1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (11:29 IST)

काश्मीर: पाकिस्तानला मदत करण्यास तयार - डोनाल्ड ट्रंप

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला मदत करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा म्हटलं आहे.
 
पाकिस्तानचे इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची दावोस इथं सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भेट झाली.
 
इम्रान खान हे चांगले मित्र असल्याचं ट्रंप यांनी पत्रकारांना सांगितलं.
 
"काश्मीरसंदर्भात तसंच भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधाबाबत बोलत आहोत. आम्ही काही मदत करू शकलो तर नक्कीच करू. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत", असं डोनाल्ड ट्रंप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
अमेरिका भारत-पाकिस्तान संबंध तसंच काश्मीरसंदर्भात अमेरिका मोलाची भूमिका बजावू शकते, असं इम्रान खान यांनी सांगितलं. "पाकिस्तानसाठी भारत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिका यासंदर्भात मदत करू शकतं. अन्य देश करू शकत नाहीत," असं इम्रान म्हणाले.
 
दुसरीकडे, काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, अशी भारताची ठाम भूमिका राहिली आहे.
 
याआधीही ट्रंप यांनी काश्मीरप्रश्नी स्वारस्य दाखवलं होतं.
 
प्रादेशिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची काय योजना आहे तसंच जगातील सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताचा काश्मिरमधील नागरिकांच्या मानवाधिकार हक्कांबाबत काय भूमिका आहे, हे अमेरिकेला जाणून घ्यायचंय, अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी काही महिन्यांपूर्वीही दिल्या होत्या.
 
काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिल्यापासून ट्रंप सातत्याने काश्मीर या मुद्यावर बोलत आहेत. अनेकदा त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं आहे.
 
या आठवड्याची सुरुवात करताना ट्रंप यांनी खास आपल्या शैलीत काश्मीरच्या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणाले, "काश्मीर हा क्लिष्ट मुद्दा आहे. काश्मिरमध्ये हिंदूही राहतात आणि मुसलमानही राहतात. दोन्ही धर्माच्या नागरिकांमध्ये शांतता नांदेल आणि ते एकोप्याने राहू शकतील हे ठामपणे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मी काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी हीच सगळ्यात चांगली गोष्ट करू शकतो. एकमेकांबरोबर शांततेत राहू शकत नाहीत असे दोन देश शेजारी असणं ही स्फोटक परिस्थिती आहे.
 
मोदी-इम्रान यांच्याशी फोनवरून केली चर्चा
 
ट्रंप यांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. पाकिस्तानातील काही नेत्यांकडून भारतविरोधी वक्तव्यं आणि हिंसेला खतपाणी घालणं शांतता निर्माण करण्यासाठी अनुकूल नाही, असं मोदी यांनी ट्रंप यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.
 
यानंतर ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काश्मीरसंदर्भात नरमाईचं धोरण घेत वक्तव्यं करण्याचा सल्ला दिला.
 
ट्रंप यांची नेहमीची भूमिका कोणत्याही प्रश्नावर तात्काळ प्रभाव टाकण्याची असते. मुत्सद्दीपणे एखाद्या मुद्यावर उपाय शोधून काढणं ही त्यांची भूमिका नसते.
 
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रंप यांनी नाट्यमय पद्धतीने काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. या वक्तव्याची भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रचंड चर्चा केली. राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटले.
 
व्हाईट हाऊसमध्ये इम्रान खान ट्रंप यांच्या शेजारीच बसले होते.
 
त्यावेळी ट्रंप म्हणाले, "मदत करू शकलो तर मध्यस्थी करणं पसंत करेन. त्यांनी नरेंद्र मोदीशी जपानमधील आसोका इथे झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. आम्ही काश्मीरच्या मुद्यावरून चर्चा करत होतो. त्यावेळी त्यांनी मला विचारलं,की तुम्हाला मध्यस्थी करायला आवडेल का? त्यावर मी विचारलं, कुठे? ते म्हणाले-काश्मीर. कारण हा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याप्रश्नी ठोस उपाययोजना करण्याचा त्यांचा विचार आहे, असं मला वाटतं. तुम्हालाही (इम्रान खान) या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे."
 
