चीनमध्ये २५० भारतीय विद्यार्थी अडकले
चीनमध्ये कोरोना व्हायरसचं जिथं केंद्र मानलं जातंय त्या शहरात २५० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मृत्यूच्या या दाढेतून त्यांची सुटका करावी, यासाठी आता भारत सरकारने चीन सरकारकडे विनंती केली आहे.
कोरोना व्हायरसचा जिथे सर्वाधिक प्रभाव आहे, अशा १७ शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी बंदी घातली आहे. या शहरांशी कोणीही संपर्क करू नये यासाठी त्या शहरांवर बंदी घालण्यात आली आहे. यातील वुहान नावाच्या शहरात ७०० भारतीय विद्यार्थी शिकतात. हेच शहर कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू आहे. या शहरात आतापर्यंत ४६ जणांचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला आहे. ७०० विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी सुटीमुळे भारतात आले. मात्र तेथे अद्याप २५० विद्यार्थी अडकलेले आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी आणि त्यांना भारतात परत येऊ द्यावे, अशी मागणी भारताने चीनच्या परराष्ट्र खात्याकडे केली आहे.