गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (20:35 IST)

सुंदर पिचाईः 'या' दोन गोष्टींमुळे जगात क्रांती घडेल, गूगलच्या सीईओंनी व्यक्त केले मत

अमोल राजन
जगभरात इंटरनेटच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं मत गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं आहे.
 
अनेक देश माहितीच्या प्रवाहात अडथळा आणत आहेत आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला गांभीर्यानं घेतलं जात नाही असंही पिचाई म्हणाले आहेत.
 
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पिचाई यांनी प्रायव्हसी, डेटा आणि करांसदर्भातील वादावर मतं मांडली.
 
आग, वीज किंवा इंटरनेटच्या शोधामुळे झालेल्या बदलांपेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होणारे बदल जास्त प्रभावी असतील असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
 
चीनच्या इंटरनेट मॉडेलचं काय?
या मुलाखतीत पिचाई यांना चीनच्या इंटरनेट मॉडेलबद्दल विचारण्यात आलं. या प्रणालीमध्ये सरकारकडे जास्त ताकद असून त्यात सर्व हालचालींवर कडक लक्ष ठेवलं जातं.
 
पिचाई यांनी उत्तर देताना चीनचं नाव न घेता स्वतंत्र आणि मुक्त इंटरनेटवर "हल्ले केले जात आहेत" असं विधान केलं. अर्थात त्यानंतर ते, "आमची प्रमुख उत्पादनं आणि सेवांमधील काहीही चीनमध्ये उपलब्ध नाही," असंही ते म्हणाले.
 
'दोन गोष्टींनी येणार क्रांती'
येत्या 25 वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कंप्युटिंग या दोन गोष्टी क्रांती घडवतील असं पिचाई यांचं मत आहे.
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलताना ते म्हणाले, "मानवतेने तयार केलेले सर्वांत चांगले तंत्र अशा दृष्टीने मी त्याकडे पाहातो."
 
"तुम्ही आग, वीज किंवा इंटरनेटच्या बाबतीत आता जे विचार करताय तसंच होणार आहे. मला वाटतं त्यापेक्षाही चांगलं."
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम ही माणसांसारखी काम करण्यासाठी तयार केली जाते. एखादी विशेष समस्या सोडवण्यासाठी तिची निर्मिती केली जाते. आताही अशा अनेक सिस्टिम्स कार्यरत आहेत.
 
क्वांटम कंप्युटिंग ही पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. साधारणतः कंप्युटिंग बायनरीवर आधारित आहे : 0 किंवा 1. त्याच्यामध्ये काहीही असत नाही. त्याला बिट्स म्हटलं जातं.
 
क्वांटम कंप्युटट क्यूबिट्सवर काम करतो. यामध्ये एका पदार्थाला एकावेळेस एकाच स्थितीत राहाण्याची शक्यता तयार होते. हे समजणं थोडं कठीण आहे पण यामुळे जगात मोठे बदल होऊ शकतात.
 
अर्थात पिचाई यांच्यासह तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञांच्यामते हे सर्वत्र कामास येतील असे नाही.
 
टॅक्स संबंधित प्रकरणांवर पिचाई काय म्हणाले?
टॅक्स संबंधित प्रकरणांवर गूगलची प्रतिक्रिया बचावात्मक राहिली आहे.
 
आपली टॅक्सची देयके कमी करण्यासाठी गूगलने गेली अनेक वर्षं अकाउंटंट्स आणि वकिलांना भरपूर फी दिलेली आहे.
 
2017 साली गूगलने आपल्या 'डबल आयरिश, डच सँडविच' नावाच्या रणनितीअंतर्गंत एका डच शेल कंपनीच्या माध्यमातून 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम बर्म्युडाला पाठवली होती.
गूगल आता या स्कीमचा वापर करत नाही आणि गूगल जगातील सर्वांत मोठ्या करदात्यांपैकी एक आहे असं पिचाई म्हणाले.
 
गूगल ज्या देशात आहे तिथल्या कर कायद्यांचे पालन करते असं ते म्हणाले. 'कॉर्पोरेट ग्लोबल मिनिमम टॅक्स'वर होत असलेल्या चर्चेबाबत आपण उत्साही आहोत असंही ते म्हणाले.
 
कंपनीने गेल्या दशकात एकूण कमाईच्या 20 टक्के रक्कम करातून दिली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत हे जात आहे. यातला बहुतांश कर अमेरिकेत दिला जातो.
 
डेटा आणि प्रायव्हसी तसेच सर्चच्या क्षेत्रामध्ये एखाधिकार अशा अनेक मोठ्या मुद्द्यांचा गूगल सामना करत आहे.
 
एकाधिकारावर बोलताना पिचाई यांनी असं मत मांडलं की गूगल हे मोफत उत्पादन आहे आणि यूजर्स सहज दुसरे उत्पादन वापरू शकतात. फेसबूकनेही असाच तर्क यापूर्वी मांडला आहे.
 
'माझ्या आत भारत वसलाय'
तुम्ही अमेरिकन आहात की भारतीय असं विचारल्यावर ते म्हणाले, "मी अमेरिकेचा नागरिक आहे आणि माझ्या आत भारत वसला आहे. आणि तो माझा महत्त्वाचा भाग आहे."
 
सुंदर पिचाई कोण आहेत?
सुंदर पिचाई यांचा प्रवास विलक्षण आहे. आणि त्यांनी गुगलचं सर्वेसर्वा होणं म्हणजे भारतीयांच्या आयटी क्षेत्रातल्या दबदब्याचं लक्षण आहे. त्याबरोबरीने अमेरिकेत आयटी इंडस्ट्रीत कर्तृत्व असलेल्याला आपली स्वप्नं साकार करता येतात याचं प्रतीक आहे.
 
पिचाई यांचा जन्म तसंच शालेय शिक्षण तामिळनाडूमधल्या चेन्नईमध्ये झाला. त्यांना लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या शाळेच्या टीमने अनेक स्पर्धा जिंकल्या.
 
त्यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटालर्जी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांच्या एका शिक्षकांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं होतं की, 'ते त्यांच्या बॅचमधले सगळ्यांत हुशार विद्यार्थी होते.'
 
त्यांनी 2004 साली गुगल कंपनी जॉईन केली. गुगलचं वेब ब्राऊजर, गुगल क्रोम, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमसारख्या गोष्टी त्यांच्या देखरेखीखाली बनल्या.
 
अँड्रॉइड जगातली सगळ्यांत प्रसिद्ध मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण ही सिस्टीम बनवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या सुंदर पिचाईंच्या चेन्नईतल्या घरी 12 वर्षांपूर्वी साधा टेलिफोन नव्हता हे सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही.