२००१
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥
तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
२००२
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥
तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ति । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
२००३
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥
करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥
तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
२००४
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥
उच्छष्टि हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥
तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥
॥४॥
२००५
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ओठ हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
२००६
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौर्यासीचे वेढां ॥ध्रु.॥
नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥
तुका म्हणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥५॥
२००७
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेई हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥
घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥
हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥३॥
॥३॥
२००८
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥
मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥
होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
२००९
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥
तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥
२०१०
आम्ही बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे ॥१॥
काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥
कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥
कारण सवें एका । अवघें आहे म्हणे तुका ॥३॥
२०११
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥१॥
आम्हीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
भोजन भोजनाच्या काळीं । मागों करूनियां आळी ॥२॥
तुका म्हणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा ॥३॥
२०१२
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥
आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
आपला निवाड । आपणें चि करितां गोड ॥२॥
तुम्हीं आम्हीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥
आसे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥४॥
२०१३
न व्हावें तें जालें । तुम्हां आम्हांसी लागलें ॥१॥
आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥
पाटोळ्यासवेंसाटी । दिली रगट्याची गांठी ॥२॥
तुका म्हणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥
२०१४
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥
आतां बळिया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥
वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥
२०१५
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तों झोंडाईंचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं ॥३॥
२०१६
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥
पांचांमधीं जावें । थोड्यासाटीं फजित व्हावें ॥२॥
तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आम्ही कांहीं ॥३॥
टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका म्हणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥
॥९॥
२०१७
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचोर्याचें दार । वरिल दाटावें तें थोर ॥२॥
वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥
तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
२०१८
करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥
म्हणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका म्हणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
॥२॥
२०१९
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईंट ॥ध्रु.॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥
२०२०
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥
आलें अंगासी तें बळिवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥
तुका म्हणे कळों येईंल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥
॥२॥
२०२१
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवे ती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥
भूत भविष्य कळों येईंल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥
स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥
तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥
॥१॥
२०२२
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥
इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥
विसरले मुक्ति भक्तिअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥
तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥
२०२३
भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥
सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥
२०२४
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥
सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥
॥३॥
२०२५
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥
काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥
नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥
तुका म्हणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥
॥१॥
२०२६
काळ जवळि च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥
कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥
काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥
काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥
काळ भोंवताला भोंवे । राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥
तुका म्हणे काळा । कर्म मळितें तें जाळा ॥५॥
॥१॥
२०२७
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥
तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
२०२८
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥
तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
॥२॥
२०२९
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे ।
नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें ।
विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥
आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥
आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप ।
मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथें काय पुण्यपाप ।
विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया ।
मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां ।
तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥
॥१॥
२०३०
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तत्वता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्ती । कांहीं नेघे आपुला ॥ध्रु.॥
उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । म्हणे करितां ढवाळ्या ॥२॥
जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी ददुऩरा । तुका म्हणे दुरा । देशत्यागें तयासी ॥३॥
२०३१
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे ।
भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥
आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।
शुकनळिकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकळिया ॥ध्रु॥
पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा ।
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
॥२॥
२०३२
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥
२०३३
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका म्हणे तया करावें तें काईं । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥
२०३४
जवळी नाहीं चित्ति । काय मांडियेलें प्रेत ॥१॥
कैसा पाहे चद्रिद्राष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
२०३५
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥
काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगळिया घरा येती ॥३॥
॥४॥
२०३६
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माड ।
अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं ।
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे ।
सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥
एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें ।
तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं
तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥
॥१॥
२०३७
नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाईं । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥
तुका म्हणे आम्ही सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥
२०३८
गर्भा असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥
गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥
तुका म्हणे निश्चळ राहें । होईंल तें सहज पाहें ॥५॥
२०३९
न म्हणे कवणां सद्धि साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥
ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥
गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥
देई चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥
आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥
तुका म्हणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देई प्रेम देवा ॥५॥
२०४०
अग्निमाजी गेलें । अग्नि होऊन तें च ठेलें ॥१॥
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥
लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥२॥
सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे ॥४॥
तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥५॥
॥४॥
२०४१
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥
रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥
प्रेमामृतपान । होईंल चरणरजें स्नान ॥२॥
तुका म्हणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥
२०४२
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥
तुका म्हणे गोड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
॥२॥
२०४३
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥
नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥
तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
२०४४
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥
२०४५
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥
म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
आम्ही घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥
तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
२०४६
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥
करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥
तुका म्हणे आईं । हातीं धरूनि संग देईं ॥३॥
२०४७
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥
तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥
तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥
२०४८
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥
व्याला वाडविलें म्हुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥
माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥
तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
२०४९
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
हें चि माझेंभांडवल ।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥
तुका म्हणे डोईं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
२०५०
आम्ही घ्यावें तुझें नाम । तुम्ही आम्हां द्यावें प्रेम ॥१॥
ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥
माझी डोईं पायांवरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
२०५१
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥
न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
२०५२
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥
तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
२०५३
आम्हां वैष्णवांचा । नेम काया मनें वाचा ॥१॥
धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥
उचित समय । लाजनिवारावें भय ॥२॥
तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥
२०५४
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥१॥
सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥
नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥२॥
तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका ॥३॥
२०५५
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥
आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥
माझें मज नारायणा । देतां कां रे नये मना ॥३॥
भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
२०५६
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥
नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥
करूनियां नीती । दिल्याप्रमाणें चालती ॥२॥
हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं ॥३॥
बळ बुद्धी युक्ति । तुज दिल्या सर्व शक्ति ॥४॥
तुका म्हणे खरा । आतां घेईंन मुशारा ॥५॥
२०५७
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥
करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥
चित्त चित्ती ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा ॥३॥
॥१५॥
२०५८
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण । तयावांचूनि काय तें ॥१॥
कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥
काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥२॥
हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥
२०५९
आम्ही भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुम्हांविण न पडे ॥ध्रु.॥
दोनी फाकलिया वाटा । गोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥२॥
तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥३॥
२०६०
वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥
आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
आलें बहुतांच्या मना । कां रे न होसी शाहाणा । मुळींच्या वचना । आम्ही जागों आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥
॥३॥
२०६१
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥२॥
तुका म्हणे मनीं । आपुल्या च लाभहानि ॥३॥
२०६२
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥१॥
सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥
पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥
तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
२०६३
जगा काळ खाय । आम्ही माथां दिले पाय ॥१॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥
हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥
तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
॥३॥
२०६४
ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥
भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥
तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
२०६५
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥
सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥
निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥
तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
२०६६
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
२०६७
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥
बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधुस ॥ध्रु.॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साह्य व्हावया ॥२॥
बोले तैसी करणी करी । तुका म्हणे एक हरि ॥३॥
॥४॥
२०६८
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं ।
पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥१॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा ।
संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे ।
मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥
तुका म्हणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम ।
हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
२०६९
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
बाखराचें वाण । सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥
न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥
२०७०
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
दृढ माझें मन । येथें राखावें बांधोन ॥२॥
तुका म्हणे वाटे । नको फुटों देऊं फांटे ॥३॥
॥३॥
२०७१
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥
तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥
२०७२
मागणें तें मागों देवा । करूं भक्ति त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥
तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
२०७३
चित्ती नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥
अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥
तुका म्हणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥
२०७४
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥
तुका म्हणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुर्हाडी ॥३॥
॥४॥
२०७५
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥
तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
२०७६
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
बहुथोड्या आड । निवारितां लाभें जाड ॥२॥
तुका म्हणे खरें । नेलें हातींचे अंधारें ॥३॥
२०७७
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
अराणूक नाहीं कधीं । जाली तरि भेदबुद्धि ॥२॥
अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव ॥३॥
॥३॥
२०७८
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥
शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
२०७९
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥
वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥
तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
२०८०
बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥
जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥
तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥
॥३॥
२०८१
पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥२॥
तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥
२०८२
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥
लेंकरें वत्ति पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥
आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काईं ॥४॥
तुका म्हणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
२०८३
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे ॥१॥
जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥
ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥
बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥
तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥
२०८४
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥४॥
तुका म्हणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
२०८५
लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चिंतीनें ॥ध्रु.॥
तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥
तुका म्हणे जरी होईंल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥
॥५॥
२०८६
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
अवघी निवारावी भूक । अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥
तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥
२०८७
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥
आतां तूं चि बाह्यात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
२०८८
जेथें माझी दृष्टि जाय । तेथें पाय भावीन ॥१॥
असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
अवघा च अवघे देसी । सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका म्हणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥
॥३॥
२०८९
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥
कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ॥२॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥४॥
२०९०
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास ॥१॥
जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥
कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥२॥
तुका म्हणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥३॥
२०९१
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥
न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥
अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचाराची वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥
उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें ॥४॥
२०९२
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥
तुका म्हणे भक्तिभाव । हा चि देवाचा ही देव ॥३॥
२०९३
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥१॥
न लगें सांगावें मांगावें ॥
जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें । फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
२०९४
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें ॥१॥
देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥
तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥३॥
२०९५
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥
तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥
तुका म्हणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥४॥
॥७॥
२०९६
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥३॥
तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥
काय करूं एका । मुखें सांग म्हणे तुका ॥५॥
२०९७
विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥
क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चत्ति ॥३॥
२०९८
भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर जाले ॥१॥
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥
का म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥
॥३॥
२०९९
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥
तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥
२१००
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥
नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥
देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥४॥
२१०१
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रम्हानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
॥३॥
२१०२
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु ॥१॥
वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥
शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥
तुका म्हणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥३॥
२१०३
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥
भक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥
गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥
२१०४
जैसें चित्ती जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥
अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि ॥३॥
२१०५ ना
हीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥
तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
२१०६
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥
पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥
आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥
मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥
तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥
२१०७
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥
उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥ध्रु.॥
जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळिंगी आवडी करूनियां ॥२॥
शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥
तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥
२१०८
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्ती माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥
जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥
आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥
तुका म्हणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥
२१०९
कळेल हें तैसें गाईंन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥
काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिका ॥३॥
तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥
२११०
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥
उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥
कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥
काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥
तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥
२१११
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥
नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥
पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥
२११२
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥
आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥
२११३
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥
तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥
२११४
विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥
मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥
हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥
सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥
अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥
तुका म्हणे क्षण । नको तयाचें दर्षण ॥५॥
२११५
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥
काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥
तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥
२११६
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥
जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥
आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥
काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥
तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥
२११७
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥
न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥
जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥
हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥
तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
२११८
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥१॥
नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥
असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥
तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक वेव्हार तयासाटीं ॥४॥
२११९
याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्ती पायीं सुखें ॥१॥
माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥
मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥
तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥
२१२०
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥
किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
२१२१
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥
आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥
२१२२
नव जातां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥
कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥
नाहीं आम्ही खात । कांहीं कोणाचें लागत ॥२॥
कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥३॥
२१२३
मोहरोनी चित्ती । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥
तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥
संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥
एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥
२१२४
काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥
कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा ॥३॥
२१२५
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥
हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥
तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥
नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
२१२६
निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥
नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥
निवडावें तन । सेतीं करावें राखण ॥२॥
तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥३॥
२१२७
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥
लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥
बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥
तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥
२१२८
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥
येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्ती ॥ध्रु.॥
नाहीं केली निंदा । आम्हीं दुसिलेंसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणें विण काय काज ॥३॥
२१२९
कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥१॥
तुज आठवावे पाय । आम्हीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥
तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥
तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
२१३०
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥
तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥
देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराईं ॥२॥
कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें ॥३॥
२१३१
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ती पांडुरंगा ॥१॥
येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥
अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥
तुका म्हणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥
२१३२
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥
आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥
सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥
तुका म्हणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥
२१३३
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥
तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥
खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥
तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥
२१३४
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥
ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥
२१३५
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥
आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्ती समाधान ॥ध्रु.॥
राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥
तुका म्हणे ऐसा होईंल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥
२१३६
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥
चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥
पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥
२१३७
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥
हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥
खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥
तुका म्हणे पाळी तोंडीचिया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥
२१३८
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥
पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे ॥ध्रु.॥
घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥
तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥
२१३९
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥
घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥
आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥
तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥
२१४०
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥
आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥
नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥
तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥
२१४१
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥
जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥
वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥
करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥
तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥
२१४२
माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥
जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥
सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥
गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥
तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥
२१४३
कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥
कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥
कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥२॥
कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥३॥
तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥
॥१३॥
२१४४
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥
तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥
करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥
तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥
२१४५
भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥
