सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 सप्टेंबर 2022 (15:28 IST)

किंग चार्ल्स तृतीय राजे म्हणून कसं काम करतील?

ब्रिटिश साम्राज्यात सर्वाधिक काळ राजगादीचे वारसदार म्हणून राहण्याचा विक्रम नावावर असलेले प्रिन्स चार्ल्स आता किंग चार्ल्स म्हणून ओळखले जाणार आहेत.
73 वर्षीय किंग चार्ल्स यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 70 वर्षे युवराज म्हणूनच राज्यकारभार पाहिला. अखेरीस, नवे राजे म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजगादीवर बसणारे सर्वांत वयोवृद्ध राजे म्हणूनही त्यांना ओळखलं जाणार आहे.
 
किंग चार्ल्स यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या छत्राखाली काम करताना जगभरातील नेत्यांच्या पीढ्या बदलताना पाहिल्या. त्यांच्या कार्यकाळात खुद्द युकेमध्ये 15 पंतप्रधान तर अमेरिकेत 14 पंतप्रधान झाले.
 
आता महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटिश साम्राज्यातील एक मोठं युग संपलं आहे. आता ब्रिटनच्या राजगादीची जबाबदारी मिळालेले किंग चार्ल्स यांच्याकडून आपण नेमकी कोणती अपेक्षा करू शकतो?
 
आतापर्यंत विविध मुद्द्यांवर बोलणारे युवराज पुढे एक राजा म्हणून कशा पद्धतीने तटस्थ राहतील?
 
राजा म्हणून किंग चार्ल्स यांना पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांची आवश्यकता नसेल. त्याचप्रमाणे त्यांच्यावर सार्वजनिक व्यासपीठावर मत व्यक्त करण्यावरही मर्यादा येतील. एकूणच त्यांच्यातील सम्राट हा त्यांच्यातील व्यक्तीवर काही प्रमाणात वरचढ ठरणार आहे.
 
याविषयी बोलताना घटनातज्ज्ञ प्रा. वर्नन बोगडॅनोर म्हणतात, "आता त्यांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत. तसंच नवे नियमही पाळावे लागणार आहेत."
 
"किंग चार्ल्स यांना पूर्वी त्यांच्या खास शैलीसाठी ओळखलं जात होतं. पण आता तीच शैली त्यांना बदलावी लागेल. जनतेला विशिष्ट बाजूचा प्रचार करणारा सम्राट नको आहे," असंही प्रा. बोगडॅनोर यांना वाटतं.
 
सम्राट म्हणून मितभाषी राहणं किती आवश्यक आहे, हे किंग चार्ल्स यांना चांगलंच ठाऊक आहे.
 
"मी काही मूर्ख नाही. सम्राट असणं काय असतं, हे मला व्यवस्थितरित्या माहीत आहे. त्यामुळे माझा कारभार त्याच प्रकारे करेन, असं कुणाला वाटत असेल तर ती कल्पना पूर्णपणे मूर्खपणाची आहे," असं किंग चार्ल्स यांनी 2018 साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
जेव्हा नवा सम्राट सिंहासनावर बसतो, त्याचा राज्यकारभार हा पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळे सर्वांचं आता किंग चार्ल्स यांच्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
 
किंग चार्ल्स यांना महाराणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा वेगळं, आणखी वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक कारभार करण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रा. बोगडॅनोर यांनी व्यक्त केलं.
 
"अल्पसंख्याक समुदाय, वंचित घटक यांना जोडून घेण्यासाठी किंग चार्ल्स यांनी अधिक प्रयत्न करावेत. त्यासाठी एकात्म शक्ती म्हणून त्यांनी काम करावं," अशी अपेक्षाही प्रा. बोगडॅनोर यांनी व्यक्त केली.
 
याशिवाय, किंग चार्ल्स यांनी कला, संगीत आणि संस्कृती यांना शाही संरक्षण द्यावं. त्यांनी घोडेस्वारीऐवजी सांस्कृतिक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं अशी अपेक्षाही प्रा. बोगडॅनोर यांनी व्यक्त केली.
पण, किंग चार्ल्स यांच्या प्रिन्स ट्रस्ट चॅरिटीसोबत अनेक वर्षे काम केलेले सर लॉईड डॉर्फमन यांच्या मते, किंग चार्ल्स हे हवामान बदल आणि सेंद्रीय शेती क्षेत्रात काम करणं थांबवणार नाहीत.
 
ते म्हणतात, "ते या क्षेत्रात जाणकार आहेत. तसंच प्रभावीही आहेत. त्यामुळे राजेपदावर गेल्यानंतर ते या कामांचा पूर्णपणे त्याग करतील, असं मला वाटत नाही."
 
"राज्यकारभारात किंग चार्ल्स हे राजघराण्यातील कोअर ग्रुप म्हणजेच कॅमिला, प्रिन्स विल्यम आणि कॅथरिन यांना सोबत घेऊन काम करतील," असं म्हटलं जात आहे.
 
याविषयी बोलताना रॉयल कमेंटेटेर व्हिक्टोरिया मर्फी सांगतात, "नवे राजे अतिशय काळजीपूर्वक आणि सातत्याने काम करतील. आपण बराच काळ महाराणी म्हणून एलिझाबेथ यांना पाहिलं आहे. पण त्यांचं सार्वजनिक आयुष्य इतर कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा लांबलचक राहिलं आहे."
इतिहासकार आणि लेखक अँथनी सेल्डन यांच्या मते, किंग चार्ल्स यांनी हवामान बदलासारख्या मुद्यांवर चांगलं काम केलेलं आहे. पण त्यांच्याभोवती राजघराण्याचं वलयही होतं, हे विसरून चालणार नाही.
 
ग्लासगो येथे झालेल्या हवामान बदल परिषदेत किंग चार्ल्स यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गांभीर्याने घेतलं घेतलं होतं. हार्डमन यांच्या मते, आता राजा म्हणून जागतिक व्यासपीठावर त्यांना आणखी चांगलं काम करता येईल.
 
एक राजा म्हणून त्यांची भूमिका कशी असेल?
किंग चार्ल्स यांना जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या मते ते काहीसे लाजाळू आणि मितभाषी व्यक्ती आहेत. सोप्या शब्दांत त्यांचं वर्णन संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून करता येईल.
 
"किंग चार्ल्स हे बोर्डिंग शाळेत शिक्षण घेत असताना इतर मुले त्रास देत असल्याबाबतचं पत्र त्यांनी लिहिलं होतं. कामाबाबत ते काहीसे अधीर आहेत. काम तत्काळ पूर्ण व्हावं, असं त्यांचं म्हणणं असतं," असं चार्ल्स यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत कॅमिला यांनी म्हटलं होतं.
 
त्या सांगतात, "किंग चार्ल्स हे अतिशय गंभीर व्यक्तिमत्व आहेत, असं काहींना वाटतं. पण त्यांची दुसरी बाजूही लोकांनी पाहावी असं मला वाटतं. ते खाली बसून मुलांशी खेळतात, त्यांना हॅरी पॉटरची पुस्तके वाचून दाखवतात. वेगवेगळे आवाज काढूनही दाखवतात."
 
चार्ल्स हे सार्वजनिक ठिकाणी असतात, तेव्हा ते हलक्याफुलक्या विनोदांनी वातावरण मोकळं ठेवतात. पण सम्राट बनल्यानंतर त्यांच्यात काही बदल होऊ शकेल.
 
चार्ल्स यांच्या प्रिन्स चिटिंग इन्स्टिट्यूटमध्ये कामाचा अनुभव असलेले ख्रिस पोप म्हणतात, "नवे राजे हे अतिशय व्यस्त असतील. कामाचा ताण सहन करण्याची ऊर्जा त्यांच्यात खूप आहे."
 
पुढच्या पीढीचा ते सतत विचार करत असतात. त्यांच्या काही कामांमधून त्याची झलक पाहायला मिळते, असं पोप सांगतात.
 
प्रिन्स चॅरिटेबलच्या कामांमधून सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं काम तर होतंच पण त्याशिवाय नाविन्यपूर्ण संशोधनांना चालना देण्याचंही काम केलं जातं.
 
पोप म्हणतात, "परंपरा जपल्या पाहिजेत, याची ते काळजी घेतात. पण केवळ जुन्याच चालीरितींवर चाललं पाहिजे, असं त्यांचं मत नाही."
 
नवे राजे चार्ल्स यांनी अशीच सर्वसमावेशक भूमिका घेऊन काम करणं अपेक्षित असल्याचं ते सांगतात.
 
किंग चार्ल्स यांच्यासोबत हितन मेहता यांनी 2007 मध्ये ब्रिटिश एशियन ट्रस्टअंतर्गत काम केलं होतं.
 
