अमेरिकेत २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सास येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळली आहे. या विद्यार्थिनीचे नाव राजलक्ष्मी यारलागड्डा उर्फ राजी असे आहे, ती आंध्र प्रदेशची रहिवासी आहे. ही बातमी कळताच तिचे कुटुंब आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. नुकतीच पदवीधर झालेली आणि नोकरीच्या शोधात असलेली २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी राजलक्ष्मी हिचा तीव्र खोकला आणि छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाला. ती उज्ज्वल भविष्याच्या आशेने अमेरिकेत आली होती.
आंध्र प्रदेशातील राजलक्ष्मी यारलागड्डा उर्फ राजी हिने नुकतीच कॉर्पस क्रिस्टी येथील टेक्सास ए अँड एम विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. ती तिच्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या आशेने अमेरिकेत आली होती. राजलक्ष्मीचे कुटुंब बापटला जिल्ह्यातील करमेचेडू गावात अल्पभूधारक शेतकरी आहे.
राजलक्ष्मीच्या चुलत भावाने सांगितले की ती तिच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी नोकरी शोधत होती. तिला दोन-तीन दिवसांपासून तीव्र खोकला आणि छातीत दुखत होते. त्याने सांगितले की ७ नोव्हेंबर रोजी सकाळी अलार्म वाजूनही ती उठली नाही. नंतर तिच्या मित्रांना कळले की तिचा झोपेत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अमेरिकेत राजलक्ष्मीच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik