बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३५०१ ते ४०००

३५०१
 
करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥
 
येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आम्ही ॥२॥
 
तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥३॥
 
३५०२
 
काळा च सारिखीं वाहाती क्षेत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥
 
ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें॥ध्रु.॥
 
शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण ॥२॥
 
तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥३॥
 
३५०३
 
बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥
 
जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥
 
करणें तें आम्ही करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥२॥
 
तुका म्हणे असों आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें घायें सारूं ॥३॥
 
३५०४
 
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला सीण बहु फेरे ॥१॥
 
आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥
 
 
वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥
 
 
तुका म्हणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥
 
३५०५
 
पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥
 
आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार जाणील तों ॥२॥
 
तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥
 
३५०६
 
आपुलिये टाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥१॥
 
करीन पायांशीं वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥
 
कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥
 
तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥
 
३५०७
 
माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥
 
ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥
 
संपादितों तो अवघा बाहए रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥
 
तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥
 
३५०८
 
नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥१॥
 
आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥
 
नाहीं भाव परी म्हणवितों दास । नका देऊं यास उणेंयेऊं ॥२॥
 
तुका म्हणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा ॥३॥
 
३५०९
 
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥
 
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥
 
कोण तुम्हां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आम्हा ॥२॥
 
तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥
 
३५१०
 
निष्ठ‍ यासाटीं करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥
 
ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥
 
 
बैसलासी केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्‍याची ॥२॥
 
 
तुका म्हणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
 
३५११
 
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥
 
असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥
 
केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥
 
तुका म्हणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना ॥३॥
 
३५१२
 
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तान ॥१॥
 
जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काईं ॥ध्रु.॥
 
माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥
 
तुका म्हणे साचें । तेथें मागील कईंचें ॥३॥
 
३५१३
 
तुम्हां आम्हां सरी । येथें कईंच्या या परी ॥१॥
 
स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥
 
खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥
 
तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुज पुढें ॥३॥
 
३५१४
 
कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें माव दावीतसें ॥१॥
 
आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥
 
संतांचें उच्छष्टि मागिले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥२॥
 
तुका म्हणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥३॥
 
३५१५
 
थोडे तुम्ही मागें होती उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥
 
आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥
 
तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥
 
तुका म्हणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
 
३५१६
 
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥
 
हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
 
आम्ही तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥२॥
 
तुका म्हणे मज धरियेलें बळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥३॥
 
३५१७
 
आहेतें सकळ प्रारब्धा हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥
 
ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥
 
अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥२॥
 
तुका म्हणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥३॥
 
३५१८
 
सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥
 
देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥
 
तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥
 
तुका म्हणे आम्ही चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥
 
३५१९
 
ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥
 
बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥
 
आम्हांसी न कळे । तुम्ही झाकुं नये डोळे ॥२॥
 
तुका म्हणे संगें । असों एक एका अंगें ॥३॥
 
३५२०
 
मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥
 
धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥
 
करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥२॥
 
तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते॥३॥
 
३५२१
 
आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥
 
मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥
 
देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥
 
तुका म्हणे बाळीं । केली चाहाडी सकळीं ॥३॥
 
३५२२
 
नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥१॥
 
जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥
 
नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥२॥
 
तुका म्हणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥३॥
 
३५२३
 
आम्हां बोल लावा । तुम्हां अनुचित हें देवा ॥१॥
 
ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
 
आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥२॥
 
तुका म्हणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥३॥
 
३५२४
 
मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥
 
पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥
 
निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥
 
तुका म्हणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥
 
३५२५
 
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥
 
निष्ठ‍ तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥
 
पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥
 
तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥३॥
 
३५२६
 
नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥
 
तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥
 
आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥
 
तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥
 
३५२७
 
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥
 
निष्ठ‍ हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥
 
झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥२॥
 
तुका म्हणे देवपण । गुंडाळून असों दे ॥३॥
 
३५२८
 
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥
 
म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥
 
माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरस ॥२॥
 
तुका म्हणे आळवणे । माझ्या देणें उत्तर ॥३॥
 
३५२९
 
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥
 
वाइटबरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥
 
बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥२॥
 
काकुलती यावें देवा । तो तों सेवा इच्छितो ॥३॥
 
हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥४॥
 
तुका म्हणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥५॥
 
३५३०
 
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥
 
ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥
 
पळणें तों पळा सांडुनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥
 
तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥
 
३५३१
 
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥
 
म्हणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥
 
कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥२॥
 
तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥३॥
 
३५३२
 
आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥
 
जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥
 
व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥२॥
 
कवतुकें वावरें । तुका म्हणे या आधारें ॥३॥
 
३५३३
 
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥
 
करितें पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥
 
जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥
 
तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥
 
३५३४
 
जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥१॥
 
पायां पडणें न संडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥
 
एका भावें चाड । आहे तैसें अंतीं गोड ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां । टळणें चि नाहीं नेमा ॥३॥
 
३५३५
 
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥
 
पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥
 
माझें तुझें भिन्नभावें । गळां दावें मोहाचें ॥२॥
 
तुका म्हणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥३॥
 
३५३६
 
देह प्रारब्धा शिरीं । असोन करी उद्वेग ॥१॥
 
धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥
 
ऐसी चुकोनियां वर्में । पीडा भ्रमें पावलों ॥२॥
 
तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा॥३॥
 
३५३७
 
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरिनाम ।
 
उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥१॥
 
आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें ॥ध्रु.॥
 
खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला ।
 
न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें ॥२॥
 
तुका म्हणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं ।
 
भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥३॥
 
३५३८
 
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥
 
येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥
 
आवरिल्या वृित्त । मन घेउनियां हातीं ॥२॥
 
तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥
 
३५३९
 
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥
 
म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥
 
कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥२॥
 
तुका म्हणे संतसेवा । हा चि हेवा उत्तम॥३॥
 
३५४०
 
नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥
 
जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥
 
न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥
 
कैवल्य तें जोडे । पालट लवकरी घडे ॥३॥
 
जन्ममरणदुःख अटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥
 
तुका म्हणे जाला । याचा गुण बहुतांला ॥५॥
 
३५४१
 
अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट ।
 
होती हरिनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥
 
तुम्ही हरि म्हणा हरि म्हणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥
 
अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला ।
 
क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरि म्हणतां ॥२॥
 
अमित्य दोषाचें मूळ । जालें वाल्मीकास सबळ ।
 
जाला हरिनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥३॥
 
हरि म्हणतां तरले । महादोषी गणिके नेलें ।
 
कुंटणी भिली उद्धरिलें । वैकुंठासी हरि म्हणतां ॥४॥
 
हरिविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया ।
 
म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥५॥
 
३५४२
 
भजन या नासिलें हेडि । दंभा लंडा आवडी ॥१॥
 
जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥
 
एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥२॥
 
तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥
 
३४४३
 
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरीं ॥१॥
 
प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रम्हरसीं भोजन ॥ध्रु.॥
 
तृप्तीवरि आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥२॥
 
तुका म्हणे पाख मन । नारायण तें भोगी ॥३॥
 
३४४४
 
सुख सुखा विरजण जालें । तें मथलें नवनीत ॥१॥
 
हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥ध्रु.॥
 
प्रबल तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥
 
तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
 
३५४५
 
कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥
 
होइल यमपुरी । यमदंड यातना ॥ध्रु.॥
 
कोण जाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥२॥
 
कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा ॥३॥
 
तोंडा पडिली खळिणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥
 
कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥
 
लाज धरीं म्हणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥६॥
 
३५४६
 
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥१ ॥
 
मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥
 
घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥२ ॥
 
तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥३॥
 
३५४७
 
एक आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥
 
विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥
 
जाणत चि दुजें नाहीं । आणिक कांहीं प्रकार ॥२॥
 
तुका म्हणे शरण आलों । काय बोलों विनवितों ॥३॥
 
३५४८
 
काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥
 
आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥
 
बहुत करुणा केलेंसे भासेन । एक ही वचन नाहीं आलें ॥२॥
 
माझी कांहीं सेवा होईंल पावली । निश्चिंती मानिली होती ऐसी ॥३॥
 
तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखें चि ॥४॥
 
३५४९
 
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥
 
कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥
 
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मावेचा पदर कळों येतो ॥२॥
 
होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें जालों युक्तिकळाहीन ॥३॥
 
तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥
 
३५५०
 
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥
 
कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाटीं ॥२॥
 
तुका म्हणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥३॥
 

३५५१
 
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥
 
कां नेणें निष्ठ‍ केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥
 
तुका म्हणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥
 
३५५२
 
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥
 
नाहीं सरता जालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥
 
कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥
 
तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
 
३५५३
 
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥
 
मग तळमळ न करितें मन । जालें तें कारण कळों येतें ॥२॥
 
तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वइदासी भीड मरणें रोग्या ॥३॥
 
