । पठण करिता ग्रंथाचे ॥७०॥
॥ अध्याय पहिला ॥  ॥ ओवी संख्या ७०॥
स्वामी जंगलात उभे आहेत आणि त्यांच्या अवती भवती खूप साप आहेत
त्यांच्या बरोबर भक्त आहे आणि त्या भक्ताने एक साप उचलला आहे.
घराच्या दरवाज्यात त्याची बायको उभी आहे. साप उचललेला भक्त पागोटे झटकतो तेव्हा
सोन्याचा साप बाहेर पडतो. हे दृश्य त्याची बायको आश्चर्याने पहात आहे.