1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (18:16 IST)

महाराणी एलिझाबेथ निधन : युकेच्या राजघराण्यात कोण-कोण आहे? राजाची भूमिका काय असते?

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर युकेची राजगादी राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडे गेली आहे. महाराणी एलिझाबेथ या 1952 साली ब्रिटिश साम्राज्याच्या महाराणी झाल्या. त्यांचा राज्याभिषेक 1953 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी झाला होता. त्यांनी 2022 पर्यंत तब्बल 70 वर्षे राज्य केलं.
 
ब्रिटिश साम्राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम महाराणी एलिझाबेथ यांच्याच नावे आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सत्ता सांभाळल्याचा अमृत महोत्सव साजरा केला होता.
 
पण आता महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे वारसाहक्काने राजगादीची जबाबदारी आली आहे.
 
आता काय होईल?
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांची राजगादी तत्काळ त्यांचे सर्वांत मोठे पुत्र चार्ल्स यांच्याकडे गेली आहे. चार्ल्स हे माजी प्रिन्स ऑफ वेल्स आहेत.
 
राजा म्हणून राज्याभिषेक होण्यासाठी अनेक व्यावहारिक आणि पारंपरिक गोष्टींची पूर्तता करावी लागते.
 
त्यासाठी, नवे राजे किंग चार्ल्स यांनी लंडनच्या सेंट जेम्स पॅलेस येथे अक्सेशन काऊन्सिलमध्ये उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्ण केली.
 
राजे काय करतात?
युकेच्या राजगादीवर असलेली व्यक्ती ही युकेची राष्ट्रप्रमुख असते.
 
पण त्यांच्याकडे असलेले अधिकार हे सध्या नाममात्र किंवा औपचारिक स्वरुपाचे असतात. शिवाय, युकेच्या राजगादीवरची व्यक्ती ही राजकीयदृष्ट्या तटस्थही असते.
 
युकेच्या राजगादीवरील व्यक्तीला युके सरकारमार्फत दररोज काही कागदपत्रे लाल रंगाच्या कातडी बॉक्समधून पाठवले जातात. या कागदपत्रांवर राजेंची औपचारिक सही परवानगी स्वरुपात देण्यात येते.
 
युकेचे पंतप्रधान दर आठवड्यात राजांची भेट त्यांच्या बकिंगहॅम पॅलेस येथे घेतात. सरकार करत असलेल्या कामाविषयी माहिती त्यांना यावेळी दिली जाते.
 
या बैठका पूर्णपणे खासगी स्वरुपाच्या असतात. याठिकाणी कोणती चर्चा होते त्याची कोणतीही अधिकृत नोंद ठेवली जात नाही.
 
याव्यतिरिक्त संसदीय कामकाजातही राजांना काही विशिष्ट गोष्टींची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
 
सरकारची नियुक्ती - सार्वत्रिक निवडणुकीत विजय प्राप्त करणाऱ्या पक्षाच्या नेत्याला बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलावण्यात येतं. याठिकाणी त्यांना सत्तास्थापनेसाठी औपचारिक निमंत्रण दिलं जातं. याशिवाय, राजे सरकारची मुदत संपल्यानंतर त्याचं औपचारिक विसर्जन करण्याचं कामही करतात.
 
सरकार स्थापना आणि राजेंचं अभिभाषण - ब्रिटिश संसदेची सुरुवात राजेंच्या अभिभाषणापासून करण्याचा प्रघात आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या सिंहासनावरून करण्यात येणाऱ्या या भाषणात सरकारचं धोरण काय असेल, याची माहिती देण्यात येते.
 
रॉयल असेंट (अध्यादेशास मंजुरी) - जेव्हा युके संसदेत एखादा अध्यादेश पारित केला जातो. त्यावेळी त्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी त्याच्यावर राजेंकडून औपचारिक शिक्कामोर्तब होणं आवश्यक असतं. ही मंजुरी देण्याचं काम राजे करतात. ब्रिटिश साम्राज्यात 1708 साली रॉयल असेंट शेवटचा नाकारण्यात आला होता.
 
याशिवाय, विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांच्या युके दौऱ्यात त्यांची भेट घेण्याचं काम राजे करतात. त्याशिवाय देशात नियुक्त राजदूत किंवा उच्चायुक्त यांचीही भेट ते घेतात.
 
लंडनमधील सेनोटाफ येथे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक स्मृती कार्यक्रमाचं नेतृत्वही राजांकडेच असतं.
 
युकेचे राजे हे कॉमनवेल्थ देशांच्या संघटनेचेही प्रमुख असतात. कधी काळी ब्रिटिश वसाहतीच्या अधिपत्याखाली राहिलेल्या 56 स्वतंत्र देशांची ही संघटना आहे. यापैकी 14 देशांचं प्रमुखपद हे औपचारिकदृष्ट्या राजांकडेच देण्यात आलेलं आहे. या देशांमध्ये सुमारे 2.4 अब्ज नागरिक वास्तव्याला आहेत.
 
2021 साली बार्बाडोस हा देश प्रजासत्ताक बनल्यानंतर त्यांनीही प्रमुखपद युकेच्या राजेंना द्यावं, असं त्याच्या शेजारी देशांनी सुचवलं आहे.
 
