गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

झेंडर : काहीही पाठवा अगदी फुकट

पूर्वी फोटो किंवा व्हिडिओ फाइल्सची साइझ आजच्या तुलनेनं फार कमी असायची. मात्र आता एचडीचा जमाना आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांची भूक वाढली आणि आता आपण फक्त फाइल किंवा गाणे किंवा फोटोच ट्रान्सफर करीत नाही, तर मित्रांना आता आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेला संपूर्ण चित्रपट हवा असतो किंवा मित्राच्या  वाढदिवसाचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हवे असते. स्मार्टफोनमधील कॅमेरे सुद्धा एचडी झालेले आहेत. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओची फाइल साइझही फार वाढलेली आहे. त्यामुळे ह्या फाइल्स ई-मेल किंवा व्हॉट्‌सअ‍ॅप करायच्या म्हटल्या तर शक्य होत नाही. 
 
जसे काही वर्षांपूर्वी आपल्याला मित्रांसोबत एखादे गाणे किंवा फोटो अथवा फाइल शेअर किंवा ट्रान्सफर करायची असल्यास सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ब्ल्यू टूथ. म्हणजे दोन्ही स्मार्ट फोनमधील ब्ल्यू टूथ चालू करून आपण आपल्या मित्राला हवी असलेली फाइल ट्रान्सफर करीत असू; या सर्वांची फाइल ही काही शेकडो एमबीमध्ये किंवा जीबीमध्येसुद्धा असते. अशा वेळी जर या फाइल्स आपण ब्ल्यू टूथच्या माध्यमातून एकमेकांना ट्रान्सफर केल्या तर यामध्ये प्रचंड वेळ जातो. एवढी मोठी व्हिडिओ फाइल ईमेल करू शकत नाही किंवा व्हॉट्‌सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करू शकत नाही; कारण याला फाइल साइजच्या मर्यादा आहेत; फाइल तर मित्राला पाठवायची आहे; मग कसे करणार? मात्र तुमची ही समस्या सोडविण्यासाठी एक अँड्राईड अ‍ॅप तुम्हाला मदत करील; त्याचे नाव आहे-झेंडर (xender file transfershare).
 
काय आहे हे अ‍ॅप?
 
* झेंडर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी मोफत उपलब्ध असून जगभरात जवळपास लाखो यूजर्स झेंडर फाइल ट्रान्सफरसाठी वापरतात.
 
यामध्ये हंगामा हे नवीन फीचर सध्या आले असून याचा वापर करून तुम्ही गाणी प्ले करू शकता तसेच डाउनलोड आणि शेअर सुद्धा करू शकता.
 
* झेंडर अ‍ॅपच्या माध्यमातून फाइल ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याही केबलची गरज नाही किंवा इंटरनेट अथवा वायफाय कनेक्शनचीही गरज नाही. कुठलाही छुपा डेटा यूजेस यामध्ये होत नाही. याच झेंडर अ‍ॅपला पूर्वी फ्लॅशट्रान्सफर या नावानेदेखील ओळखले जायचे.
 
* झेंडर अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही काहीही ट्रान्सफर करू शकता. जसे की, तुमच्या स्मार्ट फोनमधील कॉन्टॅक्ट, फाइल्स, फोटोज‌, गाणी, विविध प्रसंगांच्या फाइल, साइज जास्त असलेले फोटो, एवढंच काय तुम्ही अ‍ॅपसुद्धा तुमच्या मित्रांच्या स्मार्ट फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.  
 
* झेंडरच्या फाइल ट्रान्सफरचा स्पीड हा ब्ल्यू टूथपेक्षा दोनशे पटीने अधिक असतो. तसेच चाळीस एमबी प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड स्पीडने फाइल ट्रान्सफर करू शकता. म्हणजे एखादा अख्खा चित्रपट जरी ट्रान्सफर करायचा असला तरी काही मिनिटांतच ट्रान्सफर करू शकता. तुमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ, ज्याची साइज ही जीबी आहे, तोही सहजगत्या तुम्ही झेंडरच्या मदतीने तुमच्या मित्राला पाठवू शकता.
 
* झेंडरचे अजून एक जादूई फीचर म्हणजे याचा असलेला क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट. याचा अर्थ तुमच्याजवळ अँड्रॉईड मोबाइल आहे आणि तुमच्या ज्या मित्राला फाइल ट्रान्सफर करायची आहे त्याच्याकडे आयफोन आहे; तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही. कारण यामध्ये अँड्रॉईड स्मार्ट फोनमधून आयफोनमध्ये आणि आयफोनमधून अँड्रॉईडस्मार्टफोनमध्ये फाइल ट्रान्सफर करता येते. टायझेन, विंडोज आदी प्लॅटफॉर्म सपोर्ट सुद्धा यामध्ये आहे.