गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (14:02 IST)

गोळीबारानंतर पहिल्याच भाषणात ट्रंप कडाडले, 'आता मी हा देश एकत्र आणणार आहे'

Donald Trump
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील वेळेनुसार ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी घडली.
 
या गोळीबारानंतर त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर भाषण केलं. मिलवॉकी येथे झालेल्या नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनमध्ये बोलताना ते म्हणाले की, "आता मी संपूर्ण देशाला एकत्र आणणार आहे."
 
तत्पूर्वी मिलवॉकीयेथील या कार्यक्रमाला जात असताना न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रम्प म्हणाले की, "या हल्ल्याचा अनुभव हादरवून टाकणारा होता. माझा मृत्यू अटळ होता, पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे."
 
न्यूयॉर्क पोस्टला प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांच्या उजव्या कानावर पांढऱ्या रंगाची पट्टी लावली होती पण त्यांच्या निकटवर्तीयांनी तशा परिस्थितीत फोटो काढू दिले नाहीत. ट्रम्प पुढे म्हणाले की, "डॉक्टरांना पण आश्चर्य वाटत होतं, त्यांनी यापूर्वी असं काही घडल्याचं बघितलं नव्हतं."
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
 
एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर इवांका यांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, "आज पेन्सिल्वेनियातील बटलरमध्ये विनाकारण झालेल्या हिंसाचारानंतर माझे वडील आणि इतर पीडितांसाठी तुम्ही जे प्रेम दाखवलंत, प्रार्थना केली, त्याबद्दल धन्यवाद."
 
इवांका यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, "सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनी जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल मी आभारी आहे.
 
"मी आपल्या देशासाठी सतत प्रार्थना करत राहीन. डॅडी, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि सदैव राहील," असं इवांका म्हणाल्या.
 
तर डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे.
 
हल्ल्यानंतर त्याने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया मंचावर एक फोटो टाकला आहे. या फोटोत डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत आहेत आणि आपल्या हाताची मूठ ते हवेत उंचावत आहेत.
 
ट्रम्प ज्युनियरनं या फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, "अमेरिकेला वाचवण्यासाठी ते नेहमीच लढत राहतील."
 
याशिवाय ट्रम्प यांची मुलगी, टिफनी एरियानाने सुद्धा आपल्या वडिलांचा जीव वाचल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले.
 
टिफनी म्हणाल्या, "राजकीय हिंसाचारातून कधीही कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही.
 
'तुम्ही आज पाहिलंत की माझे वडील लढवय्ये आहेत आणि ते तुमच्यासाठी आणि अमेरिकेसाठी लढत राहतील, टिफनी म्हणाल्या.
 
नेमकं काय घडलं?
पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला, ट्रम्प गोळीबारानंतर कानाला हात लावत खाली झुकताना दिसले आणि नंतरच काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळापासून दूर नेलं.
 
हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.
 
डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवलं जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले.
 
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेतील लोकांनी दिली आहे.
 
या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी बीबीसीला सांगितलं की सभास्थळापासून जवळ असणाऱ्या एका इमारतीवर एका माणसाला रायफल घेऊन रांगत असताना त्यांनी पाहिलं होतं.
 
या घटनेनंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात असं दिसत आहे की गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.
 
ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग म्हणाले की, "अध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्यांनंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणेचे आभार मानले."
 
पोलीस यंत्रणेतील सूत्रांनी बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार असणाऱ्या सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केलं आहे. या सूत्रांनी हेही सांगितलं की संशयित पुरुष हल्लेखोर हा रायफल घेऊन आला होता आणि त्याने मंचापासून काहीशे मीटर दूर असलेल्या एका उंच जागेवरून गोळीबार केला.
 
सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात असं सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
 
ते पुढे म्हणाले की आता या घटनेचा तपास सुरू असून जी माहिती मिळेल ती लवकरच सांगितली जाईल.
 
यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते. पेन्सिल्वेनिया हे अमेरिकेतील महत्त्वाचं स्विंग स्टेट (राजकीय दृष्ट्या स्पष्ट नसलेलं) राज्य आहे.
 
या सभेत ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळाने गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
 
एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभे असलेले समर्थक दचकून खाली झुकताना दिसून आले.
 
हल्लेखोराची ओळख पटली
अमेरिकेतील सर्वोच्च तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटल्याचा दावा केला आहे.
 
गोळी चालवणारा व्यक्ती 20 वर्षांचा थॉमस मॅथ्यू क्रूक्स होता, असं एफबीआयनं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. त्या माहितीनुसार क्रूक्स पेन्सिल्व्हेनियातील बेथल पार्कचा रहिवासी होता.
 
क्रूक्स हा ट्रम्प यांची सभा झाली त्या ठिकाणापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेथल पार्कमध्ये राहत होता, असं एफबीआयनं म्हटलं.
 
ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं एफबीआयनं म्हटलं आहे. याबाबत लोकांना माहिती असल्यास त्यांनी ती शेअर करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
लोकांकडं काही फोटो किंवा ऑनलाइन व्हिडिओ असेल तर ते शेअर करावे असं त्यांनी म्हटलं आहे. हल्ल्याचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
'त्याच्या हातात रायफल होती, आम्ही त्याला स्पष्टपणे बघितलं होतं'
डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणाहून बोलत होते तिथून काही अंतरावर असणाऱ्या एकमजली इमारतीवरून गोळीबार झाला असावा असा अंदाज, उपस्थित लोकांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.
 
प्रत्यक्षदर्शींपैकी एक असलेल्या ग्रेग नावाच्या व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की, "ट्रम्प यांचं भाषण सुरू होण्याच्या पाचच मिनिटांपूर्वी मी त्या इमारतीवर एका व्यक्तीला रायफल घेऊन रांगत असताना बघितलं होतं."
 
ग्रेग हेही म्हणाले की संशयित व्यक्तीची माहिती त्यांनी लगेच तिथे असलेल्या पोलिसांना दिली होती.
 
"त्याच्याकडे रायफल होती आणि आम्ही त्याला स्पष्टपणे बघू शकत होतो. आम्ही त्याच्याकडे बोट दाखवत होतो आणि पोलीस इकडे तिकडे जमिनीवर धावत होते. आम्ही पोलिसांना सांगत होतो की तिकडे एका छतावर रायफल घेऊन एक माणूस आलेला आहे. पण पोलिसांना नेमकं काय सुरू आहे तेच कळत नव्हतं," असं ग्रेग सांगतात.
 
आणखी एक साक्षीदार जेसन यांनी बीबीसीला घटनेची माहिती दिली.
 
पहिल्या गोळीचा आवाज आल्यानंतर लागोपाठ पाच वेळा गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याचं जेसन म्हणाले.
 
जेसन म्हणाले की, "गोळीबारानंतर आम्ही बघितलं की सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर उडी घेतली, त्यांना सुरक्षित केलं आणि गर्दीतला प्रत्येकजण लगेचच खाली झुकला."
 
"त्यानंतर लगेचच ट्रम्प पुन्हा उभे राहिले, त्यांनी गर्दीकडे पाहून हात उंचावला, हवेत मूठ आवळली, ते काहीतरी बोलत होते."
 
या सभेला उपस्थित असलेल्या टीम यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनीही एकापाठोपाठ एक गोळीबाराचा आवाज ऐकला. टीम म्हणाले की, "तिथल्या हायड्रॉलिक लाईनवर काहीतरी आदळलं असावं. त्यानंतर आम्ही ट्रम्प यांना खाली झुकताना पाहिला आणि सगळेच लोक खाली वाकू लागले, तिथे गोंधळ उडाला होता."
 