ते सांगतात, "ते मनाने मानवतावादी आहेत. लोकांना कदाचित माहीत नसेल, पण ते नेहमी आपण आपल्या नातवंडांसाठी काय मागे ठेवून जाणार आहोत, याविषयी बोलताना दिसतात."
 
"मागच्या शुक्रवारी रात्री नऊ वाजता मला त्यांचा कॉल आला. पाकिस्तानमध्ये पूर आला आहे, आपण त्यासाठी काय करत आहोत, असं त्यांनी मला विचारलं. त्यांनी एखाद्या समस्येबाबत ऐकलं तर त्यातून तोडगा काढण्याचे मार्ग ते शोधत असतात."
 
किंग चार्ल्स फिलीप आर्थर जॉर्ज यांचा जन्म बकिंगहॅम पॅलेस येथे 14 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. त्यावेळी बीबीसीने ही बातमी देताना महाराणींना मुलगा झाला, असं न म्हणता महाराणींनी सुरक्षितपणे युवराजांना जन्म दिला, अशा स्वरूपात ही बातमी दिली होती.
 
चार वर्षांनी त्यावर शिक्कामोर्तब झालं. याविषयी बोलताना चार्ल्स 2005 च्या मुलाखतीत म्हणाले होते, "मी खास कुटुंबात जन्मलो, हे मला माहीत आहे. त्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचा माझा प्रयत्न असतो."
 
किंग चार्ल्स हे आतार्यंत 400 हून अधिक संस्थांचे विश्वस्त अथवा अध्यक्ष राहिले आहेत. 1976 मध्ये त्यांनी आपल्या रॉयल नेव्हीच्या कमाईच्या पैशांतून स्वतःच्या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी वंचित वर्गातील तब्बल 9 लाख तरुणांना मदत केली. पण प्रिन्स ट्रस्टशी संबंधित सगळ्या योजना यशस्वी राहिल्या, असं नाही.
 
2018 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, "तो एक चांगला विचार होता. पण त्याची अंमलबजावमी करणं काहीसं अवघड राहिलं."
 
त्यांच्या कामांवर राजकीय हस्तक्षेपाचाही आरोप लावण्यात आला. विशेषकरून 'ब्लॅक स्पायडर मेमो' प्रकरणात.
 
ब्लॅक स्पाडयर मेमो म्हणजे त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स असलेल्या चार्ल्स यांच्याकडून ब्रिटिश सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेत्यांना लिहिलेली पत्रं.
 
2004 पासून चार्ल यांच्याकडून सरकारी मंत्र्यांना लिहिलेल्या खासगी पत्रांमध्ये शेती, नगररचना, वास्तुकला, शिक्षण तसंच पँटागॉनियन टुथफिश यांचं जतन यांच्यासारख्या मुद्द्यांवरही सरकारी दृष्टिकोनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
 
चार्ल्स यांची बाजू घेताना माजी कॅबिनेट मंत्र्यांनी एकदा म्हटलं होतं की नव्या सम्राटांबाबत बोलायचं तर ते एक असं व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची एक निश्चित अशी भूमिका आहे.
 
ते आपल्या विचारांवर ठाम असतात. विरोधी युक्तिवाद ऐकून घेणं किंवा त्यांची चर्चा करणं, यावर त्यांचा विश्वास नाही.
 
आपल्यावरील हस्तक्षेपाच्या आरोपांना उत्तर देताना चार्ल्स यांनी 2006 च्या मुलाखतीत म्हटलं होतं, "याला जर हस्तक्षेप म्हणाल, तर त्याचा मला गर्व आहे. पण जाणूनबुजून हस्तक्षेप केला, हा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
 
ते म्हणाले, "तुम्ही काहीच करत नसाल तर त्याबाबत तक्रार केली जाते. तुम्ही काही प्रयत्न केला तर तुम्ही अडकता. तुम्ही मदतीसाठीही काही करत असाल तर तक्रार करण्यात येते."
 
सम्राट चार्ल्स यांना लोकांचा पाठिंबा किती मिळेल?
चार्ल्स यांनी म्हटलं आहे, "तुम्ही लोकांचा दृष्टीकोन समजून घेतला नाही, तर राजघराण्यासारखी गोष्ट टिकू शकणार नाही. लोकांना नको असल्यास ते संपून जाईल."
 
डिसेंबर 2021 मध्ये YouGov संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राजघराण्याला अजूनही दोन तृतीयांश लोकांचा पाठिंबा असल्याचं दिसून आलं होतं.
 
पण आई महाराणी एलिझाबेथ किंवा मुलगा प्रिन्स विल्यम यांच्या तुलनेत किंग चार्ल्स हे कमी लोकप्रिय असल्याचं त्यात म्हटलं होतं.
 
विशेषतः तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता असल्याचं सर्वेक्षणात सांगण्यात आलं.
 
व्हिक्टोरिया मर्फी यांच्या मते, टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये प्रिन्स चार्ल्स यांना निर्दयी दर्शवण्यात आलेलं आहे. वेल्सच्या राजकुमारी आणि चार्ल्स यांची पहिली पत्नी डायना यांचा मृत्यू 1997 साली एका कार अपघातात झाला होता.
 
डायना यांच्याशी किंग चार्ल्स यांचे नातेसंबंध ज्याप्रमाणे दर्शवण्यात आले, त्यात किती तथ्य आहे हा प्रश्न आहे. पण याचा त्यांच्या प्रतिमेवर गंभीर परिणाम झाला.
 
मर्फी सांगतात, "रॉयल फॅमिलीत आणि डायना यांच्याबाबत गेल्या काही वर्षांत तयार करण्यात आलेल्या नॅरेटिव्हमुळे त्यांच्या प्रतिमेला खूप नुकसान झालेलं आहे."
 
लंडन विद्यापीठाच्या रॉयल होलोवेमध्ये 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ द मॉडर्न मोनार्की'चे प्राध्यापक पॉलीन मॅक्लेरन म्हणतात,"चार्ल्स हे सिंहासनाजवळ पोहोचले तसे जनतेचा मतप्रवाह बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
प्रा. मॅक्लेरन म्हणतात, "स्पिटिंग इमेजसारख्या विनोदी कार्यक्रमांमध्ये त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जात होतं. पण नंतर नंतर त्यांना पर्यावरणाविषयी गांभीर्याने बोलणाऱ्या अधिक प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रतिमेत बदलण्यात आलं."
 
किंग चार्ल्स आणि प्रिन्स हॅरी, डचेस ऑफ ससेक्स मेगन यांच्याबाबतच्या गोष्टी ऐकण्यासाठी जनता नेहमी तयार असते. त्यामुळे शाही कुटुंबाचे प्रमुख म्हणून चार्ल्स यांना काही प्रमाणात गोष्टी सहनही कराव्या लागतील.
 
सम्राट चार्ल्स यांना काही कौटुंबिक विषयांमध्येही मोठे निर्णय घ्यावे लागतील. उदा. व्हर्जिनिया गिफ्रे यांच्या लैंगिक शोषणाच्या दाव्यानंतर भविष्यात प्रिन्स अँड्र्यू यांची भूमिका काय असेल, हेसुद्धा त्यांना ठरवावं लागेल.
ब्रिटनच्या बाहेर सर्वांत मोठं आव्हान म्हणजे राष्ट्रकुल देशांना आधुनिक परिभाषेत जोडून घ्यावं लागेल.
 
या देशांच्या संघटनेचे प्रमुख म्हणून राष्ट्रकुल देशातील त्यांच्या वसाहतीदरम्यानच्या कटू आठवणी आणि गुलामीच्या मुद्द्यांना कसं तोंड द्यावं, याचा विचारही त्यांना करावं लागेल.
 
किंग चार्ल्स हे आता 14 देशांसोबत ब्रिटनचे राष्ट्राध्यक्षही बनले आहेत. यामध्ये काही देशांची राष्ट्रकुल सदस्य म्हणून राहताना प्रजासत्ताक होण्याचीही इच्छा असेल. या बदलांसंदर्भात चर्चांना आपण नेहमी तयार राहणार आहोत, असं किंग चार्ल्स यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे.
 
असे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून त्यांच्या नव्या शासन काळाचा मार्ग ठरला आहे. शिवाय महाराणी एलिझाबेथ यांनी कॅमिला यांना राजकुमारीऐवजी 'क्वीन ऑफ कन्सॉर्ट' ही उपाधी दिली, तेव्हा त्यांना त्याचा आनंद झाला असेलच.
 
कॅमिला या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या जोडीदार असतील. कारण ज्या वयात लोक साधारणपणे निवृत्त होतात, या वयात ते नवी जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे सध्याचा क्षण किंग चार्ल्स यांच्यासाठी अविस्मरणीय असला तरी आव्हानात्मकही राहणार आहे.