गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (13:09 IST)

China 'CPC 100th Anniversary': चीनमधल्या घडामोडींना नवं वळण देणाऱ्या 11 घोषणा

चीनमधला कम्युनिस्ट पक्षाने - CCP - चायनीज कम्युनिस्ट पार्टी शंभर वर्ष पूर्ण केली. कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी सोहळा चीनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या शंभर वर्षांच्या काळात चीनमध्ये अनेक गोष्टी बदलल्या. पण काही घोषणा अशा होत्या ज्यांनी चीनमध्ये मोठे बदल घडवले. पाहुयात अकरा अशा घोषणा ज्यांनी चीन बदलवला.
 
1. 100 फुलं फुलू देत - 1956
भाषण देताना चीनमध्ये घोषणांचा वापर सर्रासपणे केला जातो. मोजक्या शब्दांच्या यमक असलेल्या घोषणा आपलं म्हणणं पोचवण्याचं प्रभावी माध्यम असल्याचं मानलं जातं. चायनीज मधल्या चार कॅरेक्टर च्या सहाय्याने मांडता येणाऱ्या या घोषणांचा चीनमधल्या नेत्यांनी गेल्या दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांपासून वापर केलेला आहे.
 
चीनचे माजी नेते माओ झेडोंग हे आपल्या भाषणांमध्ये चपखलपणे अशा घोषणांचा वापर करत. प्रसिद्ध चिनी साहित्यकृतींमधल्या यमक असणाऱ्या ओळींचा वापर माओ त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरत असत.
 
"100 फुलं फुलू देत, शंभर विचारसरणीमध्ये स्पर्धा होऊ दे" (let a hundred flowers bloom, let a hundred schools of thought contend) या माओ यांनी वापरलेल्या ओळी होत्या ख्रिस्तपूर्व 221 या काळातल्या.
 
आपल्या पक्षावर टीका करायला परवानगी असल्याचं या ओळींमधून माओ यांनी सूचित केलं होतं. पण नंतर जेव्हा पक्षावर टीका व्हायला सुरुवात झाली तेव्हा ती अतिशय कडवट होती आणि चहुबाजूंनी होत होती. नेत्यांवर टीका करणारी मोठी पोस्टर झळकू लागली, विद्यार्थी आणि व्याख्यात्यांनी उघडपणे पक्षाच्या धोरणांवर टीका करायला सुरुवात केली. शंभर फुलं आणि 100 विचारसरणी यांची ही घोषणा दिल्याच्या वर्षभराच्या काळात माओनी हे सगळं संपुष्टात आणलं.
 
"मार्क्सवादाच्या विरोधात असणाऱ्या विचारांबद्दल आमचे धोरण काय असायला हवं? क्रांतीच्या विरोधात असणाऱ्यांबद्दल आणि साम्यवादाला धक्का पोहोचवण्याची इच्छा असणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं, तर हा मुद्दा सोपा आहे. आम्ही त्यांच्याकडून त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ," एका भाषणादरम्यान त्यांनी जाहीर केलं.
 
हक्कांची मागणी करणार्‍यांच्या विरोधात मोहीम उघडली गेली आणि विचारवंतांना ताब्यात घेण्यात आलं, तुरुंगात टाकण्यात आलं किंवा मग त्यांना दुर्गम भागांमध्ये काम करण्यास पाठवण्यात आलं.
 
या घोषणेनेबद्दल विचारवंतांच्या मनात अजूनही शंका आहे. हा खरच आटोक्याबाहेर गेलेला गोष्टी खुल्या करण्याचा खरा प्रयत्न होता का की हा इतर विचारसरणीच्या लोकांनी स्वतःहून समोर यावं म्हणून राज्यात आलेला एक सापळा होता?
 
2. विचार करायची हिंमत करा, त्यानुसार पावले उचलण्याची हिंमत दाखवा -1958
ग्रेट लीप फॉरवर्ड (Great Leap Forward) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालावधीतील ही एक महत्त्वाची घोषणा होती. ही दोन वर्षांची मोहीम होती.
 
शेतमजुरांनी एकत्र येत सामूहिक शेती करावी यासाठी माओ यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं होतं. आपल्या नेतृत्वाखाली शेतमजुरांनी एकत्र यावं यासाठी माओ यांनी दिलेली घोषणा होती, "विचार करण्याचं, बोलण्याचं आणि कृती करण्याचं धारिष्ट्य दाखवा."
 
पण या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न कोसळलं. माओ यांची धोरणं आणि त्याच वेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती यामुळे जवळपास तीन कोटी लोकांचा जीव गेला.
 