३५५४
 
ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥१॥
 
तुम्हां तंव होइल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥
 
कोण जाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥२॥
 
तुका म्हणे निमित्याचा । आला सुच अनुभव ॥३॥
 
३५५५
 
ब्रम्हज्ञानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी ॥१॥
 
थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥
 
कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥
 
तुका म्हणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥३॥
 
३५५६
 
कधीं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥१॥
 
भेटी लागीं पंढरीनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥ध्रु.॥
 
सिणलें माझें मन । वाट पाहतां लोचन ॥२॥
 
तुका म्हणे लागली भूक । तुझें पहावया श्रीमुख ॥३॥
 
३५५७
 
उच्चारूं यासाटीं । आम्ही नाम तुझें कंठीं ॥१॥
 
येसी धांवत धांवत । माउलिये कृपावंते ॥ध्रु.॥
 
पाय चित्तीं धरूं । क्रिडा भलते ठायीं करूं ॥२॥
 
तुका म्हणे माझे गंगे । प्रेमभरित पांडुरंगे ॥३॥
 
३५५८
 
दगडाच्या देवा बगाड नवस । बाईंल कथेस जाऊं नेदी ॥१॥
 
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥
 
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥२॥
 
करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥
 
तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥४॥
 
३५५९
 
करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥१॥
 
होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥
 
भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥२॥
 
तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥३॥
 
३५६०
 
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥
 
कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥
 
पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥
 
बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥
 
तुका म्हणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥
 
३५६१
 
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥
 
काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥
 
येर येरा समदृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥२॥
 
तुका म्हणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुम्हां ॥३॥
 
३५६२
 
काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥
 
डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥
 
न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥
 
तुका म्हणे माझा घात तुम्हां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥३॥
 
३५६३
 
नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥
 
अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥
 
धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥
 
तुका म्हणे फार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥३॥
 
३५६४
 
लडिवाळ म्हणोनी निष्ठ‍ न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥
 
बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥
 
नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठ‍ उत्तरा कोमेजतों ॥२॥
 
तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरि । शांतवा उत्तरीं अमृताच्या ॥३॥
 
३५६५
 
आत्मस्थिति मज नको हा विचार । देईं निरंतर चरणसेवा ॥१॥
 
जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी माझ्या देई जीवा ॥ध्रु.॥
 
काय सायुज्यता मुक्ति हे चि गोड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥२॥
 
काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥
 
गोड चरणसेवा देवभक्तपण । मज देवा झणें दुराविसी ॥४॥
 
जाणिवेपासूनि सोडवीं माझ्या जीवा । देईं चरणसेवा निरंतर ॥५॥
 
तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीतिकर । प्रीति ते ही सार सेवा हे रे ॥६॥
 
३५६६
 
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥
 
बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥
 
तुका म्हणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥३॥
 
३५६७
 
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥
 
समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्याची लागे चिंता ॥२॥
 
जरी तुज कांहीं होईंल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥
 
३६६८
 
न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥
 
येथें सुखाचिया रासी । पुढें ठाव नाहीं कल्पनेसी॥ध्रु.॥
 
सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे येथें होईंल विसांवा । तुटतील हांवा पुढिलिया ॥३॥
 
३५६९
 
काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥
 
हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥
 
द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥२॥
 
तुका म्हणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥३॥
 
३५७०
 
नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥
 
त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥
 
घोकुनी अक्षर । वाद छळणा करीत फिरे ॥२॥
 
म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥३॥
 
३५७१
 
हें चि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥
 
हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥
 
न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीर्थी ॥२॥
 
कल्पना हे तळि देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥
 
तुका म्हणे नामें देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥४॥
 
३५७२
 
माझे विषयीं तुज पडतां विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥
 
तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥
 
तुका म्हणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥
 
३५७३
 
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रें वाडां गाय सांपडली ॥१॥
 
कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया काईं ॥ध्रु.॥
 
केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥२॥
 
तुका म्हणे खीर केली का†हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥३॥
 
३५७४
 
भागल्यांचा तूं विसांवा । करीं नांवा निंबलोण ॥१॥
 
परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥
 
अनाथांचा अंगीकार । करितां भार न मनिसी ॥२॥
 
तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसें धुरेगे विठ्ठल ॥३॥
 
३५७५
 
घालूनियां कास । बळें आलों मागायास ॥१॥
 
प्रेमें देई पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥ध्रु.॥
 
होई रे शाहाणा । कळों नेदावें या जना ॥२॥
 
तुका म्हणे पायीं । जडलों मग उरलें काईं ॥३॥
 
३५७६
 
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥१॥
 
कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
 
सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥
 
तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥
 
३५७७
 
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥
 
शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥
 
आलों लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥२॥
 
तुका म्हणे कई । डोईं ठेवीन हे पायीं ॥३॥
 
३५७८
 
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥
 
धरणें घेतलें घरांत । नको धरून उठवूं हात ॥ध्रु.॥
 
घेतली मुरकुंडी । थोर जालों मी लंडी ॥२॥
 
तुका म्हणे जगजीवना । ब्रिदें पाहें नारायणा ॥३॥
 
३५७९
 
पडिलों बाहेरि आपल्या कर्तव्यें । संसाराचा जीवें वीट आला ॥१॥
 
एकामध्यें एक नाहीं मिळे येत । ताक नवनीत निडळिया ॥ध्रु.॥
 
दोनी जालीं नांवें एकाच्या मथनें । भुस सार गुणें वेगळालीं ॥२॥
 
तुका म्हणे कोठें वसे मुक्ताफळ । सिंपल्याचें स्थळ खंडलिया ॥३॥
 
३५८१
 
पाहातां हें बरवें जालें । कळों आलें यावरी ॥१॥
 
मागिलांचा जाला झाडा । त्या निवाडास्तव ॥ध्रु.॥
 
विसांवलें अंग दिसे । सरिसे अनुभव ॥२॥
 
तुका म्हणे बरें जालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥
 
३५८१
 
चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥१॥
 
फुटोनियां गेला कुंभ । जालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥
 
धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥
 
तुका म्हणे कौतुक कोडें । आगी काय जाणे मढें ॥३॥
 
३५८२
 
श्रमपरिहारा । मूळ हें जालें दातारा ॥१॥
 
देह निवेदूनि पायीं । जालों रिकामा उतराईं ॥ध्रु.॥
 
आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥
 
राहिला निराळा । तुका कटकटे वेगळा ॥३॥
 
३५८३
 
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कार्या देहाकडे नावलोकीं ॥१॥
 
म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥
 
कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥
 
तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥३॥
 
३५८४
 
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥
 
नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम कोरडी वरिवरि ॥ध्रु.॥
 
सत्याविण काय उगी च लांबणी । कारियाची वाणी येर भूस ॥२॥
 
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥
 
३५८५
 
नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥१॥
 
अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥
 
मनें कल्पीलें आवरितां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥
 
३५८६
 
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे ॥१॥
 
काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माहें आलें कोडें आजिवरि ॥ध्रु.॥
 
सेवेंविण आम्ही न लिंपों काया । जाला देवराया निर्धार हा ॥२॥
 
तुका म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें कारियासी ॥३॥
 
३५८७
 
वृत्तीवरि आम्हां येणें काशासाटीं । एवढी हे आटी सोसावया ॥१॥
 
जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥
 
मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुम्हां कां अळस वोडवला ॥२॥
 
तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥
 
३५८८
 
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥
 
आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥
 
एका नेमें कोठें दुसरा पालट । पादिर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥
 
तुका म्हणे किती बोलसी उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥
 
३५८९
 
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळातें ॥१॥
 
टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावेलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥
 
तुम्हांसी कां कोडें कोणे ही विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥२॥
 
तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईंन ॥३॥
 
३५९०
 
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥
 
द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥
 
उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥
 
तुका म्हणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥
 
३५९१
 
कोठें आतां आम्ही वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥
 
न करावी सांडी आतां टाळाटाळी । देइन ये कळी होइल माजी ॥ध्रु.॥
 
घरोघरीं जाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां भाकितां करुणा । भलता चि शाहाणा शोध काढी ॥३॥
 
३५९२
 
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥
 
धीरें तूं गंभीर जीवनें जगाचें । जळो विभागाचें आत्रीतत्या ॥ध्रु.॥
 
भेईंल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥
 
तुका म्हणे आवश्यक हें वचन । पाळावें चि वान समयो आहे ॥३॥
 
३५९३
 
आम्ही पाहा कैसीं एकतत्व जालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥
 
तुम्हांविण कांहीं नावडावें जीवा । केला तो चि देवा केला पण ॥ध्रु.॥
 
वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥२॥
 
तुका म्हणे कळे नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥३॥
 
३५९४
 
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥
 
करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥
 
हेंगे ऐसें म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥
 
घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥३॥
 
३५९५
 
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥
 
म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥
 
मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥
 
तुका म्हणे कळे । काय लाभ कोण वेळ ॥३॥
 
३५९६
 
तुम्ही तों सदैव । आधरपणें माझी हांव ॥१॥
 
जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥
 
येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥२॥
 
तुका म्हणे जालें । एक मग हें निमालें ॥३॥
 
३५९७
 
कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उसीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥
 
