पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेची माघार
जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेची ही भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी काम करणा-या अनेक संघटनांसाठी एक धक्का आहे.
अमेरिकन जनतेच्या हिताचे रक्षण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. पॅरिस क्लायमेट करारातून माघार घेत असलो तरी, नव्या तरतुदींसह पुन्हा करारामध्ये सहभागी होऊ किंवा नव्याने करार करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओबामा यांच्या राजवटीत झालेला पॅरिस क्लायमेट करार अमेरिकेवर अन्यायकारक होता. नवीन करार अमेरिकेन जनता, कामगार आणि उद्योग यांच्या हिताचा असला पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. नवीन करार झाला तर चांगलेच आहे पण झाला नाही तरी फार काही बिघडत नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.