गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कराची , सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (12:26 IST)

भारताच्या 68 मच्छिमारांना पाकिस्तानने सोडले

मासेमारी करताना सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 68 भारतीय मच्छिमारांची आज सुटका करण्यात आली. सद्‌भावना कृती म्हणून पाकिस्तानने या मच्छिमारांची सुटका केली. या सर्व मच्छिमारांना कराचीतील लंधी तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे सर्व मच्छिमार लाहोरहून रेल्वेने वाघा सीमेवर आणण्यात येतील आणि त्यानंतर ते भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने शनिवारी याबाबतचे आदेश दिले असल्याचे सिंध प्रांताचे गृह विभागाचे अधिकारी नसीम सिद्दीकी यांनी सांगितले.
 
पाकिस्तानातील ईधी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या मच्छिमारांना रोख रक्कम, काही भेटवस्तू आणि शुभेच्छा दिल्या. जुलै महिन्यात भारताच्या 78 मच्छिमारांना सागरी हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल पाकिस्तानने पकडले होते आणि लंधी तुरुंगात ठेवण्यात आले होते. या तुरुंगामध्ये भारताचे अजून 200 मच्छिमार असल्याचेही नसीम सिद्दीकी यांनी सांगितले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आणि यावर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तान सरकारने दोन तुकड्यांमध्ये भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. जानेवारी ते डिसेंबरदरम्यान 12 दिवसांमध्ये एकूण 438 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.