ट्रंप यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव भारतीयांसाठी धक्काच होता. कारण गेल्या दशकभरात अमेरिकेचे डावपेच याच्या अगदी उलट स्वरुपाचे होते. काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विराष्ट्रीय प्रश्न असल्याच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा होता. अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं.
 
बराक ओबामा यांच्यासह अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यांना काश्मीर प्रश्नाने आकर्षित केलं आहे. मात्र भारताशी असलेले संबंध दृढ करायचे असतील तर काश्मीरप्रश्नी कमीत कमी दखल घेतलेली बरी हे अमेरिकेच्या लक्षात आलं होतं.
 
मग असं काय घडलं ज्यामुळे ट्रंप यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करावी असं वाटू लागलं? यावरून भारतात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.
 
कोणाला हे षडयंत्र आहे असं वाटलं. यावरून लोकांनी अनेक निष्कर्षही काढले. मात्र ट्रंप काय विचार करतात याचा अंदाज बांधणं अवघड काम आहे. विशेषत: गोष्टी भौगौलिक राजकारणाशी निगडित असतात तेव्हा. ट्रंप कसा विचार करतात याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयालाच अंदाज नाही. त्यामुळे भारतासाठी हे अवघडच समीकरण आहे.
 
एवढं सगळं असूनही ट्रंप यांनी काश्मीरप्रश्नी स्वारस्य दाखवण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे- अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या धोरणाला पाकिस्तानकडून समर्थन मिळवणं. ट्रंप यांना अमेरिकेच्या फौजांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढायचं आहे.
 
राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका लक्षात घेऊन ट्रंप यांना असं करायचं आहे जेणेकरून ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. अमेरिकेचं सैन्य परत जाण्याबाबत अमेरिका आणि तालिबान यांच्यात सहमती झाली आहे आणि यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.
 
या शांतता करारासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या समर्थनाची आवश्यकता आहे. दुसरीकडे काश्मीरच्या मुद्यावर अमेरिकेने साथ द्यावी असं पाकिस्तानला वाटतं आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैनिकांच्या फौजा टप्याटप्याने घटवणं ही ट्रंप यांची प्राथमिकता आहे आणि यासाठी ते इम्रान खान यांना संतुष्ट करू शकतात.
 
दुसरीकडे भारताने जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं आहे. यामुळे काश्मिरला असलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. काश्मीर आणि लेह केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. भारत आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या भूमिकेसंदर्भात सुस्पष्ट डावपेचांसह वाटचाल करतो आहे.
 
पाकिस्तान असहाय्यपणे काश्मीरचा प्रश्न अफगाणिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तालिबाननेच पाकिस्तानला इशारा दिला आहे. काही पक्ष काश्मीर आणि अफगाणिस्तान एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. कारण काश्मिरचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही.
 
राजकीय संभ्रमावस्थेमुळं पाकिस्तान अफगाणिस्तानबाबत ठोसपणे भूमिका घेण्यात मागे पडला आहे. अफगाणिस्तानमध्ये कोणाचंही सरकार आलं तरी हे सरकार आपल्या सुरक्षा बळकटीकरणासाठी भारताकडेच मदतीचा हात मागणार हे निश्चित.
 
ट्रंप यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावानंतरही काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न आहे, या भूमिकेवर भारत ठाम आहे. तिसऱ्या देशाची मध्यस्थी यात गरजेची नाही हे भारताने वारंवार सांगितलं आहे. अंतर्गत संरचना पाहिली आणि संवेदनशीलता लक्षात घेतली तर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही.
 
ट्रंप यांच्या मध्यस्थीच्या सूतोवाचानंतरही काश्मिरमधली परिस्थिती आणि काश्मिरप्रती भारताची भूमिका अमेरिका बदलू शकत नाही. अन्य देश काश्मिरप्रश्नी कसं बघत आहेत हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यानंतर लक्षात येऊ शकतं. काश्मिरप्रश्नी उत्तर भारत आणि पाकिस्तान यांनी काढायला हवं. तिसऱ्या देशाने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.