बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (19:07 IST)

चीनमध्ये कुठला आजार पसरलाय? त्याचा भारतातील मुलांना किती धोका आहे?

चार वर्षांपूर्वी चीनमधून सुरू झालेला कोविड संसर्ग हळूहळू जगभरात पसरला आणि लाखो लोकांना त्याचा फटका बसला.आता चीनच्या उत्तरेकडील भागातील मुलांना न्यूमोनिया झाल्याच्या बातम्या चिंतेचा विषय बनला आहे.
 
चीनच्या उत्तरेकडील भागातील रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने आजारी मुलं उपचारासाठी आल्याचा दावाही अनेक अहवालांमध्ये केला जातोय.
 
कोविड आणि हिवाळ्याच्या ऋतूत चीनमध्ये उठविण्यात आलेल्या निर्बंधांनाही या श्वसनाच्या आजाराशी जोडलं जातंय.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा संदर्भ देत जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, चीनमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणं कोविडसारखी मोठ्या प्रमाणात नाहीत आणि अलिकडील प्रकरणांमध्ये कोणतेही नवीन किंवा असामान्य रोगजंतू आढळलेले नाहीत याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी संचालक मारिया वेन यांनी सांगितलं की, 'चीनमधील मुलांमध्ये या प्रकरणांत वाढ होण्याचं कारण म्हणजे कोविडमुळे दोन वर्षांची बंदी घालण्यात आलेली, ज्याने मुलांना या रोगजंतूपासून दूर ठेवलं. '
 
त्यांचं म्हणणं होतं, "आम्ही साथीच्या आजारापूर्वीच्या काळाशी तुलना करण्यास सांगितलंय आणि जी लाट आता दिसतेय त्याचं प्रमाण इतकं नाहीये, जे 2018-19 मध्ये दिसलं होतं.”
 
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे प्रवक्ते मी फेंग यांनी रविवारी सांगितलं की, श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ होण्याचं कारण म्हणजे अनके प्रकारच्या रोगजंतूंची उपस्थिती हे असून, त्यामध्ये मुख्यतः इन्फ्लूएंझा हे आहे.
 
चीन हा भारताचा शेजारी देश आहे. अशा परिस्थितीत हा आजार रोखण्यासाठी भारत सरकारनेही परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
 
परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकार कशाप्रकारे तयार आहे?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच श्वासोच्छवासाच्या आजारांना तोंड देण्यासाठी तयारी आणि उपाययोजनांबाबत तपशीलवार आढावा बैठक घेतली.
 
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांना या संदर्भात तयारी करण्याची आणि आढावा घेण्याचा सल्ला दिलाय.
 
फ्लू, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविकं, वैयक्तिक संरक्षक उपकरणं, चाचणी किट, ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपाययोजनांची पुरेशी उपलब्धता हॉस्पिटलमध्ये असावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.
 
त्याचवेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड-19 मध्ये सुधारित पाळत ठेवणे धोरणा’ साठी मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचा सल्ला देण्यात आलाय. हे धोरण या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेलं. इन्फ्लूएंझा सारखा आजार (आयएलआय) आणि दीर्घ श्वसनाचा आजार (सारी) यांचं निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
 
दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिनचे प्रमुख डॉ. अनंत मोहन म्हणतात की, चीनकडून ‘डब्ल्यूएचओ’ला मिळालेल्या माहितीवरून हे समजू शकतं की हे तेचे सामान्य जंतू आहेत जे सर्दी आणि खोकल्याला कारणीभूत असतात.
 
ते म्हणतात, "अशा प्रकरणांची संख्या वाढतेय आणि याचं एक मुख्य कारण अधिक चाचण्या असू शकतं, परंतु हे नवीन जंतू नाहीत.”
 
चीनमधील मुलांमध्ये पसरणारा हा रोग संसर्गजन्य आहे का?
डॉक्टरांच्या मते, हा एक पसरणारा किंवा संसर्गजन्य रोग आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं असल्यास, श्वासोच्छवासाशी संबंधित आजार हे संसर्गजन्य असतात. या रोगाचे विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंचे थेंब खोकणे, हसणे, शिंकणे, बोलणे आणि गाणे इत्यादीद्वारे पसरतात.
 
डॉ. वेद प्रकाश हे लखनौ येथील किंग जॉर्ज वैद्यकिय विद्यापीठामध्ये पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनचे प्रमुख आहेत.
 
ते म्हणतात की, कोविड दरम्यान लादलेले निर्बंध उठवल्यानंतर चीनमध्ये हा पहिला हिवाळा आहे, त्यामुळे तिथल्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होईल.
 
ते असंही म्हणतात की, चीनमध्ये कोणताही नवीन विषाणू किंवा सुक्ष्मजंतूचा रोगजंतू आढळलेला नाही.
 
मायकोप्लाझ्मा, आरएसव्ही म्हणजे काय?
डॉक्टर म्हणतात की विषाणू आणि सूक्ष्मजंतू हे सूक्ष्म रोगजंतू आहेत जे या प्रकारच्या रोगास कारणीभूत ठरतात.
 
