सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (15:08 IST)

आधी मैत्री केली, प्रॉपर्टीसाठी खून केला, शीर धडावेगळं करून मृतदेह फेकून दिला...

murder
हेलेना विल्किन्सन, जेरेमी ब्रिटन
पैशाच्या लालसेपोटी जगात खूप भयानक गोष्टी घडल्याचं आपण वाचत, ऐकत आलोय. अशीच एक घटना लंडनमध्ये घडली होती.
 
एका महिलेने पैशासाठी तिच्याच मैत्रिणीचा खून केला. नंतर तिचं शीर धडावेगळं केलं. तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून 300 किलोमीटर दूर जंगलात फेकून दिला.
 
या महिलेचं नाव जेमा मिशेल. तिच्या अतिहव्यासामुळे ती खुनी बनली. आपल्या मैत्रिणीच्या खुनाच्या आरोपाखाली तिला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
 
लंडनचे मेट्रोपॉलिटन पोलिस निरीक्षक जिम ईस्टवुड या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणाला, "मिशेल एक निर्दयी मारेकरी आहे. पैशासाठी तिने स्वतःच्या मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्याचा निर्णय घेतला."
 
चर्चमध्ये सुरू झालेल्या मैत्रीचा शेवट एकीच्या निर्घृण हत्येत आणि दुसरीच्या तुरुंगात जाण्यानं झाला.
 
ब्रिटनच्या डेव्हनमधील सॅल्कोम्बेच्या समुद्र किनाऱ्यावर घनदाट जंगल आहे. या जंगलात एक मृतदेह सापडला होता, पण याला शीरचं नव्हतं. त्यामुळे मृतदेह नेमका कोणाचा याचा अंदाज येत नव्हता.
 
दुसरीकडे 300 किलोमीटर अंतरावर मलेशियन वंशाची 'मी कुएन चेंग' नावाची महिला मागच्या 16 दिवसांपासून बेपत्ता होती. तिला 'डेबोरा' नावानेही ओळखलं जायचं.
 
दूर जंगलात सापडलेला हा मृतदेह 67 वर्षीय डेबोराचा होता. त्यानंतर काही दिवसांतच तिचं शीरही त्याच परिसरात सापडलं.
 
पण हे भयानक हत्याकांड उघडकीस यायला जवळपास एक वर्ष लागलं होतं. 12 नंबरच्या कोर्टरूममध्ये क्रिमिनल वकील दीना हीर यांनी हा घटनाक्रम उघडकीस आणला.
 
मिशेलने डेबोरावर हल्ला करून तिची हत्या केली होती. त्यानंतर डेबोराचा मृतदेह एका मोठ्या निळ्या सूट केसमध्ये टाकून सॅल्कोम्बे इथं नेण्यात आल्याचं दीना हीर यांनी सांगितलं.
 
सलग दोन आठवडे सुरू असणारा हा खटला डेबोराच्या कुटुंबातील सदस्यांनी व्हीडिओ लिंकवर पाहिला.
 
मिशेल-डेबोराची मैत्री
मिशेल सुखवस्तू कुटुंबात वाढली. तिचं शिक्षणही चांगल्या शाळेत झालं. तिची आई परराष्ट्र खात्यात कामाला होती.
 
मिशेलचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. तिथंही तिची थोडीफार संपत्ती आहे. लंडनमध्येही तिचं घर आहे.
 
डेबोरा आणि मिशेल यांच्यात जे संभाषण झालं होतं त्यावरून तरी मिशेलच्या घराची किंमत 40 लाख पौंड असावी, असं डेबोराला वाटतं होतं.
 
पण मिशेलच्या घराची दुरुस्ती करणं खूप गरजेचं होतं.
 
डेबोराने यासाठी तिला 2 लाख पौंड देऊ असं सांगितलं. पण काळाच्या ओघात ते पैसे देणं राहून गेलं.
 
डेबोरा अचानक गायब झाली...
या दोघींचीही ख्रिश्चन धर्मावर श्रध्दा होती. ऑगस्ट 2020 मध्ये त्या दोघींची भेट एका चर्चमध्ये झाली होती.
 
मिशेल 'ख्रिश्चन कनेक्शन्स' नावाच्या डेटिंग साईटवर होती. डेबोरा सुद्धा या वेबसाईटवर होती. ती तिथं रोज प्रार्थनेचे मेसेज पोस्ट करायची. डेबोरा मानसिकदृष्ट्या खचलेली होती.
 