पण अतिशय भीषण ठरलेल्या या ग्रेट लीप फॉरवर्ड कालावधीशी संबंध असून देखील माओंचे पाठिराखे पुढची अनेक वर्ष ही घोषणा वापरत राहिले.
 
3. जुन्या चार गोष्टी झुगारून टाका - 1966
'जे जे जुनं आहे, ते सगळं झुगारून द्यावं,' असं आवाहन या घोषणेद्वारे तरुणांना करण्यात आलं होतं.
 
जुनाट म्हणून गणल्या गेलेल्या या चार गोष्टींची ढोबळपणे व्याख्या करण्यात आली होती - जुन्या कल्पना, पद्धती, परंपरा आणि सवयी.
 
पाश्चिमात्य विचारसरणी याचा संबंध देऊळ उद्ध्वस्त करणाऱ्या तरुणांच्या फोटोशी लावत असल्याचं लंडनमधल्या किंग्स कॉलेजच्या जेनिफर ऑलतेहँगर सांगतात. पण जसजशी ही मोहीम वाढली, तसा अनेक वृद्धांचा आणि विचारवंतांचा शारीरिक छळ करण्यात आला त्यातल्या अनेकांचा मृत्यू झाला.
 
या सांस्कृतिक क्रांतीदरम्यान अनेक नव्या घोषणांचा उदय झाला. 'बंड करणं रास्त आहे' (To rebel is justified) ही घोषणाही वरचेवर देण्यात येत होती.
 
मोठी क्रांती निर्माण व्हावी म्हणून माओंनी सगळ्या क्षेत्रातल्या मान्यता असलेल्या गोष्टींवर वा अधिकारवाणी असणाऱ्यांवर हल्ले करायला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं. ग्रेट लीप फॉरवर्डमुळे माओंच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता आणि आपलं वर्चस्व पुन्हा एका प्रस्थापित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता.
 
1976मध्ये अधिकृतरीत्या ही मोहीम संपली, पण तोपर्यंत हजारोंचा जीव गेला होता. या सांस्कृतिक क्रांतीमध्ये झालेल्या हिंसाचारात लाखोंचा जीव गेला असल्याची शक्यताही काहीजण वर्तवतात.
 
4. 'चांडाळ चौकडीची हकालपट्टी करा' - 1976
माओंच्या निधनानंतर नेतृत्वातलं सर्वोच्च स्थान पटकावण्यासाठीची चढाओढ सुरू झाली.
 
माओंनंतर हुआ गुओफेंग त्यांचेउत्तराधिकारी असतील, हे ठरलं होतं. त्यांनी नेतृत्वाची सूत्रं अधिकृतपणे हाती घेतलीही. पण माओंच्या पत्नी जिआंग क्विंग आणि त्यांच्या तीन साथीदारांचा विरोध त्यांना सहन करावा लागला.
 
या सगळ्यांचा सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली सुरू असणाऱ्या गोष्टींशी संबंध असल्याचं सांगत त्यांना अटक करण्यात आली आणि मार्गातून बाजूला करण्यात आलं.
 
त्याकाळी प्रचारासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये त्यांना गद्दार म्हटलं गेलं होतं. सगळ्यांत जास्त प्रसिद्धी ज्या पोस्टरला मिळाली, त्यामध्ये त्यांच्या फोटोवर लाल फुल्ली मारण्यात आली होती. आणि लिहिण्यात आलं होतं, "वांग - झांग, जियांग - याओ या पक्षाविरोधातल्या चांडाळ चौकडीची हकालपट्टी करा."
 
खुद्द हुआ यांचं नेतृत्व डेंग श्याओपिंग यांनी उलथवलं. तर अटक करण्यात आलेल्या चौघांवर जाहीर खटला चालवण्यात आला. आधुनिक चीनच्या इतिहासातला हा सर्वांत मोठा सत्तासंघर्ष होता.
 
या चौघांवरच्या सुनावणीचं प्रक्षेपण टीव्हीवरून करण्यात आलं. जियांग क्विंग यांच्या साथीदारांनी त्यांची सोबत सोडली, पण त्या मात्र ठाम राहिल्या. या सगळ्यांना आजीवन कारावास देण्यात आला. 1991मध्ये जियांग क्विंग यांचं निधन झालं. त्यांनी स्वतःचा जीव दिल्याचं सांगण्यात आलं.
 
5. सुधारणा आणि खुलं धोरण - 1978
डेंग शाओपिंग यांनी चीनमध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. त्यांनी सगळ्यात आधी हळुच एक गोष्ट केली. ती म्हणजे 'क्लास स्ट्रगल' म्हणजे एखाद्या विशिष्ट वर्गाच्या अडचणींविषयी करण्यात आलेले उल्लेख त्यांनी टाळले.
 
