शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (14:08 IST)

मानव जन्माचे महत्त्व

आपल्या हिंदू धर्मात अशी समजूत आहे,की प्रत्येक जीव हा चोऱ्यांशी लक्ष योनीतून भ्रमण करतो,"पुनरपि जननं पुनरपि मरणं।" असे हे जन्म मृत्यूचे रहाटगाडगे प्रत्येकाचा मागे लागलेले आहे आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त मनुष्य प्राण्यालाच मोकळा आहे. कारण मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान मनुष्याशिवाय अन्य प्राण्यांना कधीच होऊ शकत नाही. 
 
मानव प्राण्याने जर का सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने अभ्यास केला,तर त्याला "कोहम  पासून सोहम" पर्यंत चे ज्ञान प्राप्त होते आणि तो अंती जन्म-मरण्याचा फेऱ्यातून मुक्त होतो.अशी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची शिकवण आहे.अर्थात या साठी ही प्रथम कुळात जन्म होणे महत्वाचे आहे.केवळ मानव योनीत जन्म झाला म्हणून कुणी या मार्गाने मुक्त होईल असे नव्हे.त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले पाहिजेत आणि त्याला सद्गुरुप्राप्ती होऊन त्यांचे योग्य मार्गदर्शन ही लाभले पाहिजे.
 
ज्या घरात नित्य उपासना सुरू आहे,धर्मग्रंथांचे वाचन चालू आहे, घरात ईश्वरनिष्ठ पुरुषांचे वास्तव्य आहे.अशा ठिकाणी जन्म झाला,तरच त्या जीवाला आपली पुढील प्रगती करून घेणे शक्य आहे,परंतु केवळ उत्तम कुळात जन्म होऊन ही भागत नाही. कारण पुढे दुर्जनाची सांगत लागली,तर मनुष्य वाममार्गा कडे ओढला जाण्याची बरीच शक्यता असते.यासाठीच ,उत्तम कुळात जन्म झाल्यानंतरही सत्संगतीचा लाभ झाला पाहिजे. अश्या प्रकारे सर्व  गोष्टी पूर्वसंचिताने जमून आल्यानंतरच या जन्मी उत्तम उपासना होऊन सद्गुरुकृपेने मुक्तीचा लाभ होऊ शकेल.
 
चातुर्मासाचा काळ उपासना करण्या आणि वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी होते. या काळात नामस्मरण करणे,धार्मिक ग्रंथ वाचणे,शरीरास आणि मनास शिस्त लागण्यासाठी काही नियम करून ते पाळावेत. त्यायोगे मनाला संयम करण्याची सवय लागते आणि ते अधिक प्रभावशाली बनते.