गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (15:52 IST)

फेसबुकच्या इतिहासात शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण

फेसबुकच्या शेअर्सच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कंपनीचं भांडवली बाजारातील मूल्य किंवा भागधारकांच्या शेअर्सचे बाजारमूल्य तब्बल 125 अब्ज डॉलर्सनं घसरलं असून अमेरिकेच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. फेसबुकच्या शेअरची गत बघून तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अन्य कंपन्यांच्या शेअर्सचीही विक्री झाली व त्यांना फटका बसला आहे. आत्तापर्यंतच्या फेसबुकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे.  
 
अॅपलच्या शेअरचा भाव एक टक्क्यानं तर अॅमेझॉनच्या शेअरचा भाव 2.3 टक्क्यांनी घसरला. नेटफ्लिक्सचा शेअर तीन टक्क्यांनी घसरला असून गुगलच्या पेरेंट कंपनीचा अल्फाबेटच्या शेअरचा भावही 2.4 टक्क्यांनी पडला आहे. ट्विटर व स्नॅपचे शेअरही प्रत्येकी चार टक्क्यांनी घसरले आहेत. या सगळ्याची सुरूवात फेसबुकने गेल्या तिमाहीतल्या अॅक्टिव्ह युजर्सची माहिती दिल्यानंतर झाली.
 
दररोजच्या अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत गेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्याचे फेसबुकनं जाहीर केलं तसेच या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उत्पन्नाची वाढ मंदावेल अशी शक्यता व्यक्त केली. या बातमीमुळे तेजीची स्वप्नं बघणाऱ्यांना चाप बसला आणि हा धक्का पचवता न आल्यानं गुंचवणूकदारांनी फेसबुकच्या शेअर्सची विक्री केली, परिणामी काही तासांमध्येच फेसबुकचा शेअर तब्बल 20 टक्क्यांनी घसरला.