शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , मंगळवार, 16 जानेवारी 2018 (09:51 IST)

पाकिस्तानी तालिबानकडून बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा दावा

pakistani taliban banajir bhutto
पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर एका पुस्तकाच्या माध्यमातून पाकिस्तानी तालिबानने याबाबतचा दावा केला आहे.
 
पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रमुख असणाऱ्या 54 वर्षीय भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 या दिवशी हत्या करण्यात आली. रावळपिंडीत निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्यानंतर त्या आत्मघाती हल्ल्याच्या लक्ष्य ठरल्या. भुट्टो यांच्या हत्येची जबाबदारी प्रदीर्घ काळ कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेवर त्या आत्मघाती हल्ल्याचा ठपका ठेवला. मात्र, पाकिस्तानी तालिबानने तो हल्ला घडवल्याचा इन्कार केला होता.
 
यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्‍या अबू मन्सूर असीम मुफ्ती नूर वली याने लिहिलेल्या पुस्तकातून या संघटनेनेच भुट्टो यांची हत्या घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. इन्किलाब मेहसूद साऊथ वझिरीस्तान- फ्रॉम ब्रिटीश राज टू अमेरिकन इम्पिअरिअलिझम असे संबंधित पुस्तकाचे नाव आहे. ऑनलाईन झालेले हे उर्दू भाषेतील 588 पानी पुस्तक 30 नोव्हेंबर 2017 ला प्रकाशित झाले. पाकिस्तानची सत्ता पुन्हा मिळाल्यास मुजाहिदीनींविरोधात अमेरिकेशी हातमिळवणी करण्याची योजना भुट्टो यांनी आखली होती.
 
या योजनेची माहिती अमेरिकी ड्रोन हल्ल्यात 2009 मध्ये ठार झालेल्या पाकिस्तानी तालिबानचा संस्थापक बैतुल्ला मेहसूद याला मिळाली. त्या योजनेमुळेच भुट्टो यांची हत्या करण्यात आली, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी त्यांना धर्मरक्षक (मुजाहिदीन) म्हणवतात.
 
दरम्यान, बिलाल उर्फ सईद आणि इक्रमुल्ला या आत्मघाती हल्लेखोरांवर भुट्टो यांच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बिलालने प्रथम पिस्तुलातून भुट्टो यांच्यावर गोळीबार केला. त्याने झाडलेली एक गोळी भुट्टो यांच्या मानेत घुसली. त्यानंतर बिलालने अंगावर परिधान केलेल्या स्फोटकांच्या जॅकेट स्फोट घडवला. त्या हल्ल्यानंतर इक्रमुल्ला घटनास्थळावरून निसटला. तो अजूनही जिवंत आहे, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.