शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified सोमवार, 26 एप्रिल 2021 (22:02 IST)

#MahaCovid हॅशटॅगद्वारे ट्विटरवर मराठीजनांचा मदतीचा हात

-जान्हवी मुळे
 
आजकाल आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, कुठल्याही सोशल मीडियावर गेलो, की तिथेही आसपास कोव्हिडनं निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
 
त्यातच अनेकजण मदतीसाठी साद घालताना दिसतात. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, कुणाला औषधं कुठे मिळतात हे माहिती नाही, कुणाला ऑक्सिजन हवा आहे, तर कुणाला रुग्णासाठी जेवण कुठे मिळेल याची माहिती हवी आहे.
 
मदतीसाठी याचना करणाऱ्या अशा पोस्ट्सबरोबरच मदतीचा हात देणारेही अनेक आहेत. या सगळ्यांची एकमेकांशी गाठभेट घालून देण्यासाठी काही मराठी नेटिझन्सनी एकत्र येत नवी चळवळ सुरू केली आहे. तिचं नाव आहे #MahaCovid.
 
 
ही चळवळ नेमकी काय आहे आणि तिथे तुम्ही मदत कशी मागू शकता, याविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
 
असा सुरू झाला महाकोव्हिड हॅशटॅग
ट्विटरचा वापर करणाऱ्यांना तिथली काही प्रसिद्ध मराठी ट्विटर हँडल्स पाहिली असतील. ही हँडल्स आणि त्यामागचे चेहरे एकत्र आले आणि त्यांनी लोकांना संपर्क साधण्यासाठी सोयीचा दुवा म्हणून #MahaCovid ची सुरुवात केली आहे.
 
त्यामध्ये मराठी आरटी, मराठी ब्रेन (मराठी विश्वपैलू), पुणेरी स्पीक्स, रोहित दलाल (आयएम शांतनू), किरण जाधव, मानसी फुले, नितिन सोनवणे, सँडी शिंदे, तितिक्षा चितळे, शुभम जटाल, शुभम लाड, दीपक चव्हाण, पौर्णिमा पवार, पूर्वा आणि राजेश दलाल यांचा समावेश आहे.
 
या सगळ्यांनी मग ट्विटरवर जाहीर केलं की तुम्हाला कसली मदत हवी असेल, तर तशी मागणी #MahaCovid हा हॅशटॅग आणि तुमच्या शहराच्या हॅशटॅगसह पाठवा. काही तासांतच आठ हजारांहून अधिक ट्‌विटस पडले आणि हॅशटॅग भारतात ट्रेंडही होऊ लागला.
 
शंतनू सांगतात, "आपण मदत आपल्या महाराष्ट्रासाठी करणार आहोत, त्यामुळे #MahaCovid अशा हॅशटॅग ठरवण्यात आला. डेटा गोळा होऊ लागला आणि ऑटोमेशनमुळे गोष्टी हळू हळू प्रत्येकाला निर्देश देणं सोपं होऊ लागलं. लोकाना बेड्स, इंजेक्शन, व्हेंटिलेटर्स मिळण्यात मदत होऊ लागली.
 
"बऱ्याच जणांचे पेशंटची तब्येत सुधारते आहे असेही अपडेट्स येऊ लागले.. आमच्यापैकी काहींनी शक्य असेल तसं नजीकच्या हॉस्पिटलमध्ये वैयक्तिक भेटी ही दिल्या."
 
अनेक सेलिब्रिटींनीही हा हॅशटॅग आपणाहून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरूवात केली. तर अधिकारीवर्ग आणि तज्ज्ञही आपल्याकडची माहिती शेअर करताना हा हॅशटॅग वापरत आहेत.
 
एरवी सोशल मिडिया म्हणजे फक्त मौज मजा करण्याची किंवा एकमेकांवर चिखलफेक करण्याची जागा असा समज असतो. पण संकटकाळात अनेकदा सोशल मीडियावरून घातलेली साद लवकर मदत मिळवून देते, असा अनुभव जगभरात अनेकांना आला आहे.
 
महाराष्ट्रातही वादळ, पूर अशा संकटांच्या काळात लोकांनी असे हॅशटॅग्ज वापरून एकमेकांना मदत केली होतती. यावेळी संकट मोठं आहे आणि ट्विटरवरचे सगळे मराठीजन एकत्र येऊन एकमेकांना मदत करताना दिसत आहेत.
 
#MahaCovid वापरून मदत कशी मिळवायची?
कुणाला मदत हवी असेल तर ते या हॅशटॅगचा वापर कसा करू शकतात, याविषियी आम्ही शंतनू यांनी माहिती दिली आहे.
 
कोव्हिडसंदर्भात बेड / ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर कोणत्याही गोष्टी मिळविण्यात अडचण येत असेल तर तुमचे प्रश्न किंवा माहिती ट्वीट करा आणि सोबत #MahaCovid तसंच #Sosशहराचेनाव असे हॅशटॅग जोडा.
हॅशटॅगमुळे तुमची हाक ट्विटरवरच्या सक्रिय मित्रांपर्यंत पोहोचेल व आपणांस लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यात सहकार्य करणे सोपे जाईल.
ज्यांच्याकडे माहिती आहे, त्यांनीही ती या हॅशटॅगसह ट्विट करावी.
तुम्ही ट्विटवर ह#MahaCovid हा हॅशटॅग आणि तुमच्या शहराचं नाव सर्च केलंत, तरी तिथे महत्त्वाची माहिती मिळू शकते.
ज्यांची गरज पूर्ण होत गेली त्यांनी मदत मागणारे ट्विट्स डिलिट करावेत, म्हणजे पुन्हा पुन्हा ते नजरेस पडणार नाहीत.
मदतीची विनंती किंवा माहिती वगळता इतर गोष्टींमध्ये हा हॅशटॅग वापरणं टाळावं.