1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (14:24 IST)

युद्धबंदीनंतर इस्रायलचे पुन्हा हल्ले सुरू, 178 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

Israel Hamas war
सात दिवसांच्या युद्धबंदीनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.
 
इस्रायल आणि हमास हे दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत की त्यांच्यामुळे युद्धबंदीचा कालावधी वाढू शकला नाही.
 
दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये पुन्हा बॉम्बफेक सुरू केल्यानंतर आतापर्यंत 178 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचं हमासच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
 
तर 200 दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचंही इस्रायलनं म्हटलं आहे.
 
युद्धबंदी वाढवण्याच्या चर्चेशी संबंधित एका सूत्रानं बीबीसीला सांगितलं की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी वाढवण्याचा करार कतारमध्ये होऊ शकला नाही.
 
मात्र, तरीही या दोघांमधील संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
 
युद्धबंदी का संपली?
इस्रायली संरक्षण दलाने म्हटलं आहे की युद्धबंदी संपण्याच्या एक तास आधी सायरन वाजला आणि गाझा पट्टीजवळील इस्रायली प्रदेशात रॉकेट रोखण्यात आलं.
 
एक तासानंतर इस्रायली सैन्यानं सांगितलं की लढाई पुन्हा सुरू झाली आहे. त्यांनी हमासवर कराराच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.
 
आयडीएफनं सांगितलं की त्यांची युद्धविमान गाझा पट्टीतील हमासच्या तळांना लक्ष्य करत आहेत.
 
त्यानंतर लगेचच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, "हमासने सर्व महिला ओलिसांची सुटका करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण केली नाही आणि इस्रायली नागरिकांवर रॉकेटचा मारा केला."
 
हमासने इस्रायलवर केले आरोप
पण हमासनं लढाई सुरू केल्याबद्दल इस्रायलला दोष दिला आणि म्हटलं की, "त्यांनी ओलिसांना सोडण्याच्या सर्व ऑफर नाकारल्या."
 
हमासने एका निवेदनात म्हटलं आहे की, गाझा पट्टीमध्ये झिओनिस्ट युद्ध गुन्हे सुरू ठेवल्याबद्दल आणि इस्रायलला हिरवा कंदील दिल्याबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दोष दिला, आणि त्यांनी असं म्हटलं आहे की, कब्जा करणाऱ्यांनी गुन्हेगारी आक्रमण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आठवडाभर चाललेल्या युद्धबंदी दरम्यान, नेतन्याहू यांच्यावर युद्ध पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढला, विशेषत: त्यांच्या सरकारमधील उजव्या विचारसरणीच्या सहकाऱ्यांकडून दबाव होता. मात्र, करार संपल्यानंतर इस्त्रायल सातत्यानं तसं करण्याचा इरादा व्यक्त करत होता.
 
असं असूनही, अद्याप नवीन करार होण्याची आशा आहे.
 
युद्धबंदी करारातील प्रमुख भूमिकेत असणाऱ्याने शुक्रवारी ( 1 डिसेंबर) सांगितलं की तात्पुरती युद्धबंदी करण्याच्या उद्देशानं चर्चा सुरू आहे.
 
पुढे काय होणार?
नवीन कराराच्या अपेक्षेने वाटाघाटी एकाबाजूला सुरू असल्या तरी युद्ध पुन्हा सुरु झालं आहे.
 
गाझा पट्टीत, विशेषत: गाझा शहरात काही आठवड्यांच्या तीव्र लढाईनंतर, इस्रायली सैन्य आता दक्षिणेकडे आपले लक्ष वळवताना दिसत आहे, जिथं बॉम्बस्फोटांच्या घटना घडत आहेत.
 
आयडीएफ ने गाझाचा नकाशा तयार केला आहे, ज्यामध्ये त्याची 2,000 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भविष्यातील युद्धात गाझामधील लोकांचं संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
इस्त्रायली सैन्यानं सांगितलं की, नकाशातील क्षेत्र अशा प्रकारे विभागली गेली आहेत की, "आवश्यक असल्यास विशिष्ट भागातून लोकांना बाहेर काढलं जाऊ शकतं."
 
शुक्रवारी (1 डिसेंबर) इस्रायली विमानांनी खान युनिसच्या पूर्व आणि उत्तरेकडील भागात पत्रकं टाकली. हे दक्षिण गाझाचे सर्वात मोठं क्षेत्र आहे. पत्रकांमध्ये विशिष्ट इमारतींचा उल्लेख नाही परंतु रहिवाशांना त्वरित ते क्षेत्र रिकामं करण्यास आणि रफाहमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाण्यास अरबी भाषेत सांगितलं.
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायली अधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर लगेचच लढाई पुन्हा सुरू झाली. या बैठकीत ब्लिंकन यांनी पुनरुच्चार केला की युद्धाच्या पुढील टप्प्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा लागेल.
 
ब्लिंकेन म्हणाले की, त्यांनी इस्रायली सरकारला सांगितलं की, पॅलेस्टिनी लोकांचं आणखी मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊ नये आणि रुग्णालये, वीज प्रकल्प आणि पाण्याच्या टाक्या यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य करु नये.
 
युद्धबंदी दरम्यान काय झालं?
सात दिवसांच्या तात्पुरत्या युद्धबंदी दरम्यान, हमासनं गाझामधून 78 इस्रायली महिला आणि मुलांसह 110 लोकांना सोडण्याचं मान्य केलं.
 
या कराराअंतर्गत 240 पॅलेस्टिनींची इस्रायलच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याच्यावर दगडफेक करण्यापासून खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत अनेक आरोप होते.
 
सुटका करण्यात आलेल्या बहुतेक पॅलेस्टिनींना कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं नव्हतं आणि त्यांना कोणत्याही खटल्याशिवाय रिमांडवर तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. काही लोकांचे म्हणणं आहे की 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना सामूहिक शिक्षा देण्यात आली.
 
सर्व कैद्यांना कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
 
गाझामध्ये अजूनही 140 इस्रायली ओलीस ठेवल्याचा अंदाज आहे.