शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (16:27 IST)

'इस्रायलनं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 274 नागरिकांना मारलं', हमासच्या आरोग्य मंत्रालयाचा आरोप

israel hamas war
हमासच्या ताब्यातील बंदींना सोडवण्यासाठी इस्रायलनं राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 274 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयानं केला आहे. यात लहान मुलांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इस्रायलनं या ऑपरेशनद्वारे 4 ओलिसांची सुटका केली.
 
शनिवारी (8 जून) नुसरत शरणार्थी छावणी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बंदींची सुटका करताना इस्रायली लष्कर आणि हमास यांच्यात संघर्ष झाला. त्यात इस्रायलच्या लष्करानं हवाई हल्लादेखील केला.
 
हमासनं 7 ऑक्टोबरला नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधधून अपहरण केलेल्या नोआ अरगामनी ( 27), अलमोग मीर (22), अँड्रेई कोझलोव्ह (27) आणि सलोमी झीव (41) यांची या ऑपरेशनमध्ये शनिवारी (8 जून) सुटका करण्यात आली.
 
इस्रायलच्या लष्करानं यात 100 पेक्षा कमी जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
मात्र, गाझामधील हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाचे आकडे खरे असतील, तर हा दिवस इस्रायल-हमास संघर्षातील सर्वात विध्वंसक दिवस ठरू शकतो.
दाट लोकवस्ती असलेल्या या भागातील नागरिकांनी प्रचंड बॉम्बहल्ले आणि गोळीबारामुळं दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, असं म्हटलं.
 
अब्देल सलाम दारविश यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, ते बाजारात भाजी विकत घेत असताना त्यांनी वरून जाणारी लढाऊ विमानं आणि गोळीबाराचा आवाज ऐकला.
 
"त्यानंतर लोकांच्या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते आणि भिंतींवर रक्ताचे डाग पडलेले होते," असं ते म्हणाले.
 
बंदींना सोडवल्यानं ते कुटुंबांना भेटणार म्हणून इस्रायलमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनसह जगभरातील नेत्यांनी बंदींना सोडवल्याचं स्वागत केलं.
 
पण या कारवाईच्या मोबदल्यात मोजाव्या लागलेल्या किमतीवर होणारी टीका वाढू लागली आहे. युरोपियन युनियनचे परराष्ट्र संबंध प्रमुख जोसेप बोरेल यांनी म्हटलं की, "गाझामधील या विध्वंसाचा तीव्र शब्दांत निषेध केला."
 
"गाझामधील आणखी नरसंहाराच्या बातम्या भयावह आहेत," असं त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याबाबत इस्रायलचे एक मंत्री म्हणाले की, नागरिकांच्या पाठीशी लपणाऱ्या हमासचा निषेध करण्याऐवजी युरोपियन युनियननं स्वतःच्या नागरिकांना वाचवणाऱ्या इस्रायलचा निषेध केला.
 
नुसरतमधील छावणीच्या परिसरात झालेल्या प्रचंड नुकसानीवरून बॉम्बहल्ले आणि शोक व्यक्त करणारे नागरिक दिसत आहेत.
 
गाझामधील दोन रुग्णालयं अल-अक्सा आणि अल-अवदा रुग्णालयानं त्यांनी 70 मृतदेह मोजले आहेत असं सांगितलं.
 
दोन तासांच्या या ऑपरेशनमध्ये जे 274 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे, त्यापैकी 86 नावं हमासच्या आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहेत.
 
यापूर्वी इस्रायलचे लष्करी प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी हे ऑपरेशन जोखमीचं आणि गुंतागुंतीचं असलं तरी ते अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे राबवल्यानं त्यात 100 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला होता.
 
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव्ह गालांट यांच्या मते, बंदींची सुटका करताना प्रचंड गोळीबाराचा सामना केल्याचं म्हटलं. सैन्याच्या विशेष तुकडीचा एका अधिकारीही त्यात जखमी झाले होते, नंतर हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
 
गाझामधील व्हिडिओमध्ये या ऑपरेशननंतरच्या नरसंहाराची दृश्ये दिसतात.
 
अल-अक्सा हॉस्पिटलमधील फूटेजमध्ये गंभीररित्या जखमी झालेले असंख्य लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. रक्तानं माखलेल्या फरशीवर चालण्यासाठीही डॉक्टरांना जागा मिळत नसल्याचं त्यातून पाहायला मिळत आहे.
 
