जय शंकर! जय स्वामी समर्थ!
आज, ३० ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुक्ल अष्टमी) या पवित्र दिवशी, धनकवडीचे अवलिया योगी श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हा दिवस नामस्मरण, जागरण, कीर्तन आणि स्वामी सेवेत रंगून जाणारा असतो. पुणे जिल्ह्यातील धनकवडी भागात आजही शांतपणे, समाधिस्त स्थितीत, असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे श्री सद्गुरू योगीराज शंकर महाराज.
त्यांची समाधी सातारा रस्त्यालगत, पुण्यात आहे. समाधीचा अधिकृत दिनांक आहे – वैशाख शुद्ध अष्टमी, शके १८६९ (२४ एप्रिल १९४७, सोमवार).
शंकर महाराज हे नाथसंप्रदायातील सिद्ध योगी, श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्योत्तम, आणि दत्तावतार मानलेले महायोगी होते. त्यांचे जीवन चमत्कार, करुणा आणि अध्यात्मिक तेजाने ओतप्रोत होते.
जन्म आणि बालपण
जन्म: अंदाजे इ.स. १८०० (किंवा काही संदर्भानुसार १७८५)
ठिकाण: मंगळवेढे (पंढरपूरजवळ) किंवा नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गाव
उपासनी कुटुंबात जन्म, तर काही कथांनुसार चिमणाजी अंतापूरकरांना रानात सापडलेले बाळ
दिवस: कार्तिक शु. अष्टमी, पहाटेच्या सुमारास प्रकट
बालपण:
अष्टावक्र (आठ ठिकाणी वाकडे), अजानुबाहू (हात गुडघ्यापर्यंत लांब), तेजस्वी डोळे आणि बालसुलभ चेहरा. लहानपणी अतिशय खोडकर, हरणाचा पाठलाग करत मचनूरच्या जंगलात पोहोचले, तिथे श्री स्वामी समर्थ महाराज भेटले आणि स्पर्शदीक्षा मिळाली.
गुरु दीक्षा आणि स्वामी समर्थांची भेट
गुरू: श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट). महाराज त्यांना “आई” आणि “मालक” म्हणत. सहा महिने स्वामींच्या सेवेत राहून योग-तंत्राचे शिक्षण घेतले. स्वामी समर्थांनी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले. नंतर एका दिवशी वटवृक्षाखाली त्यांनी स्वामींच्या सान्निध्यात अंतिम दीक्षा घेतली. स्वामी समाधीनंतर (इ.स. १८७८) शंकर महाराज महाराष्ट्रात परतले आणि आपला अध्यात्मिक प्रवास पुढे चालू ठेवला.
“सिद्धीच्या मागे लागू नका!” – त्यांचा जीवनसंदेश
शंकर महाराज महायोगी होते, पण त्यांना सिद्धी किंवा प्रसिद्धीची हाव नव्हती.
ते स्वतः नेहमी म्हणत असत — “सिद्धीच्या मागे लागू नका! सिद्धी नव्हे, भक्ती हवी.”
त्यांच्याकडे योगसामर्थ्य, दिव्यशक्ती आणि चमत्कारिक अनुभूती होती, पण त्यांनी कधीही त्याचा दिखावा केला नाही. ते म्हणत, “काहींना सिद्धी हवी असते प्रसिद्धीसाठी, पण खरी सिद्धी म्हणजे आत्मबोध.” त्यांनी आपल्या आयुष्यात धन, नावलौकिक, कीर्ती, अनुयायी यांचा मोह कधीही धरला नाही. म्हणूनच चिकित्सक, वैज्ञानिक, विद्वान सुद्धा त्यांच्या अलौकिकतेपुढे नतमस्तक झाले.
श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्य
शंकर महाराजांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले सद्गुरू मानले. ते भक्तांना नेहमी स्वामींचा जप करण्यास सांगत असत. त्यांचे वचन आजही भक्तांच्या हृदयात निनादते — “मी आणि माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. जो खुदको जानता है, वही मुझे पहचानता है.” त्यांनी आयुष्यभर स्वामींच्या पुण्यतिथी आणि प्रकट दिनाचे भक्तिभावाने पालन केले.