आता इंग्लंडमधील चलनी नोटा आणि टपाल तिकिटांवरील फोटोही बदलण्यात येईल. तसंच ब्रिटिश पासपोर्टवरील नोंदीमध्ये हर मॅजेस्टीऐवजी आता हिज मॅजेस्टी असा उल्लेख करण्यात येईल.
 
याशिवाय इंग्लंडचं राष्ट्रगीत आता "गॉड सेव्ह द क्वीन'ऐवजी 'गॉड सेव्ह द किंग" असं गायलं जाईल.
 
वारसाहक्क
रॉयल फॅमिलीतील वारसा हक्कसंदर्भातील नियमांनुसार राजगादीवरील व्यक्तीचं निधन झालं किंवा त्याने त्या पदाचा त्याग केल्यास त्याच्या ज्येष्ठ अपत्याला ते पद मिळतं.
 
त्यामुळे महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ही जबाबदारी आता ज्येष्ठ सुपुत्र या नात्याने किंग चार्ल्स यांच्याकडे आली आहे. तर त्यांची पत्नी कॅमिला या आता क्वीन कन्सर्ट म्हणून ओळखल्या जातील.
 
रॉयल वारसाहक्कांच्या नियमांमध्ये 2013 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार अपत्यांमध्ये सर्वात मोठी बहीण असल्यास तिला डावलून कनिष्ठ भाऊ राजगादीवर बसू शकणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.
 
किंग चार्ल्स यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स विलियम यांच्याकडे त्याचा वारसा जाईल. त्यांच्याकडे सध्या ड्यूक ऑफ कॉर्नवॉल हे पद आहे. पण प्रिन्स ऑफ वेल्स हे पद मिळण्यासाठी त्यांची नियुक्ती त्यांच्या वडिलांनी करणं गरजेचं आहे.
 
प्रिन्स विलियम यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स जॉर्ज हे वारसा हक्काच्या नियमांनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर प्रिन्सेस कार्लेट या तिसऱ्या क्रमांकावर असतील.
 
राज्याभिषेक कसा होतो?
ब्रिटिश साम्राज्यात गादीवर बसलेल्या राजाला राज्याभिषेक करून औपचारिकरित्या मुकूट घातला जातो. मागील राजाच्या निधनानंतर पाळला जाणारा दुखवटा संपताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
 
वडील किंग जॉर्ज सहावे यांचं निधन झाल्यानंतर 6 फेब्रुवारी 1952 रोजी एलिझाबेथ द्वितीय या महाराणी बनल्या होत्या. पण त्यांचा राज्याभिषेक 2 जून 1953 रोजी झाला.
 
महाराणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक दूरचित्रवाणीवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. त्यावेळी सुमारे दोन कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला होता.
 
गेल्या 900 वर्षांपासून ब्रिटिश राजांचा राज्याभिषेक कार्यक्रम वेस्टमिन्स्टर अॅबे येथे आयोजित करण्यात येतो.
 
याठिकाणी विलियम द कॉन्करर यांचा राज्याभिषेक पहिल्यांदा झाला. आता किंग चार्ल्स हे 40वे राजे असतील.
 
इंग्रज संस्कृतीतील हा एक धार्मिक विधी असतो. सेंटरबरीचे आर्चबिशप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतो.
 
यादरम्यान, राजेंना पवित्र तेलाने अभिषेक केला जातो. त्यानंतर त्यांना राजेशाहीचं प्रतीक असलेली ऑर्ब आणि राजदंड या गोष्टी देण्यात येतात.
 
अखेरीस, आर्चबिशप राजेंच्या डोक्यावर मुकूट घालतात. हा मुकूट पूर्णपणे सोन्याचा असून 1661 वर्षापासून तो वापरला जातो.
 
ब्रिटिश साम्राज्यात या मुकूटाचा अमूल्य असं स्थान आहे. राज्याभिषेक कार्यक्रमात हाच मुकूट केंद्रस्थानी असतो.
 
केवळ राजेंनीच राज्याभिषेकाच्या दिवशी परिधान करायचा असतो.
 
रॉयल विवाहसमारंभाप्रमाणेच राज्याभिषेक कार्यक्रमसुद्धा देशाचा प्रमुख सार्वजनिक कार्यक्रम असतो.
 
त्यामुळे सरकारच त्यासाठीचा सर्व खर्च करतं. शिवाय, कार्यक्रमास येणाऱ्या पाहुण्यांची यादी बनवण्याचं कामही सरकारमार्फतच केलं जातं.
 
रॉयल फॅमिलीत आणखी कोण-कोण?
ड्यूक ऑफ कॉर्नवॉल अँड कँब्रिज -किंग चार्ल्स आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स विल्यम यांना या नावाने ओळखतात. प्रिन्स विल्यम यांच्या पत्नीचं नाव आहे डचेस ऑफ कॉर्नवॉल अँड कँब्रिज कॅथरीन.
 
विल्यम आणि कॅथरीन दांपत्याला तीन अपत्य आहेत. प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस कार्लेट आणि प्रिन्स लुईस.
 
