1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (17:32 IST)

हरदीपसिंग निज्जर : भारताचा मोस्ट वाँटेड ज्याला परदेशात गोळ्या घातल्या

Hardeep Singh Nijjar,
अंशुल सिंह

 
जूनमध्ये कॅनडामध्ये 45 वर्षीय खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली.
 
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली.
 
पोलिसांनी हत्येला दुजोरा देत सांगितले की, निज्जरची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
 
निज्जर हा सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वारा साहिबचे अध्यक्ष होता आणि भारत सरकारच्या 'वॉन्टेड' यादीत त्याचा समावेश होता.
 
शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते विरसा सिंग वल्टोहा यांनी या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "निज्जर हे एका समुदायाचे धार्मिक सदस्य आणि गुरुद्वाराचे अध्यक्ष होते. ही घटना कशी आणि का घडली हे शोधण्यासाठी आम्ही पुरावे गोळा करत आहोत.
 
हरदीप सिंह निज्जर हा पंजाबमधील जालंधरमधील भरसिंग पुरा या गावचा होता.
 
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचे सदस्य होता.
 
खलिस्तान टायगर फोर्सला कारवाया, नेटवर्किंग, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता.
 
पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार, "निज्जर यांच्या मूळ गावी भरसिंग पुरा येथील जमिनी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जप्त केल्या होत्या. 2020 मध्ये वेगळ्या खलिस्तान राष्ट्रासाठी 'शीख जनमत 2020' या ऑनलाईन मोहिमेत निज्जरचा यांचा सहभाग होता. ही मोहीम 'सिख फॉर जस्टिस' या भारतात बंदी घातलेल्या संस्थेने चालवली होती.
 
निज्जर 1997 मध्ये कॅनडाला पोहोचले. सुरुवातीच्या काळात निज्जर कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम करत होते.
 
कोरोना लॉकडाऊनपूर्वी त्याचे पालक मूळ गावी परतले होते.
 
भारतीय तपास संस्था एनआयएच्या म्हणण्यानुसार, निज्जर कथितरित्या 2013-14 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि इथे त्याची भेट खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख जगत सिंग तारा याच्यासोबत झाली होती.
 
दरम्यान, तो सतत भारत सरकारच्या रडारवर होता.
 
भारताच्या वॉन्टेड यादीत असणारी आणि परदेशात हत्या झालेली हरदीप सिंग निज्जर ही पहिली व्यक्ती नाही. निज्जरपासून जहूर मिस्त्रीपर्यंत अशा लोकांची एक मोठी यादी आहे.
 
परमजीत सिंह पंजवड
जुलै 2020 मध्ये, भारत सरकारने एक अधिसूचना काढली.
 
या अधिसूचनेत 'बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा' (UAPA) अंतर्गत नऊ 'दहशतवाद्यां'ची माहिती देण्यात आली होती.
 
अधिसूचनेत एक नाव होते परमजीत सिंग उर्फ पंजवाड.
 
पंजाबमधील तरन तारन येथे जन्मलेला परमजीत सिंग हा भारत सरकारने बंदी घातलेल्या 'खलिस्तान कमांडो फोर्स' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता होता.
 
या 'दहशतवादी हल्ल्यां'मध्ये परमजीत सिंग आणि खलिस्तान कमांडो फोर्सचा हात असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
 
लाहोरमध्ये हत्या
या वर्षी मे महिन्यात परमजीत सिंग पंजवाड यांची पाकिस्तानातील लाहोरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
 
मे महिन्यात एका सकाळी, पंजवाड हे फिरायला गेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
 
पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पंजवर सिंग यांच्या डोक्यात एका बंदूकधाऱ्याने गोळी झाडली होती आणि रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले."
 
या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आणि नंतर त्याचाही मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
 
सय्यद खालिद रझा
अल बद्र मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा प्रमुख आणि भारत प्रशासित काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या सय्यद खालिद रझाची यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हत्या करण्यात आली होती.
 
कराचीतील ज्येष्ठ पत्रकार फैजुल्ला खान यांच्या मते, सय्यद खालिद रझा कराचीतील बिहारी समाजातील होते.
 
फैजुल्ला खान सांगतात, "90 च्या दशकाच्या सुरुवातीस, खालिद रझा अफगाणिस्तानमधील अल बद्र संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षण घेतल्यानंतर भारत प्रशासित काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांविरुद्धच्या लढाईत सहभागी होता, परंतु 1993 मध्ये पाकिस्तानात परतल्यानंतर पेशावरमध्ये त्याला त्या संघटनेचा पदाधिकारी बनवण्यात आले.
 
अल बद्र मुजाहिद्दीन ही जमात-ए-इस्लामीची संलग्न सशस्त्र शाखा होती आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तान आणि नंतर भारत-प्रशासित काश्मीरमध्ये सक्रिय आहे.
 
काही अंतर्गत मतभेदांमुळे अल बद्र मुजाहिद्दीन 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात जमात-ए-इस्लामीपासून वेगळे झाले.
 
