रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (13:45 IST)

सफला एकादशी आज, वाचा पौराणिक व्रत कथा

पौष मासमध्ये कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाणारे सफला एकादशीचे व्रत यंदा गुरुवार, १८ डिसेंबरला येत आहे. या एकादशीची तिथी बुधवार, १७ डिसेंबरला रात्री ११ वाजून १0 मिनिटांनी प्रारंभ होत असून १८ डिसेंबरला ११ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे. शास्त्रानुसार, ती नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. 
 
जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजाअर्चना करा, पहाटे उठून व्रताचे संकल्प करा. दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र, केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा, सत्यनारायण कथापाठ करून आरती करा. या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये. दुसर्‍या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अघ्र्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे.

पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते. महाराज युधिष्ठिरने सांगितले की, हे जनार्दन पौष कृष्ण एकादशीचे काय नाव आहे? त्या दिवशी कोणत्या देवीदेवतांचे पूजन केले जाते? आणि त्याचा विधी काय आहे? कृपा करून मला सांगा. यावर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 'हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की, एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणार्‍यांनाही प्रसन्न होत नाही. त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा. त्यामुळे हे राजन तुम्ही द्वादशीयुक्त पौष कृष्ण एकादशीचे माहात्म्य एकाग्रचित्ताने ऐका. या एकादशीचे नाव सफला एकादशी आहे. या एकादशीचे देवता श्रीनारायण आहेत. अत्यंत विधिपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्षामध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञामध्ये अश्‍वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे. जो व्यक्ती सदैव एकादशीचे मन:पूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे. आता या व्रताची विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका. 
 
'माझी पूजा करण्याकरिता ऋतूनुसार फळ, नारळ, लिंबू, नैवेद्यासह सोळा साहित्य गोळा करा. या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा. या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही. पाच हजार वर्षे तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. त्यामुळे हे राजन आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐका.'
 
चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला चार मुले होती. त्यातील लुम्पक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसर्‍या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्‍चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला. महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असते. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुम्पक राहत होता. या जंगलाला जनता देवीदेवतांची नगरी मानत असत. काही काळ गेल्यानंतर लुम्पकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला. त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता- उजाडता तो मूच्र्छित झाला. दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वत:ला सावरत तो काही खायला मिळते का, हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली. तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्‍वरला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. 
 
दुसर्‍या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून 'भगवान की जय हो' असे म्हणत पित्याकडे गेला. 
 
पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुम्पक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुम्पक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्या शेवटी मुक्ती मिळते. आणि जे हे व्रत करीत नाही ते पशूपेक्षा काही कमी नसतात. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, माहात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळते.' 

साभार : पुण्यनगरी