गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री समर्थ सप्तशती ग्रंथ । समर्थ इच्छे निर्माण होत । त्याचा तोची करीत । अक्षरब्रह्म तो असे ॥१॥
मी येथे निमित्त । ही त्याची लीला असत । हा ग्रंथ नव्हे अमृत्र । भरोनिया वाढले ॥२॥
ही दत्ताची वाडमय मूर्ती । प्रकटली असे येथप्रताई । अजानुबाहू दत्तमूर्ती ।  राहे व्यापूनी ग्रंथाते ॥३॥
श्रवण पठणे परमार्थ । लाभे भक्तांसी निश्चित । साधका आत्मज्ञान प्राप्त । समर्थकृपे होत असे ॥४॥
समर्था या कलियुगात । तूची एक महासमर्थ । दिव्य अनुभव भक्तांप्रत । मिळावे तुझ्या करुणेने ॥५॥
ऊँ श्री स्वामी समर्थ । जे सप्तशती वाचीत । सारथी होऊनी तयाप्रत । निजात्म सुख तू दावावे ॥६॥
तू आदि अंतरहित । परब्रह्म तू साक्षात । अवधूत निरंजन दत्त । विविध रुपे राहसी तू ॥७॥
हे विश्व तव स्वरुप । तू ब्रह्माण्डाच्या अतीत । अजानुबाहू समर्थ । दत्तात्रेया गुरुवर्या ॥८॥
या ग्रंथाच्या अक्षराअक्षरांत । परब्रह्म श्री स्वामी समर्थ । व्यापोनी राहो प्रार्थित । श्री दत्त परब्रह्मासी ॥९॥
पठणे पुरवावे मनोरथ । प्रगती व्हावी अध्यात्मात । कुंडलिनी व्हावी जागृत । केवळ पठणे ग्रंथाच्या ॥१०॥
जो योगसाधना करीत । सोऽहम्‍ ध्याने आरधित । त्या सर्वा मार्ग प्राप्त । व्हावा ग्रंथ पठणाने ॥११॥
हा ग्रंथ नव्हे सद्‍गुरु । ऐसी व्हावी ख्याती थोरु । स्वामी समर्थ क्रृपासागरु । वरदान देती ग्रंथाते ॥१२॥
परब्रह्म प्रकाशमार्ग । तो हा सप्तशती ग्रंथ । पठणे मार्ग मिळत । सद्‍भक्तासी निश्चये ॥१३॥
परब्रह्म स्वामी समर्थ । ग्रंथासी वरदान देत । हा ग्रंथ नव्हे मी साक्षात । ऐसे माना भाविक हो ॥१४॥
केवळ लोकोध्दारार्थ । समर्थ ग्रंथ लिहवीत । परमार्थी प्रगती होत । ग्रंथ पठणे निश्चये ॥१५॥
नित्य करावे ग्रंथपठण । तैसेची करावे सोऽहम्‍ ध्यान । आणि मानस पूजन । नित्य करावे समर्थाचे॥१६॥
तयाचा प्रपंच परमार्थ । मी स्वये सिध्द करीत ।ऐसे ग्रंथ  महात्म । स्वये समर्थ सांगतसे ॥१७॥
ऐसे ऐकोनी वचन । द्त्त संतोष पावोन । म्हणे मज अपेक्षेहून । बहुत दिधले ईश्वरा ॥१८॥
असो स्वामी समर्थ । तया प्रज्ञापुरात । अनेक लीला करीत ।  चराचरी रहोनिया ॥१९॥
गिरनारहून येती सिध्द । हिमालयातून योगी येत । म्हणती स्वामी राहत । हिमालया माझारी ॥२०॥
कोणी म्हणती गिरनारी । समर्थ राहती तेथवरी । ऐसे लोक नाना परी बोलत राहती सर्वदा ॥२१॥
एकाच वेळी रुपे अनंत । घेऊनी स्वामी फिरत । भक्ता सर्वत्र भेटत । सर्वात्मक ते श्री स्वामी ॥२२॥
कधी काशीत प्रकटत । रामेश्वराही असत । अबू गिरनारीही राहत। एकाच वेळी श्री स्वामी ॥२३॥
