पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द, अमेरिकेचा दणका
पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची (सुमारे 2130 कोटी) आर्थिक मदत रद्द केली आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर १५ दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला हा दुसरा धक्का आहे. या आधाही अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी 500 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द केली होती.
अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत कोएलिशन सपोर्ट फंडसाठी देण्यात येणार होती. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारले होते. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अफगाणिस्तानमध्ये लढत आहोत आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. अमेरिकेची अशी फसवणूक सहन करणार नाही, असे बजावत त्यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत रद्द केली होती. अजूनही पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानला मदत केल्यास तो पैसा दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही मदत रद्द करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांनी सांगितले.