1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (15:41 IST)

अमेरिका निवडणूक 2020 : शांततेत सत्ता हस्तांतरास डोनाल्ड ट्रंप तयार नाहीत?

US Election 2020
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत आपण हरलो तर सत्तेचं शांततापूर्ण हस्तांतरण करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नकार दिला आहे.
 
"ठीक आहे. काय होईल बघूया. ते तुम्हाला माहीतच आहे," असं वक्तव्य ट्रंप यांनी व्हाईटहाऊसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत केलं.
 
यावेळी ट्रंप यांनी मतपत्रिकेबाबत, विशेषतः पोस्टल मतांबाबत काळजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या मतदानात फसवणूक होण्याची जास्त शक्यता असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं.
 
अमेरिकेत बहुतांश ठिकाणी मेल-इन प्रकारचे मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे. अनेक राज्य या गोष्टीला प्रोत्साहन देत असून कोरोना व्हायरसच्या काळात लोकांनी आपल्या घरातून बाहेर न पडता मतदान करावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
बुधवारी (23 सप्टेंबर) संध्याकाळी ट्रंप यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
 
निवडणुकीत पराभूत झाल्यास डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण पद्धतीने केलं जाईल का, असा प्रश्न यावेळी एका पत्रकाराने विचारला.
 
याला उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "मी मतपत्रिकांबाबत सातत्याने तक्रार करत आलो आहे. अशा पद्धतीने मतदान घेणं नुकसानीचं ठरू शकतं."
 
यावर पत्रकाराने देशात दंगली होत असल्याबाबत प्रश्न विचारला. याला मध्येच तोडताना ट्रंप यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचं सांगितलं. "पोस्टाद्वारे मतदान झालं नाही तर सर्व शांततेच होईल, स्पष्ट सांगायचं तर मी सत्ता कायम राखीन."
 
2016 ला झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध डेमोक्रेटीक पक्षाच्या हिलरी क्लिंटन उभ्या होत्या. या निवडणुकीत आपला पराभव झाल्यास तो निकाल आपण स्वीकारणार नाही, अशी भूमिका ट्रंप यांनी घेतली होती. हा म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत त्यावेळी क्लिंटन यांनी नोंदवलं होतं.
 
अखेर, या निवडणुकीत विजय मिळवून डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.
 
या निवडणुकीत ट्रंप यांना तीस लाख मतं (पॉप्यूलर व्होट्स) कमी मिळाली होती. या निकालाबाबत ट्रंप यांना अजूनही संशय आहे.
 
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींचं पद रुथ बेडर गिन्सबर्ग यांच्या निधनानंतर रिक्त आहे. हे पद भरण्याच्या निर्णयाचीही ट्रंप यांनी पाठराखण केली. शिवाय, निकाल आल्यानंतर कदाचित कोर्टात जाण्याची वेळ येऊ शकते, असंही ट्रंप म्हणाले.
 
"या निवडणुकीचा शेवट कोर्टात होईल आपल्याकडे नऊ न्यायमूर्ती आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. कारण डेमोक्रेटीक पक्ष निवडणुकीत घोटाळा करण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचायलाच हवं."
 
डोनाल्ड ट्रंप यांचा रोख सातत्याने वादग्रस्त अशा मेल-इन मतांकडेच होता. याठिकाणी फसवणूक होण्याला वाव असल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे.
 
न्यायमूर्तींच्या रिक्त पदासाठी महिला उमेदवार सुचवणार असल्याचं ट्रंप यांनी यांनी सांगितलं.
 
ट्रंप यांच्या उमेदवाराला मान्यता मिळाल्यास कोर्टातील संख्याबळ ट्रंप यांच्या बाजूने 6-3 प्रमाणात असू शकतं, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.