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका पाठोपाठ कार आणि रुग्णवाहिकांमधून रुग्ण रुग्णालयात आणले जात असल्याचं दिसून आलं.
 
शनिवारी रुग्णालयात आणल्या जाणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत होती, असं नुसरतमधील अल-अवदा हॉस्पिटलच्या संचालकांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात पुरेशी जागाही नसल्यातं, डॉ. मारवान अबू नासेर यांनी सांगितलं.
 
एका व्यक्तीनं ऑक्टोबर महिन्यात हा संघर्ष सुरू झाल्यापासून त्याच्या कुटुंबातील 40 हून अधिक जण मारले गेल्याचं सांगितलं. हल्ल्यात कोसळलेल्या एका घरात त्यानं बीबीसीला माहिती दिली.
 
"मुलं आणि महिला घरात आले, तसा बॉम्बहल्ला सुरू झाला आणि घरातील सर्वांचा मृत्यू झाला," असं त्यांनी सांगितलं.
 
"या घरात आधी 30 लोक राहायचे. नंतर त्यांची संख्या 50 झाली होती. त्याच घरावर हल्ला झाला. फक्त मी, माझे वडील, माझी पत्नी आणि एक तरुण यात वाचलो. 50 लोकांपैकी फक्त आम्हीच वाचलो आहोत."
 
गाझामधील लोकांकडूनही शक्यतो हमासवर टीका केलेली पाहायला मिळत नाही. पण सध्या सुरू असलेल्या रक्तपातामुळं लोक हमासवर टीकाही करत आहेत.
 
37 वर्षांचे हसन ओमार यांनी या संघर्षात अनावश्यक जीवितहानी झाल्याचं म्हणत दुःख व्यक्त केलं. त्यांना इस्रायलच्या प्रत्येक बंदीच्या मोबदल्यात 80 पॅलेस्टिनी कैंद्यांना सोडवून घेता आलं असतं. त्यानं रक्तपातही टळला असता. 100 लोकांचे जीवन गमावण्यापेक्षा ते लाखपटीनं चांगलं ठरलं असतं, असं ते म्हणाले.
 
"हानी थांबवणं हेही एकप्रकारे फायद्याचं ठरू शकतं, असं मला हमासला संगायचं आहे. कतारच्या हॉटेलांमधून जे आपल्यावर नियंत्रण ठेवतात त्यांच्यापासून आपण मुक्त झालं पाहिजे."
 
इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी आणि बंदींच्या सुटकेच्या करारासाठी प्रयत्न सुरू असताना बंदींची सुटका करण्यात आली.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांना या करारासाठी आवाहन करण्यात आलं आहे. पण त्यांना कट्टर उजव्या विचारसरणीच्या मित्र पक्षांकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. बंदींना सोडवण्यासाठी लष्करी कारवाई हा एकमेव मार्ग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
इस्रायलनं शनिवारी केलेलं ऑपरेशन हे या संघर्षात बंदींना सोडवण्यासाठी केलेली पहिली कारवाई आहे. यामुळं दबावात असलेल्या नेतन्याहूंची समीकरणं बिघडू शकतात असं म्हटलं जात आहे.
 
नुसरतमध्ये इस्रायलच्या कारवाईचं उत्तर देताना हमासचे राजकीय नेते इस्माईल हानियेह यांनी इस्रायल हमासवर अटी लादू शकत नाही, असं म्हटलं आहे.
 
पॅलिस्टिनींच्या सुरक्षेबाबत खात्री होत नाही, तोपर्यंत हमास शस्त्रसंधीसाठी तयार होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
गेल्यावर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 251 जणांना बंदी बनवण्यात आलं होतं.
 
या बंदींपैकी 116 जण अजूनही पॅलिस्टाईनमध्ये कैदेत आहेत. लष्करानं 41 जणांचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं आहे.
 
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या करारानुसार हमासनं एका आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या मोबदल्यात 105 बंदींना सोडलं होतं. इस्रायलच्या तुरुंगात अजूनही 240 पॅलिस्टिनी कैदेत आहेत.
 
शनिवारी हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं गाझामध्ये मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 36 हजार 801 वर पोहोचला आहे.
Published By- Priya Dixit