सहस्ररुपे धरोन । करिती लोकांचे कल्याण । श्री स्वामी समर्थ भगवान । करुणासागर जगताचे ॥२४॥
कधी गुप्त कधी प्रकट। कधी आकाशवाणी बोलत । कधी मलंग पठाण वेषात । फिरे दत्त महास्वामी ॥२५॥
आजही सदेह रुपात । स्वामी राहती फिरत । या विश्वाचे ते विश्वनाथ । चिंता करिता विश्वाची ॥२६॥
ऐसा स्वामी समर्थ । चराचरी भरोनी राहत । परी काही स्थाने असत । सिध्दपीठ त्या देवाची ॥२७॥
नृसिंहवाडी गाणगापूर । तैसेची ते औदुंबर । अक्कलकोट अबू गिरनार । सिध्दपीठ असती ही ॥२८॥
ऐसी काही स्थाने असत । परी भक्त हृदयी राहत । निर्मल मने आठवीत । समर्थ जवळी राहतसे ॥२९॥
म्हणोनी सद्‍भक्तांनी । चिंता वाहावी गुरुचरणी । मानसपूजा करोनी । स्मरण करावे दत्ताचे ॥३०॥
ते राम ते कृष्ण । दत्त दिगंबर नारायण । ते साक्षात परब्रह्म । ऐसे स्व्ररुप समर्थांचे ॥३१॥
सर्व रुपे त्यांची असत । काली दुर्गाही तेची असत । मनी होऊनी निश्चित । भजावे स्वामी समर्थांना ॥३२॥
नित्य करावे पूजन । सोऽहम्‍ मंत्रे करावे ध्यान । हेची उत्तम साधन । मोक्षमार्गाते पावाया ॥३३॥
एक प्रहर ध्यान करीत । बारा वर्षांत होई सिध्द ।ऐसे स्वामी समर्थ । स्वये मजला सांगितले ॥३४॥
श्री स्वामी समर्थ । विश्वावरी कृपा करीत । मार्ग परमार्थ दावीत । लोकोध्दारा कारणे ॥३५॥
 एक भक्त दर्शनार्थ । दुरोनी येई चालत । पाहोनिया स्वामीप्रत । अति विस्मित होतसे ॥३६॥
म्हणे हिमालयात । स्वामी मजला दर्शन देत । ऐसे म्हणोनी एकटक । पाहत राहे स्वामींना ॥३७॥
त्यासी समाधी लागत । तटस्थ होऊनी तो जात । वैकुंठ दर्शन होत  । समाधित तयालागी ॥३८॥
जागृत होऊनी भक्त । सर्व लोकांसी सांगत । अहो तया वैकुंठात । पाहिले मी स्वामींना ॥३९॥
दिव्य सिंहासन असत । रत्ने जडली असंख्यात । लक्ष्मी देवदेवता दिसत । वेष्ठोनिया स्वामींना ॥४०॥
दिव्य सिंहासन असत । रत्न जडली असंख्यात । लक्ष्मी पायाशी बैसत । ऐसा महिमा स्वामींचा ॥४१॥
गरुड आणि हनुमंत । गणपती आणि अनेक सिध्द । स्वामी चरणाते सेवीत ।ऐसा महिमा स्वामींचा ॥४२॥
अणिमादि अष्टसिध्दी । चवरी घेऊनी हाती । सेवा स्वामींची करिती । ऐसा महिमा स्वामींचा ॥४३॥
ब्रह्मज्ञान आत्मज्ञान । समाधी आणि योगज्ञान । कायाकल्पाचेही ज्ञान  । समर्थकृपे मिळतसे ॥४४॥
नाना विद्या नाना कला । समर्थ चरणी राहिल्या । म्हणोनी त्यांच्या सेवकाला । उणे पडेना काहीही ॥४५॥
कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी । लक्ष्मी भरे जेथे पाणी । सर्व देव हात जोडोनी । चरणी तिष्टती सर्वदा ॥४६॥
ऐसे ब्राह्मण सांगत । परमानंदे नमन करीत । ऐसा स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिला ॥४७॥
