शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुकाराम महाराजांनी नित्यपाठासाठी स्वार्गाहून पाठविलेले अभंग

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
 
अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥
 
उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥ 
बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥
 
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥ 
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥
 
ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥
आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
वर्णियेले एका गुणनामघोषं । जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५॥
 
दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥
 
ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥
घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥
 
भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥
 
मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥
साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥
 
गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥
निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥
न कळे कवणाला त्‍याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्‍याची ॥७॥
खुण त्‍याची जाणे जे तैसे असती । तुका म्‍हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥
 
दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥
लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥
त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका महणे ॥५॥
 
स्‍वर्ग लोकांहूनी आले हे अभंग । धाडियले सांग तुम्‍हांलागी ॥१॥
नित्‍यनेमे यांसी पढतां प्रतापें । जळतील पापे जन्‍मांतरीची ॥२॥
तया मागे पुढे रक्षी नारायण । मांदिल्‍या निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धिचा पालट नासेल कुमती । होईल सदभक्ति येणे पंथे ॥४॥
सदभक्ति झालिया सहज साक्षात्‍कार । होईल उध्‍दार पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणे इहपरलोक । सत्‍य सत्‍य भाक माझी तुम्‍हां ॥६॥
परोपकारासाठी सांगीतले देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणे भवव्‍यवथा जाईल तुमची । सख्‍या विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कंथा धाडिली णिशाणी । घ्‍यारे ओळखोनी सज्‍जन हो ॥९॥
माझे दंडवत तुम्‍हा सर्व लोकां । देहा सहित तुका वैकुंठासी ॥१०॥
 
 
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥
पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥
विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥
सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥ 
संसार उडाला संदेह फिटला । पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥६॥
 
पांच कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितले हे तुका कथुनियां गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेभावे ॥४॥
जीवेभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