त्याआधीची 12 वर्षं अशा प्रकारच्या घोषणा वर्तमानपत्रं आणि बॅनर्सवर छापल्या जात होत्या.
 
याऐवजी आता वर्तमानपत्रं आणि पोस्टर्सवर 'आधुनिकीकरणाच्या 4 गोष्टी' झळकू लागल्या. खरंतर हा प्रस्ताव 1960पासून होता पण माओंच्या काळात त्याची कधीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
 
शाओपिंग यांनी आणलेली आणखा एक संकल्पना म्हणजे 'चीनी साम्यवाद'. यामुळे चीनमधल्या नेतृत्त्वाला मार्क्सवादी तत्त्वांपासून फारकत घेणं शक्य झालं.
 
डेंग यांच्या या योजनांची घोषणा होती - 'सुधारणा आणि खुलं धोरण'
 
कालांतराने याचा समावेश चीनच्या घटनेच्या प्रस्तावनेत करण्यात आला. "सर्व राष्ट्रीयत्वांचे चीनचे लोक सार्वभौम हुकुमशाहीचं पालन करतील आणि समाजवादाचा मार्ग अवलंबतील, बदल स्वीकारतील आणि बाहेरील जगासाठीचं खुलं धोरण स्वीकारतील."
 
6. वस्तुस्थितीतून सत्य शोधा- 1978
कम्युनिस्ट नेत्यांची ही एक आवडती घोषणा आहे.
 
"खरंतर ही प्राचीन चीनी तत्त्वज्ञानातली एक संकल्पना आहे. पण 1970च्या दशकाच्या उत्तरार्धातल्या सुधारणांच्या काळात ती चर्चेत आली," डॉ. अल्टहेंगर सांगतात.
 
यासारख्या म्हणींचा उल्लेख हा ख्रिस्तपूर्व काळातील दुसऱ्या शतकातही आढळतो.
 
चीनमधल्या या घोषणा 'चेंग्यू' (Chengyu) या वाक्य प्रकाराच्या जवळपास जाणाऱ्या आहेत. यामध्ये चार अक्षरांच्या या वचनांना मोठा सामाजिक अर्थ असतो. थोडक्यात सांगायचं, तर आपलं म्हणणं समोरच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
 
Seek truth from facts हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. 1930च्या दशकामध्ये माओ यांनी ही घोषणा वापरली होती. त्यांच्या नंतरच्या नेत्यांनी ही घोषणा पुन्हा वापरत मान्यता मिळवली.
 
1978मधल्या एका भाषणात डेंग म्हणाले होते, "जर आपण आपली मनं खुली केली, वस्तुस्थितीतून सत्याचा शोध घेतला, प्रत्येक गोष्टी सत्यता बाळगली आणि सिद्धांत जर प्रत्यक्षात आचरणात आणले तर आपल्याला आपली ही समाजवादी आधुनिकीकरणाची योजना चांगली राबवता येईल."
 
7. कमी मुलं जन्माला घाला, जास्त डुकरं पाळा - 1979
चीनच्या एक अपत्य धोरणाशी संबंधित काही विचित्र घोषणांपैकी ही एक.
 
अशा प्रकारच्या घोषणांना मध्यवर्ती नेतृत्त्वाकडून जरी प्रत्यक्षात मान्यता मिळाली नसली, तरी दशकानुदशकं या आणि अशा घोषणा स्थानिक कार्यालयांच्या भिंतीवर लिहिलेल्या पाहायला मिळत.
 
यातल्या काही घोषणांचा तर अर्थ होता, "वेळेपूर्वी कळा सुरू करा... गर्भपात...काहीही करा पण जास्तीचं मूल जन्माला घालू नका," "जर एका कुटुंबाला जास्तीचं मूल झालं, तर सगळ्या गावाची नसबंदी करण्यात येईल," आणि "आणखी एक मूल म्हणजे आणखी एक थडगं."
 
चीनमधला जन्मदर हा सातत्याने कमी होतोय आणि त्यामुळेच त्यांनी नुकतीच ही 'वन चाईल्ड पॉलिसी' रद्द केली आहे.
 
8. तीन घटकांची शिकवण- 2000
चीनच्या राजकारणाची सूत्रं जियांग झेमिन यांच्या हातात असतानाच्या 10 वर्षांच्या काळामध्ये त्यांचा भर होता, "तीन घटकांची शिकवण" यावर.
 
2000 साली बोलताना जियांग यांनी ही संकल्पना मांडली होती. आणि त्यानंतर 2002 साली पक्षाच्या 80व्या वर्धापन दिनी त्यांनी ही संकल्पना विस्ताराने मांडली.
 
