गोसिआम थामारा सिथोले या दक्षिण आफ्रिकेतल्या महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची बातमी खोटी असल्याचं समोर आलंय. गाऊटेंग प्रांतातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अशी 10 मुलं जन्माला आल्याचं रेकॉर्ड नाहीये, असं स्थानिक प्रशासनाने म्हटलंय. वैद्यकीय चाचण्यांमध्ये दिसून आलंय की सिथोले गेल्या काही महिन्यात गरोदरही नव्हत्या.
या 37-वर्षीय महिलेला आता मानसिक आरोग्य कायद्याखाली ताब्यात घेतलंय आणि निरिक्षणाखाली ठेवलंय. त्यांना मदत केली जाईल, असं म्हटलंय. स्थानिक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही महिला खोटं का बोलली हे स्पष्ट केलेलं नाही.
ही बातमी आधी प्रिटोरिया न्यूजने सगळ्यांत आधी दिली दिली. ही संस्था इंडिपेंडन्ट ऑनलाईन या माध्यमसमूहाच्या मालकीची आहे. या माध्यमसमूहाने म्हटलंय की ते त्यांच्या बातमीवर ठाम आहेत. उलट या संस्थेने असा आरोप केलाय की सिथोले यांनी 7 जूनला बाळांना स्टीव्ह बिको अॅकॅडमिक हॉस्पिटलमध्ये जन्म दिला, पण तिथे काहीच सोईसुविधा नव्हत्या.
आता हॉस्पिटल आणि प्रांत प्रशासन हॉस्पिटलमध्ये झालेल्या निष्काळजीपणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही इंडिपेंडन्ट ऑनलाईनने म्हटलंय. "हे आरोप खोटे आहेत आणि याला कोणताही पुरावा नाही. स्टीव्ह बिको अॅकॅडमिक हॉस्पिटल आणि गाऊटेंग प्रदेशाच्या प्रशासनाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे," असं त्यांच्या ताज्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. प्रिटोरिया न्यूजचे संपादक पिएट रांपेडी आणि इंडिपेंडन्ट ऑनलाईनविरोधात कायदेशीर कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुळात ही बातमी आली कुठून?
सिथोले यांना आधीच 6 वर्षांची जुळी मुलं आहेत. त्या आणि त्यांचे पार्टनर तेबोहो त्सोटेत्सी थेंबिसा टाऊनशिप या भागात इतर मध्यमवर्गीय लोकांसोबत राहातात. दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्ग जवळचा हा भाग आहे.
इंडिपेंडन्ट ऑनलाईननुसार प्रिटोरिया न्यूजचे संपादक रांपेडी आणि हे जोडपं एकाच चर्चमध्ये प्रार्थना करायला जायचे. तिथेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली. मे महिन्यात त्यांनी या जोडप्याची मुलाखत घेतली असंही सांगितलं जातंय.
त्यावेळेस सिथोले आणि त्यांचे पार्टनर यांनी आपल्याला आठ मुलं होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी झालेल्या फोटोशूटमध्ये सिथोले गरोदर दिसताहेत आणि त्यांचं पोटं फारच मोठं दिसतंय.
10 मुलांचा एकाचवेळी जन्म झाल्याची बातमी प्रिटोरिया न्यूजने 8 तारखेला दिली. यात त्यांनी सिथोलेंचे पार्टनर त्सोटेत्सी यांनी आपल्याला ही माहिती दिली असल्याचं म्हटलं.
प्रिटोरिया न्यूजने लिहिलं की त्सोटेत्सींना सिथोले यांनी मेसेज करून आपल्याला 10 मुलं झाल्याची माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे आपण भेटायला जाऊ शकलो नाही, असंही ते म्हणाले.
रांपेडी यांनीही याच मेसेजच्या आधारावर बातमी लिहिली आणि त्यांनी या बातमीची तिसऱ्या, स्वतंत्र सूत्रांमार्फत खातरजमा करून घेतली नाही.
स्थानिक महापौरांनीसुद्धा 10 बाळांचा जन्म झाल्याची बातमी खरी असल्याचं म्हटलं त्या नंतर बीबीसीसह इतर माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली.
पण सरकारी प्रवक्त्यांनी नंतर सांगितलं की महापौरांनी त्या कुटुंबाने सांगितलेली माहिती खरी मानली, पण त्यांनी तोवर बाळांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं.
या 10 बाळांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी देणग्या जमा व्हायला लागल्या. यात 70 हजार डॉलर्सची देगणी तर इंडिपेंडन्ट ऑनलाईनचे अध्यक्ष इक्बाल सुर्वे यांनी यांनीच दिली.
पण प्रिटोरिया न्यूजने या बाळांचा जन्म कुठे झाला ते सांगितलं नाही. म्हणून या घटनेभोवती संशयाचे ढग दाटले. त्यानंतर गाऊटेंग प्रांतातल्या हॉस्पिटल्सनी एकापाठोपाठ एक सांगितलं की अशा बाळांचा जन्म आमच्या हॉस्पिटलमध्ये झालेला नाही.
या बाळाच्या कथित जन्मानंतर 10 दिवसांनी इंडिपेंडन्ट ऑनलाईनने स्टीव्ह बिको अॅकॅडमिक हॉस्पिटलवर आरोप केले.
दुसरीकडे या जोडप्यामध्येही दुरावा आला. या घटनेनंतर सिथोले गायब झाल्या. त्यांचे पार्टनर त्सोटेत्सी यांनी त्या हरवल्याची तक्रार दिली आणि लोकांनी देगण्या पाठवणं बंद करावं असं म्हटलं.
प्रिटोरिया न्यूजनुसार सिथोले यांनी त्यांच्या पार्टनरवर मुलांच्या नावावर लोकांकडून पैसे उकळण्याचा आरोप केला.
दरम्यान, काही सामजिक कार्यकर्त्यांनी सिथोले यांना शोधून काढलं आणि त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी दवाखान्यात दाखल केलं अशी माहिती गाऊटेंगमधल्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
News24 ने लिक केलेल्या एका मेमोनुसार रांपेडी यांनी कथितरित्या इंडिपेंडन्ट ऑनलाईनच्या 'प्रतिष्ठेला धक्का लावल्याबद्दल' माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलंय या घटनेकडे एक 'हृदयाला हात घालणारी' बातमी म्हणून न पाहता 'शोधपत्रकारितेच्या नजरेतून' पाहायला हवं होतं.