शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: खाटमांडू , शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (09:23 IST)

एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजणार नेपाळ

नेपाळ सरकार जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टची उंची तपासणार आहे. जगातील या सर्वात उंच पर्वतशिखराची उंची यापूर्वी 1954 साली मोजण्यात आली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी, 2015 मध्ये झालेल्या 7.8 रिश्‍तरच्या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली आहे असे काही तज्ञांचे मत आहे. हा विवाद कायमचा संपवण्यासाठी नेपाळ सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्ट आणि अन्य 14 सर्वात उंच पर्वत शिखरांपैकी निम्मी पर्वत शिखरे नेपाळमध्ये आहेत. मात्र नेपाळने स्वत: त्यांची उंची कधीही मोजली नाही. सर्वे ऑफ इंडियाने 1954 साली मोजल्यानुसार एव्हरेस्टची उंची 8848 मीटर्स म्हणजे 29028 फूट असल्याचे मानले गेलेले आहे. पाश्‍च्यात्य पर्वतारोही त्याची उंची 8850 मीटर्स म्हणजे 29035 फूट मानतात. 1999 साली एनजीएस (नॅशनल जॉग्रफिक सोसायटी) आणि बीएमएस (बोस्टन्स म्युझीयम ऑफ सायन्स) यांनी उपग्रह आधारित तंत्रज्ञानाने ही उंची मोजली होती. 2005 साली चिनी गिर्यारोहक आणि संशोधकांनी ही उंची 8844. 83 मीटर्स म्हणजे 29,035 फूट असल्याचे जाहीर केले आहे.
 
हा विवाद मिटवण्यासार्ठीॅ एव्हरेस्टची उंची मोजण्याचे नेपाळ सरकारने ठरवले आहे. यासाठी लागणारी साधन सामग्री नेपाळ सरकारकडे नाही. परंतु ती भाड्याने मिळू शकते असे म्हटले आहे. या कामासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. हवामान अनुकूल असल्यास पुढील वर्षी गिर्यारोहण मोसमात कामाला सुरुवात करण्यात येईल असे नेपाळ सर्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.