शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:33 IST)

व्हॉट्सअॅपवरील व्हायरल अफवांचा पर्दाफाश कसा करता येतो, जाणून घ्या!

‘कृपया जास्तीत जास्त फॉरवर्ड करा’, ‘forwarded as received’, ‘एक  फॉरवर्ड तो देश के नाम बनता है’वगैरे गोड विनंत्या, इमोशनल ब्लॅकमेल आपल्याला रोज मिनिटाला दहाच्या रेटने होत असतं. यातल्या बहुतेक सगळ्याच मेसेजमध्ये या ओळींच्या वर वाटेल ते तारे तोडलेले असतात. मग तो गेले काही दिवस फिरत असणारा ‘नागोठण्यात अजगराने मुलीला गिळल्याची’ खोटी बातमी असेल किंवा मग आपला मुद्दा पटवून द्यायला इतिहासातल्या न घडलेल्या गोष्टी पकवून तयार केलेला मेसेज असेल. आपल्यावर मारा होणारे हे मेसेजेस् किती खरे किंवा खोटे असतात याची शहानिशा करायला सगळ्यांकडेच वेळ असेल असं नाही. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी बंगळुरूमध्ये आयबीएममध्ये काम करणाऱ्या एका साॅफ्टवेअर इंजिनियरने त्याच्या पातळीवर एक मोहीम सुरू केलीये.
 
शमस ओलियाथ गेले सहा महिने ऑफिसच्या लंचटाईममध्ये व्हॉट्सअॅपवरच्या या अशा खोट्या मेसेजेस्चा शोध घेतो. त्यात मेसेजमध्ये केलेला दावा किती खरा आहे ते तो नेटसर्च करून शोधून काढतो. आणि अफवांचा पर्दाफाश करतो. यासाठी त्याने स्वत:ची एक वेबसाईटच सुरू केली आहे. check4spam.com या त्याच्य़ा वेबसाईटवर तो हे सगळे खोटे मेसेजेस् प्रसिध्द करतो आणि ते कसे खोटे आहेत याचे पुरावे, माहिती देतो.
 
या कामासाठी त्याने एक फोन नंबर ठेवला आहे. जर कोणा नेटयूझरला एखादा व्हायरल मेसेज कितपत खरा आहे याची शहानिशा करायची असेल तर तो मेसेज ते या नंबरवर  फॉरवर्ड करू शकतात. शमस मग पुढची सूत्रे आपल्या हातात घेतो. सध्या त्याला दर दिवशी ६० ते ७०  फॉरवर्ड्स येतात. जर एखाद्या अफवेचं आधीच निराकरण झालं असेल तर शम सत्याची लिंक त्या नेटयूझरला पाठवतो. पण जर तसं नसेल तर आपलं तांत्रिक कौशल्य पणाला लावत तो या प्रकरणांचा छडा लावतो.
 
नेटसर्च करायचीसुध्दा एक पध्दत असते. याचंही एक तंत्र समजून घेत कॉर्पोरेट कंपन्यांनी, प्रचारबहाद्दरांनी, मुद्दाम अफवा पसरवणाऱ्यांनी त्यांच्या थापा खऱ्या वाटतील अशी सोय करून ठेवलेली असते. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या तंत्राचा वापर करत ही सगळी माहिती मोठ्या खुबीने पेरली जाते.
 
एखाद्या अफवेविषयी ‘फॅक्टचेकिंग’करताना शमस या सगळ्यांचं भान ठेवत माहिती शोधतो.
 
“एखाद्या अफवेविषयी खरी माहिती शोधताना मी गूगल सर्चमधल्या पहिल्या पानाच्या पलीकडे जात माहिती मिळवतो” शमस ओलियाथ म्हणाला “खरी माहिती अनेकदा तळाशी असते”अर्थात हा नियम सरसकट लागू होत नाही पण आता नेटसॅव्ही झालेल्या थापाड्यांवर मात करायला अशा काही युक्त्या वापराव्या लागतात.