राष्ट्राध्यक्ष जो बायडन काय म्हणाले?
या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यातर्फे एक लेखी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
 
बायडन यांनी लिहिलं की, "डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत हे जाणून मला दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. आपण देश म्हणून एकसंध राहायला हवे. या घटनेचा निषेध केला पाहिजे."
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
 
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की "आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही आणि माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नाही हे कळल्यावर दिलासा मिळाला."
 
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना उपाध्यक्ष राहिलेले माईक पेन्स म्हणाले की, "ते आणि त्यांची पत्नी त्यांचे माजी सहकारी राहिलेल्या ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत या प्रार्थनेत प्रत्येक अमेरिकन नागरिकाला सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं."
 
अमेरिकेतील संसदेचे अल्पसंख्याक नेते हकीम जेफ्रीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या प्रार्थना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत आहेत. हल्ल्यानंतर तत्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांचा मी आभारी आहे. अमेरिका ही लोकशाही आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय हिंसा इथे कधीही स्वीकारार्ह नाही.”
 
गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस या सुरक्षा संस्थेकडून ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
 
यात त्यांनी असं सांगितलं आहे की, "या हल्ल्यात प्रेक्षकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी आहेत. 13 जुलै रोजी संध्याकाळी अंदाजे 6:15 वाजता (अमेरिकन वेळ), एका संशयित शूटरने सभेच्या ठिकाणाच्या बाहेर असलेल्या एका उंच जागेवरून मंचाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. आणि सीक्रेट सर्व्हिसने एफबीआयला सूचित केलं आहे."
 
बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजला सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने 200 फूट ते 300 फूट अंतरावरून एआर-शैलीतील रायफलने ट्रम्प यांच्या दिशेने गोळीबार केला.
 
ट्रम्प सोमवारी मिलवॉकी येथील अधिवेशनात अध्यक्षपदासाठी त्यांच्या पक्षाचे नामांकन स्वीकारणार होते. काहींनी असा अंदाज लावला होता की बटलरच्या सभेत ते मोठी घोषणा करतील.
 
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये 2020 च्या निवडणुकीसारखाच चुरशीचा सामना पाहायला मिळतो आहे.
 
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला - एफबीआय
अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयने पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.
 
एफबीआय फील्ड ऑफिसर केविन रोजेक यांनी या हल्ल्याला ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न मानलं जात असल्याचं सांगितलं.
 
रोझेक म्हणाले की, "आज संध्याकाळी आमचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला."
 
पत्रकार परिषदेत अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे लोक नव्हते. एफबीआयचे स्पेशल एजंट केविन रोजेक यांनी सांगितलं की, सीक्रेट सर्व्हिसचे लोक या पत्रकार परिषदेला येऊ शकले नाहीत.
 
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव थॉमस मैथ्यू क्रुक्स असं आहे आणि तो 20 वर्षांचा होता.
 
एफबीआयने सांगितलं की हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी डीएनए आणि बायोमेट्रिक्स चाचण्या घेतल्या जातील.
 
क्रुक्स हा पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कचा रहिवासी असल्याची माहिती एफबीआयने दिली. तसेच ज्या ठिकाणी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता त्या ठिकाणापासून बेथेल पार्क 70 किलोमीटर अंतरावर आहे.
 
एफबीआयच्या निवेदनात म्हटले आहे की, "हा तपास अद्याप सुरू आहे, तपासात मदत करू शकणारी माहिती असलेले फोटो किंवा व्हिडिओ कोणीही ऑनलाइन सबमिट करू शकतात."
 
माझ्या मित्रावर झालेला हल्ला चिंताजनक - नरेंद्र मोदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून.
 
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मोदींनी हा हल्ल्याबाबतची चिंता व्यक्त केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं की, "माझे प्रिय मित्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला चिंताजनक आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबासोब, जखमींसोबत आणि प्रत्येक अमेरिकन नागरिकांसोबत आमच्या प्रार्थना आहेत."
 
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
 
राहुल गांधी यांनी लिहिलं की, "अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध झाला पाहिजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हत्येच्या प्रयत्नामुळे मी चिंतेत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा."