मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:39 IST)

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपचं जगभरात 6 तासांचं आऊटेज, सेवा सुरळीत पण..

तब्बल 6 तासांच्या Outage म्हणजे बंद पडल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
 
या तीनही सेवा फेसबुकच्या मालकीच्या आहेत. सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या तीनही सेवा बंद पडल्या. जगभरात वेबसाईट वा स्मार्टफोनद्वारे या सेवा वापरता येत नव्हत्या.
 
आतापर्यंतचं या सेवांचं हे सर्वांत मोठं आऊटेज (Outage) म्हणजेच खंडित राहण्याचा काळ असल्याचं डाऊनडिटेक्टर (Downdetector) या सेवांच्या आऊटेजवर लक्ष ठेवणाऱ्या गटानं म्हटलंय. जगभरातल्या तब्बल 10.6 दशलक्ष लोकांनी या काळात आपल्याला सेवा वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली.
 
2019मध्ये फेसबुकला अशाच प्रकारच्या मोठ्या आऊटेजला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी फेसबुक आणि त्यांच्या मालकीची इतर अॅप्स जवळपास 14 तास बंद पडली होती.
 
तब्बल 6 तासांनंतर या तीनही साईट्स सुरू झाल्या आहेत. पण 100% सेवा सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याचं सांगण्यात आलंय.
 
फेसबुकने ट्वीट करत या आऊटेजबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
पण या आऊटेजमागचं कारण काय होतं, हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

दरम्यान ट्विटर, रेडिट (Reddit) यासारख्या इतर सोशल मीडिया नेटवर्कनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला बंद पडल्याबद्दल कोपरखळी दिली. आणि या नेटवर्क्सनी त्याला उत्तरही दिलं.
फेसबुक आणि त्यांच्या मालकीच्या दोन इतर सेवा जगभरात बंद पडल्याने या आऊटेजचा फटका कोट्यवधी युजर्सना बसला. अनेकांनी ट्विटरवरून आपल्याला येणाऱ्या अडचणी मांडल्या.