डॉ. वेद प्रकाश स्पष्ट करतात की मायकोप्लाझ्मा हा एक जिवाणू जंतू आहे आणि तो मुख्यतः मुलांवर हल्ला करतो. त्याचा घसा आणि श्वसनसंस्थेवर परिणाम होतो ज्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो.
 
आरएसव्ही हा एक प्रकारचा विषाणू आहे ज्याला इंग्रजीमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ म्हणतात.
 
डॉ.अनंत मोहन यांच्या मते, हा विषाणू वरच्या श्वसनमार्गावर, नाक आणि घशावर परिणाम करतो आणि सर्दी, खोकला आणि तापाला कारणीभूत ठरतो.
 
मायकोप्लाझ्मा, आरएसव्ही किंवा इन्फ्लूएन्झा हे अतिशय सामान्य आहेत आणि फार गंभीर नसल्यास प्रतिजैविकांद्वारे बरे केले जाऊ शकतात.
डॉक्टर अनेक लक्षणं सांगतात जी सामान्य दिसतात. डॉक्टरांच्या मते, कधीकधी तो स्वत:हून बरा होतो. यासाठी अनेकवेळा ॲलर्जीची औषधेही दिली जातात, मात्र जेव्हा न्यूमोनिया होऊ लागतो तेव्हा प्रतिजैविक औषधे दिली जातात.
 
डॉ. अनंत मोहन म्हणतात की कोविडचा चीनमध्ये पसरलेल्या इन्फ्लूएंझाशी संबंध जोडणं कठीण आहे.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार,"ज्यांना कोरोना झाला नसेल त्यांनी अँटीबॉडीज विकसित केल्या नसतील अशी शक्यता आहे." हा एक सिद्धांत असू शकतो परंतु हे गरजेचं नाही की कोरोना अँटीबॉडीज इतर विषाणू, इन्फ्लूएंझापासून संरक्षण देतील.
 
आता इन्फ्लूएन्झासाठी लस उपलब्ध आहे आणि त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्यामुळे तीही घेता येऊ शकते.
 
पण डॉ. अनंत हेही आवर्जून सांगतात की लसीला पूर्णपणे खात्रीशीर समजू नये आणि नेहमीच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
 
तर दुसरीकडे डॉ वेद प्रकाश याचं म्हणणं वेगळं आहे.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, “जी मुलं आणि लोकांचं लशीकरण झालेलं नाही आणि ज्यांना कोविडसुद्धा झालेला नाही, ज्या लोकांनी बदलणा-या हवामानाचा सामना केलेला नाही, जिवाणू, विषाणू किंवा इन्फ्लूएंझाच्या संपर्कात आलेले नाहीत त्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती नसते. अशा परिस्थितीत कमी प्रभावी जीवाणू किंवा विषाणूंचा अशा लोकांवर जास्त परिणाम होतो.
 
लहान मुलांसाठी ही लस वापरली गेली नाही, त्यामुळे त्यांना जास्त धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रौढ व्यक्तींचं लसीकरण झालेलं नाही किंवा कोविड झालेला नाही अशा व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे.
 
त्याच वेळी, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या लोकांमध्ये या प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो.
 
प्रदूषणाचा किती परिणाम होऊ शकतो?
डॉक्टरांच्या मते, जेव्हा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.
 
वातावरणाचा जास्तीत जास्त संपर्क शरीरातील, फुफ्फुसांवर आणि श्वसनसंस्थेशी होतो, त्यामुळे त्यांना संसर्गाचाही सामना करावा लागतो आणि त्याअनुषंगाने जुळवूनही घ्यावं लागतं.
 
ज्या वेळेस शरीर हवामानातील बदलासाठी तयारी करत असतं, जसं की हिवाळ्यातील हवामानाबद्दल विचार केला तर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे विषाणू, सूक्ष्मजंतू किंवा इन्फ्लूएंझाचा हल्ला होतो. यामुळे ॲलर्जी आणि न्यूमोनिया देखील होतो.
 
मोठ्या प्रमाणात प्रदूषण असेल तर पीएम 2.5 किंवा पीएम 10 चे कण शरीरात खोलवर जाऊ शकतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
 
आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो?
कोविड दरम्यान एक मोहीम चालवली गेली - ‘सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा’, त्याचप्रमाणे डॉक्टर हे टाळण्यासाठी अनेक सल्ले देतात.
 
गेल्या दशकात हृदयविकार, पक्षाघात किंवा कॅन्सर यांसारखे जीवघेणे आजार उदयास आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे, परंतु गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला आहे.
 
अशा स्थितीत श्‍वसनाचे आजार येत्या काही वर्षांत साथीचे रूप धारण करू शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलेय.
 
तज्ज्ञांचं मत आहे की सरकार पावलं उचलतंय परंतु पाळत ठेवणारी यंत्रणा, प्रतिबंधक धोरण, मनुष्यबळ आणि विशेष सुविधा बळकट करण्याबरोबरच लोकांना जागरूक केलं पाहिजे.
 
Published By- Priya Dixit