मिशेलने ऑस्टियोपॅथीमध्ये डिग्री घेतली होती. ऑस्टियोपॅथी म्हणजे स्नायू आणि सांधे हलवून आरोग्य समस्यांवर उपचार करण्याची एक पद्धत आहे.
 
डेबोराला ज्या आरोग्याच्या समस्या होत्या त्यावर मिशेल तिला काही सल्ले द्यायची आणि सोबतच आध्यात्मिक मार्गांनी आराम मिळवण्यासाठीही मदत करायची.
 
डेबोरा स्वभावाने खूप उदार होती. गरजूंना आधार देणं तिच्या स्वभावात होतं. याचा परिणाम मिशेल आणि डेबोरा चांगल्या मैत्रिणी झाल्या.
 
मात्र नंतर थोड्याच दिवसात डेबोरा बेपत्ता झाली. तिचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्यांनी सर्वात आधी डेबोराच्या घराजवळचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले.
 
इन्स्पेक्टर ईस्टवुड सांगतात की, डेबोराच्या हत्येमध्ये मिशेलचा सहभाग असावा असा खात्रीलायक पुरावा आम्हाला सापडला. ज्या दिवशी डेबोरा बेपत्ता झाली त्यादिवशी मिशेलने डेबोराच्या घरी खूप चकरा मारल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं.
 
एवढंच नाही तर मिशेल ज्या शहरात गेली होती त्याच शहरात डेबोराहचा मृतदेह सापडल्याचं इन्स्पेक्टर ईस्टवुड सांगतात.
 
ज्या निळ्या सुटकेस मधून डेबोराचा मृतदेह हलवण्यात आला होता ती सुटकेसही नंतर जप्त करण्यात आली. डेबोराचा मृतदेह नेताना मिशेलने तिचा फोन घरातच ठेवला होता. तिने तिच्या मृत शेजाऱ्याचा फोन सुरू करून स्वतः सोबत घेतला होता.
 
मिशेलने डेबोराला मारलं कारण...
ईस्टवुड सांगतात त्याप्रमाणे, "मिशेलने जे इच्छापत्र तयार केलं होतं त्यात डेबोराच्या संपत्तीशी निगडित काही गोष्टी होत्या."
 
मिशेलने 11 जूनला डेबोराच्या मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रं तिच्या घरातून घेतले होते. पोलिसांना याचा सुगावा लागला. या सगळ्या गोष्टी गृहीत धरता मिशेलने डेबोराची संपत्ती लाटण्यासाठी हा खून केल्याचा युक्तिवाद वकील हीर यांनी कोर्टात केला.
 
दुसरीकडे पोलीस निरीक्षक ईस्टवूड यांनीही या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपशीलवार माहिती सादर केली.
 
त्यांनी कोर्टात सांगितलं की, मिशेल डेबोराच्या घरात जाताना एक निळी सुटकेस घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.
 
तिने डेबोराला ठार मारण्याच्या उद्देशानेचं ती सुटकेस आत नेली होती.
 
मिशेल जेव्हा घराबाहेर येते तेव्हा तिची सुटकेस आधीपेक्षा जड वाटत असल्याचं दिसतंय. सुटकेस हलवण्यासाठी मिशेल ती जोरजोराने ओढत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
 
पुढे दोन आठवड्यानंतर मिशेलने एक गाडी भाड्याने घेतली. त्यात निळी सुटकेस ठेऊन ती सॅल्कोम्बेकडे निघाली.
 
सॅल्कोम्बेकडे जाताना तिच्या कारचा टायर फुटला. टायर दुरुस्त करण्यासाठी जो मेकॅनिक बोलावला होता त्याला गाडीतून कसला तरी वास येऊ लागला. मिशेल सुद्धा अस्वस्थ असल्याचं त्याला जाणवलं.
 
कारचं बदललेलं टायर मेकॅनिक जेव्हा मागच्या बाजूला ठेऊ लागला तेव्हा मिशेल घाबरली. तिने त्याला ते टायर मागच्या सीटवर ठेवायला सांगितलं.
 
ईस्टवुड सांगतात, "डेबोराच्या घरी सूटकेस घेऊन जाण्यापासून ते मृत शेजाऱ्याचा फोन वापरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिशेलने ठरल्याप्रमाणे केल्या."
 
6 जुलै 2021 रोजी मिशेलला अटक करण्यात आली. तपास सुरू असताना तिने पोलिसांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही.
 
शेवटी न्यायालयाने डेबोराच्या हत्येप्रकरणी मिशेलला दोषी ठरवत 34 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Published By -Smita Joshi