आहे तें मागों तों दिसातें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥
 
नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥२॥
 
तुका म्हणे हात आवरिला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥३॥
 
३५९८
 
हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे ॥१॥
 
त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥
 
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥
 
तुका म्हणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥३॥
 
३५९९
 
अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥
 
कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥
 
जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥२॥
 
मुसळाचें धनु । तुका म्हणे नव्हे अनु ॥३॥
 
३६००
 
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
 
आतां होतें तें चि जालें । नाम ठायींचें चांगलें ॥ध्रु.॥
 
उतरलें डाई । उत्तम ते सुलाख ताईं ॥२॥
 
हिंडवितां देश । तुका म्हणे नाहीं नाश ॥३॥
 

३६०१
 
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
 
या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥
 
कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥
 
तुका म्हणे आतां निश्चळि चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥
 
३६०२
 
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
 
तुम्हां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥
 
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
 
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥
 
३६०३
 
आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥
 
नाहीं ऐसें येथें जालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोसें ॥ध्रु.॥
 
न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥
 
तुका म्हणे आतां वचनें वचन । वाढले तिक्षिण बुद्धि जाली ॥३॥
 
३६०४
 
कोठें देवा बोलों । तुम्हां भीड घालूं गेलों ॥१॥
 
करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥
 
दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥
 
तुका म्हणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥
 
३६०५
 
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥१॥
 
ठेवियेला पूर्ण करूनि संकेत । तयापाशीं चित्त लागलें से ॥ध्रु.॥
 
 
जाणसी गे माते लेंकराचें लाड । नये पडों आड निष्ठ‍ता ॥२॥
 
 
तुका म्हणे आम्हीं करावें वचन । तुम्हांसी जतन करणें तें ॥३॥
 
३६०६
 
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥
 
चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते उजेवन करावया ॥ध्रु.॥
 
लावूनियां दृिष्ट घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥
 
तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥
 
३६०७
 
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥
 
दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावेल बुद्धि पायांपाशीं॥ध्रु.॥
 
अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥
 
तुका म्हणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥३॥
 
३६०८
 
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥
 
निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥
 
दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥
 
तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईंन ॥३॥
 
३६०९
 
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
 
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥ध्रु.॥
 
सिकवूं जाणे तें गोमाटियासाटीं । लोभें नाहीं तुटी निश्चियेंसी ॥२॥
 
अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥३॥
 
न करी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥
 
तुका म्हणे करी जिवाची जतन । दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
 
३६१०
 
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥
 
हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥
 
लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥२॥
 
तुका म्हणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू ॥३॥
 
३६११
 
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥
 
आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥
 
 
शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥
 
 
तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
 
३६१२
 
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥
 
संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥
 
आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥
 
तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥३॥
 
३६१३
 
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥१॥
 
नाहीं सोंग अळंकार । दास जाला संवसार ॥ध्रु.॥
 
दुःख आम्हां नाहीं चिंता । हरिचे दास म्हणवितां ॥२॥
 
तुका म्हणे देवा । ऐसीं जळो करितां सेवा ॥३॥
 
३६१४
 
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकळिलों ॥१॥
 
जनाचारामध्यें उडाला पातेरा । जालों निलाजिरा म्हणऊनि ॥ध्रु.॥
 
कोणाचिया दारा जावेनासें जालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥
 
कां न जाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें जालें ॥३॥
 
तुका म्हणे तुज भक्त जाले फार । म्हणोनियां थार नाहीं येथें ॥४॥
 
३६१५
 
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥
 
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥
 
नव्हे चि तुम्हांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
 
भोग तंव जाला खरा भोगावया तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
 
कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥४॥
 
३६१६
 
कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥
 
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥
 
कां जी आम्हांवरि आणिकांची सत्ता । तुम्हांसी असता जवळिकें ॥२॥
 
तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥
 
३६१७
 
निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
 
होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥
 
दुसर्‍याच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥२॥
 
तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥
 
३६१८
 
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥
 
ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥
 
येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥
 
तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
 
३६१९
 
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥
 
नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥
 
मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥
 
तुका म्हणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥
 
३६२०
 
माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥१॥
 
सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥
 
वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥२॥
 
तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून ॥३॥
 
३६२१
 
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥
 
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥
 
बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥
 
तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसी ॥३॥
 
३६२२
 
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥
 
माझें परिसावें गार्‍हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥
 
हा चि आम्हां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥२॥
 
तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार॥३॥
 
३६२३
 
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥
 
वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥
 
इंिद्रयांची हांव पुरे। परि हें उरे चिंतन ॥२॥
 
तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥
 
३६२४
 
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
 
न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥
 
भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥
 
तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥३॥
 
३६२५
 
ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥१॥
 
सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥
 
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥
 
तुका म्हणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥
 
३६२६
 
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥
 
पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥
 
अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥
 
तुका म्हणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥३॥
 
३६२७
 
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥
 
देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥
 
एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥
 
तुका म्हणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥३॥
 
३६२८
 
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥
 
तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥
 
चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥
 
तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥३॥
 
३६२९
 
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥
 
तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥
 
सेवा करी साहे निष्ठ‍ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥
 
तुका म्हणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥३॥
 
३६३०
 
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥१॥
 
आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
 
मागें सारियेली युHी । कांहीं होती जवळी ते ॥२॥
 
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
 
३६३१
 
आतां येथें जाली जीवासवेंसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥
 
आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥
 
आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥
 
आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥
 
आतां लोकलाज नयो येथें आड । बहु जालें गोड ब्रम्हरस ॥४॥
 
तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥५॥
 
३६३२
 
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज हि येणें काळें कृपा कीजे ॥१॥
 
अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥
 
अंतरींचें कळों देई गुह्य गुज । अंतरीं तें बीज राखईंन ॥२॥
 
समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥३॥
 
तेणें या चित्ताची राहेल तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥
 
तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
 
३६३३
 
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥
 
उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥
 
आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥२॥
 
तुका म्हणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥
 
३६३४
 
नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥
 
आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देई ॥ध्रु.॥
 
समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
 
तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥
 
३६३५
 
जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥१॥
 
ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥
 
काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥२॥
 
तुका म्हणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥३॥
 
३६३६
 
नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥
 
चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास॥२॥
 
तुका म्हणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
 
३६३७
 
तुम्ही माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥
 
आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥
 
एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न राहे च पळ मन ठायीं ॥२॥
 
पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥
 
शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥४॥
 
तुका म्हणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥
 
३६३८
 
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥
 
कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥
 
नाहीं मिळे येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥
 
तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
 
३६३९
 
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥
 
कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥
 
दावूनियां आस । दूर पळविता कास ॥२॥
 
तुका म्हणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥३॥
 
३६४०
 
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥
 
होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धि ॥ध्रु.॥
 
सत्य संकल्प च साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥
 
तुका म्हणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥
 
३६४१
 
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥
 
दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥
 
सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥२॥
 
धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥
 
तुका म्हणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥
 
३६४२
 
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । जालों मी सेवक दास तुझा ॥१॥
 
कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥
 
दंभ मान माझा करूं पाहे घात । जालिया ही थीत कारणाचा ॥२॥
 
हीन बुद्धि माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥
 
तुका म्हणे मज विघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥
 
३६४३
 
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥
 
देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥
 
द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥
 
तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥
 
तुका म्हणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराईं पांडुरंगा ॥४॥
 
३६४४
 
काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
 
काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
 
सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥
 
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
 
३६४५
 
देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं॥१॥
 
देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे ॥२॥
 
देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका म्हणे ॥३॥
 
३६४६
 
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥
 
काय जालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥
 
पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥
 
तुका म्हणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥
 
३६४७
 
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीन ॥१॥
 
नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥
 
वेव्हारें आलें तें समानें चि होतें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥
 
तुका म्हणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥
 
३६४८
 
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥
 
होइल हो तैसी आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥
 
तुम्हांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥
 
तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड॥३॥
 
३६४९
 
कां हो वाडवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोडएाचें ॥१॥
 
ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । जालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥
 
निवाड आपणियांपाशीं । असोन कां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥
 
तुका म्हणे गोड । होतें जालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥
 
३६५०
 
नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥
 
आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईंल करुणा । ते चि पहा तुम्हांसी ॥ध्रु.॥
 
ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥
 
आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥३॥
 

३६५१
 
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥
 
मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥
 
नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥
 
तुका म्हणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥
 
३६५२
 
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥
 
नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥
 
काय सांगायास वेचे । रींद आरंभीं ठायींचे ॥२॥
 
तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
 
३६५३
 
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥
 
म्हणविल्यासाटीं कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥
 
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्हीं ॥२॥
 
नाहीं मनोगत तोंवरि हे देवा । तुका म्हणे सेवा नेघीजे तों ॥३॥
 
३६५४
 
मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥
 
तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥
 
मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥
 
तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥
 
३६५५
 
घालूनि लोळणी पडिलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरि ॥१॥
 
वोल्हावेल तनु होईंल शीतळ । जाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥
 
पावेन या ठाया कई जालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरि ॥२॥
 
तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येइल जवळी पांडुरंग ॥३॥
 
३६५६
 
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥
 
उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
 
सांभाळावें तें म्या काईं । अवो आईं विठ्ठले । मागें जया जाईं नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥
 
आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका म्हणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥
 
३६५७
 
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥
 
पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥
 
हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका । साजतें हें थोरपण । नाहीं विण वत्सळा ॥२॥
 
शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
 
३६५८
 
धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
 
संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥
 
पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥२॥
 
तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
 
३६५९
 
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥
 
आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥
 
बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
 
लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥३॥
 
३६६०
 
न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥
 
जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥
 
दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥२॥
 
तुका म्हणे जालों आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥
 
३६६१
 
एकविध वृित्त न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति ॥१॥
 
कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥
 
न राहे निश्चळि जागवितां मन । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥
 
तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥
 
३६६२
 
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥
 
ऐसें सांगोनिया जालों उतराईं । आणीक तें काईं माझे हातीं ॥ध्रु.॥
 
केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥
 
तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥
 
३६६३
 
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥
 
उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥
 
घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥२॥
 
तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणाचें ॥३॥
 
३६६४
 
नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
 
कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥
 
मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥
 
तुका म्हणे मज । न लगे बोलणें सहज ॥३॥
 
३६६५
 
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥
 
धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥
 
रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥
 
तुका म्हणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
 
३६६६
 
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥१॥
 
कपाळास लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥
 
एक परि बरें वेडें । तार्किक कुडें जळो तें ॥२॥
 
तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
 
३६६७
 
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥
 
पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीस ॥ध्रु.॥
 
एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥
 
जगाऐसी बुद्धि नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा जालों पायीं ॥३॥
 
आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥
 
तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥
 
३६६८
 
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
 
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
 
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥
 
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे धरी । सेज जमा सेवटीं ॥३॥
 
३६६९
 
पडिलिया ताळा । मग अवघा चि निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥
 
जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥
 
सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
 
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हुण लागती ॥३॥
 
३६७०
 
जीविता तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥
 
जनार्दनीं सरती कर्में । वाते भ्रमे अनेत्र । अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥
 
तुका म्हणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी ॥३॥
 
३६७१
 
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥१॥
 
ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥
 
मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥२॥
 
तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥
 
३६७२
 
केवढा तो अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर ॥१॥
 
आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥
 
कां जी कृपेनें कृपण । वेचत असे ऐसें धन ॥२॥
 
तुका म्हणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥
 
३६७३
 
अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥
 
येइल तारूं तरी तारा जी देवा । नाहीं तरी सेवा घ्या वो भार ॥ध्रु.॥
 
कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जाई जनें ॥२॥
 
तुका म्हणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार मी ॥३॥
 
३६७४
 
माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥
 
कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥
 
द्यावें काहीं तुम्हीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥
 
तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
 
३६७५
 
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥
 
करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥
 
मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥२॥
 
नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
 
३६७६
 
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥
 
वेळोवेळां जागवितों । दुजें येइल म्हुण भीतों ॥ध्रु.॥
 
नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥
 
तुका जालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
 
३६७७
 
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥
 
येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खर्‍या खोट्यां ॥ध्रु.॥
 
उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
 
तुका म्हणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें ॥३॥
 
३६७८
 
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥
 
मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥
 
दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥२॥
 
तुका म्हणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
 
३६७९
 
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥
 
नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥
 
लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥२॥
 
तुका म्हणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥३॥
 
३६८०
 
येणें जाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
 
भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपल्यापें ॥ध्रु.॥
 
आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥
 
तुका म्हणे कोठें पाहोंजासी आतां । माझी जाली सत्ता तुम्हांवरि ॥३॥
 
३६८१
 
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥
 
लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥२॥
 
तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥
 
३६८२
 
नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥
 
कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥
 
विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥
 
तुका म्हणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥
 
३६८३
 
मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥
 
होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥
 
आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनीं ॥२॥
 
तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
 
३६८४
 
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥
 
पाहातसें वाट येई गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥
 
बहुतांचे सत्ते जालों कासावीस । जाय रात्री दिस वैरियांचा ॥२॥
 
तुका म्हणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥
 
३६८५
 
कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायिंच्या ठायीं ॥१॥
 
कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥
 
दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥
 
तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण म्हणऊनि ॥३॥
 
३६८६
 
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥
 
कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥
 
जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥
 
तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥
 
३६८७
 
आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥
 
काय होइल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥
 
लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठासांडी ॥२॥
 
तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥
 
३६८८
 
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ट‍ता ॥१॥
 
जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥
 
काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥
 
तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥
 
३६८९
 
नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥
 
जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥
 
उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥
 
तुका म्हणे पाहों । होइल तें निवांत राहों ॥३॥
 
३६९०
 
बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥
 
हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥
 
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥
 
तुका म्हणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
 
३६९१
 
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥
 
अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥
 
माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुम्हां जगीं सोयइरिका ॥२॥
 
तुका म्हणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचाठायीं ॥३॥
 
३६९२
 
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥
 
म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहु साल ॥ध्रु.॥
 
वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥२॥
 
तुका म्हणे सरतें नव्हें चि पायांपें । बळ केलें पापें नव्हें चि भेटी ॥३॥
 
३६९३
 
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
 
बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥
 
वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥
 
जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
 
३६९४
 
हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥
 
दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥
 
वेगळाल्या कोठें भागें । लाग लागें लावावा ॥२॥
 
तुका म्हणे केल्या जमा । वृत्तितमा भाजूनि ॥३॥
 
३६९५
 
तुम्हांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥१॥
 
आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥
 
कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥
 
तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥३॥
 
३६९६
 
आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल ॥१॥
 
होईंल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचा बळें आघ्रो उरे ॥ध्रु.॥
 
जाणविलें तेथे थोडें एकवेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमीं ॥२॥
 
तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥३॥
 
३६९७
 
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥
 
किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥
 
आतां कोण याचा करील आदर । जावो कळिवर विटंबोनि ॥२॥
 
तुका म्हणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥
 
३६९८
 
हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥
 
अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥
 
धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाळ्या ॥२॥
 
कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥३॥
 
३६९९
 
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥
 
परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥
 
वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥
 
तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
 
३७००
 
देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥१॥
 
ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥
 
दास म्हणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥२॥
 
तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥
 

३७०१
 
काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥
 
सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥
 
काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥२॥
 
आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥३॥
 
लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥
 
तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥५॥
 
३७०२
 
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥
 
शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥ध्रु.॥
 
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥
 
तुका म्हणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥
 
३७०३
 
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
 
अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥
 
पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥२॥
 
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
 
३७०४
 
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥
 
आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढें चि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥
 
 
जागाजालेपणें । काय नासावें स्वप्न । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥
 
 
छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोईं गुडघे कोंपर ॥३॥
 
३७०५
 
गुणांचा चि सांटा । करूं न वजों आणिका वाटा ॥१॥
 
करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥
 
नेमली पंगती । आम्हां संतांची संगती ॥२॥
 
तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥
 
३७०६
 
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दरपणींचें धन उपर वाया ॥१॥
 
अनुभउ कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥
 
गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥२॥
 
तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
 
३७०७
 
सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं ।
 
स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
 
कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥
 
दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये ।
 
आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥
 
कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी ।
 
 
तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं म्हणे परि लाभ नाहीं ॥३॥
 
३७०८
 
अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी ।
 
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥
 
नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥
 
पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं ।
 
अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां ॥२॥
 
आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें ।
 
तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठें ॥३॥
 
३७०९
 
केलें तरी आता साच चि करावें । विचारिलें द्यावें कृपादान ॥१॥
 
संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुम्हां पुण्यपाप कळे देवा ॥ध्रु.॥
 
उदार शक्ति तंव तुमची भूमंडळीं । ऐसी ब्रिदावळी गर्जतसे ॥२॥
 
तुका म्हणे अहो रकुमादेवीवरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥३॥
 
३७१०
 
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥१॥
 
सतंत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
 
जागविलें तरी । तुम्हां वेक्तियेणें हरी ॥२॥
 
तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
 
३७११
 
मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥
 
बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
 
पाक आणि रुचि । जेथें तेथें ते कइंची ॥२॥
 
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
 
३७१२
 
चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी ॥१॥
 
तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥
 
जाय जेथें मन । आड घाला सुदर्शन ॥२॥
 
तुका म्हणे भोजें । नाचें हो ऐसें न लजें ॥३॥
 
३७१३
 
आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥
 
नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥
 
सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥
 
तुका म्हणे ब्रम्हानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥
 
३७१४
 
जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा ॥१॥
 
तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥
 
सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥
 
वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥
 
३७१५
 
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
 
तो मी हीणाहूनि सांडें । देवे दुर्‍हे काळतोंडें ॥ध्रु.॥
 
मानूनी भर्वसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥
 
तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥
 
३७१६
 
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥
 
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥
 
 
निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
 
 
तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
 
३७१७
 
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥
 
आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥
 
जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥
 
तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
 
३७१८
 
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
 
सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
 
तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥
 
३७१९
 
मज अभयदान देईं दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
 
देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥
 
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥
 
तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥३॥
 
३७२०
 
करावा वर्षाव । तृषाक्रांत जाला जीव ॥१॥
 
पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगनिवास ॥ध्रु.॥
 
संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
 
तुका म्हणे फळें । चरणांबुजें तीं सकळें ॥३॥
 
३७२१
 
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥
 
मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरूनी ॥ध्रु.॥
 
बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥
 
तुका म्हणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥
 
३७२२
 
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
 
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥
 
कायावाचामन । स्वरूपीं च अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणे पाडें लवलाहो ॥२॥
 
तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥
 
३७२३
 
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥
 
नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥
 
अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥२॥
 
तुका म्हणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥३॥
 
३७२४
 
पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥१॥
 
ऐका नवल्याची ठेव । नेणतां भक्तिभाव ॥ध्रु.॥
 
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥
 
पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
 
खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥४॥
 
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥
 
३७२५
 
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
 
पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥
 
कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥२॥
 
तुका म्हणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥३॥
 
३७२६
 
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥
 
संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥
 
मोटचौफळ । अंतीं उच्छिष्टाचें बळ ॥२॥
 
न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥
 
आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥४॥
 
कळवळिला तुका । घराचार येथें नका ॥५॥
 
३७२७
 
मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥
 
नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥
 
पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥
 
जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥३॥
 
अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥
 
संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥
 
कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥६॥
 
पातोगें महाद्वारीं । वरि झुली वाकळा ॥७॥
 
३७२८
 
करणें न करणें वारलें जेथें । जातों तेणें पंथें संतसंगें ॥१॥
 
संतीं हें पहिलें लाविलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जें नाम ॥२॥
 
तुका म्हणे तुम्हीं चला या चि वाटे । भरवशानें भेटे पांडुरंग ॥३॥
 
३७२९
 
कइंचें कारण । तृष्णा वाढविते सीण ॥१॥
 
काय करूनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥
 
रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे उर फोडी ॥२॥
 
तुका न पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
 
३७३०
 
धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥१॥
 
ब्रम्हज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥
 
नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥
 
तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥३॥
 
३७३१
 
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥
 
एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥
 
नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥२॥
 
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
 
३७३२
 
भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥
 
अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥
 
समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥
 
तुका म्हणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥३॥
 
३७३३
 
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥
 
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥
 
होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥
 
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥
 
३७३४
 
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
 
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥
 
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
 
३७३५
 
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥
 
जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥
 
व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥
 
जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥
 
सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥
 
३७३६
 
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥
 
राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषचि ॥ध्रु.॥
 
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥३॥
 
३७३७
 
अद्वय चि द्वय जालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥
 
अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥
 
शून्य निरशुन्यी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ इटेवरी ॥२॥
 
सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
 
तुका म्हणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातों ॥४॥
 
३७३८
 
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥
 
सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें म्हणतसे ॥ध्रु.॥
 
जेणें हें विश्व निमिऩलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥
 
तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी अर्थ । रिद्धिसिद्धिमुक्ती देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥
 
३७३९
 
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥
 
वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥
 
षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥२॥
 
तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥
 
३७४०
 
वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥१॥
 
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥
 
विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥२॥
 
जंव आहे आयुष्याचा लेश । तंव करीं पंढरीचा वास ॥३॥
 
अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
 
३७४१
 
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
 
हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥
 
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
 
३७४२
 
अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥
 
करूनी उचित देई हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें ॥ध्रु.॥
 
देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥२॥
 
तुका म्हणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देई मज ॥३॥
 
३७४३
 
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥
 
हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥
 
हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥२॥
 
हा चि माझा योग हा चि माझा यज्ञ । हें चि जपध्यान नाम तुझें ॥३॥
 
हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥४॥
 
हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥५॥
 
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥६॥
 
तुका म्हणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥७॥
 
३७४४
 
कोण साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥
 
ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥
 
कोणें नाहीं केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
 
कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥
 
कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥
 
तुका म्हणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥
 
३७४५
 
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
 
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥
 
जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥
 
तुका म्हणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥
 
३७४६
 
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥
 
म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरिचे दास ॥ध्रु.॥
 
संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥
 
तुका म्हणे दृष्टी । उघडितों नव्हे कष्टी ॥३॥
 
३७४७
 
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥
 
आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळिवरें तुटी जाल्या त्वरे ॥ध्रु.॥
 
सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळे देवा मन जालें ॥२॥
 
पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥
 
म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अटाहासें ॥४॥
 
तुका म्हणे होइल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला ॥५॥
 
दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय । पाहणें तों काय अजून अंत ॥६॥
 
३७४८
 
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥
 
तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संचार ॥ध्रु.॥
 
होतें अभयदान । तरी स्थिर होतें मन ॥२॥
 
तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
 
३७४९
 
वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥
 
इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥
 
लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥
 
तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥
 
३७५०
 
आइका माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥
 
वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥
 
तुमचें न भंगे सवाौत्तमपण । करितां समाधान लेंकराचें॥२॥
 
तुका म्हणे जरी बोलतों बोबडें । तरी वाडे कोडें कवतुक ॥३॥
 

३७५१
 
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभदरुषणें ॥१॥
 
पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥ध्रु.॥
 
कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥२॥
 
बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥३॥
 
तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥४॥
 
३७५२
 
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥
 
निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥
 
उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥
 
तुका म्हणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥
 
३७५३
 
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥
 
तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धि हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥
 
भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
 
काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
 
३७५४
 
न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥
 
आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥
 
बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥
 
तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतों ॥३॥
 
३७५५
 
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥
 
समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥
 
घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥
 
तुका म्हणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥
 
३७५६
 
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
 
तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥
 
नांवासाटीं नेघें भार । न लगे फार वित्पित्त ॥२॥
 
तुका म्हणे न लगे जावें । कोठें देवें सुचनें ॥३॥
 
३७५७
 
इंिद्रयाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥
 
जावें म्हणती पंढरपुरा । हा चि बरा संसार ॥ध्रु.॥
 
बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥
 
तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
 
३७५८
 
आतां देवा मोकळिलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥
 
आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥
 
सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरि ॥२॥
 
तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥
 
३७५९
 
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥
 
प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥
 
आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥
 
तुका म्हणे एक जालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
 
३७६०
 
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥
 
आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥
 
खाणार ताकाचें आसातें माजीरें । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥
 
तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥
 
३७६१
 
नाहीं सरों येत कोरडएा उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥
 
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥
 
निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥
 
तुका म्हणे नेम न टळतां बरें । खर्‍यासी चि खरें ऐसें नांव ॥३॥
 
३७६२
 
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥
 
न देखेल लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥
 
नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥
 
तुका म्हणे तुम्हीं सदैव जी देवा । माझ्या हा चि जीवा एक ठाव ॥३॥
 
३७६३
 
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥
 
रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ध्रु.॥
 
कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥
 
तुका म्हणे जन । ऐसें नांवबुद्धिहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक निमलें ॥३॥
 
३७६४
 
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥
 
हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ध्रु.॥
 
जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥
 
तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥
 
३७६५
 
नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥१॥
 
कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥
 
लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥
 
तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥३॥
 
३७६६
 
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥
 
करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
 
गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥
 
जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
 
३७६७
 
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥
 
बरवें जालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥
 
राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥
 
तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
 
३७६८
 
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥
 
पायावरि ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥
 
येथून तेथवरि आतां । नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥
 
तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥
 
३७६९
 
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥
 
अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥
 
साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥
 
तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
 
३७७०
 
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥
 
नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥
 
विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥
 
देवाविण कांहीं । तुका म्हणे उरी नाहीं ॥३॥
 
३७७१
 
वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥
 
कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥
 
नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥
 
तुका म्हणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥
 
३७७२
 
आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥
 
सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥
 
अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं जालों नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी ॥३॥
 
३७७३
 
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥१॥
 
आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥
 
बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥
 
तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥
 
३७७४
 
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥
 
आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥
 
विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥
 
तुका म्हणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥
 
३७७५
 
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥
 
आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥
 
तुके तरि तुकीं खर्‍याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥२॥
 
तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
 
 
 
३७७६
 
आपण चि व्हाल साहे । कसियाला हे धांवणी ॥१॥
 
भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥
 
आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥
 
तुका म्हणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥
 
३७७७
 
निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥
 
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥
 
कोण तुम्हांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥
 
३७७८
 
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥
 
नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥
 
स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥
 
न मगें परि भातें । तुका म्हणे निढळि रितें ॥३॥
 
३७७९
 
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥
 
मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥
 
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥
 
चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया ॥३॥
 
३७८०
 
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥
 
लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥
 
कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥
 
तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥
 
३७८१
 
म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥
 
दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
 
हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥
 
तुका म्हणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें ॥३॥
 
३७८२
 
न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥
 
करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥
 
आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥२॥
 
तुका म्हणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥३॥
 
३७८३
 
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥
 
लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईंची घाणी ॥ध्रु.॥
 
पुष्प जवळी नाका । दुगपधीच्या नांवें थुंका ॥२॥
 
तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥
 
३७८४
 
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना ॥१॥
 
अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥
 
गुणदोष काशासाटीं । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥
 
तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥
 
३७८५
 
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥
 
एकसरीं केलीं कळिवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥
 
संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥
 
तुका म्हणे हें तूं ब्रम्हांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥
 
३७८६
 
आहे तैसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥
 
वचनाचा भार पडिलिया शिरीं । जालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥
 
अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां गोंवळ्याचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥
 