माझें तळमळी चित्ती । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥
कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥
तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥
२१४६
शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥
आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥
एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥
बुद्धि नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥
२१४७
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥
कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥
काय बळयुक्ति । नाहीं तुझे अंगीं शक्ति ॥२॥
तुका म्हणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥
२१४८
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥
माझी शक्ति नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥
आम्हां ओढी काळ । तुझें क्षीण झालें बळ ॥२॥
तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
२१४९
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥
काय करिसी होईं वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
तूं चि डोळे वाती । होईं दीपक सांगातीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं ॥३॥
२१५०
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥
माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥
गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥
तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि ॥३॥
२१५१
करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥१॥
आतां ये वो माझे आईं । देई भातुकें विठाईं ॥ध्रु.॥
उपायासी नाम । दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥
बीज आणि फळ । हें चि तुका म्हणे मूळ ॥३॥
२१५२
धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥
तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥
जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥
तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥
२१५३
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥
असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥
खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥
तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें ॥३॥
॥१०॥
२१५४
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥
तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥
ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥
तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥
२१५५
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥
माझें चित्ती मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥
दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥
तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईंल कळों ॥३॥
२१५६
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ती वाटतसें ॥१॥
याचा कांहीं तुम्हीं देखा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥
काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥
तुका म्हणे आतां जालों उतराईं । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥
२१५७
सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥
काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥
कुबिर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती ॥२॥
तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख फुंदता ॥३॥
२१५८
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥
रुचिविण काय शब्द वार्या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥
आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥
२१५९
मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आम्हां ॥१॥
वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥
गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥
२१६०
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥
वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥
उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥
तुका म्हणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥
२१६१
काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥
मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥
जाली तरी मर्यादा । किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥
तुका म्हणे साचा । कोठें जासी हृदयींचा ॥३॥
२१६२
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥
आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥
लावूनियां सवे । पळतां दिसाल बरवे ॥२॥
तुका म्हणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥
॥३॥
२१६३
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥
द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥
तुका म्हणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥३॥
२१६४
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥
बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥
फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥
तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण ॥३॥
२१६५
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥
ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥
चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥
वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें ॥३॥
२१६६
तळमळी चित्ती दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥
वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥
वेठीऐसा करीं भक्तिवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥
तुका म्हणे कईं देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥
॥४॥
२१६७
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥
ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हुण ॥ध्रु.॥
नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
॥१॥
२१६८
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥
येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥
काचें तरी कढे । जाती ऐसें चित्ती ओढे ॥२॥
विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका ॥३॥
२१६९
खोट्याचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥
काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥
तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे ॥३॥
॥२॥
२१७०
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥
दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥
केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥
कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता ॥३॥
माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥
तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥
॥१॥
२१७१
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥
हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥
जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥
तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥
२१७२
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥
तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥
२१७३
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥
इच्छितां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥
देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥
तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥
२१७४
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥
म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥
आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥
तुका म्हणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥
॥४॥
२१७५
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥
तार्कियाचें अंग आपणा पारिखें । माजिर्यासारिखें वाईंचाळे ॥ध्रु.॥
माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥
तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
२१७६
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईंल लेखूं ॥१॥
तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ध्रु.॥
इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥२॥
तुका म्हणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥
२१७७
भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्हीं भोग ब्रम्हतनु ॥१॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
॥३॥
२१७८
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥
विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु.॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥
तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥
२१७९
नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥
नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥
सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥
चुकी जाली आतां काय । तुका म्हणे उरली हाय ॥३॥
२१८०
आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥
माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥
भांडवल सेवा । हा चि ठेवियेला ठेवा ॥२॥
करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥
२१८१
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥
करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥
आधारें वदली प्रसादाची वाणी । उच्छिष्टसेवणी तुमचिया ॥२॥
तुका म्हणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥
॥४॥
२१८२
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥
पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥
जळो ऐसी ब्रिदावळी । भाटवोळीपणाची ॥२॥
तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥३॥
२१८३
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥
अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥
तुका म्हणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥
२१८४
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥
स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥
काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥
तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥
२१८५
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥
धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥
निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥
तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥
॥४॥
२१८६
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥
सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥
तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्याची ॥३॥
२१८७
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥
सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥
विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥
तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥३॥
२१८८
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥
भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोईं येथुनें चि ॥ध्रु.॥
येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥
तुका म्हणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥
॥३॥
२१८९
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥
आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥
संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥
आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे ॥३॥
२१९०
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥
आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥
प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥
तुका म्हणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
२१९१
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥
अंगभूत म्हूण पूजितो वाहाणा । म्हणतां शाहाणा येइल कैसा ॥२॥
तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥
२१९२
कुतर्याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे ॥१॥
जाय तिकडे हाडहाडी । गोर्हावाडी च सोइरीं ॥ध्रु.॥
अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥
तुका म्हणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥
२१९३
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥
बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥
सेविलिया निःकामबुद्धी । मदें शुद्धी सांडवी ॥२॥
त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥
॥५॥
२१९४
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥
असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥
दुसर्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥
एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
२१९५
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥
वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥
तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥
याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥
॥२॥
२१९६
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥
कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥
२१९७
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥
पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥
फेडा आतां पांग । अंगीं लपवुनी अंग ॥२॥
दुजें नेणें तुका । कांहीं तुम्हासी ठाउका ॥३॥
२१९८
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥
फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥
कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥२॥
तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥
॥३॥
२१९९
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥
नये पाहों कांहीं गोर्हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥
॥१॥
२२००
चावळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥
उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥
गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काईं ॥२॥
तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥
२२०१
आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥
कोण नाहीं दक्ष करितां संसार । आम्हीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥
नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥
तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥ ॥२॥
२२०२
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥
धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥
उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥
सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥
२२०३
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥
नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥
लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥
तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥
॥२॥
२२०४
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥
जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥
घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥
आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥
२२०५
धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥
जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥
विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥
तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥
॥२॥
२२०६
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥
पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥
न म्हणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥
तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥३॥
२२०७
शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥१॥
पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥
दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥२॥
सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥
॥२॥
२२०८
भक्ता म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥१॥
नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥
अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥
तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥
॥१॥
२२०९
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥
चित्ती न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥
न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्ती नाहीं त्यासी ॥२॥
तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥
२२१०
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥
ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥
सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥
तुका म्हणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥
अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक
बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥
लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ २० ॥
२२११
भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥
जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥
जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥
तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥
२२१२
नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥
जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥
ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥
तुका म्हणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥
२२१३
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥
आतां आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥
अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥
तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥३॥
२२१४
नाहीं आइकत तुम्ही माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥१॥
येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥
करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥२॥
तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥३॥
२२१५
नव्हे तुम्हां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥
मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥
स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥
शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची ॥३॥
२२१६
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥
सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥
दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥
जातीं उखळें चाटूं । तुका म्हणे राज्य घाटूं ॥३॥
२२१७
आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥१॥
हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥
जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥२॥
तुका म्हणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥३॥
२२१८
पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥१॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥
द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥
तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥
२२१९
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥
मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची ॥ध्रु.॥
समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥
तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥
२२२०
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥
नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥
तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
२२२१
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥
तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥
न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥
तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥३॥
२२२२
कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥
देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥
शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥
तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥
२२२३
मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥१॥
काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥
बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥
तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥
२२२४
असो तुझें तुजपाशीं । आम्हां त्यासी काय चाड ॥१॥
निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥
करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥
तुका म्हणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥३॥
२२२५
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥
काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥
स्थिरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥
तुका म्हणे विळतां मन । आम्हां क्षण न लगे ॥३॥
२२२६
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥
कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥
नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥
तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥३॥
२२२७
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्ती ॥१॥
न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे ॥ध्रु.॥
लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥
तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढ्यासाटीं ॥३॥
२२२८
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥
खोट्या तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥
म्हणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥
तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥
२२२९
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥ध्रु.॥
बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥
२२३०
रूपें गोविलें चित्ती । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥
तुम्हीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥
जाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥
तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥
॥२०॥
स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं,कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून
२२३१
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्ती क्षोभविलें ॥१॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥
अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥
उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥
२२३२
तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥
कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥
तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आईं । आतां पुढें काईं तुज घालूं सांकडें ॥३॥
२२३३
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥
चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या ॥ध्रु.॥
नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥
गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका म्हणे जाणावें ॥३॥
२२३४
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥
उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥
तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥
२२३५
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुम्हां आकांत ॥१॥
वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥
जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥
तुका म्हणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता । काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥
२२३६
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥
देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥
तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्वांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥
कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥
२२३७
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काईं । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥
अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥
तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥
॥७॥
२२३८
बरें आम्हां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥
मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥
जें आम्ही बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईंन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥
निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥३॥
खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥
गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बईंल तूं देवा भारवाही ॥५॥
लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥
तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥
२२३९
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥
होसी सरड बेडुक । बाग गांढव्या ही पाईंक ॥ध्रु.॥
बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥
तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥
२२४०
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥
रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
चौघांचिया मतें । आधीं खरें केलें होते ॥२॥
तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥
२२४१
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥
काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥
सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें ॥२॥
तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम ॥३॥
॥४॥
२२४२
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥
आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥
गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ २॥
तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥
॥१॥
२२४३
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥
शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥
अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥
॥१॥
२२४४
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥१॥
कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥
केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥
तुका म्हणे ठाया । जाई आपल्या आलिया ॥३॥
॥१॥
२२४५
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥१॥
अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥
ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥२॥
कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥३॥
मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥
तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥५॥
२२४६
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥
२२४७
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥
ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥
भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥२॥
तुका म्हणे शेष घेईंन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥
॥३॥
२२४८
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥१॥
पुरोनि पंढरिये उरलें भक्तिसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥
बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥
असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे विठ्ठल ॥३॥
२२४९
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥
उदित हें भाग्य होईंल कोणे काळीं । चित्ती तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥
उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥
तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंद्रियांची ॥३॥
२२५०
नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवती ॥१॥
गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ती ॥ध्रु.॥
प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥२॥
तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥
॥३॥
२२५१
स्वामिकाज गुरुभक्ति । पितृवचन सेवा पति ॥१॥
हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥
निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥
२२५२
चित्ती घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥
तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईंल तें ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥
तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥
२२५३
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥
आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥
रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥
तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥
२२५४
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥
तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥
कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥
वांयां जातां मज । तुका म्हणे तुम्हां लाज ॥३॥
२२५५
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥१॥
मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥
उभयकुळींसाक्ष । तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥
समपिऩली काया । तुका म्हणे पंढरिराया ॥३॥
२२५६
वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥
उत्पत्तिपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥
तुका म्हणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥३॥
२२५७
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥
वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥
बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥
तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥
भांडवल माझें मिरविसी जनीं । सहजर वोवनी नाममाळा ॥४॥
तुका म्हणे आम्ही केली जिवें साटी । तुम्हां आम्हां तुटी घालूं आतां ॥५॥
२२५८
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्तीचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥
पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥
२२५९
ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥१॥
सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे । सत्यकर्में आचरें होईंल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥
साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥२॥
सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करीं ॥३॥
२२६०
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ॥ध्रु.॥
उदका भिन्न पालट काईं । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥
तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें ॥३॥
॥१०॥
२२६१
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईंच्या ॥१॥
पाप ताप दैन्य जाईंल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥
संतमहंतसद्धिहरिदासदाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं ॥२॥
तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥३॥
२२६२
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥
उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥
घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥
लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें मोकळीं ॥३॥
हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां ॥४॥
तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥
॥२॥
२२६३
येईवो येईवो येईधांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥
विठाबाईं विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥
न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥
नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥
२२६४
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥
धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥
हा चि होईंजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥२॥
जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥
पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥
तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥
२२६५
सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥
तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥
आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥
तुका म्हणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥
२२६६
करितां होया व्हावें चित्ती चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥
मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥
साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥२॥
तुका म्हणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥३॥
२२६७
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥१॥
घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥
आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥
तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥
२२६८
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥
अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥
इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥
तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥३॥
२२६९
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥
करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥
सरे ऐसा नाहीं झरा । पंक्ती करा समवेत ॥२॥
तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाईं माउलीचा ॥३॥
