1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (10:03 IST)

Elon Musk इलॉन मस्क यांचं पुण्यात ऑफिस उघडणार

Elon Musks narendra modi
ANI
उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्लाने पुण्यात ऑफिससाठी जागा घेतली आहे. पुण्यातील विमाननगर भागातील पंचशील बिझनेस पार्कमध्ये ऑफिससाठी भाड्याने ही जागा घेण्यात आली आहे.
 
1 ऑक्टोबर 2023 पासून टेस्लाच्या ऑफिसचं कॉन्ट्र्रॅक्ट सुरु होणार आहे.
 
पुण्यातील विमाननगर भागात पंचशील बिझनेस पार्क ही मोठी इमारत असून या इमारतींमध्ये टेस्ला व्यतिरिक्त इतरही मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत.
 
टेस्लाला जागतिक दर्जाचे निकष त्यांच्या ऑफिससाठी हवे होते, असं पंचशील रिअल्टीचे एक्झिक्यूटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट नितीन लाहोटी यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगतिलं.
 
“आफिस बघताना टेस्लाला जागतिक दर्जाच्या आफिसचे निकष पूर्ण करेल असं आफिस हवं होतं. आमच्याकडे त्या सगळ्या सुविधा असलेल्याने त्यांनी ही जागा निवडली. आमच्याकडून टेबलस्पेस या कंपनीने आणि त्यांच्याकडून टेस्लाने करार करुन ही जागा भाड्याने घेतली आहे,” असं नितीन लाहोटी यांनी सांगितलं.
 
टेस्लाची भारतातली उपकंपनी असलेल्या टेस्ला इंडिया मोटार अँड एनर्जीकडून ही साधारणपणे 5 हजार 600 स्क्वेअरफूटची जागा भाड्याने घेण्यात आलेली आहे.
 
हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, टेस्ला 60 महिन्यांसाठी मासिक 11.65 लाख रुपये भाडं आणि 34.95 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरणार आहे. त्यात असंही म्हटलं आहे की, रिअल इस्टेट ऍनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सने यासंदर्भातले कागदपत्र मिळवली आहेत.
 
त्यानुसार हा भाडेकरार 26 जुलै 2023 रोजी झालेला आहे. या करारानुसार भाडेकरारात पाच कार आणि 10 दुचाकी पार्किंगचा समावेश असेल.
 
कागदपत्रांनुसार, दोन्ही कंपन्यांनी वार्षिक 5% वाढीच्या कलमासह 36 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसाठी सहमती दर्शविली. हे भाडे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे, असं हिंदुस्तान टाईम्सने म्हटलेलं आहे.
 
बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, टेस्लाला कार चार्जिंगची सुविधा, फुड कोर्ट, डे केअर सेंटर यांसारख्या सुविधा हव्या होत्या. तसंच टेस्लाने पुण्याच्या इतर भागातही आँफिस जागा पाहिली.
 
ऑफिससाठी पुण्याव्यतिरिक्त चेन्नईचाही विचार सुरु होता. कंपनीच्या गरजांचा विचार करुन ही जागा निश्चित करण्यात आल्याचं पंचशील बिझनेस पार्ककडून सांगण्यात आलं.
 
टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांची मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट झाली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले तेव्हा ही भेट झाली.
 
मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी चर्चा केली आणि त्यांच्या भेटीबद्दल सविस्तर सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की ते भारताचा दौरा कधी करतील.
 
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी सर्वांत आधी हे म्हटलं की, ते भारताच्या भविष्याबद्दल उत्साही आहेत आणि त्यांना वाटतं की सगळ्या जगात भारत असा देश आहे जिथे (प्रगतीच्या) अधिक संधी आहेत.
 
इलॉन मस्क आधीही हे म्हटलेत की त्यांना भारतीय बाजारात त्यांना त्यांची इलेक्ट्रिक कार टेस्ला आणण्यात रस आहे.
 
एका पत्रकाराने त्यांना विचारलं की भारतात गुंतवणूक करण्याबद्दल त्यांच्या काय योजना आहे आणि ते भारतात कोणत्या प्रकारची गुंतवणूक करू इच्छितात?
 
याचं उत्तर देताना मस्क यांनी म्हटलं की, “शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात भारतात खूप संधी आहेत. शाश्वत ऊर्जेचा महत्त्वाचा प्रकार आहे पवन ऊर्जा. त्यासाठी इथे खूप संधी आहेत. पवनऊर्जेतून तुम्ही वीज निर्मिती करू शकता.”
 
त्याबरोबरच मस्क यांनी आपली इंटरनेट कंपनी स्टारलिंक भारतात आणण्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. ते म्हणाले, “आम्ही स्टारलिंक भारतात घेऊन जाण्याबद्दल विचार करत आहोत. याचा फायदा भारतातल्या त्या दुर्गम भागातल्या गावाखेड्यांना फायदा होईल जिथे इंटरनेट नाहीये किंवा इंटरनेटचा स्पीड खूपच कमी आहे.”
 
मस्क भारतात येणार का? मोदींनी त्यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी त्यांना आमंत्रण दिलं आहे आणि ते पुढच्या वर्षी भारताचा दौरा करतील.