३७८७
 
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥
 
कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥
 
माझी म्हणती कवी । निषेधुनि पापी जीवीं ॥२॥
 
तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥
 
३७८८
 
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥
 
गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥
 
चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥२॥
 
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
 
३७८९
 
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥
 
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥
 
बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥
 
तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥
 
३७९०
 
ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥
 
पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ध्रु.॥
 
आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥
 
तुका म्हणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥
 
३७९१
 
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥
 
जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥
 
कामधेनु देखे जैशा गाईंम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥
 
तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
 
३७९२
 
तरी च हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥
 
येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥
 
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
 
तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥
 
३७९३
 
अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥१॥
 
नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥
 
तुका म्हणे नांदों आपल्या प्रतापें । तयासी लोकांपें स्तुती सांगों ॥३॥
 
३७९४
 
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण। तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥
 
तैसें जालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥
 
घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतीया ॥२॥
 
चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥
 
३७९५
 
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥
 
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥
 
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥
 
जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥
 
तुका म्हणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥
 
३७९६
 
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥
 
तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥
 
न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥
 
मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥
 
करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोलें पांडुरंगा ॥४॥
 
३७९७
 
देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥१॥
 
सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥
 
जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥
 
सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥
 
तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥
 
३७९८
 
आम्ही विठ्ठलाचे दास जालों आतां । न चले हे सत्ता आणिकांची ॥१॥
 
नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥
 
कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेईं आतां ॥२॥
 
इंिद्रयांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाळी तुज ॥३॥
 
तुका म्हणे आम्ही जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळि होऊनियां ॥४॥
 
३७९९
 
सांगतों तरि तुम्ही भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥
 
करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
 
कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
 
३८००
 
शब्दज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥
 
जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥
 
तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥
 

३८०१
 
अन्यायासी राजा जरि न करितां दंड । बहुचक ते लंड पीडिती जना ॥१॥
 
ने करी निगा कुणबी न काढितां तण । कैंचे येती कण हातासी ते ॥२॥
 
तुका म्हणे संतां करूं नये अनुचित । पाप नाहीं नीत विचारिता ॥३॥
 
३८०२
 
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसर्‍याची ॥१॥
 
असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥
 
 
समर्थासी काय कोणें हें म्हणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥२॥
 
 
तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥
 
३८०३
 
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥
 
आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥२॥
 
तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥३॥
 
३८०४
 
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥
 
पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥
 
तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥
 
कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका म्हणे ॥३॥
 
३८०५
 
देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुम्हां आम्हां ॥१॥
 
काशानें उदार तुम्हांसी म्हणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥
 
देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेलें ॥३॥
 
३८०६
 
तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चियाचा ॥१॥
 
म्हणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥
 
 
कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥
 
 
तुका म्हणे बरी झर्‍याची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥३॥
 
३८०७
 
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥१॥
 
देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥
 
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥
 
मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥
 
तुका म्हणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकळिकां कळों यावें ॥४॥
 
३८०८
 
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । जाली वेरझार हाणी ॥१॥
 
घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥
 
अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥
 
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं जालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥
 
आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती ॥४॥
 
जें दुर्लभ ब्रम्हादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे म्हणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥
 
३८०९
 
तुझिया दासांचा हीन जालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥
 
तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥
 
आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥
 
सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥३॥
 
तुका म्हणे तुज असो माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥
 
३८१०
 
ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥१॥
 
काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥
 
जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥
 
आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥
 
क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया तूं आतां ॥४॥
 
वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें म्हणे ॥५॥
 
तुका म्हणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥
 
३८११
 
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आठविलें ॥१॥
 
जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं ॥२॥
 
 
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । सवसार ना पाय तुझे मज ॥३॥
 
३८१२
 
आतां तरी मज सांगा साच भाव । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥
 
चुकावया कर्म नव्हतें कारण । केला होय सीण अवघा चि ॥२॥
 
तुका म्हणे नको पाहूं निरवाण । देई कृपादान याचकासी ॥३॥
 
३८१३
 
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥
 
दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥२॥
 
तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
 
३८१४
 
नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥
 
शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥
 
प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥२॥
 
सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥३॥
 
महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥४॥
 
तये नावेसंगें ब्राम्हण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥५॥
 
नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥६॥
 
तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥७॥
 
पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥८॥
 
नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका म्हणे ॥९॥
 
३९१५
 
काय वांचोनियां जालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरि ॥१॥
 
जातां भलें काय डोळियांचें काम । जरि पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥
 
काय मुख बळि श्वापदाचे धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥
 
तुका म्हणे पैं या पांडुरंगाविण । न वचे चि क्षण जीव भला ॥३॥
 
३८१६
 
सोइर्‍यासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ॥१॥
 
गाईंसी देखोनी बदबदा मारी । घोडएाची चाकरी गोड वाटे ॥ध्रु.॥
 
पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राम्हणासी खांड देऊं नेदी ॥२॥
 
पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि ॥३॥
 
कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस॥४॥
 
बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाठी दवडितो ॥५॥
 
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥६॥
 
३८१७
 
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥
 
तुझा म्हणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥
 
काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥
 
नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥
 
तुका म्हणे चाले आणिकांची सत्ता । तुज आळवितां नवल हें ॥४॥
 
३८१८
 
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
 
गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥
 
बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥
 
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥
 
३८१९
 
आतां धरितों पदरीं । तुज मज करीन सरी ॥१॥
 
जालों जीवासी उदार । उभा ठाकलों समोर ॥२॥
 
तुका विनवीतसे संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
 
३८२०
 
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥
 
न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥
 
तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥
 
३८२१
 
पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥
 
तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥
 
गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥२॥
 
तुका म्हणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥३॥
 
३८२२
 
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥
 
तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥
 
मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥
 
तुका म्हणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
 
३८२३
 
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥
 
पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥
 
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवर्‍या सांगाती ॥२॥
 
तुका म्हणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥
 
३८२४
 
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥
 
तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥
 
माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥
 
लोभ मोह माया आम्हां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥
 
तुका म्हणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥
 
३८२५
 
त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥
 
एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥
 
तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥
 
बापा विठ्ठलराया हें चि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥
 
आवडीसारखें मागितलें जरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥
 
३८२६
 
सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥
 
क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥
 
दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥२॥
 
कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥३॥
 
रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥४॥
 
तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥५॥
 
३८२७
 
बाप माझा दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥
 
कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
 
गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥२॥
 
तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥
 
३८२८
 
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥
 
नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥
 
जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥
 
तुका म्हणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥३॥
 
३८२९
 
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥
 
ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥
 
युगें जालीं अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥
 
भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥
 
तुका म्हणे पुंडलिका । तूं चि बळिया एक निका ॥४॥
 
३८३०
 
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
 
माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥
 
नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥
 
तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥
 
३८३१
 
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
 
शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥
 
नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतों ॥२॥
 
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥३॥
 
३८३२
 
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
 
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥
 
मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥२॥
 
तुका म्हणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥
 
३८३३
 
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
 
मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग कळिकाळा ॥ध्रु.॥
 
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
 
विचारितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आणीक नाहीं ॥३॥
 
तुका म्हणे चित्त रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥
 
३८३४
 
ब्रम्हज्ञान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज ॥१॥
 
पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥२॥
 
तुका म्हणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥३॥
 
३८३५
 
मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडीं हें ॥१॥
 
कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥
 
विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥२॥
 
तुका म्हणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥३॥
 
३८३६
 
नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥१॥
 
अंधळ्याचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥
 
न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
 
तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥३॥
 
३८३७
 
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥
 
करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केविलवाणें ॥ध्रु.॥
 
नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥
 
तुका म्हणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥
 
३८३८
 
होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥
 
तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥
 
नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥
 
तुका म्हणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा ॥३॥
 
३८३९
 
काय तुझी ऐसी वेचते गांठोळी । मांहे टाळाटाळी करीतसां ॥१॥
 
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरि सांगा निवडूनि ॥ध्रु.॥
 
कोण तुम्हां सुख असे या कवतुकें । भोगितां अनेकें दुःखें आम्ही ॥२॥
 
तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥
 
३८४०
 
देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥१॥
 
रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥२॥
 
तुका म्हणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥३॥
 
३८४१
 
नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥
 
निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥
 
नाहीं आणूनियां समपिऩलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
 
तुका म्हणे आम्हीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥३॥
 
३८४२
 
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥
 
सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥
 
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥
 
तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥
 
३८४३
 
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥
 
जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥
 
मन स्थिर माझें जालेंसे निश्चळि । वारिलीं सकळ आशापाश ॥२॥
 
जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥
 
तुका म्हणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥
 
३८४४
 
होऊं शब्दस्पर्श नये माझा तुम्हां । विप्रवृंदा तुम्हां ब्राम्हणांसी ॥१॥
 
म्हणोनियां तुम्हां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥
 
वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
 
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥
 
३८४५
 
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥
 
माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥
 
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥
 
विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥३॥
 
म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥
 
तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
 
३८४६
 
वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥
 
नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥
 
जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥२॥
 
तुका म्हणे बरे धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥
 
३८४७
 
आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥
 
तेणें माझें चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥
 
व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥२॥
 
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
 
३८४८
 
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥
 
पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होतो कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
 
