मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

India : व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्ये सर्वात पुढे!

व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्येही भारत अग्रस्थानी आहे कारण भारतीय यूझर्समध्ये व्हॉट्‌सऍपचे वेड इतर देशांच्या तुलनेत जरा जास्तच आहे.  
 
भारतीय यूझर्स व्हॉट्‌सऍपवरुन दररोज 50 मिलियन म्हणजेच 5 कोटी मिनिटे व्हिडिओ कॉल करतात. म्हणजेच भारतीय दररोज सरासरी 8 लाख 33 हजार 333 तास वेळ व्हॉट्‌सऍपच्या व्हिडिओ कॉलिंगवर घालवतात. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत प्रचंड जास्त आहे.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्‌सऍपवरुन व्हिडिओ कॉलिंगला सुरुवात झाली. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी समोर आली आहे. व्हॉट्‌सऍपच्या व्हिडिओ कॉलिंगला स्काईप, फेसबुक मेसेंजरचं व्हिडिओ चॅट, हाईक, वायबर, गुगलचे ऍलो आणि ऍपलचे फेसटाईम यांची टक्कर आहे. इंटरनेटचे घसरते दर आणि रिलायन्स जिओ सारख्या कंपन्यांनी दिलेला फ्री प्रमोशनल डेटा वाढत्या व्हिडिओ कॉलिंगसाठी महत्त्वाचा ठरला आहे. जगभरात दररोज 5.5 कोटी व्हिडिओ कॉल्स केले जातात. जगात दररोज एकूण 34 कोटी मिनिटे व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्सवर बोलले जाते. जगभरात व्हॉट्‌सऍपचे 20 कोटी मासिक ऍक्‍टिव्ह यूझर्स आहेत. कोणतीही थर्ड पार्टी जाहिरात सुरु करण्याचा मानस नसल्याचे व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्‌सऍप कंपनी फेसबुकने विकत घेतली आहे. फोटो स्टोरी, जीआयएफ इमेज यासारखी फीचर्स अलिकडच्या काळात लॉंच करण्यात आली आहेत. त्यानंतर डिजीटल पेमेंटच्या दृष्टीने व्हॉट्‌सऍपचे प्रयत्न सुरु आहेत.