4 जी इंटरनेटसाठी जिओ थेट सॅटेलाईटची मदत घेणार
खेड्यापाड्यात आणि दूर अंतराच्या ठिकाणीही 4 जी इंटरनेट सेवा मिळण्यासाठी रिलायन्स जिओ आता थेट सॅटेलाईटची मदत घेणार आहे. ईस्त्रा आणि ह्यूग्स कम्युनिकेशनच्या मदतीने जिओ लवकरच सॅटेलाईट आधारित इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू करणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ 400 हून अधिक एलटीई साईट्सला जोडणार आहे. या साईट्स सध्याच्या नेटवर्क कनेक्शनच्या बाहेर आहेत. जिओ या साईट्सच्याजवळ सॅटेलाईट सेटअप उभारणार असून त्यासाठी ह्यूग्स कम्युनिकेशनला 10 मिलीयन डॉलरचे कंत्राट देण्यात आले आहे. हिंदुस्थानातील टेलिकॉम कंपन्या टॉवर्सला जोडण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करती होती. कारण फायबर ऑप्टिक्सद्वारे कनेक्शन जोडणे खूपच महागात पडू शकते. मात्र डोंगराळ भागात या मायक्रोवेव्ह कनेक्शनही खूपच तापदायी ठरते. त्यामुळे जिओने ग्रामीण भागात नेटवर्कसाठी सॅटेलाईटचा ऑप्शन आणला आहे.
ह्यूग्ससोबत भागिदारी करणाऱया जिओने मुंबई आणि नागपूर येथे दोन अर्थ स्टेशन सुरू करण्याची योजना आखली आहे. तसेच लेह आणि पोर्ट ब्लेअरमध्ये मिनी हब सुरू होणार असून याद्वारे लेह, लडाख, अंदमान, लक्ष्यद्वीपमध्ये चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.