इंिद्रयांचे आम्ही पांगिलों अंकित । त्यांच्यासंगें चित्त रंगलें तें ॥२॥
 
एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
 
तुका म्हणे जरी मोकळिसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥
 
३८४९
 
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाटीं ॥१॥
 
तें मी तुझें नाम गाईंन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥
 
वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं ॥२॥
 
वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥
 
तुका म्हणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥
 
३८५०
 
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥
 
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥
 
अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥
 
घेई उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥
 
बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥
 
तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥
 

३८५१
 
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
 
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥
 
पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥
 
तुका म्हणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥३॥
 
३८५२
 
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥
 
वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥
 
कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥
 
३८५३
 
धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥
 
धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥
 
धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥
 
धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले धन्य कर ॥३॥
 
धन्य तुका म्हणे आम्हांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥
 
३८५४
 
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य जाली बुद्धि संचितासी ॥१॥
 
येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥
 
त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥२॥
 
तुका म्हणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
 
३८५५
 
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥
 
उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥
 
गाईंचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥
 
तुका म्हणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥
 
३८५६
 
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥
 
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥
 
मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥२॥
 
तुका म्हणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
 
३८५७
 
वांझेनें दाविलें ग†हवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥
 
तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥
 
बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥२॥
 
कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥
 
तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥४॥
 
३८५८
 
तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥१॥
 
लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥२॥
 
तुका म्हणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥३॥
 
३८५९
 
मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥१॥
 
राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
 
नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भक्तकाजा ॥२॥
 
सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
 
तुका म्हणे त्यासी गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
 
३८६०
 
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥
 
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥
 
पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥
 
तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥
 
३८६१
 
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥
 
अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥२॥
 
तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥
 
३८६२
 
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥
 
आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥
 
बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥
 
तुका म्हणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥३॥
 
३८६३
 
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥१॥
 
उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकळिली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥
 
माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥
 
तुका म्हणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥३॥
 
३८६४
 
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥
 
तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥
 
विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥
 
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥३॥
 
३८६५
 
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
 
बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥ध्रु.॥
 
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥
 
अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
 
तुका म्हणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
 
३८६६
 
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठ‍ अतिवादी ॥१॥
 
अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥
 
संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥
 
तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित आचरावें ॥३॥
 
३८६७
 
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥
 
विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥
 
विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥२॥
 
विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥३॥
 
तुका म्हणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥
 
३८६८
 
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥१॥
 
धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥
 
जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥
 
सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥
 
३८६९
 
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥१॥
 
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥
 
जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
 
तुका म्हणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥
 
३८७०
 
झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥
 
वल्कलें नेसुनि ठुंगा गुंडाळुनी । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥
 
लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाटीं ॥२॥
 
सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥
 
ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पांग फिटे ॥४॥
 
३८७१
 
भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥
 
एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥
 
नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥
 
मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥
 
ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥
 
सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥
 
सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥
 
तुका म्हणे आतां होईं तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥
 
३८७२
 
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥१॥
 
अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥
 
नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥
 
गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥
 
तुका म्हणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
 
३८७३
 
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
 
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥
 
द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
 
पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥
 
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥
 
३८७४
 
नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥
 
जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥
 
चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥
 
पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥३॥
 
तुका म्हणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
 
३८७५
 
जेजे आळी केली तेते गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
 
काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेले ॥ध्रु.॥
 
अभ्यास तो नाहीं स्वप्नीं ही दुश्चिता । प्रत्यक्ष कैंचा चि तो ॥२॥
 
आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी जालें ॥३॥
 
तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलिसी ऐसा वाटतोसी ॥४॥
 
३८७६
 
पूवाअहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥
 
जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥
 
मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥२॥
 
तुका म्हणे आम्हांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥
 
३८७७
 
दर्दुराचें पिलुं म्हणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥१॥
 
कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥
 
आज्ञा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥२॥
 
तुका म्हणे तुझे ऐसे हे पवाडे । वणिऩतां निवाडे सुख वाटे ॥३॥
 
३८७८
 
करुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥
 
पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥
 
कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥
 
हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥
 
तुका म्हणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥
 
३८७९
 
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥१॥
 
प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥
 
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
 
तुका म्हणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वणिऩताती ॥३॥
 
३८८०
 
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
 
अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥
 
धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥
 
तुका म्हणे तुज वणिऩती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥
 
३८८१
 
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥
 
आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥
 
निष्ठ‍ अथवा होई तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥
 
आपुलें वचन राहावें सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाडु ॥३॥
 
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईंल तयाकडे ॥४॥
 
तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥
 
३८८२
 
आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥
 
नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥२॥
 
जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका म्हणे ॥३॥
 
३८८३
 
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥
 
आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥
 
कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥
 
तुका म्हणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥
 
३८८४
 
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
 
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥
 
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥
 
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
 
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
 
पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥
 
३८८५
 
अभयदान मज देई गा उदारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥१॥
 
देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांही नेणें दुजें ॥ध्रु.॥
 
सेवा भक्ति भाव नेणें मी पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥२॥
 
अवघा निरोपिला तुज देहभाव । आतां मज पाव पांडुरंगा ॥३॥
 
तुका म्हणे तुजें नाम दिनानाथ । तें मज उचित करीं आतां ॥४॥
 
३८८६
 
लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाईं जननिये ॥१॥
 
पतितपावन म्हणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥
 
नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
 
बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें म्हणतील ॥३॥
 
करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥४॥
 
तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥
 
३८८७
 
तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥
 
तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥
 
गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥
 
तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
 
३८८८
 
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥
 
नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥
 
पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरि गीत गाई तुझे ॥२॥
 
तुका म्हणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥
 
३८८९
 
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
 
अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा ॥२॥
 
तुका म्हणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
 
३८९०
 
यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
 
सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥
 
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
 
न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥३॥
 
तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥४॥
 
३८९१
 
झांकूनियां नेत्र काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥१॥
 
रामनाम म्हणा उघड मंत्र जाणा । चुकती यातना गर्भवास ॥ध्रु.॥
 
मंत्र यंत्र संध्या करिसी जडीबुटी । तेणें भूतसृष्टी पावसील ॥२॥
 
तुका म्हणे ऐक सुंदर मंत्र एक । भवसिंधुतारक रामनाम ॥३॥
 
३८९२
 
पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥
 
ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥
 
वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥
 
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
 
३८९३
 
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥
 
तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥
 
मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥
 
तुका म्हणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥
 
३८९४
 
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥
 
दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥
 
रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥२॥
 
तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥३॥
 
३८९५
 
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥
 
पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि जाले ॥२॥
 
तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥३॥
 
३८९६
 
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥१॥
 
भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥
 
मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥
 
३८९७
 
आविसाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥
 
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
 
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥
 
३८९८
 
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥
 
कृपेचे सागर तुम्ही संत सारे । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥
 
अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें करावें निर्वाण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥
 
३८९९
 
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥
 
ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥
 
कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥
 
नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥३॥
 
अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥
 
३९००
 
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥
 
अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥
 
कराल ते जोडी येईंल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥
 
सांचलिया धन होईंल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
 
करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥
 
तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
 

३९०१
 
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥
 
सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
 
रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥
 
तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥
 
३९०२
 
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥
 
भक्त जाय सदा हरि कीर्ति गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥
 
त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥
 
नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मार्गा चालताहे संगें हरि ॥३॥
 
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥
 
३९०३
 
बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥
 
आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥
 
 
नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥
 
 
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥
 
३९०४
 
हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥
 
न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥
 
असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥
 
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
 
३९०५
 
दसरा दिवाळी तो चि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥
 
आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥
 
धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥
 
 
तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥
 
३९०६
 
खिस्तीचा उदीम ब्राम्हण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥
 
वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥
 
 
मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥२॥
 
 
आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥
 
तुका म्हणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥
 
३९०७
 
जगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥
 
आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥
 
 
उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥
 
 
तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥३॥
 
३९०८
 
हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥
 
हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥
 
 
डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥
 
 
बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥
 
बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥
 
तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥
 
३९०९
 
जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥
 
मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥
 
 
तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥
 
 
तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥
 
३९१०
 
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥
 
त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥
 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥
 
शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥
 
तुका म्हणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥
 
३९११
 
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥
 
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥
 
 
तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥
 
३९१२
 
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥
 
अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥
 
 
तुका म्हणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥
 
३९१३
 
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥
 
देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥
 
मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता म्हणों नये ॥२॥
 
वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥
 
तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥
 
३९१४
 
मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥१॥
 
काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥
 
नाना छंद अंगीं बैसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥
 
३९१५
 
जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥
 
काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥
 
तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥
 
अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥
 
तुका म्हणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥
 
३९१६
 
कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥
 
आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥
 
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं म्हणती एक ॥२॥
 
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥
 
न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥
 
न जावें देउळा म्हणती देवघरीं । बुडविलें या परी तुका म्हणे ॥५॥
 
३९१७
 
नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥
 
संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥
 
न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ती गोड काज आणीक नाहीं ॥२॥
 
करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥
 
महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥
 
तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥
 
३९१८
 
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥
 
निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥
 
३९१९
 
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥
 
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
 
तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥
 
३९२०
 
कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥
 
घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥
 
पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नर्क लोका ॥३॥
 
३९२१
 
कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥
 
पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥
 
तुका म्हणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥
 
३९२२
 
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥
 
उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥
 
चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यास यम दंडी ॥३॥
 
३९२३
 
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥
 
शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥
 
तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥३॥
 
३९२४
 
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥
 
नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥
 
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
 
३९२५
 
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥१॥
 
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥
 
जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥
 
३९२६
 
स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥
 
यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥
 
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥
 
३९२७
 
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥
 
म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥
 
काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥
 
तुका म्हणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥
 
३९२८
 
तुझा म्हणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥
 
अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥
 
तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥
 
तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥
 
३९२९
 
जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥
 
सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥
 
तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा सीण जन्मांतर ॥३॥
 
३९३०
 
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥
 
कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥
 
तुका म्हणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥
 
३९३१
 
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥
 
न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
 
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥
 
३९३२
 
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥
 
अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥
 
तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥
 
३९३३
 
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
 
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
 
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥
 
निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
 
तुका म्हणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥
 
३९३४
 
माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥
 
तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥
 
पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥
 
तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥
 
३९३५
 
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥
 
येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
 
ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥
 
तुका म्हणे भेदा । करुनि करितों संवादा ॥३॥
 
३९३६
 
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥
 
ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
 
बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥
 
दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥
 
३९३७
 
माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥
 
धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥
 
करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥
 
तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥
 
३९३८
 
जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥१॥
 
परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥
 
तुझें नाम अमोलिक । नेणती हे ब्रम्हादिक ॥२॥
 
ऐसें नाम तुझें खरें । तुका म्हणे भासे पुरें ॥३॥
 
३९३९
 
सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥
 
नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥
 
द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि घ्यावें जीवें ॥२॥
 
तुका म्हणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥
 
३९४०
 
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥
 
त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥
 
श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥
 
तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥
 
३९४१
 
सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥
 
स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥
 
सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥
 
तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
 
३९४२
 
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥
 
दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥
 
तुका म्हणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
 
३९४३
 
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥
 
काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥
 
जो स्मरे रामराम । तयासी म्हणावें रिकामें ॥२॥
 
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावें भिकारी ॥३॥
 
तुका म्हणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥
 
३९४४
 
या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥
 
गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥
 
सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥
 
प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥
 
पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥
 
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥
 
३९४५
 
उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥
 
होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥
 
येइल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥
 
भक्तीप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥
 
यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥
 
तुका म्हणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥
 
३९४६
 
माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥
 
कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥
 
मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥
 
तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥
 
३९४७
 
भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा ॥१॥
 
सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥
 
काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥
 
तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥
 
३९४८
 
जातीचा ब्राम्हण । न करितां संध्यास्नान ॥१॥
 
तो एक नांनवाचा ब्राम्हण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥
 
सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥२॥
 
नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥३॥
 
तुका म्हणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥४॥
 
३९४९
 
जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥
 
करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥
 
जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥२॥
 
तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥
 
३९५०
 
आम्हां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥१॥
 
आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥
 
अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥२॥
 
तुका म्हणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥३॥
 

३९५१
 
मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥
 
तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥
 
कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥
 
नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥
 
अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥
 
तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥
 
३९५२
 
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥
 
आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥
 
कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥
 
तुका म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥३॥
 
३९५३
 
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
 
तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥
 
गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरि लोळे ॥२॥
 
प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
 
तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥
 
३९५४
 
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥
 
वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
 
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥
 
तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥
 
३९५५
 
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥
 
तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥
 
वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥
 
ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥३॥
 
मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥४॥
 
३९५६
 
सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥
 
धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥
 
विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥
 
तुका म्हणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ ॥३॥
 
३९५७
 
भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥१॥
 
अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥
 
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥
 
रिद्धि सिद्धी ज्या कामारी । तुका म्हणे ज्याचे घरीं ॥३॥
 
३९५८
 
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥
 
येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥
 
गोडी प्रियापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥
 
तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥
 
३९५९
 
बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥
 
तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥
 
नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥
 
भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥
 
त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥
 
नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥
 
३९६०
 
हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥
 
बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
 
मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥
 
धन्य म्हणे आतां । येथें नुधवा माथां ॥३॥
 
अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥
 
३९६१
 
किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥
 
एका घाई न करीं तुटी । न निघें दवासोई भेटी ॥ध्रु.॥
 
सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥२॥
 
सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥३॥
 
३९६२
 
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥
 
बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥
 
परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥
 
तुका म्हणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥३॥
 
३९६३
 
साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥
 
मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥
 
दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥
 
तुका म्हणे आत्मनष्टि । भागे चेष्ट मनाची ॥३॥
 
३९६४
 
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥
 
आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
 
सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥
 
तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥
 
३९६५
 
आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥
 
तुम्हांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥
 
दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥२॥
 
तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥
 
३९६६
 
अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी ॥१॥
 
नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥
 
नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥
 
तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥३॥
 
३९६७
 
आम्ही हरिचे हरिचे । सुर कळिकाळा यमाचे ॥१॥
 
नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥
 
आम्ही हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥२॥
 
आम्ही हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥३॥
 
तुका म्हणे आम्हांवरी । सुदर्शन घरटी करी ॥४॥
 
३९६८
 
देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥
 
न घेई माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥
 
मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥
 
तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥
 
३९६९
 
पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥
 
नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥
 
विष्णुदासां गति नाहीं तरावया । म्हणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥
 
धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥
 
तुका म्हणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥
 
३९७०
 
वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥
 
चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥
 
लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥
 
तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥
 
३९७१
 
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥
 
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥
 
सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥
 
तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥
 
३९७२
 
निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥
 
तैसा आम्हासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥
 
मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥
 
दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥
 
पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥
 
३९७३
 
श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥
 
भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥
 
३९७४
 
सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥
 
सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥
 
आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥
 
तुका म्हणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥
 
३९७५
 
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥
 
वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥
 
हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥
 
तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असतां कळिकाळ पायां तळीं ॥३॥
 
३९७६
 
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
 
तृण नाहीं तेथें पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
 
तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
 
३९७७
 
याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥
 
ब्रम्हहत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥
 
तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापार । म्हणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥
 
३९७८
 
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥
 
तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥
 
कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥
 
जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥
 
जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥
 
३९७९
 
कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥
 
कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
 
जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥
 
केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे कर्म । जाळोनियां तरसी ॥३॥
 
३९८०
 
तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥
 
दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥
 
देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥
 
तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥
 
३९८१
 
कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥१॥
 
काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥
 
काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुम्ही देवा ॥२॥
 
तुका म्हणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥३॥
 
३९८२
 
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥
 
अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥
 
मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥
 
ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥
 
माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥
 
तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥
 
तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥
 
३९८३
 
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥
 
तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥
 
वत्साचिये आसे । धेनु धांवेना गोरसें ॥२॥
 
तुका म्हणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥
 
३९८४
 
भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥
 
जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥
 
तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥
 
३९८५
 
तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥
 
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥
 
उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥
 
तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
 
३९८६
 
अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तमु ॥१॥
 
जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥
 
अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥
 
तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥
 
३९८७
 
मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप ॥१॥
 
जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥
 
तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥
 
३९८८
 
धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
 
लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ध्रु.॥
 
नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥
 
भाविक हो येथें धरा रे आवांका । म्हणे दास तुका शुद्धयाति ॥३॥
 
३९८९
 
अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥१॥
 
अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥
 
फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका म्हणे नये सवें कांहीं ॥३॥
 
३९९०
 
संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥
 
अवघीं च इंद्रियें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥
 
शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥
 
तुका म्हणे सार हरिनामउच्चार । येर्‍हवी येरझार हरीविण ॥३॥
 
३९९१
 
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
 
आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
 
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥
 
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥
 
३९९२
 
भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥
 
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥
 
सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥
 
सर्वस्वें त्याचा म्हणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥
 
तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥४॥
 
३९९३
 
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥
 
लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥
 
तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥
 
तुका म्हणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥
 
३९९४
 
हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥
 
अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥
 
तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥
 
३९९५
 
गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥
 
संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥
 
साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥२॥
 
निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥
 
तुका म्हणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥
 
३९९६
 
भाव धरिला चरणीं म्हणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥
 
करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥
 
धरिले निश्चळि न सोडीं ते पाय । तुका म्हणे सोय करीं माझी ॥३॥
 
३९९७
 
तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥
 
येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥
 
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥
 
अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥
 
तुका म्हणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥
 
३९९८
 
आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥१॥
 
तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥
 
नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भक्तांची प्रीति तुम्हां ॥२॥
 
परि आम्हांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥३॥
 
तुका म्हणें तैसें तुज काय उणें । देई दरुषण चरणांचें ॥४॥
 
३९९९
 
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥
 
जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥
 
शरणागतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥२॥
 
तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥
 
४०००
 
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥
 
सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥
 
अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥
 
तुका म्हणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