२२७०
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥
ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥२॥
तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥
॥८॥
२२७१
तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥
विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥
आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥२॥
तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥
२२७२
करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥
पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसों ॥२॥
तुका म्हणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥
२२७३
संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥
म्हणऊनि बहु तळमळी चित्ती । येईवो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥
उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥
तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥
२२७४
काळावरि घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥
आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥
देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥
तुका म्हणे होइल दरुषणें निश्चिंती । गाईंन तें गीतीं ध्यान मग ॥३॥
२२७५
परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया ॥१॥
याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडा ॥ध्रु.॥
परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥
तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥
२२७६
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥
अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥
भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥
तुका म्हणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
२२७७
नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥१॥
आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥
नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें ॥२॥
तुका म्हणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥३॥
॥७॥
२२७८
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥
अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥
तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥
२२७९
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें ।
अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तिभावेंविण भक्ति तैसी ॥१॥
तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया ।
खादलें म्हणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥
मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काईं होय ।
नपुंसका काय करील पद्मिणी । रुचिविण वाणी तैसे होय ॥२॥
हात पाय नाहीं करिल तो काईं । वृक्षा फळ आहे अमोलिक ।
हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥३॥
२२८०
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य । वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥
बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥
२२८१
नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥१॥
सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ध्रु.॥
नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥
२२८२
उपाधिवेगळे तुम्ही निविऩकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥
ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥
निसंग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥
तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
२२८३
माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥
वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥
श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥२॥
तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥
२२८४
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥
तैसें शुद्ध करीं हित । नका चित्ती बाटवूं ॥ध्रु.॥
आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥२॥
तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥
२२८५
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥
वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥
भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥
तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
२२८६
आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥१॥
मज होत कां विपत्ति । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥
जळो तें समूळ । धन संपत्ति उत्तम कुळ ॥२॥
तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥३॥
२२८७
आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥
तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥
अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥३॥
२२८८
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥
म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥
सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥
सकळ ही तीर्थी प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥
कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥
२२८९
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एक खंडती ॥ध्रु.॥
उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥
भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळीं ॥३॥
२२९०
आम्हीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास म्हणों दास विष्णूचे ॥२॥
भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥
२२९१
आम्ही हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाहीं देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥
निद्रा करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तई । वान्नरें गोवळ गाईं सवें चारित फिरतसों ॥२॥
आम्हां नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण। तुका म्हणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥३॥
२२९२
मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥
गर्जावे हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥
भाव शुद्ध नामावळी हषॉ नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं किळकाळ त्याबळें ॥२॥
कामक्रोध बंदखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥३॥
२२९३
अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥
चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥
तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काईं ॥२॥
तुज रूप नाहीं । तर माझें दाव काईं ॥३॥
खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥
साच तूं लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥
२२९४
मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥
आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥
रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥
आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥
तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥
२२९५
नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥
नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥
नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥
नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥
तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥
२२९६
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईंन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥३॥
२२९७
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥
आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥
इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे आल्या थार्या । वस्तु बर्या मोलाच्या ॥३॥
२२९८
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥
जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥
मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥
तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा ॥३॥
२२९९
अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥
हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षिराज ॥ध्रु.॥
पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥
सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥
तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥
२३००
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥
तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥
२३०१
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥
वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥
दैत्यां काळ भक्तां मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥
काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥
होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥
२३०२
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥
उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥
धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥
पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥
लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥
सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥
साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥
मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥७॥
जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥
भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥
आचारी अन्न काढी रे गाईं अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥
स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥११॥
धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥
जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सद्धिलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥
बिळयाढा तो चि जाणा रे भक्ति दृढ शरीरीं । गांढव्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥
खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईंल कैसें ॥१५॥
उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाई ॥१६॥
चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥
गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौर्याशी जन्म ॥१८॥
तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोईं । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥
॥ येकाखडी ॥ १॥
२३०३
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥
स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥
खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥
गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥
घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥
नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥
चरणीं ठेवा चित्ती । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥
छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥
जगाचा जनिता । भक्तिमुक्तींचा ही दाता ॥८॥
झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥
यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥
टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥
ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥
डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥
ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं ॥१४॥
नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥
तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१६॥
थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥
दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१८॥
धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥
नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥
परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२१॥
फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२२॥
बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥
भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥
माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥
यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२६॥
रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२७॥
लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥
वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥
सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥
खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥
सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥
हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३३॥
अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥
ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥
२३०४
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥
नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥
तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥
॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥
२३०५
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥३॥
२३०६
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥
यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥
अलंकापुरीं ब्राम्हण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राम्हण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ ३१ ॥
२३०७
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥
न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥
तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥
२३०८
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईंच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥
अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितया ॥२॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्ती द्यावें ॥३॥
तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥
२३०९
नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥
यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥
नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥
तुका म्हणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
२३१०
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥
तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥३॥
२३११
काय मी जाणता । तुम्हांहुनि अनंता ॥१॥
जो हा करूं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहुनि ॥३॥
२३१२
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥
ऐकोनियां लिखित । म्हुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥
तुका म्हणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥
२३१३
ठेवूनियां डोईं । पायीं जालों उतराईं ॥१॥
कारण तें तुम्हीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥
प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥
तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥
उपदेश अभंग ॥ ११ ॥
२३१४
नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥
साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥
तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
२३१५
नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥
उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥
आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥
२३१६
तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥
नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥
तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥
२३१७
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥
आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
२३१८
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥
म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥
सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥
२३१९
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥
नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥
पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥
तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥
यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥
२३२०
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥
त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥
आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥२॥
नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥
२३२१
संकोचोनि काय जालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥
करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥
घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥
झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
२३२२
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥
केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥
घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
२३२३
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोईं ॥३॥
२३२४
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्धी ॥ध्रु.॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥
२३२५
काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥
कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥
आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥
आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥
तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥५॥
२३२६
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचे वेल जाईंल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके ॥२॥
तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥३॥
२३२७.
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥
राज्यमदा आड सुखाची संपत्ति । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥
इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥
तुका म्हणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥
२३२८
हरिकथेवांचून इच्छिती स्वहित । हरिजन चित्ती न घला तेथें ॥१॥
जाईंल भंगोन आपुला विश्वास । होईंल या नास कारणांचा ॥ध्रु.॥
ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥
तुका म्हणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
२३२९
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईंल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्ती सांदी जनां ॥ध्रु.॥
खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥
२३३०
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥
जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्तीचिया ॥३॥
२३३१
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥
सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
२३३२
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥
२३३३
प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥
उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥
शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
२३३४
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥
सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥३॥
२३३५
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥
भक्तीच्या उत्कषॉ । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
२३३६
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥
२३३७
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥
देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराईं ठावें असो ॥३॥
॥३१॥
२३३८
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥
ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥
आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥
तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥
२३३९
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
२३४०
लवविलें तया सवे लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥
भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥
अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥
तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥
अवघें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥५॥
२३४१
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईंन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥
२३४२
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥
जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
२३४३
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥
मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥
पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥
आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
२३४४
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥
गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥
२३४५
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥
टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥
नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥
तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्ती नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥
कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा । संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥५॥
आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥६॥
येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥७॥
तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥८॥
२३४६
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥
मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥
भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं म्हणे तुका ॥३॥
२३४७
कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥
जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥
तीर्थी तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥
अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रम्हा नेणे वर्णू या सुखा ॥३॥
२३४८
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥
आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥
टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥
तुका म्हणे देवा नुपेक्षावें आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥
२३४९
जळती कीर्तनें । दोष पळतील विघ्नें ॥१॥
हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥
किळ पापाची हे मूर्ति । नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥
तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥
२३५०
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥
चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लIमी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
२३५१
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥
काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥
येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥
तुका म्हणें पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥३॥
२३५२
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें ॥१॥
मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥
बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥
तुका म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥
२३५३
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥
चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥
दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥
तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥
२३५४
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥
वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥
मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥
तुका म्हणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥
२३५५
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥
म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥
दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ॥२॥
तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥
२३५६
आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥
न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥
वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियांत ॥२॥
तुका म्हणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥
२३५७
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥
२३५८
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥
ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥
अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥
तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥
॥८॥
२३५९
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥
नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥
सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥
तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला ॥३॥
२३६०
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥१॥
गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥
प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥३॥
॥२॥
२३६१
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥
क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥
आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥
स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ ८ ॥
२३६२
सालोमालो हरिचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥
अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥
मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥
तुका म्हणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥
२३६३
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥
त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बर्या वोजा ॥ध्रु.॥
अभिलाषाच्या सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥२॥
तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
२३६४
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशा अभाग्याच्या बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥२॥
तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
२३६५
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥
काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥
सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥
तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भनभन ॥३॥
२३६६
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खर्या खोट्या निवडी भाव ॥ध्रु.॥
गर्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥
लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥
२३६७
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥
वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रम्हस्थिति ॥२॥
तुका म्हणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥
२३६८
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥
गुणअवगुण निवाडा । म्हैस म्हैस रेडा रेडा ॥ध्रु.॥
जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥
तुका म्हणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥
॥८॥
२३६९
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें ॥१॥
जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥
सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
२३७०
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥
याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥
तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥
२३७१
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें ॥१॥
वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥
पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥
तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥
२३७२
नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें ॥ध्रु.॥
काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥
तुका म्हणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥
२३७३
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
२३७४
नव्हे जोखाईं जोखाईं । मायराणी मेसाबाईं ॥१॥
बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥
रंडी चंडी शक्ति । मद्यमांस भिक्षती ॥२॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥
गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥
मुंज्या म्हैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥
वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥
तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईंचा पती ॥७॥
२३७५
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥
मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥
तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥
२३७६
मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥
रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥
भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥
तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
२३७७
नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥
गाईंगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥
तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगें चि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥३॥
नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥
सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥
मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥
रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥
भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥
तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥
२३७८
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥
तयासी बोलतां होईंल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥
विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥
तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
२३७९
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥
कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें । रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥
फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें ॥३॥
२३८०
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥
मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥
जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥
२३८१
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥
दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥
नाहीं वर्णाधमयाती । नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
२३८२
नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईंकिला ॥१॥
सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सद्धि ॠषी ॥ध्रु.॥
नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
२३८३
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥
नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥
उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥
तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥
॥१५॥
२३८४
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥
बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
२३८५
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥
निरसनें माझा होईंल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥
राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥
तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥
॥१॥
२३८६
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥
भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥
२३८७
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥
म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥
आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥
तुका म्हणे भार घातलिया वरी । होईंल कैवारी नारायण ॥३॥
२३८८
निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक ॥१॥
तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥
सोइरें पिशुन समान चि घटे । चित्ती पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्ती जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥
२३८९
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥
रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥
मानदंभांसाटीं । पडे देवासवें तुटी ॥२॥
तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां ॥३॥
२३९०
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥
मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥
किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥
तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥
२३९१
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥
आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥
२३९२
काविळयासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥
तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥
कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥
तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥
२३९३
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥
जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥
मग न लगे पारखी । अवघीं सकट सारखीं ॥२॥
तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥
२३९४.
नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥
जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥
वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
२३९५
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥
तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥
२३९६
म्हणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुम्हां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥
फेडूं आलेती दरद्रि । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥
कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥
कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥
२३९७
बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥
बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमट्याचा ॥ध्रु.॥
बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥
बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥
२३९८
येहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं ॥१॥
कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥
सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥
तुका म्हणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥
२३९९
रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥
नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥
चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥
सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥
२४००
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥
हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥
तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥
२४०१
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥
मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥
तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
२४०२
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥
पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे ॥ध्रु.॥
हरिदासांचा समागम । अंगीं प्रेम विसांवे ॥२॥
तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
२४०३
करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥१॥
आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥
हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥२॥
तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥३॥
२४०४
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥
समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥
तुका म्हणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
२४०५
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥
मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥
तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥
२४०६
तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥
बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥
करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥
तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोईं माझी ॥३॥
२४०७
भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥१॥
समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥
करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥
तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥
२४०८
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥
बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥२॥
तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥
२४०९
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥
येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥
देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥२॥
तुका म्हणे मन । कळवळी वाटे सीण ॥३॥
२४१०
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥
आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥
येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच॥३॥
२४११
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥
परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥
आपुलाल्या इच्छा । मागों जया व्हावें जैशा ॥२॥
तुका म्हणे आईं । नव्हसी उदास विठाईं ॥३॥
२४१२
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥
जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥
जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥
तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥
२४१३
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥
तेणें सुखें छंदें घेईंन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥ध्रु.॥
तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे॥३॥
२४१४
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥
आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥
बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥
२४१५
आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥
यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥
घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥
तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥
२४१६
आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास ॥१॥
वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥
आम्ही मरों वेरझारीं । स्वामी घरीं बैसले ॥२॥
तुका म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना ॥३॥
२४१७
पुसावें तें ठाईं आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥
फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥
तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥
२४१८
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥
एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥
पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥२॥
तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥
२४१९
फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥
आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥
घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥
तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देई देवा ॥३॥
२४२०
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥१॥
तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥
न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥
तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥
२४२१
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । नश्चिळ नव्हे मन काय करूं ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां तुमचें ब्रम्हज्ञान । आम्हासी चरण न सोडणें ॥२॥
विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥
सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥
तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
२४२२
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भिक्तभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥
कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥
संतांचे सेवटीं उच्छिष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥
करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥
तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥
२४२३
सर्वविशीं आम्हीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥
नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥
केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥
तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥
२४२४
येणें मुखें तुझे वर्णि गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥
कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देईं देवा ॥२॥
वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां बळ ॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥
२४२५
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥
तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार । तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥
सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥३॥
तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळे तो उपाव करीं आतां ॥४॥
२४२६
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥
गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥
गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥
कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥
तुका म्हणे तूं ब्रम्हांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥४॥
२४२७
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥
आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥
विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥२॥
राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥
तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥
२४२८
विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥१॥
तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥
आम्हां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥
तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥३॥
२४२९
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
२४३०
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा-ऐसें ॥१॥
कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी ॥ध्रु.॥
नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥
तुका म्हणे जरी गिळेअहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
२४३१
नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥
सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥
चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥
आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥
तुका म्हणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥
२४३२
नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥
अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥
तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥
२४३३
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥
उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥
तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥
२४३४
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥
झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां होईंल हे परी । अनुभव वरी येईंल मग ॥३॥
२४३५
जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥
नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥
अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥
तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥
२४३६
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥
जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
२४३७
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥
देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥
भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥
तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥३॥
२४३८
एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥१॥
तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥
वैष्णवांचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥२॥
अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
२४३९
सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥
मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥
वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तई ॥२॥
तुका म्हणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥
२४४०
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥
घेईंन जन्मांतरें । हें चि करावया खरें ॥२॥
तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥
२४४१
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥
नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥२॥
हुकुमदाज तुका । येथें कोणी फुंदो नका ॥३॥
२४४२
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥
बोरामध्यें वसे अळी । अठोळीच भोंवती ॥२॥
पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥३॥
बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥
तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥
२४४३
धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा ॥१॥
बहु जालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥
पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥
असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥
न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर ॥४॥
तुका म्हणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥
२४४४
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥
पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥
अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥
तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना ॥३॥
२४४५
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥
त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥
धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥
तुका म्हणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तांसी संकटीं रक्षावया ॥३॥
२४४६
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥
न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥
अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥
गीता जेणें उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥३॥
तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥४॥
२४४७
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥
त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥
तुका म्हणे धीरें । विण कैसें होतें बरें ॥३॥
२४४८
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें ॥१॥
न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥
याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥
२४४९
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छिष्ट तें ॥१॥
उच्छिष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥
काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥
अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥
तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥
२४५०
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी ॥१॥
डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥
आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे ॥२॥
प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥
चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥४॥
२४५१
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
ताकिकांर्चा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥
नका शोधूं मतांतरें । नुमगे खरें बुडाल ॥२॥
कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥
२४५२
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥
रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥
हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥२॥
मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥३॥
२४५३
आलिया अतीता म्हणतसां पुढारें । आपुलें रोकडें सत्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥
दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥
तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शिक्त उदार काय जाली ॥३॥
२४५४
जेथें लIमीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥
तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥
सेवा केली संतजनीं । सुखें राहिले लपोनि ॥२॥
तुका म्हणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥
२४५५
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥
कळों नये सुखदुःख । तान हरपली भूक ॥२॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
२४५६
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥
तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥
नाहीं मुक्ताफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥
तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि ॥३॥
२४५७
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥
तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥
२४५८
ऐसें भाग्य कई लाहाता होईंन । अवघें देखें जन ब्रम्हरूप ॥१॥
मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥
विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अग्नि जैसा ॥३॥
भक्ती नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
२४५९
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥
कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥
तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईंल घरा पाहिजे तो ॥४॥
२४६०
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥
प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥
तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाईंल तो छळी नरकायासीं ॥३॥
२४६१
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥
तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥
२४६२
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥
तुझा म्हणवितों दास । केली उच्छिष्टाची आस ॥ध्रु.॥
राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥
तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें ॥३॥
२४६३
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥
हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥
परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥
तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी ॥३॥
२४६४
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥
न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥
चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
२४६५
नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥
नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचार अनुभव ॥२॥
उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥
२४६६
घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥
अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥
देव आतां जाला । उगवे संकोच वहिला ॥३॥
अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥
आडकिला झोंपा । रिता कळिवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड ॥६॥
तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥
२४६७
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥
ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
हें चि ब्रम्हांड आम्हांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥
विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥
ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥
तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥
ऐशी अगम्य ईंश्वरी लीळा । ब्रम्हानंदीं गम्य तुक्याला ॥६॥
२४६८
ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥
जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥
खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥
जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही ॥४॥
२४६९
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥१॥
हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥
विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥
कामक्रोधे देह मळिण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञ मनमुंडण नव्हे चि ॥३॥
अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥
आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥
२४७०
आम्हीं जाणावें तें काईं तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥
होई मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं ॥ध्रु.॥
खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥
मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका म्हणे गा विठोबा ॥३॥
२४७१
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
२४७२
अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥
तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥
मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥
तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
२४७३
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥
अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥
मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥
तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
२४७४
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥
तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥
अग्निकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
२४७५
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥
दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥
चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥
तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥३॥
२४७६
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राईं रंक राणा ॥१॥
अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
सोळा सहजर नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
दशरथा पातकें ब्रम्हहत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥
मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥
तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥
पाळणा
२४७७
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्वी जडियेल्या वारतिया चहूं कोणा ।
अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥
निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥
खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें ।
खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥२॥
संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं ।
आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥३॥
खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं ।
रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥
खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक ।
भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख । आप पर तें ही नाहीं देहभाव सकळिक ॥५॥
सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं ।
टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥
बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी ।
घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥
धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ।
टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥
ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत ।
तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास ते घात ॥९॥
॥१॥
२४७८
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा ॥१॥
अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥
लावी अनुसंधान । कांहीं देईंल म्हणऊन ॥२॥
काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥
२४७९
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाईं ॥१॥
आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥
वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥
जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥३॥
२४८०
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥
२४८१
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भिक्तभावें ॥१॥
पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥
वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥
तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
२४८२
दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥
२४८३
तेरा दिवस जाले नश्चिक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥
तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाईं धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥
२४८४
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥
विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥
घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आळिंगीं मज ॥३॥
२४८५
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥
म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥
नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥२॥
तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥
२४८६
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥
ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥
तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
२४८७
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भिक्तवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥
२४८८
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥
ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥२॥
तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥
॥ लळतें ९ ॥
२४८९
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥
निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥
तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥
२४९०
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥
कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥
हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥
द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥
अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥
भावभक्ती सत्वगुण जाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥
२४९१
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥
अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥
तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुम्हा आम्हांसी तुटी ॥३॥
२४९२
जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥
तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥
तुका म्हणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराईं ॥३॥
२४९३
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥
विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥
सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक ॥३॥
२४९४
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारि ॥१॥
हें चि साधन रे तुज सर्व सिद्धीचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥
उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥
फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञां परिस तुका म्हणे हें सार ॥३॥
२४९५
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती ॥१॥
तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥
बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥
तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥३॥
२४९६
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥
न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुम्ही सकळ म्हणा ॥ध्रु.॥
राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौर्याशी ॥२॥
मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥
२४९७
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥
न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥
सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥
तुकाम्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥
॥९॥
२४९८
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥
किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईंट निवडलों ते ॥ध्रु.॥
करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥
तुका म्हणे धीर कारण आपुला । तुम्हीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥
२४९९
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥
काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥
एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥
तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥
२५००
निदऩयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गार्हाणें कोठें द्यावें ॥१॥
भाकितों करुणा ऐकती कान । उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें ॥२॥
तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