मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 8 मार्च 2022 (17:26 IST)

युक्रेनमध्ये 'Z' अक्षराची दहशत, कारण...

इंग्रजीतलं शेवटचं अक्षर 'Z' (झेड) सध्या चर्चेत आहे. युक्रेनमधल्या युद्धादरम्यान रशियन फौजा या अक्षराचा वापर करत आहेत. पण हे अक्षर इतकं महत्त्वाचं का बनलं आहे?
 
युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन ट्रक्सवर 'Z' हे अक्षर झळकलं होतं. तेव्हापासून रशियात हे अक्षर युद्धाचं समर्थन करणाऱ्यांचं प्रतीक म्हणून समोर आलं आहे.
 
रशियन जिम्नॅस्ट इव्हान कुलियाकवर तर 'Z' चिन्ह असलेला स्टीकर आपल्या जर्सी वापरल्याबद्दल आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशन (FIG) शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
 
कतारमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदक स्वीकारताना इव्हान पोडियमवर हे चिन्ह परिधान करून गेला होता. विशेष म्हणजे ही स्पर्धा युक्रेनच्या इलिया कोवतूननं जिंकली आणि इव्हान त्याच्या शेजारीच उभा होता.
 
खेळाच्या मंचावर अशा कुठल्याही राजकीय विचाराचं प्रदर्शन करण्यास मनाई असते. या नियमाचा भंग केल्यामुळे इव्हानवर कारवाई सुरू झाली आहे.
 
Z अक्षराचं वैशिष्ट्य काय आहे?
खरंतर रशियन सिरिलिक मूळाक्षरांमध्ये Z हे चिन्ह वापरलं जात नाही. त्याऐवजी झेड या उच्चारासाठी З हे चिन्ह वापरलं जातं. पण बहुतांश रशियन्स रोमन मूळाक्षरं वाचू शकतात.
 
"झेड चिन्हाविषयी विषयी सोशल मीडियावर एवढी चर्चा सुरू झाली आहे, ही गोष्ट रशियाचा जगात कुठे आणि किती प्रभाव आहे, हेही दाखवते आहे," असं मत अग्लाया स्नेतकोव्ह मांडतात. त्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये स्लाव्होनिक आणि पूर्व युरोपियन देशांविषयीच्या तज्ज्ञ आहेत.
 
रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट (RUSI) मध्ये रशिया आणि युरेशियावर संशोधन करणाऱ्या एमिली फेरीस सांगतात, की Z हे चिन्ह लगेच ओळखता येणारं आणि प्रभावशाली चिन्ह आहे.
 
"अनेकदा प्रोपोगँडा (प्रचार) करणाऱ्यांमध्ये अशा साध्या चिन्हांची लोकप्रियता वेगानं वाढते. हे थोडं घाबरवणारं आणि विरोधाभासी आहे. पण सौंदर्यशास्त्राचा किंवा चिन्ह म्हणून विचार केला, तर हे एक प्रभावी चिन्ह आहे."
 
 
 
पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यापासून अगदी पंधरा दिवसांतच हे चिन्ह सगळीकडे पोहोचलं आहे.
 
मध्य रशियाच्या कझान शहरात एका आश्रयकेंद्रात राहणाऱ्या साठ मुलांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या इमारतीबाहेर बर्फात उभं राहून Z हे अक्षर तयार केल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे.
 
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक, राजकारणी मंडळी, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचं समर्थन करणारे लोक या चिन्हाचा वापर करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अगदी सर्बियातही रशियाचं समर्थन करणाऱ्या एका रॅलीमध्ये 'Z' हे अक्षर झळकताना दिसलं.
 
"Z" या चिन्हाचा अर्थ काय आहे?
रशियन फौजांनी 'Z' हे चिन्ह का वापरलं असावं, त्यांच्यासाठी या चिन्हाचा अर्थ काय आहे, याविषयी अनेकांनी कयास लावले आहेत.
 
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक, राजकारणी मंडळी, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचं समर्थन करणारे लोक या चिन्हाचा वापर करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अगदी सर्बियातही रशियाचं समर्थन करणाऱ्या एका रॅलीमध्ये 'Z' हे अक्षर झळकताना दिसलं.
 
"Z" या चिन्हाचा अर्थ काय आहे?
रशियन फौजांनी 'Z' हे चिन्ह का वापरलं असावं, त्यांच्यासाठी या चिन्हाचा अर्थ काय आहे, याविषयी अनेकांनी कयास लावले आहेत.
युक्रेनमध्ये जाणाऱ्या रशियन रणगाड्यांचे फोटो जेव्हा पहिल्यांदा समोर आले, तेव्हा त्यावर हे अक्षर झळकत असल्याचं पहिल्यांदा दिसून आलं.
 
