ट्विटरवर आता ब्ल्यू टिक हवं असल्यास महिन्याला आठ डॉलर म्हणजे अंदाजे 650 रुपये मोजावे लागतील असं ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी सांगितलं आहे.
इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचा ताबा घेतला आहे. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी हे सगळे उपाय महत्त्वाचे आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
ट्विटरवर असलेले अनेक उच्चपदस्थ लोक ब्लू टिकचा वापर करतात. ही सेवा सध्या मोफत आहे.
फी आकारल्यामुळे विश्वासार्ह लोक शोधणं कठीण जाईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
मस्क जगातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती आहेत. पैसे देणाऱ्या व्यक्तींना रिप्लाय आणि सर्चमध्ये फायदा होईल. तसंच जाहिरातीसुद्धा कमी प्रमाणात दिसतील.
"आठ डॉलरमध्ये ब्लू टिक. लोक अधिक सशक्त होणार," असं त्यांनी ट्वीट केलं आहे. ब्लू टिक मिळण्याची आधीची प्रक्रिया सावकारी प्रकारची होती अशी टीका त्यांनी केली आहे.
ट्विटरवर ब्लू टिक घेण्यासाठी आतापर्यंत युझर्सला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. सेलिब्रिटी, राजकीय नेते, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ते राखून ठेवण्यात येतं.
कंपनीने ही पद्धत 2009 साली आणली होती. खोट्या अकाऊंटवर आळा आणण्यासाठी कंपनी पुरेसे उपाय करत नाही असा आरोप झाल्यावर ट्विटरने ही उपाययोजना केली होती.
ट्विटरचा ताबा घेतल्यावर मस्क यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. गेली अनेक वर्षं ट्विटर तोट्यात आहे.
जाहिरातींवरचं अवलंबित्व कमी करण्याचा मस्क यांचा मानस आहे. मस्क यांच्या नेतृत्वात ट्विटरवरील जाहिरातीचं काय होणार याविषयी अनेक कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
जनरल मोटर्स मस्क यांच्या टेस्ला कंपनीची कट्टर स्पर्धक आहे. त्यांनी ट्विटरवरच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत.
काही इतर कंपन्यांनी सुद्धा ट्विटरवरच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. जाहिरातीच्या मुद्द्यावर मस्क काय भूमिका घेतात यावर त्यांचं लक्ष लागलं आहे, असं एका माध्यमतज्ज्ञाने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
IPG या आघाडीच्या जाहिरात कंपनीने त्यांच्या क्लायंट्सला एका आठवड्यासाठी ट्विटरवर जाहिराती न देण्याचं आवाहन केलं आहे.
सुरक्षा आणि विश्वासार्हता याविषयी ट्विटर काय पावलं उचलतं याबद्दल एक स्पष्ट चित्र निर्माण होण्याची वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. IPG या कंपनीला अनेक मोठ्या कंपन्या वर्षाकाठी अब्जावधी रुपये जाहिरातीसाठी देतात.
ब्लू टिकसाठी 20 डॉलर (1600 रुपये) असेल अशा बातम्या आधी आल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी ट्विटरवर टीकेची झोड उठवली.
या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग यांनी ट्विटरवर लिहिलं की मस्क यांनी खरंतर मलाच पैसे द्यायला हवेत असं लिहिलं होतं.
त्यावर मस्क म्हणाले, "आम्हालाही बिलं भरावी लागतात."
Published By -Smita Joshi