गुरुशिष्यांच्या भेटीचा अलौकिक प्रसंग
एके दिवशी शंकर महाराज साधनेत मग्न असतानाही अंतर्मनात उदासीनता दाटली. ज्ञानेश्वरी वाचत होते, पण मन स्थिर नव्हते. स्वामी समर्थांची आठवण तीव्र होत चालली होती. शेवटी त्यांनी स्वामींना मनोमन हाक मारली — “स्वामी! आज मला असं का होतंय? माझं काही चुकलं का?” तेवढ्यात आकाशातून एक स्वर ऐकू आला — “नाही बेटा.” डोळे उघडले तर समोर वटवृक्षाखाली स्वामी समर्थ पद्मासनस्थ. मुख तेजस्वी, नजरेत आईचे प्रेम. शंकर महाराज धावत गेले, नमस्कार करताच स्वामींनी त्यांना आपल्याकडे ओढून घेतले, हृदयाशी कवटाळले. क्षणात स्वामींच्या डोळ्यांतून प्रकाशाची एक तेजस्वी ज्योत निघाली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाली. त्या क्षणी त्यांना जाणवलं – “देहाचं अनुबंधन तुटलं. गुरू माझ्यातच आहेत.”
तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले —“अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥”
म्हणजेच, “जो भक्त अनन्यभावाने आमचे स्मरण करतो, त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः सांभाळतो.”
स्वामी समर्थ त्या दिवशी ३० एप्रिल १८७८ (चैत्र वद्य त्रयोदशी) — वटवृक्षाखाली निजानंदी समाधिस्त झाले. आणि त्यांनी आपला वारसा, दत्तभक्तीचा दीप, आपल्या लाडक्या शिष्य शंकरकडे सोपवला.
जन्माचा दिव्य चमत्कार
काही संदर्भांनुसार, शंकर महाराजांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावात झाला. तेथे चिमणाजी नावाचे शिवभक्त गृहस्थ राहत होते, ज्यांना संतान नव्हते. एके रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला — “रानात जा, तुला बाळ मिळेल.” ते रानात गेले आणि तिथे त्यांना दोन वर्षांचे तेजस्वी बाळ दिसले! त्याला घरी आणले आणि नाव दिले शंकर कारण तो जणू महादेवाचा प्रसादच!
वय आणि चमत्कारिक अस्तित्व
शंकर महाराजांचा काळ आणि वय हे नेहमीच रहस्य राहिले. कधी ते वृद्ध दिसत, कधी तरुण जणू काळावर त्यांचा अधिकारच!
प्रोफेसर भालचंद्र देव (डेक्कन कॉलेज, पुणे) यांनी एकदा विचारले “महाराज, आपले वय किती?”तेव्हा महाराज हसून म्हणाले “अंदाजे १५० वर्षे. मी शनिवारवाड्यात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे.” डॉ. नागेश धनेश्वर यांनी त्यांच्या मेडिकल चाचण्या केल्या. परिणाम पाहून ते थक्क झाले — वय १५२ वर्षे! म्हणजेच, १९४७ मध्ये समाधी घेताना त्यांचे वय सुमारे १६० वर्षांहून अधिक होते!
खऱ्या गुरूची ओळख
महाराज नेहमी म्हणत असत “पाणी प्या गाळून आणि गुरु करा जाणून.” ते खोट्या, दिखाऊ, पैसा उकळणाऱ्या गुरूबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत. त्यांचा उपदेश सरळ आणि स्पष्ट होता “गुरूकडे धाव घेऊ नका; खरा गुरुच शिष्याच्या शोधात येतो.” त्यांना ठाऊक होतं श्री स्वामी समर्थ स्वतः पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांची वाट पाहत होते, कारण जगाच्या कल्याणासाठी गुरू आणि शिष्य या दोघांची भेट अपरिहार्य होती.
अद्भुत चमत्कार (सिद्धी)
भविष्यकाळ वाचण्याची आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देण्याची सिद्धी
खिचडी वाटप- एका भांड्यातून ७० जणांना भोजन
पक्षाघात बरा करणे
हनुमान रूप दर्शन
दुधाची वर्षा
सर चूणिलाल मेहतांना विष्णुदर्शन झाले.
वसंत कुलकर्णींना महाराजांनी हनुमान रूपात दर्शन दिले.
उपदेश, तत्त्वज्ञान आणि आजचा संदेश
“स्वामी समर्थ नाम जपा!”
“इच्छा-इर्षा सोडा!”
“सिद्धी नको, भक्ती हवी!”
त्यांचा संदेश आजही भक्तांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतो. अनेकांना संकटकाळात त्यांच्या दर्शनाचा अनुभव येतो.
श्री शंकर महाराज म्हणजे प्रेम, करुणा आणि अध्यात्माचा संगम. त्यांचे जीवनच एक उपदेश होते सिद्धी नव्हे, साधना हवी; कीर्ती नव्हे, नामस्मरण हवे. आजही पुण्यातील धनकवडी समाधी मठात असंख्य भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. तेथील शांतता, प्रसन्नता आणि अलौकिक ऊर्जा आजही त्या दिव्य उपस्थितीची साक्ष देते.
जय शंकर! जय स्वामी समर्थ!