अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळले, विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील अलास्कामध्ये एक चार्टर विमान कोसळले . या अपघातात विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन लष्कराने सांगितले की, पश्चिम अलास्कामधील एका दुर्गम रडार साइटवर आठ जणांना घेऊन जाणारे एक चार्टर विमान कोसळले, ज्यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
हा अपघात गुरुवारी अलास्कातील अँकरेजपासून पश्चिमेला सुमारे ४५० मैल (७२५ किलोमीटर) अंतरावर असलेल्या केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइट विमानतळावर घडला. अलास्का बचाव समन्वय केंद्राने सांगितले की, केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइटजवळ "विमान अपघाताची" माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.
आमच्या लष्करी परिवारासाठी आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांसाठी हे एक मोठे नुकसान आहे," असे अलास्का कमांड, अलास्का नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड रिजन आणि इलेव्हन्थ एअर फोर्सचे कमांडर, यू.एस. एअर फोर्सचे लेफ्टनंट जनरल रॉबर्ट डेव्हिस म्हणाले. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचे अलास्का रिजन प्रमुख, क्लिंट जॉन्सन यांनी सांगितले की, विमानात दोन वैमानिक आणि सहा प्रवासी होते. त्यांनी सांगितले की, विमानाने अँकरेज येथून उड्डाण केले होते आणि गुरुवारी दुपारी केप न्यूएनहॅमजवळ ते कोसळले असावे असा अंदाज आहे.
अलास्काच्या सिनेटर लिसा मुरकोव्स्की यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, "आज केप न्यूएनहॅम येथे झालेल्या विमान अपघाताची बातमी कळताच मी अलास्काच्या जनतेप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. मी सिक्युरिटी एव्हिएशनसोबत अलास्काभर मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे आणि त्यांच्या अनेक अनुभवी वैमानिकांना भेटले आहे. घटनास्थळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी यू.एस. कोस्ट गार्ड, एनटीएसबी, अलास्का स्टेट ट्रूपर्स आणि रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर यांचे आभार मानते. अलास्का विमानातील प्रवासी, त्यांचे प्रियजन आणि सिक्युरिटी एव्हिएशन टीमसाठी प्रार्थना करत आहे."
Edited By - Priya Dixit

