गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:11 IST)

पुन्हा माथेरानची राणी रुळावर

माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. 

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक पर्वणीच होती. मात्र जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या. दोन घटना तर रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा मे २०१६ पासून बंदच ठेवण्यात आली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने केलेल्या सुरक्षा उपाययोजनांपैकी नेरळ ते माथेरानपर्यंत संरक्षक भिंतीचे तसेच रुळांचे काम हाती घेण्यात आले. यातील अमन लॉज ते माथेरानपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या दरम्यानची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.