द प्रिन्सेस रॉयल - प्रिन्सेस अन यांना या नावाने संबोधलं जातं. या महाराणी एलिझाबेथ यांचं दुसरं अपत्य. त्यांचा विवाह व्हाईस अॅडमिरल टिमोथी लॉरेन्स यांच्याशी झाला आहे. त्यांना त्यांचे पहिले पती कॅप्टन मार्क फिलीप्स यांच्यामार्फत दोन अपत्य आहेत. पीटर फिलीप्स आणि झाला टिन्डाल.
 
द अर्ल ऑफ वेसेक्स - प्रिन्स एडवर्ड हे महाराणी एलिझाबेथ यांचं सर्वात कनिष्ठ अपत्य. त्यांना द अर्ल ऑफ वेसेक्स नावाने ओळखलं जातं. त्यांचा विवाह कोर्टेस ऑफ वेसेक्स सोफी ऱ्हाईस-जोन्स यांच्याशी झाला. त्यांना लुईस आणि जेम्स माऊंटबॅटन-विंडसर ही दोन अपत्ये आहेत.
 
द ड्यूक ऑफ यॉर्क - प्रिन्स अँड्र्यू यांना या नावाने ओळखलं जातं. ते महाराणी एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र आहेत. त्यांना त्यांची माजी पत्नी डचेस ऑफ यॉर्क सारा फर्ग्युसन यांच्यामार्फत प्रिन्सेस बिअट्रिस आणि प्रिन्सेस युजिन ही दोन अपत्ये आहेत.
 
प्रिन्स अँड्र्यू यांनी 2019 साली राजघराण्यातील सर्व पदांचा त्याग केला आहे. व्हर्जिनिया गुईफर यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका मुलाखतीत झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदांचा त्याग केला होता. या प्रकरणी अमेरिकेत गुन्हा दाखल झाला होता. पुढे हे प्रकरण मिटवण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये गुईफर यांना काही रक्कमही दिली.
 
द ड्यूक ऑफ ससेक्स - प्रिन्स हॅरी यांच्याकडे हे पद आहे. ते प्रिन्स विलियमचे धाकटे बंधू आहेत. त्यांचा विवाह डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केल यांच्याशी झाला. त्यांना आर्ची आणि लिलिबेट ही दोन अपत्ये आहेत. 2020 मध्ये त्यांनीही आपल्या पदांचा त्याग करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
रॉयल फॅमिलीतील सदस्य कुठे राहतात?
किंग चार्ल्स आणि द क्वीन कन्सर्ट या आता बकिंगहॅम पॅलेसमध्ये राहण्यास येण्याची शक्यता आहे.
 
ते यापूर्वी लंडनमध्ये क्लिअरन्स हाऊसमध्ये तर ग्लाऊसेस्टरशायरमध्ये हायग्रोव्ह येथे ते वास्तव्यास होते.
 
प्रिन्स विलियम आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल अँड कँम्ब्रिज कॅथरिन हे नुकतेच केन्सिंगटन पॅलेस येथून अडलेड कॉटेज येथे राहण्यासाठी गेले आहेत. क्वीन्स येथील विंडस्टर इस्टेट परिसरात हे ठिकाण आहे.
 
प्रिन्स जॉर्ज, प्रिन्स कार्लेट आणि प्रिन्स लुईस हे लँम्ब्रूक स्कूलमध्ये शिक्षणासाठी जातात. बर्कशायरच्या अस्कटजवळ ही शाळा आहे.
 
तर प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल हे कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्याला आहेत.
 
राजघराणं किती लोकप्रिय आहे?
महाराणी एलिझाबेथ यांच्या प्लॅटिनम ज्युबिली कार्यक्रमावेळी YouGov ने केलेल्या सर्वेक्षणात 62 टक्के लोकांनी राजघराणं कायम ठेवावं, असं मत व्यक्त केलं होतं. तर 22 टक्के लोकांना देशाचा प्रमुख लोकनियुक्त असावा, असं वाटत होतं.
 
2021 च्या दोन इप्सॉस मोरी सर्वेक्षणातही अशाच प्रकारचे कल पाहायला मिळाले. तर पाचपैकी एका सर्वेक्षणात राजघराणे संपुष्टात आणणं युकेसाठी चांगलं राहील, असा कल समोर आला होता.
 
गेल्या दशकभरात ब्रिटिश राजघराण्याच्या लोकप्रियतेत घट झाल्याचंही YouGov च्या सर्वेक्षणात समोर आलं होतं. 2012 मध्ये 75 टक्क्यांवर असलेलं हे प्रमाण 2022 मध्ये 62 टक्क्यांवर आलं आहे.
 
ज्येष्ठ नागरिकांचा ब्रिटिश राजघराण्याच्या बाजूने कल असला तरी तरुणांमध्ये हे प्रमाण कमी आहे. 2011 मध्ये 18 ते 24 वयोगटातील 59 टक्के तरुणांना राजघराणं असावं, असं वाटत होतं. पण 2022 मध्ये फक्त 33 टक्के तरुणांचं मत राजघराणं असावं, या बाजूने आहे.