1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (22:35 IST)

अमेरिकेचा लष्करी जवान उत्तर कोरियात पळून गेला, धक्कादायक कारण आलं समोर

US Army soldier
US Army soldier escaped to North Korea  दक्षिण कोरियात तैनात असलेला अमेरिकन जवान सीमा ओलांडत उत्तर कोरियात पळून गेल्याची घटना घडलीय. सीमा ओलांडण्यापूर्वी या अमेरिकन लष्करी जवानाला काही आरोपांमुळे दक्षिण कोरियाच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
 
न्यायालयाच्या दस्ताऐवजांवरून असं लक्षात येतंय की सोल पोलिसांच्या कारचं नुकसान त्यानं केलं होतं.
 
ट्रॅव्हिस किंग असं त्याचं नाव आहे. 23 वर्षांच्या ट्रॅव्हिस किंगची नुकतीच सुटका करण्यात आली होती.
 
सुटकेनंतर त्याला अमेरिकेला परत पाठवलं जात होतं. पण विमानतळावरून त्यानं पळ काढला आणि दक्षिण कोरियाच्या गस्त घालणाऱ्या सीमा दलाला चकमा देत तो उत्तर कोरियात पळालाय.
 
सीमा ओलांडण्याचा त्याचा हेतू काय होता,हे अद्याप अस्पष्ट आहे.
 
अमेरिकी अधिकाऱ्यानं असं म्हटलंय की "त्यानं स्वतःच्या इच्छेनं असं केलंय त्याच्या सुरक्षेविषयी आम्ही चिंतित आहोत."
 
PV2 रँकचा हा जवान आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार सोलमधल्या एका नाईट क्लबमध्ये कोरियन नागरिकाला मारहाण करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. 2022 मध्ये दक्षिण कोरियात चौकशी झाली होती.
 
पोलिसांच्या कारच्या लाथ मारणं आणि पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर अश्लिल भाषेचा वापर केल्या प्रकरणी त्याला आर्थिक दंडही ठोठावण्यात आला होता.
 
स्थानिक मीडियानुसार प्राणघातक हल्ल्याच्या आरोपाखाली दोन महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर 10 जुलै रोजी त्याची सुटका करण्यात आली होती.
 
त्याच्या सुटकेनंतर त्याला दक्षिण कोरियामध्ये सुमारे एक आठवडा लष्कराच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेला परत पाठवण्यासाठी त्याला राजधानी सोलच्या इंचेऑन विमानतळावर नेण्यात आलं होतं. अमेरिकेला पोहचल्यावर यूएस लष्कराच्या शिस्तभंगाच्या कारवाईला त्याला सामोरं जावं लागणार होतं.
 
'द कोरियन' टाइम्सनं विमानतळाच्या एका अधिकाऱ्याचा हवाल्यानं म्हटलंय की, “तो एकटाच बोर्डिंग गेटवर पोहचला होता कारण लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांना विमानात त्याच्या सोबत जाण्याची परवानगी नव्हती.”
 
गेटवर त्यानं अमेरिकन एयरलाईन्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पासपोर्ट गहाळ झाल्याचा दावा केला. त्यानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रस्थान करण्याच्या भागातून बाहेर नेलं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेआड होत तो डिमिलिटराईज्ड झोन(DMZ) चा फेरफटका मारण्यासाठी गेल्याचं समोर आलंय. जिथं परदेशी पर्यटक टूर कंपन्यांसोबत भेट देऊ शकतात.
 
ट्रॅव्हिस किंग या टूरवर कसा पोहचला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. कारण एखाद्या व्यक्तीला या सहलीसाठी परवानगी मिळण्यासाठी तीन दिवस ते एक आठवड्याचा कालावधी लागतो.
 
सुरक्षेच्या कारणास्तव बारकाईनं निरीक्षण करून त्या व्यक्तीला परवानगी मिळते.
 
या सीमा दौऱ्यातील एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, सीमेपलीकडे धाव घेण्यापूर्वी हा सैनिक मोठ्यानं हसत होता.
 
अमेरिकेकडून सांगण्यात आलं की, आमचा विश्वास आहे की अमेरिकन लष्करी जवान उत्तर कोरियाच्या ताब्यात आहे.
 
एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलं की, या लष्करी जवानाशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यानं सांगितलं की यूएस फोर्स कोरियाकडून याची चौकशी केली जातेय.