मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:22 IST)

लाहोरमधल्या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे, पाकिस्तानचा दावा

लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत या आरोपाचा पुनरुच्चार केलाय. 23 जून रोजी लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि ही घटना घडवून आणण्यासाठी भारतानेच मदत केली, भारताने यासाठी पैसे दिले आणि याचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केलाय.
 
पाकिस्तानने केलेल्या आरोपांना भारत सरकारने तब्बल चार दिवसांनी गुरुवारी (8 जुलै) उत्तर दिलं होतं. पाकिस्तानने भारताबद्दल अपप्रचार करणं नवीन नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी म्हटलं होतं. देशातली परिस्थिती सुधारण्यासाठी आणि दहशतवादाच्या विरोधात ठोस पावलं उचलण्यासाठी पाकिस्तानने इतकेच कष्ट घेतले तर त्याचा जास्त फायदा होईल, असंही बागची म्हणाले.
 
यावर पाकिस्तान सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफिज चौधरी म्हणाले, "भारत पाकिस्तानातल्या दहशतवादाला पाठबळ देतो हे आम्ही याआधीही म्हटलंय. सीमेपलिकडच्या गुप्तचर यंत्रणा पाकिस्तान विरोधातल्या दहशतवादी हल्ल्यांची आखणी करतात आणि ते घडवून आणण्यात सहभागी होतात, यात शंका नाही. 2016मध्ये पकडण्यात आलेले कुलभूषण जाधव हे पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या दहशतवादी मोहिमांचा चेहरा आहेत, यात शंकाच नाहीत"
 
आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार भारत दोषी असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताला जबाबदार ठरवण्यात यावं आणि पाकिस्तानच्या विरोधातल्या या कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जाहिद हाफिज चौधरी यांनी केली आहे. लाहोर हल्ल्याचा कट रचण्यात हात असणाऱ्यांना अटक करण्याचं आवाहन आपण भारताला पुन्हा एकदा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
भारताने काय उत्तर दिलं?
पाकिस्तानाची दहशतवादाबाबतची पत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहित असल्याचं गुरुवारी (8 जुलै) भारत सरकारने म्हटलं होतं. पाकिस्तानच्या दहशतवादाबद्दलच्या भूमिकेविषयी सवाल उपस्थित करत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं होतं, "आता दहशतवादाबद्दल बोलत असेलेले हे लोक अजूनही ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्यांना एखाद्या शहीदाप्रमाणे मानतात."
 
"पाकिस्तानने भारताबद्दल कोणत्याही आधाराशिवाय अपप्रचार करणं, यात काही नवीन नाही. पाकिस्तानने आधी स्वतःचं घर दुरुस्त करावं आणि त्यांच्या भूमीत वाढणाऱ्या दहशतवादावर आळा घालण्यासाठी योग्य पावलं उचलावीत."
 
इमरान खान म्हणतात भारत जबाबदार
लष्कर प्रमुख हाफिज सईदच्या घराबाहेर 23 जूनला झालेल्या स्फोटासाठी भारत जबाबदार असल्याचं यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इमरान खान यांच्यासह अनेक नेत्यांनी म्हटलं होतं.
 
याविषयी एक ट्वीट करत इमरान खान यांनी म्हटलं होतं, "आजच्या लाहोर स्फोटाच्या तपासातून समोर आलेली माहिती देशाला सांगावी अशा सूचना मी माझ्या टीमला दिल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागने वेगाने केलेल्या तपासाचं मी कौतुक करतो. नागरिक आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने त्यांनी ठोस पुरावे मिळवले आहेत."
 
"दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची ओळख पटवण्यात आली आहे. या कटाची आखणी आणि वित्तपुरवठा करण्याशी भारत पुरस्कृत दहशतवादाचा संबंध असल्याचं उघड झालंय. आंतरराष्ट्रीय समुदायाने याविरोधात आंतरराष्ट्रीय संघटनांना एकत्र आणावं."