फैझुल्ला खान यांच्या मते, 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा सय्यद खालिद रझा यांना कराची विभागासाठी अल बद्रचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा ते संपूर्ण राज्यातील संघटनेचे सर्वात प्रभावी नेते होते.
 
9/11 नंतर पाकिस्तानमध्ये जिहादी संघटनांवर बंदी घालण्यात आली आणि शेकडो लोकांना अटक करण्यात आली.
 
सय्यद खालिद रझा यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर काही वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांनी अतिरेकी कारवायांपासून दूर राहून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.
 
कराचीमध्ये हत्या
तारीख: 26 फेब्रुवारी 2023. ठिकाण: कराची, पाकिस्तान, गुलिस्तान जोहर.
 
माजी काश्मिरी जिहादी कमांडर सय्यद खालिद रझा (55 वर्षे) याला त्याच्या घराच्या दारात प्राणघातक हल्ल्यात ठार करण्यात आले.
 
सय्यद खालिद रझा यांच्या हत्येची जबाबदारी सरकारविरोधी आणि फुटीरतावादी सशस्त्र संघटना सिंधू देश आर्मीने घेतली होती.
 
बशीर अहमद पीर
याच वर्षी 20 फेब्रुवारी रोजी, काश्मिरी कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लागून असलेल्या रावळपिंडी शहरात मगरीब (सूर्यास्त) नमाजानंतर घरी जात होते.
 
यावेळी अज्ञात सशस्त्र मोटारसायकलस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला.
 
बशीर अहमद (60 वर्षे) हे भारत प्रशासित काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील असून 80 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून काश्मिरी जिहादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते.
 
90 च्या दशकाच्या सुरुवातीस, बशीर त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानात आला आणि कालांतराने तो हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रभावशाली कमांडर बनला.
 
भारत सरकारच्या वतीने बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याला 'यूएपीए' कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
 
भारत सरकार तर्फे ऑक्टोबर 2022 मध्ये याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती.
 
रिपुदमन सिंह मलिक
1985 च्या एअर इंडिया बॉम्बस्फोटातील आरोपी रिपुदमन सिंह मलिक याची गेल्या वर्षी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
 
2022 मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे शहरात रिपुदमन सिंग यांना कारमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
 
घटनास्थळी पोलिसांना एक जळालेले वाहनही सापडले.
 
1985 मध्ये कनिष्क विमान स्फोटात मलिकला आरोपी बनवण्यात आले होते.
 
मात्र, रिपुदमन सिंग मलिक यांनी या हल्ल्यात सहभाग असल्याचे नाकारले होते.
 
त्यानंतर 2005 मध्ये मलिकसह आणखी एक आरोपी अजयबसिंह बागरीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
 
23 जून 1985 रोजी खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी मॉन्ट्रियलहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानात एक टाईम बॉम्ब ठेवला होता.
 
आयर्लंडच्या किनार्‍याजवळ विमानाचा स्फोट झाला आणि 329 लोक मृत्यूमुखी पडले होते.
 
रिपुदमन सिंह मलिक याने भारत सोडून 1972 मध्ये कॅनडा गाठले आणि टॅक्सी चालक म्हणून काम करायला सुरुवात केली.
 
यानंतर मलिक एक मोठा उद्योगपती झाला आणि व्हँकुव्हरच्या 'खालसा क्रेडिट युनियन'चा अध्यक्ष म्हणून निवडून आला.
 
रिपुदमन याचे नाव दोन दशकांहून अधिक काळ काळ्या यादीत होते.
 
सप्टेंबर 2019 मध्ये मोदी सरकारने 35 वर्षे जुन्या काळ्या यादीतून परदेशात राहणाऱ्या 312 शिखांची नावे काढून टाकली होती.
 
त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये रिपुदमन सिंह मलिक तब्बल 25 वर्षांनी भारतात आला होता.
 
जहूर मिस्त्री इब्राहिम
जहूर मिस्त्री इब्राहिम 1999 मध्ये नेपाळमधून काबूलला नेण्यात आलेल्या भारतीय विमानाच्या अपहरणात सहभागी होता.
 
अपहरणकर्त्यांनी भारतीय तुरूंगात कैद असलेले जैश-ए-मोहम्मदचे संस्थापक अध्यक्ष मौलाना मसूद यांच्यासह इतर दोन कमांडर मुश्ताक जरगर आणि उमर सईद शेख यांची सुटका करून केली होती.
 
गेल्या वर्षी मार्चमध्ये जैश-ए-मोहम्मद या जिहादी संघटनेचा सदस्य जहूर मिस्त्री याची हत्या करण्यात आली होती.
 
पाकिस्तानातील कराची येथील अख्तर कॉलनीमध्ये दोन सशस्त्र मोटारसायकल स्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
 
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "चार जणांनी फर्निचरच्या दुकानात घुसून व्यावसायिकावर चार-पाच गोळ्या झाडल्या." मृत व्यक्तीची ओळख जाहिद (44) अशी झाली होती.
 
तथापि, भारतातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारले गेलेले व्यापारी इब्राहिम होते, जो अनेक वर्षांपासून जाहिद अखुंद ही खोटी ओळखी घेऊन राहत होता.