"पक्षाने कायमच तीन घटकांच्या गरजेचं प्रतिनिधित्व करायला हवं. चीनमधल्या आधुनिक उत्पादन यंत्रणाचा विकास, चीनच्या आधुनिक संस्कृतीच्या प्रगतीची दिशा आणि चीनमधल्या बहुसंख्य लोकांच्या मूलभूत गरजा," त्यांनी सांगितलं.
 
जियांग यांना इंजिनियरिंगची पार्श्वभूमी होती. आणि या शिकवणीतून त्याची झलक दिसते.
 
9. एकोप्याने राहणारा समाज- 2005
या घोषणेचा समावेश चीनच्या घटनेत करण्यात असा प्रस्ताव करण्यावरूनच या ब्रीदवाक्याचं यश दिसून येतं. हु जिंताओ यांची ही घोषणा होती आणि तिचा समावेश घटनेत करण्यात यावा असा प्रस्ताव चीनच्या संसदेत मांडण्यात आला होता.
 
या हार्मोनियस सोसायटी म्हणजेच एकोप्याने राहणाऱ्या समाजाच्या धोरणाखाली अनेक धोरणं, नियम आणि बदल करण्यात आले होते.
 
उदा. या धोरणाखाली चीनच्या पश्चिमेतल्या क्विनगाय आणि उरुमकी शहरांमध्ये मोठे प्रकल्प विकसित करण्यात आले. पण यासोबतच खुल्या अभिव्यक्तीवर कारवाई, तिबेट आणि शिनजियांगमधलं दबावधोरण याचाही समावेश याच धोरणातल्या संकल्पनांमध्ये करण्यात आलाय.
 
1980 आणि 1990च्या दशकातल्या आर्थिक बदलांदरम्यान समाजातली तफावत वाढली होती आणि त्यावरचा उपाय म्हणून हु जिंताओ यांनी हे धोरण आणलं होतं. 2005मधल्या एका भाषणात ते म्हणाले, "एकोप्याने राहणाऱ्या समाजात सार्वभौमत्वं, कायद्याचं राज्य, समानता, न्याय, खरेपणा, स्नेह आणि जिवंतपणा असतो."
 
पण चीनमधले वेब युजर्स वेगळ्याच अर्थाने अनेकदा या शब्दाचा वापर करतात. चीनी भाषेतल्या खेकडा या शब्दाचा उच्चार इंग्रजी - हार्मनी शब्दाच्या जवळपास जाणारा आहे. नियमांच्या कचाट्यात न सापडता सरकारवर टीका करण्यासाठी हा खेकडा अर्थाचा शब्द वापरला जातो.
 
10. तीन सर्वोच्च ध्येय- 2007
बदलांकडे कल असलेल्या न्यायव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठीची ही हु जिंताओ यांची योजना होती.
 
"पक्षाचं ध्येय, लोकांचा विचार आणि कायदे - घटना यांचा विचार करून ज्येष्ठ न्यायाधीश आणि वकील काम करतील," त्यांनी सांगितलं होतं.
 
कोणत्याही प्रकारे कायद्याची पार्श्वभूमी नसणाऱ्या वांग शेंगजुन यांना सुप्रीम कोर्टाचे अध्यक्ष म्हणून नेमत हु जिंताओ यांनी कायद्यातल्या सुधारणांविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
 
हु यांची तीन सर्वोच्च ध्येयांची विचारसरणी पाळली जाईल याची वांग शेंगजुन यांनी पुरेपूर काळजी घेतली. तेव्हापासून पक्षाचा विचार हा इतर दोन गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे.
 
11. चीनचं स्वप्न- 2013
चायनीज ड्रीम वा चीनचं स्वप्न हा शी जिनपिंग यांचा आवडता वाक्प्रचार आहे. 2013च्या सुरुवातीला त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आणि आजही ते या पदावर आहेत.
 
वॉशिंग्टनमधल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे चीनविषयक बाबींचे तज्ज्ञ टॉम केलॉग सांगतात, "चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाची ही एक खोड आहे. जनसामान्यांवर किंवा त्या ज्यांच्यासाठी दिल्या जातायत त्या राजकीय वर्गावर या अशा घोषणांचा आता तितका परिणाम होत नाही."
 
"चायनीज ड्रीमच्या घोषणेद्वारे शी जिनपिंग यांनी ते बदलण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यातही काही अडचणी आहेत. कारण इतर काही लोकांनी याच्याशी वेगळे संदर्भ जोडले आहेत. म्हणजे घटनात्मकतेचं चीनचं स्वप्न किंवा सामाजिक सौख्याचं चीनचं स्वप्न असे वेगळे संदर्भ जोडण्यात आलेत."