मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (17:02 IST)

IPL 2022 चे 9 कठोर नियम, बायोबबलचा नियम तोडला तर 1 कोटीचा दंड

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामासाठी नव्याने नियम तयार करण्यात आले आहेत. 'डीआरएस' ते सुपर ओव्हर यासारख्या अन्य नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे यंदाचा हंगाम आणखी रोमांचक होणार आहे.
 
'आयपीएल'च्या हंगामाला 26 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
 
1.बायोबबलचा भंग तर कोटी रुपयांचा दंड
आयपीएल'च्या बायोबबलमध्ये समाविष्ट असलेले खेळाडू, सामनाधिकारी, मार्गदर्शक आणि कुटुंबीय यांच्याकडून त्याचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
 
पहिल्या चुकीसाठी कारवाई : बायोबबलमध्ये कुणीही बाहेरील व्यक्तीस प्रवेश देण्यात आला तर एक कोटी रुपये दंड म्हणून आकारण्यात येतील. या पार्श्वभूमीवर संबंधिताला सात दिवसांचं पुन्हा विलगीकरण करावं लागेल. विलगीकरणाच्या कालखंडात संबंधित व्यक्ती जेवढ्या लढतींमध्ये खेळू शकणार नाही, त्यांचं मानधनसुद्धा वजा केलं जाईल.
दुसऱ्या चुकीसाठी कारवाई : दुसऱ्या चुकीसाठी त्या व्यक्तीला एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली जाईल. या सामन्याचे मानधनही वजा होईल. संघाच्या एकूण गुणांमधून एक किंवा दोन गुण वजा करण्यात येतील.
 
तिसऱ्या चुकीसाठी कारवाई : संबंधित व्यक्तीस उर्वरित हंगामासाठी त्याच्या संघातून वगळण्यात येईल. त्याच्या जागी बदली खेळाडू/मार्गदर्शक संघाला मिळणार नाही.
 
2. खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही कठोर नियम
आयपीएल'च्या सामन्यांसाठी खेळाडू आणि मार्गदर्शकांसमवेत पत्नी-प्रेयसी आणि मुलं सोबत राहण्यास परवागी असते. परंतु कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे त्यांच्यावरही बंधने लादण्यात आली आहेत.
 
या कौटुंबिक सदस्यांकडून पहिल्यांदा परिघाचं उल्लंघन झाल्यास खेळाडू आणि कुटुंबाला सात दिवसांचं विलगीकरण पुन्हा करावे लागेल.
 
पंच, मार्गदर्शक आणि अन्य अधिकाऱ्यांसाठीही सारखीच कारवाई होईल. दुसऱ्यांदा चूक झाल्यास संबंधित कौटुंबिक सदस्याची बायोबबलमधून हकालपट्टी करण्यात येईल. याशिवाय क्रिकेटपटूला आणखी सात दिवसांच्या विलगीकरणाला सामोरं जावं लागणार.
 
3. कोरोना चाचणी चुकवल्यास
बायोबबलमध्ये नियमित कोरोना चाचण्या करून घेणं सर्वांना बंधनकारक असेल. पहिल्यांदा चूक झाल्यास ताकीद दिली जाईल, दुसऱ्यांदा चूक घडल्यास 75 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. याचप्रमाणे स्टेडियम किंवा सरावाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
 
4.कोरोनाची लागण झाल्यास
'बीसीसीआय'ने सर्वांत मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) 12 तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, 'बीसीसीआय' सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसं शक्य न झाल्यास 'आयपीएल'ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.
 
5.प्रत्येक डावात संघांना दोन 'डीआरएस'
मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (एमसीसी) सुचविण्यात आलेल्या नियमाला पाठिंबा देत 'बीसीसीआय'ने 'आयपीएल' सामन्यात एकूण चार 'डीआरएस'चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक डावात दोन्ही संघांना दोन-दोन 'डीआरएस'चा वापर करता येणार आहे.
 
6. झेलनंतर नवीन फलंदाज फलंदाजीला
'बीसीसीआय'ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या 'आयपीएल'मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल.
 
7. सुपर ओव्हर 'टाय' झाल्यानंतरही विजेता
'आयपीएल'साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील 'टाय' (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे.
याचा अर्थ अंतिम फेरीतील दोन संघामधील जो संघ साखळीच्या गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असेल, त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.
 
8.चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी
लकाकी मिळवण्यासाठी चेंडूला लाळ लावता येणार नाही. कोरोना काळात खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क कमीत कमी असावा तसंच जंतूंचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गोलंदाज चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करतात. अनेक गोलंदाज गोलंदाजी करतात तसंच चेंडू असंख्य क्षेत्ररक्षणांकडे जातो.
 
एकाच्या लाळेत विषाणू असल्यास त्याचा त्रास अन्य खेळाडूंना होऊ शकतो. खेळाच्या माध्यमातून चेंडू फलंदाजांकडे तसंच तपासणी/परीक्षणासाठी अंपायर्सकडेही जातो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
 
9.नवीन संरचना
यंदा आयपीएल 8 नव्हे तर 10 संघांची असणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या संरचनेत बदल झाला आहे. 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
 
प्रत्येक संघाचे आपल्या गटातील सर्व संघांशी प्रत्येकी दोन सामने होतील तसंच दुसऱ्या गटातील आपल्या ओळीत असलेल्या संघाशी 2 तर अन्य चार संघांशी प्रत्येकी एकेक सामना होईल.
 
उदाहरणार्थ आयपीएलने निश्चित केलेल्या रचनेनुसार मुंबई आणि चेन्नई भिन्न गटात आहेत पण एकाच ओळीत आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ दोनदा एकमेकांशी खेळतील.