आधी Z हे अक्षर म्हणजे 2 हा आकडा आहे आणि हे अक्षर 22/02/2022 या तारखेचं प्रतीक असावं असा अंदाज लावण्यात आला. याच दिवशी रशियानं युक्रेनच्या दॉन्येस्क आणि लुहांस्कय प्रांतांचा सार्वभौमत्वाचा दावा मान्य केला आणि त्यांच्याशी मैत्री, सहकार्य आणि मदतीचा करार केला होता.
 
पण आता रशियन फौजा आपल्या सैनिकांना ओळखण्यासाठी या चिन्हाचा वापर करत असल्याचं मानलं जातंय.
 
गेल्या आठवड्यात रशियाच्या सरकारी माध्यमांतील चॅनेल-1वरील एका बातम्यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना या चिन्हाविषयी सांगण्यात आलं होतं की, Z हे अक्षर रशियन मालकीच्या लष्करी वाहनांची ओळख पटावी म्हणून वापरलं जातंय.
 
पुतिन यांचं समर्थन करणारी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माच्या पाठीराख्यांच्या झारग्रॅड (Tsargrad) या वेबसाईटनंही पत्रकारांना अशीच माहिती दिली आहे. आपल्याच सैन्यावर चुकून हल्ला टाळण्यासाठी हे अक्षर वापरलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
रशियातील विशेष सैन्यदलातले माजी अधिकारी सर्गेई कुव्हकिन यांनी रशियातील लाईफ मासिकाच्या वेबसाईटला माहिती दिली आहे की सैन्यातील वेगवेगळ्या दलांची ओळख म्हणून अशी चिन्हं वापरली जातात.
 
"चौरसातलं Z अक्षर, वर्तुळातला Z, फक्त नुसताच Z आणि चांदणीतला Z अशी वेगवेगळी अक्षरं वापरली जात आहेत. जे सैनिक थेट संपर्कात नाहीत, त्यांचा ठावठिकाणा नेमका काय आहे, हे ओळखता यावं, यासाठीही अशी अक्षरं वापरली जातायत."
रशियाच्या हवाई दलाची विमानं एवढ्या वेगानं उडतात की अशी धुसर पांढुरकी चिन्हं ओळखणं त्यांच्यासाठी कठीण आहे, असं अटलांटिक काउंसिल थिंक टँकमध्ये काम करणारे अमेरिकेच्या हवाई दलायचे लेफ्टनंट कर्नल टायसन वेट्झेल सांगतात.
 
पण रशियन हेलिकॉप्टर्स आणि रणगाड्यांकडून चुकून आपल्याच सैनिकांवर हल्ला होणं टाळायचं असले, तर असं चिन्ह मदत करू शकतं, असंही ते सांगतात.
 
रशियात या चिन्हाचा प्रसार केवळ सोशल मीडियामुळे आणि उत्स्फुर्तपणे झालेला नाही, असं अगाल्या स्नेतकोव्ह सांगतात. "रशियन सरकारनंही या चिन्हाचा प्रसार केला आहे."
 
रशियातील एक राजकारणी मारिया बुटिना यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे, त्यात झेड हे चिन्हं तुम्ही तुमच्या जॅकेटवर कसं लावू शकता, याविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणतात की तुम्ही हे घालून ऑफिसला जाऊ शकता आणि इतरांना त्याविषयी सांगू शकतात.
पण हे चिन्ह फासिस्ट चिन्ह आहे, असा अर्थ काढू नये, असं अगाल्या सांगतात. "अनेक मीम्समध्ये या झेड चिन्हाची तुलना नाझी स्वस्तिकाशी होते आहे. पण प्रामुख्यानं पुतिन यांच्या विरोधातले लोकच हे करत आहेत."
 
बरं, फक्त झेडच नाही, इतरही काही चिन्हं चर्चेत आहेत. Z प्रमाणेच V हे अक्षरही रशियन सिरिलिक मूळाक्षरांमध्ये नाही. पण रशियन संरक्षण मंत्रालयाच्या इन्स्टाग्राम पोस्ट्समध्ये Z सोबतच V हे अक्षरही दिसून येतं.
 
त्याखाली "Za PatsanoV" (आपल्या मुलांसाठी), "Sila V pravde" (सत्यात ताकद आहे) अशी टिप्पणीही आहे.
 
V हे अक्षर Vostok (व्होस्टोक) म्हणजे पूर्व आणि Z हे अक्षर Zapad (झा-पाड) म्हणजे पश्चिम यासाठी वापरलं जात असावं असाही एक कयास आहे.
 
सोशल मीडियावर अशीही चर्चा आहे की युक्रेनियन सैन्याच्या मते Z हे रशियाच्या पूर्वेकडील फौजांचं चिन्ह आहे, तर V हे त्यांच्या नौदलाचं चिन्ह आहे.
 
Z हे युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासाठी असल्याचाही एक कयास आहे.