स्वामी लीला सहचर । भाग्य त्यांचे अपार । स्वनयने पाहिला परमेश्वर । सांगाती ते राहिले ॥४८॥
चोळाप्पा स्वामींचा महाभक्त । अनेक लीला त्यासी दावीत । त्याचेसाठीच येत । अक्कलकोटात श्री स्वामी ॥४९॥
राहती त्याचे घरात । त्याचे मुलांसवे निजत । ऐसा भक्त  भाग्यवंत । घरी ठेविले ईश्वर ॥५०॥
स्वामीसुत श्रेष्ठ भक्त ।स्वामींसी एकात्म पावत ।  स्वामी पताका नेत । दर्यापार विदेशासी ॥५१॥
सुंदराबाई सेवक  । स्वामींसी ठेवी मुठीत । ती निजा म्हणता स्वामी निजत । ऐसा धाक तियेचा ॥५२॥
बाळाप्पा प्रेमळ भक्त । राही सदैव जप करीत । श्री स्वामी समर्थ । मंत्र त्याने  निर्मिला ॥५३॥
सदानंद साधू असत । हुक्का देती समर्थाप्रत । चरण संवाहन करीत । सारी रात्र राहतसे ॥५४॥
कानफाटया नाथ । श्री स्वामींची सेवा करीत । चिंतोपंत टोळ असत । लीला सहचर स्वामींचे ॥५५॥
भुजंगा चपरासी असत । श्रीपाद भट पूजा करीत । अक्कलकोटचे राजे असत । लीला सहचर स्वामींचे ॥५६॥
गवे स्वामी आणिक । स्वामींचे सांगाती असत । अवधूतबुवा असत । सेवा करिती स्वामींची ॥५७॥
शेषाचार्य अग्रिहोत्री ।  स्वामींसी तपकीर देती । असे बहू सात्विक मूर्ती । लीला सहचर स्वामींची ॥५८॥
स्वामी बहू मानीत । हास्यविनोदही करीत । शेषाचार्य प्रिय असत । सदा स्वामी समर्थांसी॥५९॥
जव स्वामी कोपत । राजाही पुढे जावो न शकत। परी शेषाचार्य जात । चरण धरती स्वामींचे ॥६०॥
नरसप्पा सुतार । तोही एक लीला सहचर । त्याचे घरी वारंवार । जावोनी राहती श्री स्वामी ॥६१॥
कलौ श्रीपाद श्रीवल्लभ । तेची एक स्वामी समर्थ । कर्दळीवनातूनी निघत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६३॥
कोणी पुसता म्हणत । मी असे श्री दत्त । नॄसिंहभान नाम असत । ऐसे सांगती तयालागी ॥६४॥
कधी म्हणती दत्तनगर । मूळपुरुष वडाचे झाड । आकाशात  पतितं तोयं । ऐसे म्हणती कधी कधी ॥६५॥
ऐसा स्वामी समर्थ । सदेह परब्रह्म दत्त । अक्कलकोटी राहत । भक्तोध्दारा कारणे ॥६६॥।
त्याच्या लीला अनंत । कथा त्याच्या अनंत । चमत्कार त्याचे अनंत । कोणी कैसे वर्णावे ॥६७॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । दावी लीला संकेत । दत्तावधूत आपुले चित्त । समर्थ कोणी वाहतसे ॥६८॥
स्वस्ती समर्थ सप्तशती । श्री स्वामींची वाड्मय मूर्ती । अक्षररुपे त्रैमूर्ती । साकार येथे होत असे ॥६९॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । येथे पाहा पूर्ण होत । भाविकांचे मनोरथ । पूर्ण  होती निश्चये ॥७०॥
॥ अध्याय दहावा ॥  
॥ ओवी संख्या ७०॥  
॥श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त ॥
॥ एकूण ओवी संख्या ७००॥