गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 24 जुलै 2021 (16:39 IST)

काश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ - इम्रान खान

काश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
 
पाकिस्तानचं काश्मीरबाबत धोरण ठरलेलं आहे. मात्र त्यापेक्षा वेगळी भूमिका इम्रान खान यांनी मांडली आहे. दुसरीकडं, जम्मू काश्मीर हा पूर्वीपासून भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील असं भारतानं अगदी ठामपणे सांगितलं आहे.
 
25 जुलैला होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर पाकिस्तानच्या नियंत्रणाखालच्या काश्मीरच्या तरार खाल परिसरात एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना इम्रान खान यांनी ही भूमिका मांडली.
 
इम्रान खान यांचं सरकार काश्मीरला स्वतंत्र प्रांत बनवण्याच्या विचारात असल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला होता. तोही इम्रान खान यांनी फेटाळला आहे.
 
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) च्या नेता मरियम नवाज यांनी 18 जुलैला पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक प्रचारसभा घेतली होती. त्यात त्यांनी काश्मीरची स्थिती बदलण्यासाठी त्याला स्वतंत्र प्रांत बनवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं.
 
इम्रान खान यांनी मात्र या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. "या सर्व अफवा कुठून येतात, हे मला माहिती नाही,'' असं इम्रान खान म्हणाले.
 
असा एक दिवस नक्की येईल, जेव्हा काश्मीरच्या नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची परवानगी असेल, असं इम्रान खान म्हणाले. त्यादिवशी काश्मीरचे लोक पाकिस्तानात राहण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.