ट्विटरवर #We_Support_Dhananjay_munde हा हॅशटॅग ट्रेंड
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर त्यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियात मुंडे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर तर #We_Support_Dhananjay_munde हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.
अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीचा आढावाच कमेंटमध्ये मांडून त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देऊ केलीय. तर काहींनी धनंजय मुंडेंनी स्वत:हून समोर येऊन संबंधित महिलेसोबतच्या संबंधांची कबुली देऊन वस्तुस्थिती मांडल्याबाबत त्यांच्या पाठिशी उभं राहणं पसंत केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आजवर अनेक राजकीय संकटं आली आहेत. संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला आहे. पण त्यांची माणसं आणि त्यांची माती त्यांच्यासोबत आहे, असंही काहींनी म्हटलंय.