गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (16:25 IST)

कुवेत: 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतात परतले हवाई दलाचे विमान

indian airforce plane
कुवेतमधून 45 भारतीय नागरिकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विमान कोचीला परतलं आहे.कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 50 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 45 भारतीय होते. शुक्रवारी सकाळी हे विमान कुवेतहून निघालं होतं.परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कुवेतला पोहोचलेले परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हेही या विमानात होते.
 
भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तीवर्धन सिंह हे कुवेतमधील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी आणि मृतदेह तातडीने परत आणण्यासाठी कुवेतला पोहोचले होते.
कुवेतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेत शहरातील मंगफ येथे झालेल्या या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व 45 भारतीयांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे.
 
या अपघातात 45 भारतीयांसह फिलिपाइन्सच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर 50 जण जखमी झाले.
 
घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं होतं.
 
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. "कुवेतमधील आगीची घटना दुःखद आहे. आप्तेष्टांना गमावणाऱ्या कुटुंबीयांबरोबर आमच्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं ते काम करत आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील आगीत 45 भारतीयांच्या मृत्यूनंतर बुधवारी (12 जून) रात्री उशीरा एक बैठक घेतली.
 
पंतप्रधानांनी या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. कुवेतमधील एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 49 जणांपैकी 45 जण भारतीय आहेत.
बैठकीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीमधून दोन-दोन लाख रुपये मदतीचं आश्वासन करण्यात आलं आहे.
 
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटलं की कुवेतमधील आगीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
 
धुरामुळे अनेकांचा जीव गुदमरला-प्रत्यक्षदर्शी
तामिळनाडूचे मणिकंदन कुवेतमध्ये मजुरी करतात. त्यांनी बीबीसी तमिळशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली.
 
मणिकंदन म्हणाले की, "आगीची घटना घडली त्यापासून जवळच असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये मी राहतो. सध्या उन्हाळा असल्यानं बहुतांश मजूर नाईट शिफ्टमध्ये काम करतात. त्यापैकी नाईट शिफ्टनंतर पहाटे घरी आलेले काही मजूर स्वयंपाक करत होते. आग लागताच ती अत्यंत वेगानं पसरली. इमारतीत असलेल्या लोकांना या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य नव्हतं. "
"इमारतीत राहणारे बहुतांश भारतीय होते. विशेषतः केरळ आणि तामिळनाडूचे होते. त्या इमारतीत राहणाऱ्या कोणालाही मी व्यक्तीशः ओळखत नाही. पण आग लागल्यानंतर अनेकांचा धुरामुळं जीव गुदमरत असल्याचं मी पाहलं. पहाटेची वेळ असल्यानं त्यांच्यापैकी काहीजण झोपेलेले होते. "
 
परराष्ट्र मंत्री आणि राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे.
 
"या बातमीमुळं सुन्न आणि दुःखी झालो आहे. कुवेत शहरात आग लागल्यानं 40 हून अधिक भारतीयांच्या मृत्यूच्या बातमीमुळं दु:खी आहे. शाकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत," असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
 
मध्य आशियात आपल्या स्थलांतरित मजुरांची स्थिती ही गंभीर चिंतेचा विषय आहे. भारत सरकारने त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्राधान्य द्यावं असंही राहुल म्हणाले आहेत.
भारतीय राजदुतांनीही या घटनास्थळाला भेट दिली. तसंच भारताच्या राजदुतांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही भेट घेतली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह कुवेतला जाणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितलं.
 
"आगीच्या घटनेतील जखमींना लागणाऱ्या मदतीच्या कामावर ते निगराणी ठेवते. तसंच मृत्यू झालेल्यांचे मृतदेह लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वनायाने प्रयत्न करतील," असं एक्सवर लिहिलं.
 
'कुवेतसाठी दुःखाचा दिवस'
स्थानिक वृत्तपत्र 'टाइम्स ऑफ कुवेत' चे संपादक रेवेन डिसुजा यांनी बीबीसी प्रतिनिधी मोहनलाल शर्मा यांना याबाबत माहिती दिली. "कुवेतमध्ये आगीच्या घटना यापूर्वीही घडत होत्या. पण एवढ्या लोकांचा मृत्यू आधी कधीही झाला नव्हता. त्यादृष्टीनं ही फार मोठी घटना आहे," असं ते म्हणाले.
 
"भारतीय समुदाय आणि कुवेतचे लोकही घाबरलेले आहेत. आज पहाटेपासून आम्ही लोक या बातमीनं घाबरलेलो आहोत. इथं अत्यंत दुःखाचं वातावरण आहे. आम्ही याबाबत विचारही करू शकत नाही.
 
भारताच्या वेगवेगळ्या भागांतून कुवेतला जाऊन काम करणारे लोक याठिकाणी कोणत्या स्थितीत राहतात? या प्रश्नावर रेवेन डिसुजा म्हणाले की, "सगळेच वाईट स्थितीत राहतात, असं म्हणू शकत नाही. अनेक लोक चांगल्या स्थितीतही राहतात. पण कधी-कधी लहान-सहान नियम उल्लंघन होत असतं."
 
"हे मजूर राहत होते त्याठिकाणची कंपनी त्यांना चांगला पगार आणि राहण्याची चांगली सुविधा देते. त्यामुळंच लोकांना कुवेतला येण्याची इच्छा असते. पण कधी-कधी अचानक असं काहीतरी घडतं ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. नियमांच्या उल्लंघनाबाबत तपास सुरू आहे. त्यातून लोकांचा मृत्यू कसा झाला हे समजेल."
"हा सर्वांसाठी दुःखाचा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट केलं आहे. तसंच हिज हायनेस अमीर यांनीही गांभीर्यानं याची दखल घेतली आहे. या घटनेमुळं अनेक चुका सुधारण्याची सुरुवात होईल, असं मला वाटतं. बेकायदेशीर कामं करणाऱ्यांना इशारा मिळाला आहे."
 
रेवेन डिसुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृतांमध्ये बहुतांश ऑईल रिफायनरीमध्ये काम करत होते. त्यांच्यात कुशल आणि अर्धकुशल कामगर होते. पाइप फिटर, टेक्निशियन आणि मजूरही अशू शकतात. हे लोक कुवेतच्या वेगवेगळ्या ऑईल सेक्टर्समध्ये काम करणाऱ्यांपैकी होते."
 
"आम्ही याबाबत नेमकं सांगू शकत नाही, पण त्यांच्यापैकी बहुतांश केरळचे असू शकतात. याची माहिती आमच्याकडे नाही. इमारतीत राहणाऱ्या 195 लोकांपैकी फक्त 67 लोक पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. या इमारतीची क्षमता एवढी नव्हती."
 
"त्याठिकाणी नियमांचं उल्लंघन झालं यात काही शंका नाही. आग लागली नव्हती तोवर क्षमतेपेक्षा जास्त लोक राहण असण्याबाबत काहीही अडचण नव्हती. आता सरकार मजूरांना राहण्याची व्यवस्था पुरवणाऱ्या कंपन्यांच्या नियम आणि अटींचा आढावा घेत आहे.
 
कशी लागली आग?
या घटनेत किमान 15 जण जखमी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
 
कुवेतच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल ईद अल-अवेहान यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या माहितीत बुधवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार सहा वाजता आग लागल्याचं सांगितलं.
 
आगीवर नियंत्रण मिळवलं असून मदतकार्य सुरू असल्याचंही ते म्हणाले.
 
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हीडिओमध्ये इमारतीत खालच्या भागात आग आणि वरच्या मजल्यावरून काळा धूर निघत असल्याचं पाहायला मिळालं.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेतच्या मंगाफ परिसरातील सहा मजली इमारतीत एका किचनमधून ही आग पसरली. या इमारतीत बहुतांश प्रवासी मजूर राहतात.
 
क्षमतेपेक्षा अधिक लोक राहत होते
स्थानिय माध्यमांनी या इमारतीत क्षमतेपेक्षा जास्त लोक राहत असल्याचं सांगितलं आहे.
 
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी टीव्ही दिलेल्या माहितीत घटनेवेळी इमारतीत मोठ्या संख्येनं लोक होते असं सांगितलं.
 
"अनेकांना बाहेर काढण्यात आलं, पण श्वास गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला," असं ते म्हणाले.
 
अशा प्रकारच्या रहिवासी भागातील इमारतींमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक राहत असल्याच्या मुद्द्यावरून याआधीही अनेकदा इशारा देण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
कुवेतचे उपपंतप्रधान काय म्हणाले?
कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहद युसूफ अल सबाह यांनी घटनास्थळाचा दौरा केला आहे.
 
शेख फहद युसूफ अल-सबाह देशाचे गृहमंत्रीही आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "मालकांचा लालचीपणा या घटनेसाठी कारणीभूत आहे."
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, "त्यांनी नियम मोडले आणि त्याचाच हा परिणाम आहे."
कुवेतच्या माध्यमांच्या रिपोर्टनुसार या इमारतीत क्षमतेपेक्षा अधिक लोक राहत होते. गृहमंत्र्यांनी या प्रकरणांत नियमांच्या उल्लंघनाची चौकशी केली जाईल, असं सांगितलं आहे.
 
भारतीय दूतावासानं या घटनेनंतर +965-65505246 हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. लोक मदतीसाठी यावर कॉल करू शकतात.
 
कुवेतमध्ये दोन-तृतियांश लोकसंख्या स्थलांतरित मजुरांचीच आहे. हा देश बाहेरुन आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. मानवाधिकार संघटनांनी कुवैतमधील स्थलांतरित लोकांच्या राहनीमानाबद्दल अनेकदा काळजी व्यक्त केलेली आहे.
 
Published By- Priya Dixit